टायफॉईड मेरी : एक स्वयंपाकीण, तिचं स्पेशल पीच आइस्क्रीम आणि त्यानंतर येणारं आजारपण किंवा मृत्यू

फोटो स्रोत, Getty Images
ती स्वयंपाकीण म्हणून श्रीमंतांच्या घरात कामाला जायची. ज्या घरात ती काम करायची तिथली माणसं आजारी तरी पडायची किंवा कोणाचा तरी मृत्यू व्हायचा. ती कामासाठी दुसरं घर शोधायची...
नाही...ती काही सीरियल किलर वगैरे अजिबात नव्हती... पण ती एका अशा आजाराची वाहक होती, जो तेव्हा जीवघेणा होता.
तिच्या शरीरात या आजाराचे जीवाणू होते, पण तिला त्याचा काहीच त्रास होत नव्हता. मात्र तिच्यामुळे इतरांना हा संसर्ग होत होता आणि त्यामुळेच इतिहासात ती टायफॉईड मेरी या नावानेच ओळखली जाऊ लागली.
कोण होती ही मेरी, न्यूयॉर्क शहराला तेव्हा हादरवणारं हे प्रकरण काय होतं, या मेरीचं पुढे काय झालं?
दुसऱ्या महायुद्धाच्याही आधीचा हा काळ...
आर्यलंडमधल्या कुक्सटाऊनमध्ये 1869 मध्ये मेरी मलॉनचा जन्म झाला. तरुण वयातच तिने आपला देश सोडला आणि ती न्यूयॉर्कमध्ये पोहोचली.
साधारण 1900 च्या आसपासचा काळ. मेरी न्यूयॉर्कमधल्या श्रीमंत लोकांच्या घरात स्वयंपाकाचं काम करायला लागली. पीच आईस्क्रीम ही तिची खास डिश. आता या डिशचं आणि तिनं पसरवलेल्या आजाराचं एक कनेक्शन आहे...पण ते सगळ्यांत शेवटी सांगू. आधी मेरीची गोष्ट.
त्याकाळी अमेरिकेत बहुसंख्य लोकांकडे कामाला नोकर असायचे आणि स्वयंपाकी म्हणून काम करणं तर एखाद्या 'किल्ल्याची राणी' असल्यासारखं असायचं.
मेरी तेव्हा मॅनहट्टनमधल्या अतिश्रीमंत भागात काम करायची. 1900 ते 1907 या काळात तिने सात घरांमध्ये काम केल. तिने शेवटचं काम केलेलं घर हे पार्क अव्हेन्यू भागात होतं.
ज्या घरात ती काम करत होती, त्या घरातले लोक आजारी पडायचे किंवा मृत्यूही व्हायचा. आता हे मृत्यू आजारपणाने व्हायचे, त्यामुळे त्यात काही संशयास्पद असण्याचं कारण नव्हतं. मात्र, तरीही त्या कुटुंबासाठी हे धक्कादायक होतं. कारण हे मृत्यू टायफॉईडमुळे व्हायचे.

फोटो स्रोत, Getty Images
आता ऑयस्टर बे किंवा फिफ्थ अव्हेन्यूसारख्या उच्चभ्रू भागात टायफॉईडसारख्या दूषित पाणी किंवा अन्नातून संसर्ग होणाऱ्या आजाराने मृत्यू होणं विचित्र होतं. त्यांच्यासाठी टायफॉईड हा आजार जणू दुसऱ्याच कुठल्या तरी जगातला होता...जिथे गर्दी, अस्वच्छता, गजबजाट होता. न्यूयॉर्कमधल्या फाइव्ह पॉइंट्स, प्रॉसपेक्ट हिल किंवा हेल्स किचनसारखी ठिकाणं, झोपडपट्ट्या, इथेच बहुतेककरून या आजाराचा प्रादूर्भाव दिसून यायचा.
त्यामुळेच मग एका कुटुंबाने जॉर्ज सोपर नावाच्या सॅनिटरी रिसर्चरची मदत घेण्याचं ठरवलं. मेरीसाठी ती धोक्याची घंटा ठरली.
पहिल्यांदा जेव्हा ते तपासासाठी स्वयंपाकघरात गेले, तेव्हा तिने त्यांना मांस कापण्याच्या सुरीचा धाक दाखवूनच बाहेर काढलं. पण त्यांना तिचा संशय आला होता.
मेरीने नेमकं काय केलं की हे लोक आजारी पडले?
मेरी टायफॉईडच्या जीवाणूंची वाहक होती...पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिला स्वतःला कधी हा आजार झाला नव्हता. पण तिच्यामुळे इतरांना संसर्ग होऊ शकत होता. याला तांत्रिक भाषेत 'लक्षणे नसलेला संसर्गवाहक' असं म्हणतात.
अर्थातच, हे सगळं मेरी मलॉनला समजणं शक्यच नव्हतं. संबंधित यंत्रणांना तातडीने कारवाई करायची होती. त्यामुळे त्यांनी 1907 साली मेरीला न्यूयॉर्कच्या बाहेर असलेल्या नॉर्थ ब्रदर नावाच्या एका बेटावरच्या आयसोलेशन फॅसिलिटीमध्ये पाठवलं.
टायफॉईड कशामुळे होतो?
टायफॉईड हा सालमोनेला टायफी या अतिशय संसर्गजन्य जीवाणूमुळे होतो. दूषित पाणी आणि अन्नातून त्याचा प्रादूर्भाव होतो.
जिथे पुरेशी स्वच्छता नसते, पिण्याचं स्वच्छ पाणी नसतं अशा ठिकाणी मुख्यतः टायफॉईडचा संसर्ग होतो.
जगभरात एक ते दोन कोटी लोक टायफॉईडने आजारी पडतात. टायफॉईडमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 128,000 ते 161,000 च्या दरम्यान आहे.

अनेकदा लक्षणं न दिसणाऱ्या व्यक्तींकडून या जीवाणूचा प्रसार होतो. अगदी आताच्या काळातही. मेरी मलॉनचा काळ तर वेगळाच होतो.
नॉर्थ ब्रदर बेटावर सध्या पक्षी अभयारण्य आहे. ते ब्राँक्सजवळ इस्ट रिव्हर नदीवर आहे.
19 व्या शतकात देवीच्या रुग्णांना वेगळं ठेवण्यासाठी तिथे एक केंद्र बनवण्यात आलं होतं. नंतर नंतर ज्या आजारांमध्ये रुग्णांना क्वारंटाईन करण्याची गरज असायची, अशा सगळ्याच आजारांच्या रुग्णांना तिथे ठेवलं जाऊ लागलं.

फोटो स्रोत, Getty Images
आधुनिक वैद्यकशास्त्राच्या सध्याच्या काळात तिथे केले जाणारे उपचार हे काहीसे क्रूर वाटू शकतात. पण जेव्हा अँटीबायोटिक्स नव्हते, लस उपलब्ध नव्हत्या तेव्हा उपचारांसाठी अन्य कोणताही मार्ग नव्हता.
मेरी मलॉनला या केंद्रात पूर्णपणे एकांतवासात ठेवलं. पण तिने याविरोधात कायदेशीर दाद मागायचं ठरवलं. आपण काहीही चुकीचं केलं नसताना असं वाळीत टाकल्यासारखी वागणूक देणं अन्यायकारक असल्याचं तिनं तिच्या वकिलांना सांगितलं.
"ख्रिश्चन समुदाय एका असहाय बाईला अशापद्धतीनं वागवत आहे हे खरंच अविश्वसनीय आहे," असं मेरीने म्हटलं.
मेरीचा युक्तिवाद मान्य झाला आणि तिला सोडण्यात आलं. पण तिच्या स्वातंत्र्याच्या बदल्यात एक अट घातली गेली...तिने पुन्हा कधीही स्वयंपाकी म्हणून काम करायचं नाही.
या सगळ्यात मेरीला मदत झाली होती, वृत्तपत्र व्यवसायातील दिग्गज विल्यम रँडॉल्फ हर्स्ट याची. हर्स्ट यांचं व्यवसायाचं एकच तत्त्व होतं...छापून आलेली प्रत्येक बातमी वाचताना वाचक बसल्या जागेवरून 'गुड गॉड!' म्हणत उठायला हवा.
त्यामुळे मेरीची गोष्ट हर्स्टला खपणीय वाटली यात आश्चर्य़ नव्हतं.
20 जून 1909 ला 'द न्यूयॉर्क अमेरिकन या हर्स्टच्या वर्तमानपत्रात मेरीची गोष्ट पहिल्यांदा छापून आली. हर्स्टच्या पाठिंब्यामुळे मेरीला प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे तिच्याकडे वकील नेमता येण्याइतका पैसाही आला.
कदाचित हर्स्टने तिचे बिलही भरले असावेत, कारण तिच्यामुळेच त्याला चांगली गोष्ट मिळाली होती. त्याच्याच रिपोर्टरने तिला 'टायफॉईड मेरी' हे नाव दिलं होतं. जे तिची आयुष्यभराची ओळख बनून राहिलं.
कसं होतं नंतरचं आयुष्य?
पुन्हा स्वयंपाकी म्हणून काम करणार नाही, या अटीवरच मेरीची सुटका करण्यात आली होती. त्यामुळे तिने कपडे धुण्यासारखी छोटीमोठी कामं करायला सुरूवात केली.
पण नंतर तिने पुन्हा एकदा स्वयंपाकाचीच कामं करायला सुरूवात केली. पण वेगवेगळी नावं घेऊन. सुरुवातीला ती अजाणतेपणी कामं करत होती, पण आपल्यामुळे लोकांना काय त्रास होऊ शकतो याची कल्पना असूनही तिनं चक्क हॉस्पिटलच्या स्वयंपाकघरातच कामाला सुरूवात केली.
परिणाम तोच झाला...तिच्या मागोमाग पुन्हा आजारपण आणि मृत्यूची साखळी सुरू झाली. तिच्यामुळे नेमके किती मृत्यू झाले, हे सांगणं कठीण आहे. ती जिथे काम करत होती, त्या घरांमध्ये तीन मृत्यू तर झाले. पण तिच्यामुळे किमान 50 जणांनी तरी प्राण गमावले असावेत असा अंदाज आहे.

फोटो स्रोत, Getty Images
टायफॉईडमुळे झालेल्या मृत्यूंनंतर पुन्हा एकदा मेरीचा शोध घेतला गेला. 1915 मध्ये तिला पुन्हा शोधलं गेलं. यावेळी तिच्यासाठी वर्तमानपत्रात लेख लिहिले गेले नाहीत. तिच्याबद्दल कोणी सहानुभूती व्यक्त केली नाही.
मेरीला एकांतवासात धाडलं गेलं, पण यावेळी तिची सुटका होणार नव्हती. ती तब्बल 23 वर्षं तिथे होती...तिच्या मृत्यूपर्यंत. 1938 साली तिचा मृत्यू झाला.
तिनं जगाला एक शिकवण दिली...तुम्हाला फारसं वैद्यकीय ज्ञान नसेल किंवा गोष्टींची माहिती नसेल तर तुम्ही डॉक्टरांनी दिलेला सल्ला नीट पाळायला हवा, तर पुढचे अनर्थ टळू शकतात.
आता जाता जाता मेरीच्या स्पेशल डिशबद्दल...पीच आइस्क्रीम तिच्या गोष्टीत एवढं खास का आहे? जर तिची खास डिश पीच आइस्क्रीम नसती, अॅपल पाय असती तर...तिचं नाव टायफॉईड मेरी नसतं. तिच्यामुळे मृत्यूची साखळी तयार झाली नसती. कारण टायफॉईडचे जीवाणू थंड पदार्थात जिवंत राहतात. शिजवल्यावर ते नष्ट होतात. त्यामुळेच या पीच आइस्क्रीमने मेरीला 'टायफॉईड मेरी' बनवलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











