कोरोना व्हायरसचा संसर्ग महिलांपेक्षा पुरुषांना होण्याचा धोका अधिक?

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA/BBC

पुरुषांच्या तुलनेत महिला आणि मुलांवर कोरोनाव्हायरसचा परिणाम कमी दिसतोय. मृतांमध्येही महिला आणि मुलांची संख्या कमी आहे.

चायनीज सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल याविषयीची पाहणी केली आणि त्यातून ही माहिती मिळाली आहे.

कोरोनाव्हायरसचा संसर्ग झालेल्या 44,000 लोकांबाबत हा अभ्यास करण्यात आला. यापैकी 2.8% पुरुष आणि 1.7% महिलांचा मृत्यू झाला.

News image

वयाच्या दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर विषाणू संसर्ग झालेल्या 0.2% लहान मुलं आणि तरुणांचा मृत्यू झाला. तर 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 15% लोकांचा मृत्यू झाला आहे.

म्हणजे महिला आणि मुलांमध्ये कोरोना व्हायरसची लागण होण्याची भीती कमी असल्याचं या आकडेवारीवरून म्हणायचं का?

याचे दोन पैलू आहेत.

संसर्गाचा प्रतिकार करण्याची शक्ती

महिला आणि मुलांमध्ये संसर्गाचं प्रमाण कमी आहे किंवा त्यांचं शरीर या विषाणूशी अधिक चांगल्या पद्धतीने लढतं, हे याचं एक कारण असू शकतं.

युनिव्हर्सिटी ऑफ एक्स्टरचे डॉक्टर भरत पनखनिया सांगतात, "सहसा नवीन विषाणूचा सगळ्यांनाच संसर्ग होतो. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे."

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, EPA

या विषाणूशी लढण्यासाठीची प्रतिकारक शक्ती नसल्याने असं होतं. पण जेव्हा एखादा विषाणू पसरू लागतो, तेव्हा मुलांना त्याची कमी लागण होते.

किंग्स कॉलेज लंडनच्या डॉक्टर नॅटली मॅकडरमट सांगतात, "पालक मुलांची काळजी जास्त घेतात, त्यांना धोक्यांपासून दूर ठेवतात म्हणून मुलांमध्ये संसर्गाचं प्रमाण कमी असू शकतं. "

महिलांचं काय?

कोरोनाव्हायरसमुळे झालेल्या मृत्यूंमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचं प्रमाण कमी आहे. पण संशोधकांना याचं आश्चर्य वाटत नाही.

फ्लूसह इतर संसर्गांबाबतही हेच पहायला मिळतं.

जीवनशैलीमुळे पुरुषांची तब्येत ही महिलांच्या तुलनेत खराब असते. धूम्रपान आणि दारू पिण्याचं प्रमाण महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त असतं.

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

डॉक्टर मॅकटरमट सांगतात, "धूम्रपानामुळे तुमच्या फुफ्फुसांचं नुकसान होतं आणि ही चांगली बाब नाही."

चीनबाबत हे जास्त लागू असण्याची शक्यता आहे कारण एका आकडेवारीनुसार इथे धूम्रपानाचं प्रमाण पुरुषांमध्ये 52% तर महिलांमध्ये 3% आहे.

पण सोबत पुरुष आणि महिलांमधली रोगप्रतिकारक शक्ती एखाद्या संसर्गाला कसं प्रत्युत्तर देते, यावरही हे अवलंबून आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट आंग्लीयचे प्राध्यापक पॉल हंटर सांगतात, "महिलांची रोग प्रतिकारक शक्ती पुरुषांपेक्षा वेगळी असते. ऑटो इम्यून डिसीजेस (रोग प्रतिकारक यंत्रणा अति सक्रीय झाल्याने होणारे आजार) होण्याचा धोका महिलांना जास्त असतो."

गर्भारपणात किती धोका

ढोबळपणे याचं उत्तर आहे - नाही. पण याविषयी तज्ज्ञांमध्ये दुमत आहे.

गर्भावस्थेत शरीरात भरपूर बदल घडत असतात. यादरम्यान रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि म्हणून आईचं शरीर भ्रूण गर्भाशयात स्वीकार करू शकतं.

म्हणूनच गर्भवती महिलांना संसर्ग होण्याचा धोका वाढतो. आपल्याच वयाच्या महिलांच्या तुलनेत गर्भवती महिलांचा फ्लूमुळे मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते.

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, PA Media

पण गर्भवती महिलांवर कोरोनाव्हायरसचा गंभीर परिणाम होत असल्याचे 'ठोस पुरावे मिळाले नसल्याचं' ब्रिटीश सरकारचं म्हणणं आहे.

प्रोफेसर हंटर म्हणतात, "माझा यावर पूर्ण विश्वास नाही. फक्त 9 गर्भवती महिलांद्वारे मिळालेल्या आकडेवारीवर हे आधारित असल्याने सगळंकाही ठीक आहे असं म्हणणं मला योग्य वाटत नाही. जर माझ्या पत्नीबाबत बोलायचं झालं तर मी तिला खबरदारी घ्यायचा, हात धुवायचा आणि काळजी घ्यायचा सल्ला देईन."

मुलं आणि कोरोनाव्हायरस

मुलांनाही कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. कोरोनाव्हायरसचा संसर्ग झालेला आतापर्यंतचा सगळ्यात कमी वयाचा रुग्ण 1 दिवसाचं बाळ आहे.

मुलांमध्ये आढळणाऱ्या कोव्हिड-19च्या लक्षणांविषयी फार कमी माहिती उपलब्ध आहे. पण ताप येणं, नाक वाहणं, खोकला अशी सर्वसाधारण लक्षणं मुलांमध्ये आढळतात.

लहान मुलं यामुळे आजारी पडू शकतात. फ्लूबाबतही हेच घडतं. यामध्ये पाच वर्षांपेक्षा कमी वय (विशेषतः दोन वर्षापेक्षा कमी) असणाऱ्या मुलांना याचा जास्त धोका असतो.

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

डॉ. पनखनिया सांगतात, "वय वाढल्यावर रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने लोकं जास्त आजारी पडतात."

म्हाताऱ्या लोकांमध्ये आधीच रोग प्रतिकारक शक्ती कमी असते आणि अस्थमासारख्या गंभीर रोगांशी मुकाबला करत असणाऱ्यांमध्ये संसर्गाचं प्रमाण जास्त आढळलं आहे.

अशा लोकांना संसर्गाचा धोका जास्त असेल. पण मुलांवर या व्हायरसचा फारसा परिणाम होत नसल्याचं आढळलंय.

मुलांची रोगप्रतिकार शक्ती अधिक चांगली असते का?

एखादं लहान मूल आणि एखादी वयस्क व्यक्ती यांच्या रोगप्रतिकारक शक्तीत खूप फरक असतो.

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

लहान असताना आपली रोगप्रतिकारक शक्ती अपरिपक्व असते आणि म्हणूनच ती कधीकधी अति कार्यरत होऊ शकते. म्हणूनच मुलांमध्ये ताप येणं सामान्य आहे.

रोगप्रतिकारक शक्ती अति कार्यरत असणंही चांगलं नाही कारण यामुळे शरीराच्या इतर अवयवांचं नुकसान होण्याची शक्यता असते.

कोरोना व्हायरस

कोरोनाव्हायरस घातक ठरण्याचं हे देखील एक कारण आहे.

डॉ. मॅक्डरमट सांगतात, "तुम्हाला वाटतं की परिस्थिती आणखी चिघळेल, पण तसं होत नाही. हा व्हायरस असं काहीतरी नक्की करतो ज्यामुळे मुलांची रोग प्रतिकार शक्ती उत्तेजित होत नाही. पण नेमकं काय घडतं, हे अजून स्पष्ट नाही"

मुलांबाबतची याविषयीची माहिती उपलब्ध नाही, हे देखील आपण लक्षात घ्यायला हवं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)