शाई पुसली जात नाही; व्हीडिओ प्रसारित करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय: निवडणूक आयोग

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
फोटो कॅप्शन, राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज (15 जानेवारी) मतदान होत आहे. तब्बल नऊ वर्षांनी होत असलेल्या या निवडणुका सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाच्या आहेत.

नेते, सेलिब्रिटी कलाकार, नागरिक सगळेच आपला मतदानाचा अधिकार बजावत आहेत.

दरम्यान, शाई पुसली जात असल्याच्या आरोपांवर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला आहे.

शाईबाबत निवडणूक आयुक्त काय म्हणाले?

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शाईच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिलंय.

त्यांनी म्हटलंय की, "महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी मार्कर पेनची जी शाई वापरली जात आहे, त्याबाबत बराच संभ्रम पसरवला जातो आहे. त्याबाबत माझं सांगणं असं आहे की, ही शाई जी आहे, ती इंडेलिबल इंक आहे. भारत निवडणूक आयोग जी इंडेलिबल इंक वापरतो, तीच ही इंक आहे. मात्र, ती मार्कर पेनच्या स्वरुपात आहे. असे मार्कर पेन 2011 पासून वापरात आहेत. ही शाई पुसली जात नाही. शाई लावल्यानंतर बारा ते पंधरा सेकंदांनंतर ती ड्राय होते. या शाईविषयी कुठल्याही प्रकारची शंका उत्पन्न करणे, तसे व्हीडिओ बाहेर प्रसारित करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय."

"मतदान केंद्रांमध्ये मतदार प्रतिनिधी असतात. तेदेखील मतदारांची ओळख पटवत असतात. कुणी बोगस मतदान करण्यासाठी येत असेल तर त्यावर मतदार प्रतिनिधी तक्रार करू शकतात. त्यांच्यावर कारवाईही केली जाईल." असं ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, "मतदारांची पण जबाबदारी आहे. शाई सुकेपर्यंत मतदारांनी शाई पुसू नये. तसं होत असेल ती मतदारांची चूक आहे. मुद्दाम जर तसं फेक नॅरेटीव्ह पसरवण्याचं कुणी करत असेल तर आम्ही त्याच्याबद्दल गुन्हा दाखल करू."

मतदान करून बाहेर आल्यावर सॅनिटायझरने शाई पुसली जातीये- राज ठाकरे यांचा आरोप

राज ठाकरे

दरम्यान, मतदानानंतर बोटावर लावल्या जाणाऱ्या शाईवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मतदानानंतर बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईवरून निवडणूक आयोग आणि सरकारवर आरोप केले आहेत.

मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी म्हटलं की, "यापूर्वी बोटाला शाई लावली जायची. पण आता त्यांनी पेन आणला आहे. या पेनबाबत सगळीकडून तक्रारी येत आहेत. मतदान करून बाहेर पडल्यानंतर त्या शाईवर सॅनिटाझर लावल्यानंतर ती शाई जाते. शाई पुसा, परत जा आणि पुन्हा मतदान करा, असा प्रकार सुरू आहे."

त्याचबरोबर त्यांनी नवीन आणलेल्या 'पाडु' मशिनवरूनही आरोप केले.

मतदान

त्यांनी म्हटलं की, , "यापूर्वी बोटाला शाई लावली जात असत. पण आता त्यांनी पेन आणला आहे. या पेनबाबत सगळीकडून तक्रारी येत आहेत. मतदान करून बाहेर पडल्यानंतर त्या शाईवर सॅनिटाझर लावल्यानंतर ती शाई जाते. शाई पुसा, परत जा आणि पुन्हा मतदान करा, असा प्रकार सुरू आहे."

ऐनकेन प्रकारे निवडणुका जिंकायच्या आणि त्यानंतर वाटेल ते करायचं असं सरकारचं सुरू आहे. विरोधी पक्ष वगैरे काही गोष्टी ठेवायच्या नाहीत, दुसऱ्या पक्षाने निवडणुका लढायच्या नाहीत, असं सरकार करत असल्याचंही त्यांनी म्हटलं.

विधानसभेवेळीही त्यांनी हेच केलं होतं आणि आताही ते हेच करत आहेत, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

'निकालानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी ते करत आहेत'

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महानगर पालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 15 मधून मतदानाचा हक्क बजावला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरमपेठ भागातील व्हीआयपी रोडवरील धरमपेठ हिंदी उच्च प्राथमिक शाळेच्या आदर्श महिला मतदान केंद्रावर त्यांच्या मातोश्री सरिता फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह मतदान केले.

देवेंद्र फडणवीस

मतदानानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं की, मार्कर वापरायचं की आणखी काय हे निवडणूक आयोग ठरवतं. याआधीही मार्कर पेन वापरला गेला आहे. कोणाचे काही आक्षेप असतील तर इलेक्शन कमिशनने लक्ष द्यावं. उद्याचा निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी ते करत आहेत.

मला सुद्धा मार्कर पेन लावण्यात आला. माझ्या बोटावरची मार्कर पेनची शाई पुसली जात नाहीये, असं म्हणत फडणवीसांनी स्वतः शाई पुसून दाखवली.

ज्येष्ठांचं मतदान

मतदानाला गुरुवारी सकाळी 7.30 वाजता सुरूवात झाली असून संध्याकाळी साडे पाच वाजेपर्यंत मतदान करता येईल.

अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांनी प्रकृतीचा विचार न करता मतदान केलं.

ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी किसन नगर येथील मतदान केंद्रावर 83 वर्षीय लक्ष्मी कदम यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. "आता चालायला होत नसलं तरी, देखील मी वयाच्या विसाव्या वर्षापासून मतदान आवर्जून करते आणि सगळ्यांनी मत द्यायला हवं, असं त्यांनी म्हटलं.

लक्ष्मी कदम
फोटो कॅप्शन, लक्ष्मी कदम

तर दुसरीकडे दोनच दिवसापूर्वी गुडघ्याचं ऑपरेशन झालेल्या 53 वर्षीय इंदुबाई शिवळे यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी मतदानाचं महत्त्व सांगताना म्हटलं की, "पाच वर्षातून एकदाच मतदान येतं, त्यामुळे काही असो सर्वांनी मतदानाचा हक्क बजावायला हवा. मी या परिस्थितीत देखील माझा हक्क बजावण्यासाठी कुटुंबाच्याबरोबर आले."

वनमंत्री गणेश नाईक यांची मतदानासाठी धावपळ, पनवेलमध्ये गोंधळ

राज्याचे वनमंत्री गणेश नाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांना मतदान करण्यासाठी तब्बल 1 तास धावपळ करावी लागली. त्यानंतर त्यांना मतदान करता आलं. याप्रकारामुळे गणेश नाईक यांनी निवडणूक आयोगाच्या यंत्रणेवर गंभीर आरोप केले. आयोगाची यंत्रणा व्यवस्थित काम करत नसल्याचे त्यांनी म्हटले.

गणेश नाईक आणि त्यांचे कुटुंबीय सकाळी 7.30 वाजता मतदानासाठी सज्ज झाले होते. नाईक यांचं मतदान केंद्राचं नाव समजत नव्हतं. त्यासाठी ते दोन मतदान केंद्रांवर फिरून आले. पण तिथेतही त्यांचं नाव सापडत नव्हतं. सुमारे तासभर हा सर्व प्रकार सुरू होता.

गणेश नाईक

अखेरीस त्याचं आणि त्यांच्या कुटुंबीयातील काही जणांची नावं हे कोपरखैरणे येथील सेंट मेरी हायस्कूल मतदान केंद्रावर आढळून आली.

या मतदान केंद्रावर गणेश नाईक, संजीव नाईक आणि सून कल्पना नाईक यांची नावं होती. तर पुतणे माजी महापौर सागर नाईक आणि त्यांच्या पत्नीचं नाव वेगळ्याच ठिकाणी आलं होतं.

पनवेल येथेही महानगरपालिकेसाठी मतदान सुरू आहे. परंतु, तिथे एका मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याचे दिसून आले. पनवेलमधील प्रभाग क्रमांक 19 मध्ये भाजप आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमनेसामने आले.

प्रभाग क्रमांक 19 मधील गुजराती शाळेतील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला. त्यामुळे काही काळ तिथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दुबार मतदार असल्याचे म्हणत संबंधित मतदाराला लॉकअपमध्ये टाका असं म्हणणाऱ्या व्यक्तीवर भाजपचे कार्यकर्ते चिडले. त्यातून दोन्ही बाजूने वाद सुरू झाला. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला.

मतदान यंत्रावर रोहित पवार यांचा संशय

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मतदान यंत्राबाबत संशय व्यक्त केला आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत निवडणूक आयोगाला निवडणुकीच्या गोंधळाबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे.

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यात अनेक ठिकाणी मतदानाची सुरवातच बंद मशीनने झाली, तर अनेक ठिकाणी इव्हीएमवरील वेळ सुमारे 15 मिनिटे उशिराची दाखवली जातेय.

रोहित पवार ट्वीट

फोटो स्रोत, Social Media

फोटो कॅप्शन, रोहित पवार ट्वीट

काही ठिकाणी तिसऱ्या उमेदवाराला मत दिल्याचं बटन दाबल्यानंतर लाइट लागते तर काही ठिकाणी शेवटचं (चौथं) बटन दाबल्यानंतर आवाज येतो पण लाईट लागत नाही.

एकूणच हे सगळंच संशयास्पद आणि निवडणुकीबाबत अविश्वास निर्माण करणारं आहे. निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्टीकरण देऊन हा गोंधळ तातडीने दूर करावा आणि मतदान हे मुक्त व निर्भय वातावरणासह मत दिलेल्या उमेदवारांनाच ते गेलं पाहिजे, याची काळजी घ्यावी," असं म्हटलं आहे.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची व्यवस्था

महानगरपालिका निवडणुकांसाठी पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी 11 हजार 349 कंट्रोल युनिट आणि 22 हजार 698 बॅलेट युनिटची व्यवस्था केली आहे.

मुंबई वगळता अन्य सर्व 28 महानगरपालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेत एका प्रभागातून एकच सदस्य निवडून द्यावयाचा असल्याने प्रत्येक मतदाराला केवळ एकच मत द्यावे लागेल.

मतदान

फोटो स्रोत, Getty Images

इतर 28 महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे प्रत्येक प्रभागात साधारणत: चार जागा असतील. काही महानगरपालिकांच्या प्रभागांत तीन किंवा पाच जागाही असतील.

राजकीय पक्षांची बैठक

महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीची तयारी; तसेच 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समितींच्या निवडणुकांची तयारी याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणीकृत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (14 जानेवारी ) बैठक घेण्यात आली.

आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार शर्मा आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)