हिवाळ्यात शरीराला किती पाण्याची गरज असते? डिहायड्रेशन टाळण्यासाठी डॉक्टरांच्या खास टिप्स

फोटो स्रोत, Getty Images
- Author, शुभ राणा
- Role, बीबीसी हिंदीसाठी
उन्हाळ्याच्या कडाक्यात घामाच्या धारा वाहत असताना आपण पाण्याची बाटली सोबतच ठेवतो. घराबाहेर पडताना, प्रवासात आणि घरी परतल्यावरही आपण न विसरता पाणी पितो.
परंतु, हिवाळा सुरू होताच हे चित्र पूर्णपणे बदलते. थंडीत कोवळ्या उन्हात बसून गरमागरम चहा पिण्याकडे आपला कल झुकतो पण थोड्या थोड्या वेळाने पाणी पिण्याकडे आपलं साफ दुर्लक्ष होतं. कारणही तसंच असतं, तहानच लागत नाही.
आता हिवाळ्यात नेमकी तहान का हरवते, यावर कधी आपण विचार केलाय का ?
पण तुम्हाला माहीत आहे का की, उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात शरीराला पाण्याची अधिक गरज असते.
पण तरीही आपल्याला तहान का लागत नाही? कमी पाणी पिण्याचे नेमके दुष्परिणाम काय आहेत? आणि याचा सर्वाधिक फटका कोणाला बसतो, लहान मुलांना की वृद्धांना?
या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'बीबीसी हिंदी'ने आरोग्य तज्ज्ञांशी संवाद साधला.
'हिवाळ्यातही शरीराला उन्हाळ्याइतकीच पाण्याची गरज'
दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील मेडिसिन विभागाचे संचालक डॉ. पुलिन कुमार गुप्ता म्हणतात, "थंडीच्या दिवसांत आपल्याला तहान खूप कमी लागते. घाम कमी येतो, त्यामुळे आपल्या शरीराला पाण्याची गरज कमी आहे असा आपला समज होतो. अनेक लोक, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि ऑफिसला जाणारे कर्मचारी असा विचार करतात की जास्त पाणी प्यायल्याने वारंवार वॉशरूमला जावे लागेल, म्हणून ते जाणूनबुजून पाणी कमी पितात."
त्यांच्या मते, हिवाळ्यातही शरीराला उन्हाळ्याइतकीच पाण्याची गरज असते, हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे. हिवाळ्यात मूत्रपिंड (किडनी) लघवीद्वारे शरीरातील जास्त पाणी बाहेर टाकते. त्याचबरोबर घर आणि ऑफिसमध्ये वापरले जाणारे हिटर, ड्रायर आणि इनडोअर हीटिंग सिस्टम हवा कोरडी करतात, ज्यामुळे त्वचा आणि श्वसनाद्वारे शरीरातील पाणी कमी होण्याचे प्रमाण अधिक वाढते.
ते पुढे असेही सांगतात की, "गरम कपडे घातल्यामुळे जरी आपल्याला घाम आलेला दिसत नसला, तरी तो अतिशय कमी प्रमाणात का होईना पण येतच असतो. आपण पाणी कमी पितो, परिणामी शरीरातील पाण्याची पातळी सातत्याने कमी होत राहते, ज्यामुळे 'क्रॉनिक डिहायड्रेशन' म्हणजेच प्रदीर्घ काळ पाण्याची कमतरता भासण्याची स्थिती निर्माण होते."

फोटो स्रोत, Getty Images
2019 मध्ये 'अमेरिकन हार्ट असोसिएशन'ने प्रसिद्ध केलेल्या एका संशोधनानुसार, जे लोक प्रदीर्घ काळ कमी पाणी पितात, त्यांना किडनीचे जुने आजार, मूतखडा आणि मूत्रमार्गाचा संसर्ग (UTI) होण्याचा धोका जास्त असतो.
वेलनेस थेरपिस्ट, आहारतज्ज्ञ आणि 'मेटामॉरफोसिस' (वेलनेस प्लॅटफॉर्म) च्या सीईओ दिव्या प्रकाश म्हणतात, "जेव्हा थंडी वाढते, तेव्हा शरीर अंतर्गत उष्णता टिकवून ठेवण्यासाठी पीबीवी (पेरिफेरल ब्लड वेसेल्स) म्हणजेच शरीराच्या टोकाच्या रक्तवाहिन्या आकुंचित करते."
यामुळे शरीरातील मध्यवर्ती रक्ताचे प्रमाण वाढते आणि मेंदूला असा संकेत मिळतो की शरीरात सर्व काही सुरळीत आहे, पाण्याची अजिबात कमतरता नाही. या प्रक्रियेमुळे तहान लागण्याची जाणीव चक्क 40 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. परंतु, शरीराची पाण्याची मूलभूत गरज ऋतूंनुसार बदलत नाही. ती नेहमी दिवसाला सरासरी 2.5 ते 3.5 लिटरच्या आसपास राहते."
कमी पाणी पिण्याचे दुष्परिणाम
आपल्या शरीराचा सुमारे 60% हिस्सा पाण्याने बनलेला असतो.
डॉ. पुलिन कुमार गुप्ता म्हणतात, "हे पाणी आपल्या रक्तामध्ये असते. रक्ताच्या माध्यमातूनच ऑक्सिजन, पोषक तत्वे आणि इतर आवश्यक घटक शरीराच्या पेशींपर्यंत पोहोचतात."
"जेव्हा शरीरात पाणी कमी होते, तेव्हा रक्त घट्ट होऊ लागते. यामुळे ब्रेन स्ट्रोक आणि हार्ट अटॅकचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. विशेषतः हिवाळ्यात हा धोका अधिक प्रमाणात दिसून येतो. घट्ट झालेले रक्त पंप करण्यासाठी हृदयाला जास्त मेहनत करावी लागते, ज्यामुळे रक्तदाब (ब्लड प्रेशर) वाढतो."
ते पुढे सांगतात की, "शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे 'ब्रेन हॅमरेज'चा धोकाही वाढतो. याचा थेट परिणाम किडनीवर (मूत्रपिंडावर) होतो, ज्यामुळे किडनीवर प्रचंड दबाव येतो आणि किडनी स्टोन किंवा मूतखडा होण्याची शक्यता कित्येक पटीने वाढते."
डॉक्टरांच्या मते, पाणी कमी प्यायल्याने पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो , ज्यामुळे बद्धकोष्ठता (कब्ज) आणि अपचनासारख्या समस्या निर्माण होतात.
तसेच, दीर्घकाळ कमी पाणी प्यायल्याने सततचा थकवा, डोकेदुखी, चक्कर येणे आणि त्वचा कोरडी पडणे यांसारखे त्रास सुरू होतात.
बहुतेक वेळा आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, परंतु आपले शरीर अशा सुरुवातीच्या संकेतांद्वारे आपल्याला धोक्याची पूर्वसूचना देत असते.
एम्स (AIIMS) ऋषिकेशशी संबंधित माजी आहारतज्ज्ञ आणि 'वन डाएट टुडे'च्या संस्थापिका डॉ. अनू अग्रवाल म्हणतात, "आपले शरीर काही असे संकेत देते जे पाण्याची कमतरता दर्शवतात. उदाहरणार्थ, अतिशय आळस आणि अशक्तपणा जाणवणे. थकवा, ताण आणि अस्वस्थता (एंग्जायटी) वाढणे. कारण पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरात 'कोर्टिसोल' या स्ट्रेस हार्मोनची निर्मिती वाढते. याशिवाय चक्कर येणे आणि ऑक्सिजनची कमतरता भासणे ही देखील लक्षणे आहेत. हे सर्व संकेत शरीरातील पेशींना अधिक पाण्याची गरज असल्याचे सांगतात."
सर्वात जास्त धोका कोणाला?
डॉ. अनू अग्रवाल यांच्या मते, जे लोक शारीरिक ताण जास्त सहन करू शकत नाहीत, जसे की वृद्ध व्यक्ती, रक्तदाब आणि मधुमेहाचे रुग्ण, ज्यांची हार्ट सर्जरी झाली आहे किंवा जे रक्त पातळ करण्याची औषधे घेत आहेत, अशा लोकांसाठी पाणी कमी पिणे अत्यंत धोकादायक ठरू शकते.
डॉ. अग्रवाल सांगतात की, महिलांच्या बाबतीत वेगवेगळ्या वयोगटात पाणी कमी पिण्याचे वेगवेगळे परिणाम दिसून येतात. किशोरावस्था आणि चाळीशीपर्यंतच्या महिलांमध्ये आधीच हार्मोनल बदल होत असतात. त्यातच मासिक पाळीच्या दरम्यान रक्तस्त्राव झाल्यामुळे शरीर डिहायड्रेट होते. अशा वेळी पाणी कमी प्यायल्यास मासिक पाळीचा त्रास वाढतो, तसेच गॅस आणि ब्लोटिंग (पोट फुगणे) यांसारख्या समस्या अधिक जाणवतात.
त्या पुढे म्हणतात, "पाणी कमी प्यायल्याने रक्ताभिसरण मंदावते, शरीरात विषारी घटक (Toxins) साचतात, ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. याशिवाय इस्ट्रोजेन आणि थायरॉईड यांसारख्या हार्मोन्सचे वहन आणि कार्य हे पाण्यावर अवलंबून असते. पाण्याच्या कमतरतेमुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडून मूड स्विंग्स आणि अनियमित मासिक पाळी यांसारख्या समस्या वाढू शकतात."
पाणी पिण्याची योग्य पद्धत
डॉ. अग्रवाल सल्ला देतात की, प्रत्येक व्यक्तीने हिवाळा असो किंवा उन्हाळा, दोन्ही ऋतूंमध्ये 2.5 ते 3 लिटर पाणी प्यायला हवे. म्हणजे जर 250 मिलीचा एक ग्लास मानला, तर दिवसातून किमान 10 ते 12 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.
पाणी पिण्याच्या योग्य पद्धतीबाबत त्या सांगतात की हिवाळ्यात सकाळी उठल्यानंतर पहिल्या 2-3 तासांत हळूहळू 2 ते 4 ग्लास पाणी प्यावे. यामुळे शरीरातील रात्रभर साचलेले विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते आणि चयापचय क्रिया वेगवान होते.
दिवसभराची पाण्याची गरज शक्यतो संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या झोपेचे चक्र बिघडणार नाही.

फोटो स्रोत, Getty Images
संध्याकाळी उशिरा जास्त पाणी प्यायल्यास किडनी फिल्टरेशनची प्रक्रिया रात्रीच्या वेळी सुरू राहते. यामुळे रात्री वारंवार लघवीला जावे लागते आणि तुमची शांत झोप वारंवार मोडते.
संध्याकाळी 5 नंतर तहान लागेल तसे थोडे थोडे पाणी पिऊ शकता (उदा. रात्रीच्या जेवणासोबत किंवा जेवणानंतर), परंतु त्याचे प्रमाण जास्त नसावे.
दिव्या प्रकाश म्हणतात, "हिवाळ्यात लोक पाण्याची जागा चहा, कॉफी, सूप किंवा अत्यंत गरम पाण्याला देतात. पण खूप जास्त गरम पाणी (50-60 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त) पिणे योग्य नाही. कारण आपल्या शरीराचे सामान्य तापमान 37 अंश सेल्सिअसच्या आसपास असते. अशा परिस्थितीत कोमट पाणी पिणे हा सर्वात योग्य मार्ग आहे. कोमट पाणी शरीर सहजपणे शोषून घेते आणि ते आरोग्यासाठी सर्वात उत्तम असते."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











