रेड वाईन पिणं खरंच आरोग्यासाठी फायदेशीर असतं का?

फोटो स्रोत, Getty Images
मद्यपान केल्यामुळे जगभरात दरवर्षी लाखो नागरिकांचा मृत्यू होतो. तरीही हजारो वर्षांपासून माणून दारू पित आला आहे.
गेल्या काही वर्षांपासून वाईन ही आरोग्यासाठी चांगली असते, अशी समज सर्वमान्य झाल्याचं पाहायला मिळतं.
त्यातही विशेषतः रेड वाईन. याचा संबंध दीर्घायुष्य आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्याशी जोडला जातो. पण खरंच रेड वाईन आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?
खरं तर, कॅन्सर आणि दारू यांचाही एक जवळचा संबंध आहे, पण बऱ्याच लोकांना अजूनही ही गोष्ट माहीत नाही. यासंदर्भात अनेक संशोधन झाले आहेत.
आठवड्याला एक बाटली वाईन पिण्यामुळे कॅन्सरचा धोका वाढत असल्याचं या संशोधनात पुढे आलं. वाईन पिणाऱ्या लोकांना असलेला धोका पुरुषांना पाच सिगारेट तर महिलांना दहा सिगारेट पिण्यामुळे होणाऱ्या नुकसानाप्रमाणेच असू शकतो.
ब्रिटनच्या वेल्स येथे सार्वजनिक आरोग्य विभागाच संचालक असलेले मार्क बेलिस म्हणतात, "धुम्रपान आणि कॅन्सरमधील संबंध यांबाबत बऱ्याच वेळा चर्चा केली जाते. पण दारू आणि कॅन्सर यांच्यातील संबंधांवर फारसं कुणी बोलताना दिसत नाही."
वाईन आरोग्यदायी असल्याचं कुणी सांगितलं?
वाईन पिणं आरोग्यासाठी चांगलं असतं, हा विचार 1970 च्या दशकातला आहे. त्यावेळी फ्रान्सच्या नागरिकांना इतर देशातील नागरिकांच्या तुलनेत हृदयविकार कमी होतो, हे शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
फ्रेंच नागरिक इतरांपेक्षा जास्त सॅच्युरेटेड फॅट खातात. त्यामुळे ही माहिती आश्चर्यचकीत करणारी होती.
शास्त्रज्ञांनी म्हटलं, फ्रान्सच्या नागरिकांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण कमी असण्याचं कारण थेट वाईनशी जोडलेलं आहे.
याला शास्त्रज्ञांनी फ्रेंच पॅराडॉक्स म्हणजेच फ्रेंच विरोधाभास असं नाव दिलं. हे एक असं कोडं आहे, जे शास्त्रज्ञ अद्याप सोडवू शकलेले नाहीत.
पण फ्रेंच विरोधाभास ही व्याख्या जगभरात लोकप्रिय झाली. त्यामुळे सध्याच्या घडीला जगभरात सर्वत्रच अल्प प्रमाणात वाईन पिणं आरोग्यासाठी चांगलं मानलं जात आहे.
यामुळे वजन वाढण्याच्या समस्येशिवाय हृदयविकार, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यात मदत मिळते.

फोटो स्रोत, Getty Images
इंटरनॅशनल सायंटिफिक फोरम ऑन अल्कोहोल रिसर्चच्या सहसंचालक हेलेना कोनीबिअर सांगतात, "अल्प प्रमाणात वाईन प्यायल्यामुळे आरोग्य उत्तर राखण्यासह वाढत्या वयासोबत कमी होत जाणारी बौद्धिक क्षमताही जास्त काळ टिकून राहू शकते. अशा प्रकारचे फायदे समोर आलेले अनेक संशोधन अहवाल प्रकाशित झालेले आहेत."
त्यामुळेच वाईनपासून दूर राहणं म्हणजे आरोग्यदायी पाऊल नसून उलट आरोग्याचं नुकसान करणं आहे, असा समज लोकांमध्ये बऱ्याच काळापासून रूढ झाला आहे.
अल्प प्रमाणात वाईन पिणं आरोग्यासाठी चांगलं आहे. पण आता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
या संशोधनाला विरोध असलेल्या व्यक्तींच्या मते, वाईनचा संबंध थेट आरोग्याशी जोडण्यासाठीची आकडेवारी तथ्याला धरून नाही. तसंच वाईनपासून दूर असलेले लोक आजारी पडतात, असं म्हणणं तर पूर्णपणे चुकीचं आहे.
2006 मध्ये वाईनमुळे होणारं नुकसान आणि फायदे यांच्याबाबत 54 संशोधनांचा आढावा घेण्यात आला.
यातून पुढे आलेल्या निष्कर्षानुसार, अल्प प्रमाणात वाईन पिल्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो, या दाव्यात काहीच तथ्य नाही.
हेलेना कोनीबिअर म्हणतात, "गेल्या पाच वर्षांपासून आम्ही पाहिलं की वाईन पिणाऱ्या लोकांचं आरोग्य चांगलं तर असतं. ते उच्चशिक्षित असतात. तसंच त्यांची दिनचर्या दिवसभर बसून राहण्यासारखी नसते.

फोटो स्रोत, Getty Images
याचवर्षी चीनमध्येही 5 लाख प्रौढ नागरिकांवर करण्यात आलेल्या एका संशोधनाचा अहवाल प्रकाशित झाला. हे संशोधन गेल्या 10 वर्षांपासून सुरू होतं.
चीनी नागरिकांच्या शरीरात दारू पिण्याच्या व्यसनाशी संबंधित दोन गुणसूत्रं आढळून येतात.
ज्यांचं आरोग्य चांगलं आहे, ते आपल्या मर्जीप्रमाणे दारू पिऊ शकतात. पण ज्यांच्यातील एन्झाईम योग्य प्रकारे काम करत नाहीत, त्यांना दारूमुळे नुकसान होऊ शकतं.
दारू आणि हृदयविकार यांच्यातील थेट संबंध या संशोधनातून समोर आलं. दारू पिल्याने रक्तदाब वाढतो, पण त्यामुळे हृदयविकार होण्याची शक्यता ही कमीच असते.
पण या संशोधनात फक्त वाईनबाबत वेगळा कोणताही अहवाल काढला गेला नाही. त्यामुळे त्याचा फायदा होईल की नुकसान हे निश्चितपणे सांगू शकता येणार नाही.
रेड वाईन
वाईनमध्ये पॉलीफिनोल नामक रसायन आढळून येतं. त्यामुळे ते आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जात आलं आहे.
या रसायनामुळे शरीरातील जळजळ कमी होते. रेड वाईनमध्ये पॉलीफिनोल व्हाईट वाईनच्या तुलनेत दहा पटींनी जास्त असते.

फोटो स्रोत, Getty Images
इटली येथील शास्त्रज्ञ अल्बर्टो बर्टेली यांच्यानुसार, वाईन अल्पप्रमाणात घेतल्यास ते लोकांना हृदयविकारापासून दूर ठेवतं. पॉलीफिनोल हेच याचं मुख्य कारण आहे. बर्टेली यांच्या मते, रोज 160 मिलीलीटर वाईन जेवणासोबत घेतल्यास ती फायदेशीर ठरू शकते.
वाईनशी संबंधित रिसर्च पॉलीफिनोल रेसवेराट्रोलवर केंद्रीत आहेत. रेसवेराट्रोल हे द्राक्षांच्या वरील आवरणात तसंच बियांमध्ये आढळून येतं.
धमन्यांमधील रक्त पातळ करून उच्च रक्तदाबापासून दूर ठेवण्यात ये मदतशीर ठरतं.
फक्त रेड वाईनच नव्हे तर व्हाईट वाईनमध्येही हे गुण आढळून येतात. बर्टेली यांच्या मते, वाईनमध्ये आढळून येणारे केमिकल आपल्याला अल्झायमरसारख्या व्याधींपासून वाचवतात.
दरम्यान, इतर कोणत्याही वाईनपेक्षाही रेड वाईनच जास्त फायदेशीर आहे, असं अनेक संशोधनांमधून समोर आलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
रेड वाईन ही पोटाच्या आरोग्यासाठी चांगली असू शकते. पोट ठिक असल्यास त्याचे अनेक लाभ आपल्याला होतात. आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. जेवण पचत असल्यामुळे वजनही नियंत्रणात राहतं.
वाईन पिल्यामुळे आपल्या पोटात आढळून येणाऱ्या बॅक्टेरियामधील विविधता वाढीस लागते. तसंच आतड्यामध्ये आढळून येणाऱ्या बॅक्टेरियांच्या संख्येतही वाढ पाहायला मिळते.
पण हा लाभ होण्यासाठी आढवड्यात फक्त एक ग्लास रेड वाईन पिण्याची आवश्यकता आहे, असंही संशोधनात आढळून आलं.
मर्यादित प्रमाणात रेड वाईन पिणाऱ्या लोकांचा बॉडी मास इंडेक्स कमी होतो. त्यामुळेच रेड वाईन पिणं चांगल्या आरोग्याशी जोडलं जातं.
पण दारू ही वाईटच असते, असं मानणाऱ्या लोकांचं मत वाईन पिण्याचं समर्थन करणाऱ्या लोकांपेक्षा पूर्णपणे उलट आहे.
मार्क बेलिस यांच्या मते, रेड वाईन पिणारे व्यक्ती सामान्य व्यक्तींपेक्षा जास्त शारिरीक हालचाली करतात, चालतात-फिरतात. त्यामुळे सर्वसामान्य माणसापेक्षा जास्त निरोगी ते राहतात.
पोटाच्या आरोग्याविषयी बोलताना ते म्हणाले की वाईन पिण्यामुळे पोट चांगलं राहतं की पोट आधीपासूनच चांगलं होतं, अशा लोकांवरच संशोधन करण्यात आलं, हेसुद्धा स्पष्ट नाही, असं ते म्हणतात.
2016 ला करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार रोज जेवणासोबत एक ग्लास वाईन पिणाऱ्या लोकांना सहा महिन्यांनंतरही ब्लड प्रेशरमध्ये विशेष फरक दिसून आला नाही.
आरोग्यवर्धक पर्याय?
भलेही वाईन पिणं आरोग्यासाठी चांगलं असेल, पण बहुतांश तज्ज्ञांच्या मते, यापासून दूर राहणं हेच आपल्यासाठी अधिक आरोग्यदायी आहे.

फोटो स्रोत, Getty Images
लंडनच्या किग्ज कॉलेज येथील कॅरोलिन रॉय यांच्या मते, "दारू आपल्यासाठी वाईटच आहे. तरीही तुम्ही पित असाल तर रेड वाईनला प्राधान्य द्या. कारण यामध्येच काही चांगले गुण आढळून आले. पण याचा अर्थ हा नाही की मी तुम्हाला वाईन पिण्याचा सल्ला देत आहे."
दारू पिण्याबाबत ब्रिटनची गाईडलाईन सर्वात कठोर मानली जाते. त्यामधील सूचनेनुसार 14 युनिटपेक्षा जास्त दारू पिणं टाळायला हवं.
खरंतर वाईन पिण्याचे बरेच फायदे सांगितले जातात. पण ते न पिणं हाच उत्तम पर्याय आहे, असं तज्ज्ञांना वाटतं.
शिवाय, रेड वाईन पिताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही वाईन आरोग्यासाठी पित नसून ती फक्त तुम्हाला दारू पिण्याची आवड असल्यामुळे पित आहात.
जर तुम्हाला आरोग्यासाठी काही करायचंच आहे, तर वाईनपेक्षाही इतर अनेक पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत.
नियमित व्यायाम, हिरव्या भाज्या, फळ खाणं यांसारख्या उपायांची सर इतर कोणत्याच गोष्टीला नाही. त्यामुळे रेड वाईन पिणं हे यासाठीचं पर्याय ठरू शकत नाही.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








