'या' 12 पैकी एक कागदपत्र असेल, तरी मतदान करता येणार

फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी आज (20 नोव्हेंबर 2024) मतदानाला सुरुवात झालीय.
नागरिकांना या निवडणुकीत मतदान करणाऱ्यासाठी जसं मतदान यादीत नाव असणं आवश्यक आहे, तसंच मतदान केंद्रावर गेल्यावर मतदान ओळखपत्र दाखवणंही आवश्यक आहे.
जर निवडणूक आयोगाकडून देण्यात येणारं ओळखपत्र नसेल किंवा गहाळ झालं असेल, तर अशावेळी काय करावं असाही प्रश्न काही मतदारांना पडतो. याबाबतच निवडणूक आयोगाने आणि राज्याच्या माहिती संचलनालयाने माहिती दिली.
महाराष्ट्राच्या माहिती संचलनालयाने मतदान ओळखपत्र नसेल, तर ओळखीचा पुरावा म्हणून 12 पर्यायी कागदपत्रांची यादी जारी केली आहे. यात आधार कार्डापासून अनेक दस्तावेजांचा समावेश आहे.
महाराष्ट्राच्या माहिती व जनसंपर्क संचलनालयाने म्हटलं, "मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांची ओळख पटविण्यासाठी 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. या छायाचित्र ओळखपत्रांपैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहे."

फोटो स्रोत, Getty Images
'हे' आहेत 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे
1. आधार कार्ड
2. मनरेगा रोजगार ओळखपत्र
3. बँक किंवा टपालाचे फोटोसह पासबूक
4. पारपत्र (पासपोर्ट)
5. वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स)
6. पॅनकार्ड
7. भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी दिलेले स्मार्ट कार्ड
8. कामगार मंत्रालयाचे आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
9. केंद्र किंवा राज्य शासनाचे निवृत्ती वेतनाचे दस्तावेज
10. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र ओळखपत्र
11. संसद सदस्य (खासदार), विधानसभा/विधानपरिषद सदस्य (आमदार) यांचे अधिकृत ओळखपत्र
12. भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र
(अनिवासी भारतीयांना त्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक)


मतदान यादीत नाव आहे का, हे कसं तपासायचं?
तुम्हाला वाटू शकतं गेल्या निवडणुकीच्या वेळी मतदार यादीत नाव नोंदणी झाली, तेव्हा तुमचं नाव होतं, मग यावेळी करायची गरज आहे की नाही? तर त्याचं उत्तर असं आहे की, दरवेळी निवडणूक आयोगाकडून आपल्या याद्या अद्ययावत केल्या जातात.
बऱ्याचदा मतदार यादीतून नाव गाळलं जाऊ शकतं. त्यामुळे आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही हे तपासून पाहावं.
केंद्रीय निवडणूक आयोग मतदारांची यादी 'Voters Service Portal' या मतदार यादीमध्ये देत असतं. या मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही ते या लिंकवर क्लिक करून पाहा.
या मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही ते या लिंकवर क्लिक करून पाहा.

फोटो स्रोत, Getty Images
मतदान ओळखपत्र हरवलं असेल, तर काय कराल?
काहीजण असे असतात ज्यांचं व्होटर आयडी कार्ड हरवलं आहे किंवा नाव, पत्ता अशा गोष्टी बदलायच्या आहेत.
त्यासाठी तुम्ही https://voters.eci.gov.in/ या वेबसाईटवरचा फॉर्म 8 डाउनलोड करू शकता आणि आवश्यक कागदपत्रांसह तो जमा करू शकता.
सगळ्या गोष्टी योग्य असतील तर तुम्हाला कमीत कमी सात दिवसांनी व्होटर आयडी कार्ड मिळेल. अर्थात जास्तीत जास्त किती वेळ लागेल याची काही मर्यादा नाही.
तुमच्या मनात काही शंका असतील तर 1950 या नंबरवर कॉल करू शकता किंवा निवडणूक आयोगाच्या नॅशनल ग्रिव्हन्सेन्स सर्विस पोर्टलवर जाऊन माहिती पाहू शकता.

फोटो स्रोत, Getty Images
तसंच, मतदानओळखपत्र हरवल्यास आणखी एक पर्याय म्हणजे पोलीस तक्रारीचा.
जर तुमचं ओळखपत्र हरवलं असेल तर 25 रुपये भरून आणि पोलिसांकडे केलेल्या तक्रारीची पोचपावती जोडून इलेक्शन रजिस्ट्रार ऑफिसमध्ये नेऊन जमा करावा.
मतदार यादीमध्ये नाव दुरुस्ती
जर तुमचं नाव यादीमध्ये आहे पण ते चुकलं असेल तर फॉर्म 8 भरून रजिस्ट्रेशन करता येतं. जर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलात आणि तुम्हाला तुमचं नाव तिथं नोंदवायचं असेल तर फॉर्म 6 भरावा लागतो.
जर कुणाच्या नावावर तुमची हरकत असेल तर फॉर्म 7 भरावा लागतो.
हे फॉर्म तुम्हाला निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर मिळतील.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











