थंडी ठरू शकते आरोग्यासाठी घातक; 'हे' आहेत डॉक्टरांनी सुचवलेले महत्त्वाचे उपाय

फोटो स्रोत, Getty Images
- Author, शुभ राणा
- Role, बीबीसी हिंदी
बोचरी थंडी आणि धुक्याची चादर पांघरलेल्या पहाटे ब्लँकेटमधून बाहेर पडणं कठीण वाटतं. अशातच सकाळी उठायचं, तयार होऊन कामावर जायचं अनेकांसाठी सर्वात कठीण काम होऊन जाते. उत्तर भारतात धुक्यामुळं आणि थंड हवेमुळे लोकांच्या कामावरही परिणाम होतो.
पण तुम्हाला माहीत आहे का, हीच थंडी तुमच्या आरोग्यावर थेट आणि गंभीर परिणाम करू शकते? हिवाळा केवळ आपली दिनचर्याच बदलत नाही, तर तो आपल्या शरीरावर, विशेषतः हृदय आणि फुफ्फुसांवर थेट परिणाम करतो.
पण थंडीचा परिणाम फक्त आपल्या दिनचर्येपर्यंत मर्यादित नाही. पीआयबीने राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) 'भारतातील अपघाती मृत्यू आणि आत्महत्या' या शीर्षकाच्या अहवालाचा दाखला देत सांगितले की, 2019 ते 2023 दरम्यान थंडीच्या लाटेत प्रभावित झाल्याने एकूण 3639 लोकांचा मृत्यू झाला.
हिवाळ्यात वाहणाऱ्या थंड हवेचा आरोग्यावर काय परिणाम होतो, हे समजून घेण्यासाठी बीबीसी न्यूजने काही आरोग्य तज्ज्ञांशी संवाद साधला.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने थंडीची लाट आणि दवाचा सामना करण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करण्याशी संबंधित राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे, 2021 मध्ये सांगितले आहे की, भारताची सुमारे 90.90 कोटी लोकसंख्या अशा भागात राहते, ज्यांना मुख्य थंडीच्या लाटेचं क्षेत्र किंवा 'कोअर कोल्ड वेव्ह झोन' मानले गेले आहे.
भारताचा उत्तरेकडील भाग, विशेषतः पर्वतीय भाग आणि त्यांना लागून असलेले मैदानी प्रदेश, कोअर कोल्ड वेव्ह झोनमध्ये येतात. हा झोन देशातील 17 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेला आहे.
मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मुले आणि वृद्ध या परिस्थितीला अधिक संवेदनशील असतात. एनडीएमएच्या मते, थंडीच्या लाटेचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. भारतात 2001 ते 2019 दरम्यान वेगवेगळ्या राज्यांमध्ये थंडीमुळे 4,712 लोकांचा मृत्यू झाला आहे.
थंड हवा शरीराला कशी इजा पोहोचवते?
थंड हवा शरीराला कसं नुकसान पोहोचवते यावर अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या 'जेएसीसी' जर्नलमध्ये 2024 मध्ये एक संशोधन प्रसिद्ध झाले.
हा अभ्यास युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी काँग्रेस 2024 मध्ये सादर करण्यात आला होता. यामध्ये असे म्हटले आहे की अत्यंत थंड हवामान आणि अचानक येणारी शीतलहर हार्ट अटॅकचा धोका वाढवते.
या अभ्यासानुसार महत्त्वाची बाब म्हणजे हा धोका थंडी वाजल्याबरोबर नाही, तर थंडी अंगाला लागल्यानंतर 2 ते 6 दिवसांनी सर्वात जास्त असतो.

फोटो स्रोत, Getty Images
नवी दिल्लीच्या वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज आणि सफदरजंग हॉस्पिटलमधील कार्डिओलॉजी विभागाचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख डॉ. एच.एस. इस्सर म्हणतात की, जशी थंड हवा शरीराला लागते, तसे आपले शरीर आपोआप 'सर्वायव्हल मोड'मध्ये जाते. या काळात शरीराची सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टिम सक्रिय होते, ज्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात.
ते म्हणतात की याचा थेट परिणाम रक्तदाब आणि हृदयाच्या कार्यक्षमतेवर होतो. परिणाम असा होतो की, रक्तदाब वाढतो आणि हृदयाला सामान्य स्थितीपेक्षा जास्त मेहनत करावी लागते.
डॉ. इस्सर यांच्या मते, थंडीत शरीर ॲड्रेनालिन आणि कोर्टिसोलसारखे स्ट्रेस हार्मोन्स देखील जास्त प्रमाणात सोडते. हे हार्मोन्स हृदयाचे ठोके जलद करतात, नसांना अधिक आकुंचित करतात आणि रक्तामध्ये सूज वाढवतात.
त्यांचे असे म्हणणे आहे की, थंडीच्या दिवसात लोक पाणी कमी पितात, ज्यामुळे रक्त थोडे जाड होते. हिवाळ्यात प्लेटलेट्स जास्त सक्रिय होतात, म्हणजेच रक्ताच्या गुठळ्या होण्याची प्रवृत्ती वाढते. हीच कारणे आहेत ज्यामुळे या ऋतूत हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका सामान्य दिवसांच्या तुलनेत जास्त असतो.
श्वसनासंबंधी त्रास
दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयातील मेडिसिन विभागाचे संचालक डॉ. पुलिन कुमार गुप्ता म्हणतात की, थंडी वाढल्यामुळे शरीर आपल्या महत्त्वाच्या अवयवांना जसे की मेंदू, हृदय आणि यकृत यांना रक्ताचा पुरवठा कायम ठेवू इच्छिते.
त्यामुळे शरीराच्या बाहेरील नसा, त्वचा, हात-पायांच्या छोट्या नसा आकुंचन पावतात. यामुळे हात-पायांच्या बोटांपर्यंत रक्त कमी पोहोचते.
अनेक लोकांची बोटे किंवा हात-पाय अशा वेळी निळे पडतात, ज्याला 'रेनॉड्स फेनोमेनन' म्हणतात. जर ही स्थिती बराच काळ राहिली तर रक्ताच्या कमतरतेमुळे टिश्यू मरू लागतात, ज्याला 'फ्रॉस्टबाइट' किंवा थंडीमुळे होणारे 'गँगरीन' म्हणतात.
यामध्ये तीव्र वेदना होऊ शकतात किंवा तो भाग सुन्न पडू शकतो. सर्वात जास्त धोका कान, नाक आणि बोटांना असतो.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. गुप्ता यांनी थंडीतील श्वसनाच्या समस्यांवरही भाष्य केले. ते सांगतात की, थंडीत थंड आणि कोरडी हवा श्वसननलिकेत जळजळ निर्माण करते.
यामुळे खोकला वाढतो आणि ब्रॉन्कायटिसचे अटॅक तीव्र होतात. थंड हवा अस्थमा ट्रिगर करते आणि श्वासनलिका आकुंचन पावल्यामुळे श्वास घेणे कठीण होते.
हिवाळ्यात लोक कमी पाणी पितात, ज्यामुळे श्वसननलिकेतील म्यूकस सुकतो. हा म्यूकस बॅक्टेरिया आणि व्हायरसला बाहेर काढण्यास मदत करतो, पण सुकल्यावर तो हे काम नीट करू शकत नाही.
हीटर चालवल्याने खोलीतील हवा अधिक कोरडी होते, ज्यामुळे अस्थमा आणि ब्रॉन्कायटिसचा त्रास वाढतो.
थंडीचा ऋतू इन्फ्लुएन्झा, न्यूमोनिया यांसारख्या व्हायरस आणि बॅक्टेरियांच्या वाढीसाठी पोषक असतो, तर थंडीमुळे रोगप्रतिकारशक्ती देखील थोडी कमकुवत होते.
व्हायरस थंडीत जास्त सक्रिय राहतात, ज्यामुळे संसर्ग सहज पसरतो.
सर्वात जास्त धोका कुणाला?
डॉ. इस्सर यांच्या मते, थंड हवेचा सर्वात जास्त धोका ज्यांचे हृदय आधीच कमकुवत आहे त्यांना असतो, विशेषतः ज्यांना आधी हार्ट अटॅक येऊन गेला आहे.
वृद्धांमध्ये आधीच रोगप्रतिकारशक्ती कमी असते, त्यामुळे थंडीत न्यूमोनिया, फ्लू, श्वासाचा त्रास, अस्थमा-सीओपीडी सारख्या समस्यांचा धोका वाढतो.
मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर अनियंत्रित होऊ शकते कारण हिवाळ्यात शारीरिक हालचाल कमी होते आणि खानपान देखील प्रभावित होते.
तसेच कमी वजन असलेल्या किंवा किडनीच्या समस्या असलेल्या लोकांवर थंडी हृदय आणि किडनीवर अतिरिक्त दबाव टाकू शकते.
हिवाळ्यात कोणत्या चुका टाळायच्या?
इस्सर यांच्या मते, हिवाळ्यात अनेक लोक सकाळी उठल्याबरोबर वॉर्म-अप न करता थंडीत बाहेर पडतात किंवा अचानक जोरदार व्यायाम किंवा काम सुरू करतात. हे शरिरासाठी धोकादायक असते कारण थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे रक्तदाब आणि हार्ट रेट वाढतो.
अचानक जड काम किंवा व्यायामामुळे हृदय आणि मेंदूवर अतिरिक्त दबाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो, विशेषतः हायपरटेंशन, हृदयविकार किंवा मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये.
डॉ. इस्सर म्हणतात की डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध बदलू नका किंवा बंद करू नका.
थंड हवेपासून बचाव कसा करावा?
थंड हवेपासून स्वतःचा बचाव कसा करावा यावर डॉ. गुप्ता म्हणतात की, हिवाळ्यात लोक अनेकदा एक जाड जॅकेट किंवा स्वेटर घालून बाहेर पडतात, पण त्यापेक्षा चांगले म्हणजे अनेक कपडे एकावर एक घालणे, जसे की इनर, त्यावर शर्ट, मग स्वेटर आणि शेवटी जॅकेट. कारण प्रत्येक लेयरच्या मध्ये हवा अडकते आणि हवा उष्णतेची दुर्वाहक असते.
ही शरीरातील उष्णता बाहेर जाण्यापासून रोखते, ज्यामुळं अधिक संरक्षण मिळतं. ते असा सल्ला देतात की लोकांनी जॅकेटसोबत टोपी घातली पाहिजे जेणेकरून कान झाकले जातील. पार्कमध्ये अनवाणी चालल्याने थंडी लागू शकते, अशा वेळी शूज आणि मोजे वापरावेत.
सकाळ-संध्याकाळ जॉगिंग किंवा व्यायामासाठी बाहेर पडू नका. हिवाळ्यात तापमान कमी असल्याने प्रदूषण आणि स्मॉग खाली येतो, जो श्वसनाचा त्रास वाढवतो. जर बाहेर पडायचे असेल तर दुपारी जा किंवा मास्क घालून बाहेर पडा.

फोटो स्रोत, Getty Images
हातमोजे नक्की वापरा, विशेषतः दुचाकी, रिक्षा किंवा सायकल चालवणारे. डॉ. गुप्ता सांगतात की थंडीपासून वाचण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे जितके शक्य असेल तितके घराच्या आत राहणे.
बाहेर जाणे खूप गरजेचे असेल तर मल्टीपल लेयर्समध्ये कपडे घालून बाहेर पडा.
ते सल्ला देतात की, घर गरम ठेवण्यासाठी कोळशाची शेगडी अजिबात पेटवू नका कारण त्यातून कार्बन मोनोऑक्साइड तयार होतो, जो नकळत झोपेत मृत्यूचे कारण बनू शकतो.
बहुतेक इलेक्ट्रिक हीटर हवेतील ओलावा शोषून घेतात, ज्यामुळे खोकला, घशात खवखव आणि श्वसनाचे त्रास वाढू शकतात.
खबरदारी म्हणून ते संपूर्ण रात्र हीटर चालवण्याऐवजी थोड्या वेळासाठीच चालवण्याचा सल्ला देतात. तसेच खिडकी किंवा दरवाजा थोडा उघडा ठेवून खोलीत वेंटिलेशन ठेवण्याचा सल्लाही ते देतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











