कोरोना व्हायरस: डास चावल्यानं कोरोनाची लागण होते का?, WHO काय म्हणतंय?

फोटो स्रोत, Science Photo Library
- Author, नामदेव अंजना
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
कोरोना व्हायरसनं जगभर थैमान घातलं आहे. ज्या वेगानं कोरोना व्हायरस जगभरात पसरतोय, त्याच वेगानं त्यासंबंधी अफवा आणि गैससमजही पसरतायत. अशाच एका समजाबद्दल जाणून घेऊया.
काही साथीचे रोग या डासांच्या माध्यमातून पसरतात, त्यामुळं अनेकांचा असा समज झालाय की, कोरोना व्हायरसही डासांमुळं पसरत असावा. त्यामुळं इतर खबरदारीच्या उपयांसोबतच डासांपासून बचाव करण्याचेही उपाय लोक करू लागलेत.

फोटो स्रोत, Getty Images
अर्थात, डासांपासून आपण काळजी घेतलीच पाहिजे. डास चावणं हे आपल्या आरोग्यासाठी हितकारक नाहीय. पण डास चावल्यानं कोरोना व्हायरस पसरतो, हे मात्र खरं नाहीय. असं WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेनंच स्पष्ट केलंय.
WHO नं काय म्हटलंय?
कोरोना व्हायरस डासांच्या माध्यमातून पसरतो, याबाबत अद्याप कुठलीच माहिती मिळाली नाही किंवा पुरावा सापडला नाही, असं स्पष्ट शब्दात WHO नं सांगितलं होतं, मात्र आता याबाबत नवी माहिती प्रसिद्ध झाली आहे.
सायंटिफिक रिपोर्ट्स जर्नलमध्ये नवे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. यामध्ये SARS-CoV-2 हा विषाणू डासांमार्फत माणसामध्ये पसरत नाही असं म्हटलं आहे. हा व्हायरस डासांच्या तीन प्रमुख प्रजातींमध्ये वाढू शकत नाही असं या अभ्यासात दिसून आलंय. डास चावला तरी त्या व्यक्तीला संसर्ग होऊ शकत नाही. WHO ने या संशोधनाच्या आधारे कोरोनाचा संसर्ग डासांमार्फत होत नाही असे जाहीर केले आहे.

- वाचा - कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा -कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा -मास्कची विल्हेवाट कशी लावायची? नवं संकट टाळण्यासाठी ‘हे’ नक्की करा
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात

WHO च्या माहितीनुसार, कोरोना व्हायरस हा श्वसन विषाणू आहे. कोरोना व्हायरस बाधित व्यक्ती ज्यावेळी खोकते किंवा शिंकते, त्यावेळी तिच्या तोंडातून उडणाऱ्या थेंबांमधून कोरोना व्हायरसचे विषाणू पसरतात.
त्यामुळं कोरोना व्हायरसच्या विषाणूंपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी खोकणाऱ्या किंवा शिंकणाऱ्या व्यक्तींपासून काही अंतर दूर राहा. महत्त्वाचं म्हणजे गर्दी टाळा.

फोटो स्रोत, WHO
याबाबत आम्ही इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांच्याशी बातचीत केली.
त्यांनी या गैरसमजावर अधिक प्रकाश टाकला. डॉ. अविनाश भोंडवे म्हणतात, कोरोना व्हायरस डासांच्या माध्यमातून पसरत नाहीत.
"आजारांचा प्रसार होण्याची वेगवेगळी माध्यमं असतात. काही आजार हवेतून पसरतात, काही पाण्यातून पसरतात, तर काही वाहक किटकातून पसरतात. मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार वाहक किटकातून पसरतात," अशी माहिती देत डॉ. भोंडवे कोरोना व्हायरसबाबत सांगतात, "कोरोना व्हायरस हा एअरबॉर्न (Airborne - हवेतून पसरणारा विषाणू) आहे. नाक, डोळे, तोंड यातून शरीरात जातो आणि त्यातून मग फुफ्फुसात शिरतो."
कोरोना व्हायरसचा विषाणू शरीरात कसा पसरत जातो? कोव्हिड-19 या आजाराची नेमकी उपचार पद्धती कशी आहे? यावरही आपण एकदा नजर टाकूया.
विषाणूचा 'इन्क्युबेशन' काळ
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं कोरोनाला जागतिक आरोग्य संकट घोषित केलं आहे. कोरोनाच्या या विषाणूचं शास्त्रीय नाव आहे Sars Cov-2.
विषाणूचा संसर्ग झाल्यापासून ते लक्षणं दिसण्यापर्यंतचा जो काळ असतो त्याला 'इन्क्युबेशन पीरियड' म्हणतात.
शरीरात प्रवेश केल्यावर हा विषाणू शरीरात चिकटून बसतो. श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो.

फोटो स्रोत, Getty Images
हा विषाणू सर्वांत आधी घशाच्या आसपासच्या पेशींना लक्ष्य करतो. त्यानंतर श्वसननलिका आणि फुफ्फुसांवर हल्ला चढवतो.
शरीरातल्या या भागात एकप्रकारची 'कोरोना विषाणूंची फॅक्ट्री' तयार होते. म्हणजे श्वसननलिका आणि फुफ्फुसांमध्ये कोरोना विषाणूंच्या संख्येत वाढ होते. या ठिकाणी तयार झालेले नवीन कोरोना विषाणू इतर पेशींवर हल्ला चढवू लागतात.
काही लोकांमध्ये अगदी सुरुवातीपासूनच संसर्गाची लक्षणं दिसतात. मात्र, अनेकांना आपण आजारी आहोत, असं वाटतही नाही.
कोरोना विषाणूचा इन्क्युबिशन काळही वेगवेगळा असतो. काही जणांमध्ये पाच दिवसात आजाराची लक्षणं दिसू लागतात.
किरकोळ लक्षणं
बहुतांश लोकांमध्ये दिसणारी लक्षणं अगदी किरकोळ असतात. संसर्ग झालेल्या दहा पैकी आठ लोकांमध्ये आजाराची अगदीच सामान्य लक्षणं दिसतात, असं म्हणू शकतो. उदाहरणार्थ-सर्दी आणि खोकला. अंगदुखी, घसा खवखवणे आणि डोकेदुखीसुद्धा असते.
शरीरातील रोगप्रतिकार क्षमता या विषाणूचा मुकाबला करण्याचा प्रयत्न करते.
शरीरावर परदेशी आक्रमण झालं आहे, असं मेंदूला वाटतं आणि ते संपूर्ण शरीराला अलर्ट करतो. त्यानतंर कोरोनाचा सामना करण्यासाठी शरीर स्वतः सायटोकाईन नावाचं रसायन स्त्रवू लागतं.

फोटो स्रोत, Getty Images
कोरोना विषाणूची लागण झालेल्या बहुतांश व्यक्तींना कोरडा खोकलाच असतो. खोकल्यात कफ नसतो. मात्र, काही जणांचा घसाही खवखवतो.
काही तुरळक जणांमध्ये खोकल्यासोबत कफही असतो. अशा प्रकरणांमध्ये खोकल्यावाटे निघणाऱ्या कफमध्ये कोरोनामुळे नष्ट झालेल्या फुफ्फुसांतल्या पेशीही असतात.
या लक्षणांसाठी डॉक्टर तुम्हाला सहसा भरपूर पाणी पिण्याचा, खूप आराम करण्याचा आणि पॅरासिटॅमॉल घेण्याचा सल्ला देतात. या लक्षणांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज नसते.
ही परिस्थिती जवळपास आठवडाभर असते. ज्यांची रोगप्रतिकार शक्ती या विषाणूचा सामना करण्यास सक्षम असते त्यांच्या प्रकृतीत आठवडाभरात सुधारणा होऊ लागते.
मात्र, काही प्रकरणांमध्ये रुग्णाचं आरोग्य अधिक ढासळतं. कोव्हिड-19 ची गंभीर लक्षणं दिसतात.
कोव्हिड-19 विषयी आतापर्यंत एवढी माहिती मिळालेली आहे. मात्र, नुकत्याच करण्यात आलेल्या काही संशोधनांमधून असंही आढळलं आहे, की या आजारात नाक गळण्यासारखी सर्दीची लक्षणंही दिसू शकतात.
कोव्हिड-19 ची गंभीर लक्षणं
आजार वाढला तर त्याची अनेक कारणं असू शकतात. एक म्हणजे विषाणूचा सामना करण्यासाठी आपली रोगप्रतिकार क्षमता गरजेपेक्षा जास्त काम करते.
या प्रक्रियेत शरीरात जी रसायनं तयार होतात त्यामुळे संपूर्ण शरीरात सूज येते. कधीकधी या सूजेमुळेही शरीराला गंभीर इजा होते.
किंग्ज कॉलेज लंडनमधील डॉ. नॅटली मॅक्डरमॉट सांगतात, "विषाणूमुळे रोगप्रतिकारक यंत्रणेचा समतोल ढासळतो आणि त्यामुळे सूज येते. विषाणू हे कसं करतो, हे अजून कळलेलं नाही."

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA/BBC
फुफ्फुसाला आलेल्या या सूजेलाच न्युमोनिया म्हणतात. हा विषाणू तोंडावाटे श्वसननलिकेतून फुफ्फुसात गेल्यावर तिथे छोट्या-छोट्या हवेच्या पिशव्या (एअर सॅक) तयार करतो.
फुफ्फुस हा शरीरातला तो अवयव आहे जिथून ऑक्सिजन संपूर्ण शरीरात पसरतो आणि कार्बन डाय ऑक्साईड शरीराबाहेर फेकला जातो.
मात्र, कोरोनाने तयार केलेल्या छोट्या-छोट्या हवेच्या पिशव्यांमध्ये पाणी साठू लागतं. त्यामुळे श्वास घेण्यात अडचण येऊन दीर्घ श्वास घेता येत नाही. या पायरीवर रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज भासते.
चीनमध्ये संसर्ग झालेल्या 56,000 लोकांच्या माहितीचा जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी अभ्यास केला. त्यावरून लक्षात आलं की संसर्ग झालेल्या 14 टक्के लोकांमध्ये संसर्गाची ही गंभीर लक्षणं दिसली.
अत्यंत गंभीर आजार
या विषाणुमुळे 6% लोकांना अत्यंत गंभीर स्वरुपाचा आजार होऊ शकतो, असं सांगितलं जातं. या टप्प्यावर मानवी शरीर विषाणूपुढे गुडघे टेकतं आणि व्यक्ती आजारी पडते.
या स्टेजवर फुफ्फुस निकामी होणं, सेप्टिक शॉक, अवयव निकामी होणं आणि मृत्यूचा धोका उद्भवतो.
या पायरीवर रोगप्रतिकार शक्ती हाताबाहेर जाते आणि शरीराला गंभीर इजा पोहोचते. फुफ्फुसाला सूज आल्याने शरीराला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही.

फोटो स्रोत, EPA
याचा थेट परिणाम किडनीवर होऊ शकतो. किडनी रक्तातील विषद्रव्ये गाळण्याचं काम करतात. मात्र, किडनीवर परिणाम झाला तर त्या निकामी होतात. आतड्यांवरही याचा परिणाम होऊ शकतो.
डॉ. भारत पनखानिया सांगतात, "विषाणूमुळे शरीरातली सूज इतकी वाढते, की अनेक अवयव निकामी होतात आणि रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो."
आजाराच्या या पातळीवर उपचारासाठी ईसीएमओ म्हणजेच एक्स्ट्रा कॉर्पोरल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशनचा वापर करतात.
हे एक प्रकारचं कृत्रिम फुफ्फुस असतं. यात शरीरातलं रक्त बाहेर काढून ते ऑक्सिजनेट करून म्हणजे त्याला ऑक्सिजन पुरवून ते पुन्हा शरीरात पाठवलं जातं.
मात्र, हा उपचार यशस्वी ठरेलच, याची खात्री देता येत नाही. संसर्गाची अनेक प्रकरणं नोंदवली जात नाहीत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








