कोरोना व्हायरसचा संसर्ग लसूण खाऊन टाळता येतो का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रिअॅलिटी चेक टीम
- Role, बीबीसी न्यूज
देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोनावरील लस उलब्ध असली, तरी ती अजून सर्वांपर्यंत पोहोचली नाहीये. अशापरिस्थितीत अनेक प्रकारचे सल्ले सोशल मीडियावरून पसरतायत. खरंच या गोष्टी कोरोनाव्हायरसची बाधा टाळू शकतील का? संशोधक याबाबत काय म्हणतात?
1.लसूण
लसूण खाल्ल्याने कोरोना व्हायरसचा संसर्ग होणार नाही, असं फेसबुकवरच्या अनेक पोस्टमध्ये म्हटलंय.
लसूण हा एक 'आरोग्याला पोषक पदार्थ असून त्यामध्ये सूक्ष्म विषाणूंचा प्रतिरोध' करण्याचे गुण काही प्रमाणात असले तरी लसूण खाल्याने कोरोना व्हायरसपासून संरक्षण मिळत असल्याचा कोणताही पुरावा नाही.
अनेकदा या अशा उपचारांमुळे अपाय होत नाही. पण हे उपचार करत असल्याने जाणवणाऱ्या आरोग्यविषयक तक्रारींसाठी वैद्यकीय सल्ला घेणं टाळू नये.
दक्षिण चीनमध्ये एका महिलेने तब्बल दीड किलो कच्चा लसूण खाल्याने तिच्या घशाला सूज आली आणि तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याची पाळी आल्याची बातमी साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिली आहे.
फळं आणि भाज्यांचा आहारात समावेश आणि भरपूर पाणी पिण्याचा एकूण निरोगी आरोग्यासाठी फायदा होतो, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे.
पण एखादी विशिष्ट गोष्ट खाल्याने कोरोना व्हायरसशी लढा देतो याचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही.
2.मिरॅकल मिनरल्स
कोरोना व्हायरस निपटून काढण्यासाठी MMS म्हणजेच मिरॅकल मिनरल सप्लीमेंट उपयुक्त असल्याचं युट्यूबर जॉर्डन सेथर याने म्हटलंय. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर जोनाथनचे हजारो फॉलोअर्स आहेत.
या मिरॅकल मिनरल सप्लिमेंटमध्ये - क्लोरीन डायऑक्साईड हा एक ब्लीचिंग घटक आहे.
सेथर आणि इतरांनी कोरोनाव्हायरसचा उद्रेक होण्यापूर्वीच या उत्पादनाची जाहिरात करणं सुरू केलं होतं. जानेवारीत सेथरने ट्वीट केलं होतं, "क्लोरीन डायऑक्साईड (MMS)मुळे कॅन्सरच्या पेशी तर नष्ट होतातच, पण कोरोनाव्हायरस नष्ट करण्याची क्षमताही यात आहे."

फोटो स्रोत, Getty Images
MMSच्या सेवनाचे धोके काय असू शकतात याविषयी अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अॅण्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने गेल्यावर्षी इशारा दिला होता. इतर देशांतल्या आरोग्य मंत्रालयांनीही याविषयी धोक्याची सूचना दिलेली आहे.
"या उत्पादनामध्ये कोणताही आजार बरा करण्याची क्षमता आहे किंवा ही उत्पादनं सुरक्षित आहेत का, याविषयीच्या कोणत्याही पाहणीची आपल्याला कल्पना नसल्याचं" एफडीएने म्हटलंय.
MMSच्या सेवनाने मळमळणं,उलट्या, जुलाब आणि मोठ्या प्रमाणात डीहायड्रेशन (शरीरातलं पाणी कमी होणं) असे त्रास होऊ शकतात.
3.घरगुती हँड सॅनिटायजर
कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठीचा एक प्रभावी उपाय म्हणजे हात स्वच्छ ठेवणं.
पण यामुळे हँड सॅनिटायजरचा तुटवडा निर्माण झाल्याच्या अनेक बातम्या आलेल्या आहेत.
या बातम्या आल्याबरोबर घरच्या घरी सॅनिटायजर कसं तयार करता येईल यासाठीच्या रेसिपीजही फिरायला लागल्या. पण अशा प्रकारे घरी तयार करण्यात येणारं सॅनिटायजर हे हात वा त्वचा निर्जुंतक करण्यासाठी उपयुक्त नाही, याने फक्त वस्तू पुसून निर्जंतुक करता येऊ शकतात असं संशोधकांनी म्हटलंय.

60 ते 70% अल्कोहोल असणाऱ्या हँड सॅनिटायजर्समध्ये त्वचा मऊ ठेवणारे घटकही असतात. यामुळे हे सॅनिटायजर वापरल्यानंतरही त्वचेला अपाय होत नाही.
घरच्या घरी प्रभावी हँड सॅनिटायजर बनवता येणं शक्य नसल्याचं लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिनच्या सॅली ब्लूमफिल्ड म्हणतात. कारण यासाठी अगदी व्होडका वापरली तरी त्यातही अल्कोहोलचं प्रमाण 40% असतं.
4. दर 15 मिनिटांनी पाणी पिणं
तोंडाद्वारे शिरलेले विषाणू शरीराबाहेर काढून टाकण्यासाठी दर 15 मिनिटांनी पाणी पिण्याचा सल्ला 'एका जपानी डॉक्टरने' दिल्याचं सोशल मीडियावर अनेक ठिकाणी वाचायला मिळतंय. हे मेसेजेस अनेकदा शेअर करण्यात आलेले आहेत.
पण असं केल्याने त्याचा फायदा होईल याचा कोणताही पुरावा नसल्याचं प्राध्यापक ब्लूमफिल्ड म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
हवेतून पसरणारे विषाणू हे श्वसनमार्गाद्वारे शरीरात प्रवेश करतात. आपल्या श्वासासोबत हे विषाणू शरीरात जातात. यातले काही तोंडात जाण्याची शक्यताही असते. पण सतत पाणी प्यायल्याने विषाणूचा संसर्ग रोखला जाणार नाही.
पण असं असलं तरी सतत पाणी पिणं आणि शरीरातलं पाण्याचं प्रमाण कायम ठेवणं हे आरोग्यासाठी नेहमीच चांगलं असतं.
5. आईस्क्रीम टाळा, गरम पाणी प्या.
कोरोना व्हायरसला दूर ठेवण्यासाठी गरम पाणी पिणं, गरम पाण्याने आंघोळ करणं किंवा हेअर ड्रायरचा वापर करणं फायद्याचं असल्याचं अनेक पोस्ट्समध्ये म्हटलंय.
विविध देशांतल्या वेगवेगळ्या सोशल मीडियावरून कॉपी-पेस्ट करण्यात आलेल्या या पोस्टमध्ये युनिसेफचा खोटा दाखला देण्यात आलेला आहे.
गरम पाणी प्यायल्याने आणि उन्हात गेल्याने या व्हायरसचा नायनाट होतो, शिवाय आईस्क्रीम खाणं टाळावं असं युनिसेफचा खोटा दाखला देत यामध्ये सांगण्यात आलंय.
कोरोना व्हायरसबद्दल पसरणारी चुकीची माहिती रोखण्यासाठी युनिसेफसाठी काम कऱणाऱ्या शार्लट गोर्नित्झ्का सांगतात, "युनिसेफचं नाव सांगत पसरणाऱ्या या मेसेजमध्ये हा कोरोना व्हायरस टाळण्यासाठी आईस्क्रीम आणि इतर थंड पदार्थ खाणं टाळावं असं सांगण्यात आलंय. अर्थातच हे पूर्णपणे खोटं आहे."

फोटो स्रोत, Getty Images
हा व्हायरस उन्हाळ्याच्या काळात शरीराबाहेर फारसा टिकू शकत नसल्याचं आपल्याला माहीत आहे, पण उष्णतेचा यावर नेमका काय परिणाम होतो, हे अजून माहीत नाही.
शरीराचं तापमान वाढवण्याचा प्रयत्न केल्याने किंवा उन्हात गेल्याने हा व्हायरस शरीरात टिकू शकत नसल्याचं या मेसेजमध्ये सांगण्यात आलंय.
पण हा कोरोना विषाणू एकदा शरीरात शिरल्यानंतर तो मारण्याचा कोणताही उपाय नसून शरीराला त्याच्याशी मुकाबला करावाच लागणार आहे.
पण शरीराबाहेर असताना हा विषाणू मारण्यासाठी तापमान 60 डिग्री सेल्सिअसपर्यंत असणं गरजेचं असल्याचं प्राध्यापक ब्लूमफिलड सांगतात. आंघोळीच्या पाण्यापेक्षा वा सॉनापेक्षा हे तापमान अतिशय जास्त आहे.
झोपण्यासाठी वापरतो ती बेडशीट्स वा टॉवेल्स हे 60 डिग्री तापमानाच्या पाण्यात धुणं हा चांगला पर्याय ठरू शकता. यामुळे कपड्यावर असणारे कोणतेही विषाणू मरू शकतात. पण त्वचा साफ करण्यासाठी हा पर्याय योग्य नाही.
शिवाय गरम पाण्याने आंघोळ केल्याने वा गरम पाणी प्यायल्याने तुमच्या शरीराच्या तापमानात बदल होत नाही. एखादी व्यक्ती आजारी पडली तरच तिच्या शरीराचं तापमान बदलतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








