हिवाळ्यात टाचांना भेगा का पडतात आणि त्यासाठी काय काळजी घ्यावी?

टाचांना भेगा पडणे ही एक सामान्य समस्या असली तरी, उपचार न केल्यास ती वेदनादायक ठरू शकते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, टाचांना भेगा पडणे ही एक सामान्य समस्या असली तरी, उपचार न केल्यास ती वेदनादायक ठरू शकते.
    • Author, पारा पड्डैय्या
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

हिवाळ्यात थंड हवेमुळे लहान मुलांचे ओठ फाटणे आणि मोठ्यांच्या टाचांना भेगा पडणे यांसारख्या समस्या सामान्य आहेत.

टाचांना भेगा पडणे ही एक सामान्य समस्या असली तरी, उपचार न केल्यास ती वेदनादायक ठरू शकते.

जेव्हा हिवाळ्यातील थंड हवा भेगा पडलेल्या टाचांना लागते तेव्हा या वेदना आणखी वाढतात.

पण पायांना भेगा पडण्याची समस्या ही हिवाळ्यातच जास्त का जाणवते? यामागे कारण काय आहे आणि ते टाळण्यासाठी कोणती खबरदारी घेतली पाहिजे?

असं हिवाळ्यात का होतं?

हिवाळ्यात पायांना भेगा पडण्याच्या समस्येबद्दल बीबीसीनं त्वचारोगतज्ज्ञ आणि कॉस्मेटोलॉजिस्ट डॉ. शाहिना शफीक यांच्याशी चर्चा केली.

त्या म्हणाल्या, "पायावरील त्वचेवर तेल ग्रंथी कमी असतात आणि त्यामुळे ती नैसर्गिकरित्या कोरडी असते. हिवाळ्यात या तेल ग्रंथी आणखी निष्क्रिय होतात आणि त्यामुळे टाचांना भेगा पडतात."

"वय वाढत असताना त्वचेची लवचिकता कमी होते. शरीरातील नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या तेलाचं प्रमाण कमी होत जातं. यामुळे त्वचा कोरडी होते आणि भेगा पडण्याची शक्यता वाढते. शरीराच्या वजनामुळे पाय आणि घोट्यांवर जास्त दबाव येतो. यामुळे टाचांना भेगा पडू शकतात."

डॉ. शाहीना शफीक

फोटो स्रोत, Dr Shahina Shafiq

फोटो कॅप्शन, डॉ. शाहीना शफीक सांगतात की हिवाळ्यात वृद्ध आणि लहान मुलांची विशेष काळजी घेतली पाहिजे.

त्वचारोगतज्ज्ञ डॉ. अयनम सत्यनारायण सांगतात की सोरायसिस, बुरशीजन्य संसर्ग, एक्झिमा, मधुमेह आणि थायरॉईड यांसारख्या त्वचेसंदर्भातील समस्यांमुळे देखील टाचांना भेगा पडू शकतात.

डॉ. सत्यनारायण यांच्या मते, हिवाळ्यात लोक कमी पाणी पितात. त्यामुळे शरीरातील ओलावा कमी होतो आणि टाचांना भेगा पडतात.

ते म्हणतात, "जर तुम्ही आंघोळ करताना तुमच्या टाचांना व्यवस्थित स्वच्छ केलं नाही किंवा आंघोळ केल्यानंतर त्या व्यवस्थित सुकवल्या नाही तर त्यामुळेही भेगा पडू शकतात."

भेगांची समस्या

टाचांना भेगा पडलेल्या त्वेचेवर फोड येऊ शकतात आणि वेदना होऊ शकते. इतकंच काय तर, रात्री झोपताना बेडशीट टाचांना लागल्यावरही वेदना होऊ शकते.

या समस्येनं ग्रस्त असलेल्या लोकांना इतरांमध्ये जाण्यास अनेकदा अस्वस्थ वाटतं.

डॉ. सत्यनारायण म्हणतात, "जे लोक चिखलात जास्त चालतात त्यांना या समस्येचा जास्त त्रास होतो. ज्यांना आधीच ही समस्या आहे त्यांना हिवाळ्यात जास्त त्रास होतो. हिवाळ्यात टाचांना भेगा पडल्यामुळे महिलांना जास्त त्रास होतो. या भेगा मोठ्या समस्येसारख्या वाटल्या नाही तरी, त्यामुळे पायांना खूप वेदना होतात."

थंडीमुळे लोक गरम पाण्यानं आंघोळ करतात, ज्यामुळे त्वचेचा नैसर्गिक ओलावा कमी होतो. यामुळे त्वचेला भेगा पडतात.

पायाच्या भेगा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, थंडीमुळे लोक गरम पाण्यानं आंघोळ करतात, ज्यामुळे त्वचेचा नैसर्गिक ओलावा कमी होतो. यामुळे त्वचेला भेगा पडतात.

डॉ. सत्यनारायण हिवाळ्यात जास्त पाणी पिण्याची शिफारस करतात.

डॉ. सत्यनारायण म्हणतात, "वातावरणातील थंड हवा शरीरातील ओलाव्याला कोरडं करते, ज्यामुळे त्वचा कमकुवत होते. शरीरात अ, क आणि ड जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे देखील त्वचेला भेगा पडतात."

"कोरड्या त्वचेमुळे खाज सुटते आणि पुरळ उठतात. जेव्हा आपण खाज सुटल्यामुळे त्याचे ओरखडे काढतो तेव्हा त्वचेचा वरचा थर सोलून जखमा तयार होतात. थंड हवेच्या संपर्कात आल्यावर या जखमांमध्ये जळजळ होते. म्हणूनच, हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणं महत्वाचं आहे."

डॉक्टर म्हणतात की जर भेगा पडलेल्या टाचांची काळजी घेतली नाही तर समस्या आणखी वाढेल.

काय खबरदारी घ्यावी?

डॉ. शाहिना शफीक म्हणतात की काही खबरदारी घेतल्यास टाचांना भेगा पडण्यापासून आराम मिळू शकतो.

हिवाळ्यात पायांचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी काही टिप्स दिल्या आहेत, जसे की:

  • दररोज कोमट पाण्यानं पाय धुवा. आंघोळ केल्यानंतर पायांना लोशन, क्रीम किंवा नारळाचं तेल लावा. यामुळे पाय कोरडे पडणार नाहीत.
  • हिवाळ्यात भरपूर पाणी पिणं फायदेशीर असतं. यामुळे पाय कोरडे पडणार नाहीत.
  • दिवसातून दोनदा पायांना चांगल्या दर्जाचं मॉइश्चरायझर लावा.
डॉ. सत्यनारायण

फोटो स्रोत, Dr Satyanarayana

फोटो कॅप्शन, डॉ. सत्यनारायण यांनी हिवाळ्यात जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला.
  • वृद्ध आणि मधुमेही लोक थंड वाऱ्यापासून त्यांच्या टाचांचं संरक्षण करण्यासाठी रात्री मोजे घालू शकतात.
  • डॉ. सत्यनारायण म्हणतात की कोमट किंवा कमी गरम पाण्यानं आंघोळ करणं चांगलं असतं. ओमेगा फॅटी अ‍ॅसिड असलेल्या बिया, काजू आणि व्हिटॅमिन सी असलेली फळं यांचा जेवणात समावेश केला पाहिजे.

मात्र, जर भेगांमधून रक्तस्त्राव होत असेल किंवा पू येत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

(टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. जर तुम्हाला काही समस्या असतील तर डॉक्टरांचाच सल्ला घेणं चांगलं.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)