डास दारू पिणाऱ्यांना जास्त चावतात का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, स्टीफन डॉलिंग
- Role, बीबीसी फ्यूचर
काही वर्षांपूर्वी मी डेन्मार्कमध्ये एका विंटेज कार रॅलीमध्ये सहभागी झालो होतो. तो माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव ठरला होता.
खरं तर, ही विंटेज कार रॅली होती. पण यात कार पेक्षा फॅन्सी ड्रेस परिधान करण्यावरच अधिक जोर होता. ही विंटेज कार रॅली मॉन नावाच्या एका बेटापर्यंत होती.
रात्री उशिरापर्यंत नाच-गाणं, खाणं-पिणं सुरू होतं. त्यानंतर झोपण्याची वेळ झाली. मला वाटलं उन्हाळ्याचे दिवस आहेत तर, मोकळ्या आकाशाखाली आपण एखाद्या बेंचवरच झोपुया.
पण ती माझ्या जीवनातली सर्वात मोठी चूक ठरली.
त्या रात्री मला तीन नवीन गोष्टी समजल्या. त्यातली पहिली बाब म्हणजे उन्हाळ्यात डेन्मार्कमध्ये खूप डास असतात. दुसरी म्हणजे हे डास तुम्ही पांघरलेल्या चादरी किंवा कपड्यांवरूनही चावतात. शिवाय तिसरी बाब म्हणजे, तुम्ही जर दारू प्यायलेले असाल तर तुम्ही डासांना चावण्यासाठी आमंत्रणच देत आहात हे निश्चित.
त्या रात्री मी डासांसाठी जणू मेजवानीच ठरलो. त्यानंतर मी जेव्हा सकाळी उठलो, तेव्हा माझी अवस्था वाईट होती. माझं संपूर्ण शरीर ताठ झालं (आखडलं) होतं.
अमेरिकेच्या जर्नल ऑफ मॉस्क्विटो कंट्रोल असोसिएशनच्या 2002 मधील अहवालानुसार, दारू प्यायलेले असाल तर, तुम्हाला डास चावण्याची शक्यता अधिक वाढते.
मात्र डास मद्यपींकडे आकर्षित का होतात? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
डास दारू कशी ओळखतात?
डासांना आपल्या उपस्थितीची जाणीव ही दोन रसायनांमुळं होते, हे आतापर्यंत समोर आलं आहे. त्यापैकी पहिलं म्हणजे कार्बन डाय ऑक्साइड जे आपण श्वसनादरम्यान सोडत असतो. तर दुसरं म्हणजे ऑक्टानॉल, ज्याला मशरूम अल्कोहोलही म्हटलं जातं. कारण मशरूमची चवही याच केमिकलमुळं तयार होत असते. हे केमिकल आपल्या शरिरात अल्कोहोल म्हणजे दारू प्यायल्यानंतर तयार होतं.
आता, पुढचा प्रश्न म्हणजे, मद्यपींचं रक्त पिणाऱ्या डासांनाही नशा किंवा गुंगी येते का?
लाखो वर्षांपासून डास मानवाचं रक्त पित आलेले आहेत. मात्र मद्यपींचं रक्त प्यायल्यानं मच्छरांना गुंगी येते का? यावर मात्र फारसं संशोधन झालेलं नाही.

फोटो स्रोत, Getty Images
डासांबाबत अभ्यास करणाऱ्या अमेरिकेच्या अभ्यासक तान्या डॅप्की फिलाडेल्फियामधील पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठात शिकवतात. ''मद्यपींचं रक्त प्यायल्यानं डासांनाही नशा होत असेल, असं मला वाटत नाही. कारण रक्तात अल्कोहोलचं प्रमाण एवढं जास्त नसतं,'' असं तान्या म्हणाल्या.
पण, कीटक अशाप्रकारे मोठ्या प्रमाणावर दारू पचवू शकतात, हे समजल्यानंतर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.
डास दारू कशी पचवतात?
अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटीमधील कोबी स्कॅल यांच्या मते, एखादी व्यक्ती 10 पेग दारु प्यायलेली असेल तर त्यांच्या शरिरात अल्कोहोलचं प्रमाण 0.2 टक्के होतं. पण एखाद्या डासानं त्या व्यक्तीचं रक्त प्यायलं, तरी त्याच्यावर दारुचा अगदी किरकोळ परिणाम होतो. त्यामुळं त्यांच्या क्षमतेवर त्याचा फारसा परिणाम होत नाही.
डासांची पचन यंत्रणाही खास असते. रक्ताशिवाय दुसरी एखादी गोष्ट त्यांच्या शरिरात गेली तर, ती एका वेगळ्या जागी साठवली जाते.
डासांचे एंझाइम ती तिला त्याठिकाणी तोडण्याचा किंवा नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच डासांच्या शरिरात दारुचा अंश गेला तरी, त्याचे एंझाइम त्याला नव्या केमिकलमध्ये रुपांतरीत करतात. त्यांच्या मेंदूवर त्याचा परिणाम होत नाही.
लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियमचं कामकाज पाहणाऱ्या, एरिका मॅकएलिस्टर यांच्या मते, अनेक किड्यांमध्ये अशा प्रकारचं वैशिष्ट्य असतं की, ते धोकादायक केमिकल त्यांच्या अन्नातून वेगळं करू शकतात, आणि नंतर हळूहळू ते शरीराबाहेर काढू शकतात. अल्कोहोलपासून ते अगदी त्रासदायक बॅक्टेरियाही एंझाइमद्वारे ते पचवतात.

फोटो स्रोत, Getty Images
एरिका यांनी कीटकांवर एक पुस्तकही लिहिलं आहे. 'द सिक्रेट लाइफ ऑफ फ्लाईज' मध्ये त्यांनी, माश्या आणि मधमाश्या यांच्यातही हे वैशिष्ट्य असल्याचं स्पष्ट केलं आहे. सडणाऱ्या फळांमध्ये अल्कोहोल तयार झालेलं असतं, तरीही त्या त्यामधील रस शोषत असतात.
''मच्छरांना नशा किंवा गुंगी येते का हे मला माहिती नाही, मात्र मधमाशांना अनेकदा अल्कोहोलमुळं गुंगी येत असते. त्यानंतर त्यांचं वर्तन बदलत असतं. त्या मस्ती करू लागतात. साथीदार निवडण्यासाठीही मग त्या फार त्रास घेत नाहीत. जास्त अल्कोहोल सेवन केल्यानं, त्या शुद्ध हरपून बसतात,'' असं एरिका सांगतात.
डासांनाही सडत असलेल्या फळांचा रस शोषणं आवडतं. केवळ मादी डासच रक्त पितात. त्याचं कारण म्हणजे, अंडी घालण्यासाठी त्यांना जे प्रोटीन हवं असतं, ते त्यांना रक्तातून मिळतं. नर आणि मादी दोन्ही प्रकारचे डास फळं आणि फुलांचा रस शोषतात, त्यातून त्यांना ऊर्जा मिळत असते.
''मद्यपी लोक, डासांना आवडतात ही एक रंजक बाब आहे,'' असं तान्या म्हणतात.
खास जनुकांकडेही आकर्षित होतात डास
अनेक मानवांच्या जनुकांमध्येही (जीन) असं काही असतं, त्यामुळं डास त्यांना चावण्याची शक्यता अधिक असते. जगभरातील लोकसंख्येच्या पाचव्या भागाएवढ्या म्हणजेच सुमारे 20 टक्के लोकांच्या जनुकांमध्ये अशा काही गोष्टी असतात, की डास त्यांच्याकडे आकर्षित होतात.
त्यापैकी एक कारण म्हणे ओ रक्तगट. इतर कोणत्याही रक्तगटाच्या तुलनेत ओ रक्तगट असलेल्यांना डास चावण्याची शक्यता दुपटीनं अधिक असते. शरीराचं तापमान वाढल्यानंही डास आकर्षित होतात.
गर्भवतींनाही डास अधिक चावतात. जे लोक दीर्घ श्वास सोडतात त्यांनाही, डास अधिक चावतात. कारण ते लोक कार्बन डाय ऑक्साइडचं उत्सर्जन जास्त करतात. त्यामुळं डासांना मानव तिथं असल्याचे संकेत मिळतात.
डासांच्या विविध प्रजाती शरिराच्या वेगवेगळ्या भागांवर हल्ला करतात. काही डास पाय आणि पंजांना चावतात कर काही मान आणि चेहऱ्यावर हल्ला करतात. कदाचित नाकातून बाहेर पडणाऱ्या कार्बन डायऑक्साईडच्या वासानं ते तिथपर्यंत पोहोचत असावेत.

फोटो स्रोत, Getty Images
''मी कोस्टारिका इथं गेले, त्यावेळी डासांनी माझ्या तळपायाला चावा घेतला, हे कसं शक्य आहे?'' असं तान्या म्हणतात.
दारुमधून निघणारं इथेनॉलही अशाच प्रकारे डासांना आकर्षित करतं. दारु प्यायल्यानंतर घामामधून काही प्रमाणात इथेनॉल बाहेर पडतं. त्याच्या वासामुळं डास लोकांपर्यंत पोहोचतात.
2010 मध्ये बर्किना फासोमध्ये झालेल्या एका संशोधनामध्येही दारु किंवा बीअर प्यायल्यानंतर डास चावण्याची शक्यता वाढते, असे तथ्य समोर आले होते.
''तुम्ही जर उपाशी असाल आणि फिरत असाल, तर जेवणाचा सुगंध येत असेल त्यादिशेला आपली पावलं आपोआप वळायला लागतात,'' असं तान्या म्हणतात.
त्याचप्रमाणे इथेनॉलमुळं डासांना आसपास भोजन उपलब्ध असल्याचे संकेत मिळतात.
मात्र, अनेकदा जनुकीय कारणांमुळंही डास अधिक चावतात. त्यामुळं डास चावतील या भीतीनं एक किंवा दोन बीअर प्यायला नकार देणंही योग्य नाही, असं मॅकएलिस्टर म्हणतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








