ओमिक्रॉनला रोखण्यासाठी बूस्टर डोस किमान 80% पर्यंत प्रभावी

ओमिक्रॉन

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, ऋजुता लुकतुके
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

इंग्लंडमधील संशोधकांनी कोव्हिड बूस्टर डोसमुळे ओमिक्रॉनला रोखण्यासाठी मदत होईल असं मत मांडलं आहे. ओमिक्रॉनमुळे होणाऱ्या गंभीर आजाराला रोखण्यासाठी 85 टक्के संरक्षण बूस्टर डोस देऊ शकेल असं त्यांचं मत आहे.

पूर्वीच्या डोसपेक्षा हे संरक्षण कमी असलं तरी तिसऱ्या डोसमुळे लोकांचं रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण कमी होईल. 861,306 लोकांनी 16 डिसेंबर रोजी युनायटेड किंग्डममध्ये लशीचा तिसरा डोस घेतलाय

ओमिक्रॉनबद्दल जगभरात अजूनही भीती आणि अनिश्चिततेचं वातावरण आहे. फ्रान्सचे पंतप्रधान जीन कास्टेक्स यांनी ओमिक्रॉनच्या प्रसाराबद्ल भीती व्यक्त केली आहे. ओमिक्रॉन युरोपात विद्युतगतीने पसरत आहे असं ते म्हणाले. युनायटेड किंग्डममधून येणाऱ्या प्रवाशांवर कठोर निर्बंध लादल्यावर त्यांनी हे मत व्यक्त केलं.

ओमिक्रॉनच्या जगभरात झालेल्या प्रसारानंतर बूस्टर डोसची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. त्यानिमित्ताने जगभरातले तज्ज्ञ बूस्टर डोसविषयी काय म्हणतात आणि सध्याचं भारताचं धोरण याचा घेतलेला हा आढावा.

ओमिक्रॉन व्हेरियंटचा प्रसार आता जगातल्या किमान 50 देशांमध्ये झाला आहे आणि त्यातच युकेमध्ये या व्हेरियंटमुळे पहिला मृत्यू झाल्याची बातमी सोमवारी (13 डिसेंबर) आली.

ओमिक्रॉनला हलक्यात घेऊ नका, असं पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना मग सांगावं लागलं. युकेमध्ये पुढच्या वर्षी जून महिन्यापर्यंत सगळ्यांना बूस्टर डोस देणार अशी घोषणा त्यांनी केली.

युकेच नाही तर जगभरात नवीन व्हेरियंट्सशी लढण्यासाठी बूस्टर डोसकडे आशेनं बघितलं जातंय. जगभरातल्या संशोधकांनी तसं सुचवलंय.

संशोधकांना असं का वाटतंय? ओमिक्रॉनचा सामना करण्यासाठी बूस्टर हाच पर्याय आहे का? आणि असं असेल तर भारत अजूनही बूस्टरला मान्यता का देत नाहीये?

बूस्टर डोस का महत्त्वाचा?

भारताच्या मानाने सध्या आफ्रिका, युरोप आणि अमेरिका खंडात ओमिक्रॉनचा प्रसार वेगाने झालाय आणि होतोय. तिथे असं लक्षात आलंय की, सध्या उपलब्ध असलेल्या लशींचे दोन डोस घेतलेल्या लोकांना ओमिक्रॉनपासून पूर्ण संरक्षण मिळतंच असं नाही. आजाराची गंभीरता कमी होते. पण, ब्रेकथ्रू संसर्गाचा धोका राहतोच.

याचं महत्त्वाचं कारण संशोधक देतात ते म्हणजे, आताच्या लशी या दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना व्हायरससाठी बनल्यात आणि मधल्या काळात हा व्हायरस अनेकदा बदललाय.

दुसरं म्हणजे कोरोनाशी लढण्याचं काम शरीरारतल्या अँटीबॉडीज् करतात. पण लस घेतल्याच्या काही काळानंतर शरीरातल्या अँटीबॉडीजचं प्रमाण कमी होतं.

ओमिक्रॉन, बूस्टर डोस

फोटो स्रोत, Getty Images

यावर एक उपाय संशोधकांना दिसतो तो म्हणजे आता उपलब्ध असलेल्या लशींचा तिसरा डोस किंवा बूस्टर डोस देण्याचा. बूस्टर डोस दिल्याने आधीपेक्षा जास्त, व्यापक (नवीन व्हेरियंट्स) आणि संस्मरणीय संरक्षण मिळू शकेल, असा या संशोधकांचा दावा आहे. यात संस्मरणीय शब्दाचा अर्थ शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती कोरोना व्हायरसला आणि बदलत्या रुपांनाही लक्षात ठेवून त्याविरोधात काम करेल असा आहे.

खासकरून ओमिक्रॉन विरोधातल्या संरक्षणाविषयी नॉटिंगहॅम विद्यापीठातले एक संशोधक डॉ. जोनाथन बॉल म्हणतात,

"बूस्टर डोसमुळे रोगप्रतिकारक शक्तीला ओमिक्रॉनबद्दल जास्तीची माहितीही मिळेल आणि त्याची ओळखही पटेल. जेणेकरून ती ओमिक्रॉनशी लढू शकेल. यालाच आम्ही रोग प्रतिकारक शक्तीला एखाद्या व्हायरसविरोधात तयार करणं असं म्हणतो. शरीर तयार असेल तर व्हायरस किंवा व्हेरियंट्स काही करू शकणार नाहीत."

पुढे जाऊन संशोधक एखाद्या व्हायरसविरोधातल्या आपल्या शरीराने दिलेल्या लढ्याला शाळा आणि विद्यापीठाची उपमाही देतात. म्हणजे सुरुवातीला आपल्या शरीराला एखाद्या व्हायरसबद्दल असलेली माहिती शाळकरी मुला इतकी असते. आणि पुढे जसा तो बदलतो, म्युटेट होतो तसं आपलं शरीर विद्यापीठ स्तरावरचा अभ्यास करतं. मग विद्यापीठातल्या विद्यार्थ्याला म्हणजे शरीराला बूस्टर हवाच असं त्यांचं म्हणणं.

भारत सरकारची बूस्टर डोसवर काय भूमिका आहे?

24 नोव्हेंबरला एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी भारतातलं बूस्टर डोसवरचं धोरण सांगितलं,

"सध्या देशात लशी प्रभावीपणे काम करत आहेत. ब्रेकथ्रू म्हणजे लस घेतल्यानंतर होणाऱ्या संसर्गाचं प्रमाण देशात खूपच कमी आहे. सिरो-पॉझिटिव्हीटी रेट खूप जास्त आहे. ही सगळी चांगली लक्षणं आहेत. त्यामुळे आताच्या घडीला देशात बूस्टर डोसची गरज नक्कीच नाही. भविष्यात लागलं तर आपण त्याचा विचार करू शकतो. पण, आताचे सगळे अहवाल बूस्टरची गरज नाही असेच आहेत."

एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया

फोटो स्रोत, Twitter / Randeep Guleria

फोटो कॅप्शन, एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया

त्यानंतर 10 डिसेंबरला आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत नीती आयोगाचे सदस्य डॉ व्ही. के. पॉल यांनीही आधी सर्व नागरिकांना लशीचे दोन डोस मगच बूस्टरचा विचार हे सरकारचं धोरण मांडलं. त्यासाठी जागतिक आरोग्य परिषदेचा सर्वांचं लसीकरण पूर्ण करण्याविषयी असलेला अहवाल लोकांसमोर मांडला.

"जागतिक आरोग्य परिषदेनं लसीकरणाविषयी स्पष्टपणे सांगितलं आहे. आधी लशीचे दोन्ही डोस पूर्ण करा आणि सध्या देशातलं चित्र पाहता आम्हालाही असंच वाटतं की, आधी सगळ्या प्रौढ जनतेला लशीचे पहिले दोन डोस देऊ या. आरोग्य परिषद आणि आपलं धोरण हे एकसारखं आहे."

देशातील तज्ज्ञ बूस्टर डोसवर काय म्हणतात?

केंद्र सरकारचा बूस्टर डोस देण्याचा इतक्यात विचार नाही हे स्पष्ट आहे. आता बाहेरच्या जगात बूस्टर डोसवर सुरू असलेली चर्चा आणि देशातली परिस्थिती याला धरून बूस्टर डोसवर देशांतर्गत तज्ज्ञ काय म्हणतात हे जाणून घेऊया.

ओमिक्रॉन, बूस्टर डोस

फोटो स्रोत, Getty Images

इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांना बूस्टर डोस आवश्यक वाटतो. पण, त्याचबरोबर आधी सर्व जनतेचं प्राथमिक लसीकरण महत्त्वाचं आहे याबद्दलही त्यांना खात्री आहे.

"प्राथमिक लसीकरण म्हणजे प्रौढ नागरिकांचे लशीचे पहिले दोन डोस होणं आवश्यक आहे हे खरंच आहे. पण, त्याचबरोबर बूस्टर डोससाठी आम्हा तज्ज्ञांची आग्रही मागणी आहे. निदान आरोग्यसेवक, डॉक्टर आणि सहव्याधी असलेले तसंच साठ वर्षांवरचे नागरिक यांच्या बूस्टर डोसला सरकारने परवानगी द्यावी असं आमचं म्हणणं आहे. कारण, आता हे सप्रमाण सिद्ध झालं आहे की, लस घेतल्यानंतर काही काळाने शरीरातल्या व्हायरसविरोधातल्या अँटीबॉडी कमी होतात," डॉ. वानखेडकर सांगतात.

इथं आपण आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ती म्हणजे बूस्टरवर डोसवर चर्चा करत असताना बाहेरच्या काही देशांमध्ये लशीचे पहिले दोन डोस घेतानाही लोकांमध्ये फारसा उत्साह नव्हता आणि आजही नाही. लशींबद्दलच्या गैरसमजुती आणि दुष्परिणामांची भीती हे सुद्धा व्हायरसचा प्रसार होण्यामागचं आणि तो बदलण्यामागचं कारण आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)