ओमिक्रॉन: दिल्लीतही रात्रीचा कर्फ्यू लागू; कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाचं पाऊल

फोटो स्रोत, © Vaibhav Garge
ओमिक्रॉन तसंच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यादृष्टीने राजधानी दिल्लीत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
दिल्लीत 27 डिसेंबरच्या म्हणजे सोमवारी रात्रीपासून दररोज रात्री कर्फ्यू लागू असेल. रात्री 11 ते सकाळी 5 या काळात नाईट कर्फ्यू असेल. कोरोनाला रोखण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आल्याचं दिल्ली प्रशासनाने म्हटलं आहे.
दिल्लीत रविवारी कोरोनाचे 290 रुग्ण आढळले तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. पॉझिटिव्हिटी रेट 0.55 असा आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 922 कोरोनाचे रुग्ण आढळले.
कोरोनाला रोखण्यादृष्टीने शिर्डीस्थित साईबाबांचं मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.
दिल्ली सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित मालिकारुपी कार्यक्रम 5 जानेवारीपासून आयोजित केला होता. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं. या कार्यक्रमाच्या नवीन तारख्या लवकरच जाहीर करण्यात येतील असं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान केंद्राने आणि राज्य सरकारने विमान प्रवासाबाबत वेगवेगळी नियमावली जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रात विमान प्रवासाबाबत गोंधळ उडाला होता. नेमकी कोणती नियमावली मानावी याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.
त्यातच केंद्र सरकारने राज्य सरकारचे कान टोचल्यानंतर या गोष्टीला केंद्र विरुद्ध राज्य संघर्षाचा नमुना म्हणून पाहिले गेले. आता सर्वांवर पडदा पडला आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेली नियमावली मागे घेतली आहे आणि केंद्र सरकारने जे नियम सांगितले तेच लागू होतील असं स्पष्ट करण्यात आलं.
परदेशातून आणि देशातील इतर राज्यातून आलेल्या प्रवाशांसाठी केंद्र सरकारची नियमावली आधार मानली जाईल असं राज्याने सांगितलं आहे.
हाय रिस्क प्रवासी आणि हाय रिस्क देशांबद्दल काय आहेत नियम
हाय रिस्क देशः
- दक्षिण अफ्रिका
- बोस्वाना
- झिब्बाब्वे
हाय रिस्क प्रवासी कोण?
- हाय रिस्क देशांमध्ये गेल्या 15 दिवसात प्रवास केलेले लोक
- हाय रिस्क देशातून येणारे प्रवासी
- हाय रिस्क देशातून येणाऱ्या प्रवाशांना RTPCR बंधनकारक
- 7 दिवस institution quarantine करावं लागणार. Positive असेल तर रुग्णालयात दाखल करणार
- 7 दिवसानंतर पुन्हा टेस्ट होणार. टेस्ट निगेटिव्ह आली तर 7 दिवस home quarantine
- इतर राज्यातून येणाऱ्यांना लशीचे दोन डोस अनिवार्य
- लस घेतली नसेल तर 72 तासांचा RTPCR टेस्ट
परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांना RTPCR रिपोर्ट गरजेचा नाही - राजेश टोपे
परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांना RTPCR रिपोर्ट गरजेचा नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
मी याबाबत मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांशी चर्चा केली असून आज नोटिफिकेशन निघणार आहे असं राजेश टोपे यांनी म्हटलं.
मात्र याचबरोबर लशीचे दोन्ही डोस झाले असले पाहिजे असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
याआधी, गुरूवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत विचारण्याच आलं. ते म्हणाले, "काल केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमावलील तफावत होती. परदेशातून भारतातील विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांसाठी एकसारखा नियम असावा असा प्रयत्न आपण केलाय. यात काही दुमत नाही."
देश म्हणून एक नियम असायला हवेत यासाठी नियम असायला हवेत असं ते पुढे म्हणाले.
पण राज्य सरकारच्या नियमात देशातील इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांना 48 तासांचा RTPCR निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक करण्यात आला होता.
त्यावर ते म्हणाले, " इतर राज्यांतून येणाऱ्या 48 तासांचा RTPCR निगेटिव्ह रिपोर्ट दाखवावा लागतो. आपण इतर राज्यात जातो तेव्हा RTPCR रिपोर्ट लागतोच. तर आपल्या राज्यात येण्यासाठी लागेल." असं अजित पवार म्हणाले होते पण आता RTPCR ची आवश्यकता नसल्याचं टोपेंनी स्पष्ट केलं आहे.
विमान प्रवासासाठी जाहीर केली होती नियमावली
कोरोनाच्या नवीन ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर सतकर्ता म्हणून केंद्र सरकारने विमान प्रवासासाठी नवीन नियम जाहीर केले आहेत त्याच वेळी महाराष्ट्र सरकारने देखील परदेशातून आलेल्या लोकांसाठी नियमावली जाहीर केली आहे.
महाराष्ट्र सरकारची नियमावली ही केंद्राच्या नियमांना धरून नाही अशी ओरड केंद्राने केली आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांना पत्र लिहिले आहे. केंद्र सरकारच्या सूचनांप्रमाणेच राज्यातील सूचना असाव्यात असं केंद्रीय आरोग्य सचिवांनी म्हटले आहे.
इक्बालसिंग चहल यांचे पत्र
कोव्हिडच्या नव्या नियमांबाबत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी राज्याचे मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती यांना पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी नियम स्पष्ट केले आहेत.
- दक्षिण अफ्रिका, बोस्वाना, नामीबिया, झिंबाब्वे अशा बाधित देशातून येणाऱ्यांना सात दिवसांचं इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन
- गेल्या 15 दिवसात या देशांमध्ये प्रवास केलेल्यांना सात दिवसांचं इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन
- या प्रवाशांची RTPCR तपासणी करण्यात येणार
- सात दिवसांनी टेस्ट निगेटिव्ह असेल तर 7 दिवस होम क्वारंटाइन
- या शिवाय 'at risk' देशातून येणाऱ्यांना केंद्र सरकारच्या नियमावलीप्रमाणे कारवाई
- इतर देशांतून प्रवाशांसाठी केंद्र सरकारच्या नियमावलीप्रमाणे कारवाई
- देशातील इतर राज्यातून येणारे प्रवासी- दोन डोस किंवा RTPCR रिपोर्ट 72 तास पहिला
- मुंबईत येणाऱ्या ज्या प्रवाशांनी लशीचे दोन डोस घेतले नाहीत त्यांना RTPCR बंधनकारक
- काही आपात्कालीन परिस्थितीत देशांतर्गत प्रवाशांची RTPCR करण्यात येईल
केंद्र आणि राज्य आमनेसामने
बाहेर देशातून येणाऱ्या प्रवाशांना RTPCR चाचणी बंधनकारक असेल, चाचणी निगेटिव्ह आल्यास 7 दिवस होम क्वारंटाइन व्हावं लागेल, असं राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमवलीत म्हटलं आहे. तर केंद्राने 14 दिवसांचे क्वारंटाईन सांगितले आहे.
भारतात यायचं तर होम क्वारंटाईन करावे असे केंद्राने सूचवले आहे पण महाराष्ट्रात इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन आहे याबाबतही केंद्राने आक्षेप नोंदवला आहे.
ओमिक्रोनचे रुग्ण आतापर्यंत आढळले नसलेल्या देशातून आलेल्या प्रवाशांना एअरपोर्टवर आल्यानंतर RTPCR टेस्ट बंधनकारक आहे.
केंद्र सरकारच्या सूचनांनुसार महाराष्ट्र सरकारनेही आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नियम जाहीर केले आहेत.
महाराष्ट्र सरकारचे नियम काय आहेत?
- पोलीस परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी एक फॉर्म तयार करतील. गेल्या 15 दिवसात ते कुठे गेले होते याची माहिती द्यावी लागेल. एअरपोर्ट अधिकाऱ्यांनी ही माहिती तपासावी
- ज्या देशात ओमिक्रोनचे रुग्ण आढळून आलेत, अशा देशातून येणाऱ्या प्रवाशांना लवकर विमानातून बाहेर काढावं.
- त्यांच्या तपासणीसाठी वेगळे काउंटर असावेत. या प्रवाशांना 7 दिवस इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन करावं लागेल.
- दुसऱ्या, तिसऱ्या, सातव्या दिवशी RTPCR चाचणी बंधनकारक.
- चाचणी निगेटिव्ह आल्यास 7 दिवस होम क्वारंटाइन व्हावं लागेल.
- ओमिक्रोनचे रुग्ण आतापर्यंत आढळले नसलेल्या देशातून आलेल्या प्रवाशांना एअरपोर्टवर आल्यानंतर RTPCR टेस्ट बंधनकारक. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास होम क्वारंटाइन व्हावं लागेल.
- कनेक्टिंग विमान असल्यास महाराष्ट्रात RTPCR महत्त्वाची.
केंद्र सरकारने दिलेली नियमावली
आंतरराष्ट्रीय प्रवाशांना ही नियमावली लागू होणार आहे.
1. सर्व प्रवाशांनी एअर सुविधा पोर्टलवर (https://www.newdelhiairport.in/airsuvidha/apho-registration) एक सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरून द्यायचा आहे. त्यामध्ये तुमच्या प्रवासासंबंधीची सर्व माहिती द्यायची आहे, ज्यामध्ये तुमच्या नियोजित प्रवासाच्या आधी 14 दिवस जर प्रवास केला असेल, तर त्यासंबंधी सांगणं आवश्यक आहे.
2. प्रवासाच्या 72 तास आधी कोव्हिडची आरटीपीसीआर चाचणी करून त्याच्या निगेटिव्ह रिपोर्ट अपलोड करणं बंधनकारक आहे.
3. ज्या प्रवाशांनी एअर सुविधा पोर्टलवर सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरला असेल आणि आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल अपलोड केला असेल त्यांनाच बोर्डिंगची परवानगी दिली जाईल.
4. कोरोनाचा संसर्ग अधिक असलेल्या (At risk) देशांतून आलेल्या प्रवाशांची विमानतळावर उतरल्यावर कोरोना चाचणी केली जाईल. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला तर त्यांना क्वारंटाइन केलं जाईल आणि पॉझिटिव्ह आल्यास नियमांनुसार पुढील पावलं उचलली जातील, अशी माहिती एअरलाइन्सनं द्यायला हवी.
5. सर्व प्रवाशांनी मोबाईलवर आरोग्य सेतू अप डाऊनलोड करणं बंधनकारक आहे.
6. डि-बोर्डिंगची सर्व प्रक्रिया हे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून पार पाडली जाईल.
7. सर्व प्रवाशांची थर्मल चाचणी एअरपोर्टवरील आरोग्य अधिकारी पार करतील. ऑनलाइन भरलेला सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म आरोग्य अधिकाऱ्यांना दाखवावा लागेल.
8. स्क्रीनिंगदरम्यान कोणत्याही प्रवाशाला कोव्हिडची लक्षणं आढळून आल्यास त्याला तात्काळ आयसोलेट केलं जाईल. जर संबंधित व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली, तर त्या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींचाही शोध घेतला जाईल.
कोरोनाचा संसर्ग अधिक असलेल्या (At risk) देशांतून आलेल्या प्रवाशांसाठी काय आहेत नियम?
1. विमानतळावर आल्यानंतर त्यांना कोव्हिड-19 चाचणीसाठी सँपलं द्यावं लागेल. चाचणीचा रिपोर्ट येईपर्यंत त्यांनी थांबणं बंधनकारक आहे.

फोटो स्रोत, Getty Images
2. जर चाचणी निगेटिव्ह आली तर 7 दिवसांसाठी होम क्वारंटाइन व्हावं लागेल. आठव्या दिवशी पुन्हा चाचणी होईल आणि ही चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर संबंधित व्यक्तीने पुढचे सात दिवस स्वतःचं सेल्फ-मॉनिटरिंग करणं आवश्यक आहे.
3. समजा एखाद्या व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली, तर त्या प्रवाशाचं सँपल INSACOG लॅबोरेटरी नेटवर्क इथं जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवलं जाईल.
4. त्या प्रवाशाच्या संपर्कात आलेल्या सर्वांची माहिती घेतली जाईल आणि त्यांना संबंधित राज्य सरकारकडून होम किंवा इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन केलं जाईल.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









