'300 रुपये मजुरी'साठी गेला 14 महिलांचा जीव, गावकरी म्हणतात 'आमच्या जीवाची काही किंमत नाही का?'

- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठी
- वाचन वेळ: 6 मिनिटे
"माझे लहान लहान नातू मम्मी कुठं गेली म्हणून विचारतात. नात म्हणते मम्मी देवाघरी गेली. पण, नातू ऐकायला तयार नाही. तो म्हणतो माझी आई दवाखान्यातच आहे. दोघंच भाऊ एकमेकांसोबत बोलत बसतात. माझ्या नातवांचं कसं होईल?"
नागपूर काटोल महामार्गावरील मेटपांजरा गावातल्या गीता टेकाम यांचा हंबरडा काळीज पिळवटून टाकणारा होता. त्यांची सून वर्षा टेकाम यांचा नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव इथल्या एसबीएल एनर्जी लिमिटेड या कंपनीतल्या स्फोटात मृत्यू झाला.
त्यांना पाच वर्षांची जुळे आहेत. त्यात एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा आदल्या रात्रीच आपल्या आईला कामाला नको जाऊ म्हणत होता. होळी आहे तर कशाला कामाला जाते. मम्मी घरीच राहा, असं म्हणत होता. पण, आपल्याच लेकरांसाठी दोन पैसे येतील असा विचार करत वर्षा कंपनीत मजुरीला गेल्या. लेकरं, नवरा, सासरे झोपूनच असताना रविवारी 1 मार्चला पहाटे 5 वाजताच त्या घरातून गेल्या.
घरातून निघताना सासू म्हणाल्या की लेकरं नको जाऊ म्हणतात तर कशाला जातेस. पण, आज जाते आणि धुळवडीला घरी राहील असं म्हणून घरातून निघाल्या त्या कायमच्या.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
आपल्या सूनेला शेवटचं कधी बघता येईल? यासाठी गीता महामार्गाकडे टक लावून पाहत बसल्या होत्या. त्यांच्या डोळ्यातून सारखे अश्रू टपकत होते. मध्येच नातवांकडे पाहून त्या टाहो फोडत होत्या.
पण, त्या निरागस लेकरांना आपली आई आपल्याला सोडून गेली हे समजत सुद्धा नव्हतं. कारण, अवघी पाच वर्षांची ही दोन्ही मुलं आहेत.
वर्षा यांच्या पतींचा अपघात झाला आहे. त्यामुळे ते जास्त काम करू शकत नाही. घरचा खर्च कसा चालेल? आपल्या मुलांचं भवितव्य चांगलं व्हावं यासाठी वर्षा 300 रुपये मजुरीनं स्फोटकांच्या कंपनीत जात होत्या. पण, मुलांचं भवितव्य घडवण्याच्या आधीच त्या निघून गेल्या.
'आईच गेल्यावर आता मी कोणाला कायच मागू?'
इथून पुढे तीन किलोमीटर आतमध्ये गेल्यानंतर आजनगाव लागतं. या गावातल्या दोन महिलांचा या स्फोटात मृत्यू झाला. यापैकी एक संगीता पंचभाई.
त्यांच्या दोन्ही मुली आपल्या आईला शेवटचं कधी बघतोय यासाठी घरासमोर रस्त्यावरच हुंदके देत उभ्या होत्या, तर दहावीत असलेला मुलगा आईचा मृतदेह आणायला नागपूरला गेला होता.
"आईला कंपनीत जाऊ नको म्हणत होतो. पण, आमच्या शिक्षणासाठी आई कंपनीत जात होती. आईवरच घरचं सगळं अवलंबून होतं. आता आम्ही काय करायचं?" असं म्हणत 21 वर्षीय गुंजन पाचभाई सारखी रडत होती.
गुंजन आर्वी इथं शिकायला असते. त्यामुळे गेल्या जानेवारी महिन्यापासून तिनं आईला पाहिलं देखील नव्हतं. चार दिवसांच्या आधी होळीला घरी येशील का? असं आईनं विचारलं होतं. तेव्हाच गुंजनचं आईसोबत बोलणं झालं होतं.
मी होळीला येणार होते. पण, त्याआधीच माझ्या आईनं बोलावून घेतलं. आता आई गेल्यावर कोणाला मी कायच मागू? असं म्हणत दोघी बहिणींनी परत हंबरडा फोडला.

आजनगावच्या दहा महिला दररोज एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीत कामाला जातात, तर इथूनच दोन किलोमीटरवर असलेल्या ढवळापूर गावातल्या 20 महिला कामाला जातात. पण, आता असा स्फोट झाल्यानं अनेक महिलांच्या मनात भीती बसली आहे.
याच गावातल्या पूनम मडके म्हणतात, "मी पाच वर्षांपासून या कंपनीत कामाला जात आहे. आजपर्यंत काही झालं नाही. पण, झालं तर एकावेळी इतक्या महिलांचा जीव गेला. आता मी या कंपनीत कधीच कामाला जाणार नाही."
ढवळापूरमधील दोन महिलांचा या स्फोटात मृत्यू झाला, तर एक महिला जखमी आहे.

अनित वालके हा दहावीतला मुलगा आणि त्याचा लहान भाऊ आईच्या प्रेमाला कायमचे मुकले. त्याची आई प्रतिभा वलके सुद्धा या स्फोटात गेली. वालके यांच्या घरी सगळे नातेवाईक जमले होते. आपली मुलगी कधी येईल याकडे प्रतिभा यांची आई डोळे लावून बसली होती. त्या एकटक रडवलेल्या चेहऱ्यानं शून्यात बघत होत्या.
अनितने आपल्या आईला एक महिन्यापासून पाहिलेलं नव्हतं. कारण, तो शिकायला काकाजवळ नागपूरला राहत होता. होळीला तो आपल्या आईला भेटणार होता. पण, त्याआधीच आई निघून गेली.
त्याचा लहान भावानं आईच्या आठवणीत रात्रभर रडला. कारण, तो आईच्या जास्त जवळ होता.
प्रतिभा यांच्यासोबतच कामाला जाणाऱ्या त्यांच्या मैत्रिण ललिता मेश्राम यांना तर मोठा धक्का बसला. त्यांनी आपल्या मैत्रिणींचे मृतदेह बाहेर निघताना पाहिले. त्यामुळे तेच ते डोळ्यासमोर दिसत असल्यानं त्यांनी ताप काढला.
कालपासून शून्यात बघत त्या सारख्या रडत आहेत.
स्फोटात 19 मृत्यूंपैकी 14 महिला
फक्त या तीन महिलांची लेकरं आईच्या प्रेमाला कायमची मुकली असं नाही. या स्फोटात 19 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी 14 महिला आहेत.
या सगळ्या महिला 40 पर्यंतच्या वयोगटातल्या होत्या आणि सगळ्यांच्या घरची परिस्थिती सारखीच होती. घरी शेती नसलेले हे सगळे मजूर आहेत.
आपलं पोट भरण्यासाठी अगदी 300 रुपये मजुरीनं स्फोटकांच्या कंपनीत जीव मुठीत घेऊन कामाला जातात.
हे सगळे मजूर स्फोट झाला त्याच्या 30 किलोमीटर परिघातील गावातले आहेत. या गावांमध्ये फिरताना होळीसारख्या सणाच्या दिवशी भयाण शांतता होती. सगळी गावं उदास वाटत होती. कारण, या गावांमधले दोन जण या स्फोटात गेले होते.

ही शांतता आणि हुंदक्यांचे आवाज ऐकून आमचा पाय पुढे सरकत नव्हता. जीव गेला त्या घरची परिस्थिती पाहून आमच्या डोळ्यात अश्रू येत होते.
तुटपुंज्या पगारात आपला जीव धोक्यात टाकणाऱ्या मजूर गावात अनेक होते. या गावातला प्रत्येकजण एकच प्रश्न विचारत होता, आमच्या जीवाची किंमत काय?
"आम्ही कंपनीत जातो. पण, कंपनीत आमची युनियन होऊ दिली जात नाही. कोणी बोललं तर दुसऱ्या दिवशीपासून येऊ नको म्हणतात. 12 तासांचं काम 8 तासात काढून घेतात. मग असे स्फोट होतात," असे कामगार नाव न घेण्याच्या अटीवर सांगत होते.
स्फोटांवर स्फोट, जबाबदार कोण?
नागपूर जिल्ह्यात अशा स्फोटकांच्या कंपनीत स्फोट होतात, जीव जातात आणि मृतांच्या नातेवाईकांना पाच दहा लाख रुपयांची मदत होते. त्यानंतर पुन्हा दुसरा स्फोट होतो आणि पुन्हा जीव जातात यापलीकडे काहीच घडत नाही.
गेल्या डिसेंबर 2023 पासून नागपूर जिल्ह्यात सहा कंपन्यांमध्ये स्फोट झाले. यामध्ये 44 लोकांना आपला जीव गमवावा लागला, तर 48 लोख जखमी झाले होते.

नागपुरात पेट्रोलियम अँड एक्सप्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायजेशन म्हणजेच पेसोचं मुख्यालय आहे. पेसो या कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्याचं काम करते. या कंपन्यांमध्ये सुरक्षा नियम पाळले जातात का? क्षमतेपेक्षा जास्त दारूगोळा ठेवला जात नाही ना? पेसोचे सगळे नियम इथं पाळले जातात का? हे तपासण्याची जबाबदारी आणि या कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पेसोची असते. तसेच डायरेक्टोरेट ऑफ इंडस्ट्रीयल सेफ्टी आणि हेल्थ (DISH) चे कार्यालय देखील नागपुरात आहेत. औद्योगिक सुरक्षा कशी आहे हे तपासण्याचं काम यांचं असतं.
या बाबत दोन्ही कार्यालयांची बाजू घेण्याचा बीबीसी मराठीने प्रयत्न केला पण प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकले नाही.
पण, महत्त्वाची कार्यालयं नागपुरात असूनसुद्धा याच जिल्ह्यात अडीच वर्षांत सहा स्फोट होऊन 44 लोकांना आपला जीव गमवावा लागतो.
आता पेसो, डिश आणि कामगार आयुक्त यांची जबाबदारी निश्तित करण्याचे आदेश महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत दिले.

ते माध्यमांसोबत बोलताना म्हणाले, कंपनीत सुरक्षेचे नियम पाळले जात नव्हते. हलगर्जीपणामुळे, निष्काळजीपणामुळे हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अहवाल आला आहे. पण, अजूनही चौकशी सुरू आहे. खरंतर ही कंपनी कुठलेही नियम पाळत नव्हती. त्यामुळे आता आम्ही जबाबदार संघटना पेसो, डिश आणि कामगार आयुक्त यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी या अधिकाऱ्यांच्या जबाबदारी निश्चित करतील. वेळ पडली या सरकारी अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखला करता येईल का? याचा विचार सुरू आहे.
कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
मृतांच्या नातेवाईकांना कंपनीकडून 75 लाख रुपये, तर राज्य शासनाकडून 5 लाख आणि केंद्र सरकारकडून दोन लाख अशा 82 लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याचं आश्वासन बावनकुळे यांनी दिलं.
ते पैसे वारस 18 वर्षांचे झाल्याशिवाय कोणालाही काढता येणार नाही.
तसेच आता कंपनीच्या संचालकासह 21 जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी 11 जणांना अटक करण्यात आली आहे. उरलेल्या लोकांना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलीस अधिकारी अनिल म्हस्के यांनी दिली.

कंपनीचं म्हणणं काय आहे?
स्फोटाबद्दल कंपनीनं प्रतिक्रिया दिली असून ही घटना प्रकल्पाच्या पॅकिंग विभागात घडली असल्याचं सांगितलं आहे.
त्यांनी पुढे म्हटलं, "घटना घडली तेव्हा पॅकिंग विभागात कुठलीही उत्पादन प्रक्रिया सुरू नव्हती. स्फोटाचे नेमके कारण चौकशीनंतर समोर येईल. आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहोत.
जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च कंपनी करणार असून इतर लोकांना आवश्यक ती आर्थिक मदत पुरवणे आमची जबाबदारी आहे.
सध्या परिस्थिती नियंत्रणात असून अंतर्गत आढावा घेत आहोत. चौकशीच्या निष्कर्षांच्या आधारे योग्य त्या दुरुस्ती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येतील."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











