Omicron : 'लॉकडाऊन नको असेल तर..', उद्धव ठाकरेंनी दिले निर्देश

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Twitter

लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधनं पाळावीच लागतील, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासोबत व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या.

कोरोनाच्या 'ओमिक्रॉन' या नव्या व्हेरियंटनं जगभर भीतीचं वातावरण निर्माण केलं असताना, भारतातही खबरदारीची पावलं उचलण्यास सुरुवात झालीय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनासोबत चर्चा करून, यासंबंधी आवश्यक पावलं उचलण्याचे आदेश दिले आहेत.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला आदेश दिलेत की, "कोव्हिडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा. केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा."

विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याचे देखील निर्देश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य प्रशासनाला केली आहे.

कोव्हिडच्या दोन्ही लाटांचा आपण चांगला मुकाबला केला होता. पण आता या विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढवणारे आहे.

याची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये, म्हणून मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने अतिशय काळजी घ्यावी, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

कोरोना व्हेरियंट

फोटो स्रोत, Getty Images

राज्यात पुन्हा संसर्गात वाढ झाली तर लॉकडाऊनसारखे पाऊल परवडणारे नाही, त्यामुळे परत लॉकडाऊन लागू द्यायचा नाही, या निर्धाराने नियमित मास्क वापरणे, अनावश्यक गर्दी न करणे, सुरक्षित अंतर पाळणे अशी काही बंधने पाळावीत लागतील, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

लसीचे दोन्ही डोस प्रत्येकाने घेणे, विशेषतः विमानतळावरून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत प्रवाशांची काटेकोर चाचणी करणे यादृष्टीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले. यासंदर्भात केंद्राकडून येणाऱ्या सूचनांची वाट न पाहता युद्धपातळीवर जे जे गरजेचे वाटते ते निर्णय घेऊन आवश्यक पाऊले लगेच टाकावीत असं त्यांनी स्पष्ट केले.

आपल्या सर्वांमधीलच बेसावधपणा वाढला आहे. 'कुछ नही होता यार' असा पवित्रा मोठ्या संकटात टाकू शकतो. मास्क न वापरणे आणि नियम तोडून अनावश्यक गर्दी करणे यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

ऑक्सिजन, औषध उपलब्धता तपासा, अग्निसुरक्षा ऑडिट पूर्ण करा

कोव्हिडशी अव्याहतपणे लढत असल्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी प्रशासनातील सर्वांचे कौतुक केले.

ते म्हणाले, "व्हेरिएंट हा उंबरठा ओलांडून आला आहे का हे काळजीपूर्वक पाहावे लागेल. दोन्ही लाटांमध्ये आपल्याला कुठं कमी पडलो ते कळत होते. ऑक्सिजनचा साठा वाढविण्यासाठी धावपळ करावी लागली होती."

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

त्यामुळे आता या नव्या विषाणू प्रकारामुळे शहरे असो किंवा दुर्गम भागातली रुग्णालये असोत, आपल्याला ऑक्सिजन निर्मिती, ऑक्सिजन साठा, आगीच्या घटना घडू नयेत म्ह्णून अग्निसुरक्षा तसेच स्थापत्य विषयक ऑडिट, औषधांची उपलब्धता हे सर्व प्रत्येक जिल्हा प्रशासनाने जातीने पाहावे."

मास्क आवश्यकच, अनावश्यक गर्दी होऊ देऊ नका

महाराष्ट्रातील जनता समजूतदार आहे. यापूर्वीही सरकारच्या सर्व सूचनांचे पालन त्यांनी केले आहे. कोविडचे रुग्ण कमी झाल्यामुळे लोकांमध्ये बेसावधपणा आला आहे. या विषाणूशी कसे लढायचे , कोणते उपचार करावेत हा नंतरचा भाग झाला पण मुळात हा संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर मास्क अनिवार्य आहेच असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आता लग्नसराईचे दिवस आहेत. मित्र- आप्तेष्ट परदेशातून देखील येतील त्यामुळे आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे.

परदेशातून आलेल्या व्यक्तींवर लक्ष ठेवणे गरजेचे

परदेशातून लोक मोठ्या प्रमाणावर मुंबईत व इतर ठिकाणी येणे सुरू झाले आहे . त्यापैकी अनेक जण देशांत इतरत्र उतरून देशांतर्गत विमान सेवेने , रस्ते व रेल्वेमार्गे येतात. त्यांच्यात कुणी विषाणूचा वाहक असेल तर इतरांना मोठा धोका होऊ शकतो त्यामुळे अशा प्रवाशांची तपासणी करणे, त्यांच्याकडे लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे , त्यादृष्टीने लगेच युद्ध पातळीवर कामाला लागा असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

चाचण्या वाढवा, आवश्यक किट्स पुरवा

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मधल्या काळात कमी झालेल्या चाचण्यांवर चिंता व्यक्त केली व चाचण्या वाढविण्याचे निर्देश दिले. विषाणूच्या नव्या प्रकाराला ओळखणारे किटस राज्यातील प्रयोगशाळांना मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

तसंच दोन्ही डोससह लसीकरण करून घेणे अतिशय आवश्यक असून प्रत्येकाने ही काळजी घेतलीच पाहिजे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

ओमिक्रॉन घातक कशामुळे?

टास्क फोर्सच्या डॉ. शशांक जोशी यांनी बैठकीत या विषाणूविषयी माहिती दिली.

कोविडच्या या नव्या विषाणूने दक्षिण आफ्रिकेतील यापूर्वीच्या डेल्टा व्हेरिएंट प्रकाराची जागा घेतली असून त्याचा संसर्ग कितीतरी अधिक आहे

डेल्टा ची जागा ओमिक्रॉनने अवघ्या दोन आठवड्यात घेतली यावरून त्याची घातकता लक्षात येते

दुसऱ्या लाट्स कारणीभूत असलेल्या डेल्टाचे दोन म्युटेशन होते. बेटा प्रकाराचे तीन म्युटेशन होते पण ओमिक्रॉन या प्रकाराचे पन्नासहून अधिक म्युटेशन आहेत.

हा व्हेरिएंट सध्याच्या औषधांना, लसीला दाद देतो किंवा नाही ते डॉक्टर्स आणि तज्ञ जाणून घेत आहेत पण घाबरून न जाता आपण काळजी घेण्याची गरज आहे कारण याचा संसर्गाचा वेग पूर्वीच्या डेल्टापेक्षा कितीतरी जास्त आहे.

महाराष्ट्रात निर्बंधांची नवी नियमावली

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं खबरदारी घेण्यास सुरुवात केलीय. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवास करणाऱ्यांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे.

कोरोना व्हेरियंट

फोटो स्रोत, Getty Images

परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला केंद्र सरकारनं घालून दिलेल्या नियमांचा पालन करावं लागेल, तर इतर राज्यातून येणारा प्रवासी दोन्ही लशी घेतलेला असावा किंवा 72 तासांपूर्वी RT-PCR चाचणी केलेला असावा, असं महाराष्ट्र सरकारनं नव्या नियमावलीत म्हटलंय.

राज्यात सार्वजनिक वाहतुकीसाठीही लशीच्या दोन्ही डोसची अट ठेवण्यात आलीय. कार्यक्रम, सभागृह, मॉल्स यांमध्ये प्रवेशासही हा नियम लागू करण्यात आलाय.

मास्क परिधान करणं बंधनकारक आहे. अन्यथा 500 रुपयांचा दंड आकरला जाईल.

राजकीय सभा, कार्यक्रमांमध्ये कोव्हिडच्या नियमांचा उल्लंघन केल्यास 50 हजारांचा दंड आकारला जाणार आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं, तसंच सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, असंही आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलंय.

केंद्र सरकारनंही सर्व राज्यांना पत्र लिहून, दक्षिण आफ्रिकेतील नव्या व्हेरियंटबाबत सतर्क राहण्याचे आदेश दिलेत.

आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांची नीट तपासणी करण्यास केंद्रानं राज्यांना कळवलंय.

दक्षिण आफ्रिकेवरून येणारी विमानं बंद करण्याची मागणी

या व्हेरियंटला व्हेरिएंट ऑफ कन्सर्न असं म्हटलेलं आहे. हा काळजीचा व्हेरिएंट आहे, असा त्यांचा प्राथमिक अनुमान आहे. यामध्ये जी माहिती उपलब्ध झाली, ती संपूर्ण माहिती आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारला कळवली आहे.

राजेश टोपे

फोटो स्रोत, facebook

राजेश टोपे म्हणाले, "या संदर्भात मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी मला दक्षिण आफ्रिकेवरून येणारी विमानं थांबवण्याची विनंती केली. पण तसं करण्याचे अधिकार राज्याकडे नाहीत. त्यामुळे आम्ही या बाबी केंद्र सरकारला कळवल्या आहेत. याबाबतचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात येईल."

"महाराष्ट्रात सध्या तरी अशा प्रकारचा कोणताही व्हेरियंट आढळलेला नाही. त्यामुळे सध्या काळजी करण्याचा विषय नाही. पण आपल्याला सतर्क राहावं लागेल. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी आपल्याला काळजीपूर्वक करावी लागेल," असंही टोपे यांनी म्हटलं.

दक्षिण अफ्रिकेतून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला प्रवाशाला BMC क्वारंटाईन करणार

दक्षिण अफ्रिकेतून मुंबईत दाखल होणाऱ्या प्रत्येक नागरिकाला क्वारंटाईन करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. कोरोना व्हायरसच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटसंदर्भात खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

दक्षिण आफ्रिकेसह जर्मनी, ऑस्टिृया, बेल्जियम, रशिया यांयारख्या देशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात येईल, असंही पेडणेकर यांनी सांगितलं.

वरील सर्व देशांमधून येणारा प्रवासी पॅाझिटिव्ह आढळल्यास जिनोम सिक्वेसिंग करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, नव्या कोरोना व्हेरिएंटच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना तसंच नियोजन यासाठी मुंबई महापालिकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठकही आयोजित करण्यात आली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) कोरोनाचा नवा विषाणू हा चिंताजनक (variant of concern) असल्याचं जाहीर केलं असून त्याला ओमिक्रॉन असं नाव देण्यात आलं आहे. भारतातील विविध राज्यांनी आता प्रतिबंधात्मक पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधानांकडून खबरदारीची सूचना

कोरोना व्हायरसच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत खबरदारी बाळगावी अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना केली आहे.

Omicron: किशोरी पेडणेकर- दक्षिण अफ्रिका, जर्मनी, ऑस्ट्रिया, रशियातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाइन करणार

फोटो स्रोत, Getty Images

यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करून माहिती दिली. सर्वप्रथम अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदी यांना नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत माहिती दिली.

नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा गुणधर्म, विविध देशांमध्ये त्याचा पाहायला मिळालेला परिणाम, भारतावर होऊ शकणारा संभाव्य परिणाम या सर्व गोष्टींची पंतप्रधान मोदींना माहिती देण्यात आली. या पार्श्वभूमीवर सर्वांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी सूचना पंतप्रधानांनी केली.

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

आंतरराष्ट्रीय अड्डाणांमार्फत देशात दाखल होणाऱ्या प्रवाशांवर विशेष नजर ठेवावी, असं मोदी म्हणाले.

धोक्याची सूचना असलेल्या देशांवर लक्ष केंद्रीत करावं, या देशांमध्यून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी घेण्यात यावी. पण त्याचवेळी आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान अडचणी येऊ नयेत, याचीही काळजी घ्यावी, असं मोदी म्हणाले.

तसंच या संदर्भात कार्यरत अधिकाऱ्यांनी राज्य सरकारांसोबत मिळून एकत्रितपणे काम करावे. जिल्हे तसंच राज्यांमध्ये या नव्या व्हेरिएंटबाबत योग्य ती माहिती आणि जागरुकता निर्माण होईल, याची सर्वांनी खात्री करावी, अशी सूचना मोदी यांनी केली.

राज्यांकडून उपाययोजना

नव्या कोरोना व्हेरिएंटची कुणकुण लागताच देशातील विविध राज्य सरकारं तातडीने सावध झाल्याचं पाहायला मिळत आहे.

बाधित देशांमधून बंगळुरूत दाखल होणाऱ्या प्रवाशांनी RT-PCR चाचणी करून घ्यावी, असं कर्नाटकचे आरोग्य मंत्री डॉ. डी. के. सुधाकर यांनी म्हटलं.

X पोस्टवरून पुढे जा, 5
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 5

चाचणीत पॉझिटिव्ह आढळणाऱ्या प्रवाशांवर विमानतळ परिसरातच उपचार करण्यात येतील. तसंच प्रवास करून आलेल्या सर्व प्रवाशांना होम क्वारंटाईन बंधनकारक असेल, असं सुधाकर म्हणाले.

उत्तराखंड सरकारने यासंदर्भात प्रतिबंधक नियमावली लागू केली आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 6
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 6

याठिकाणी कोरोना चाचणी तसंच नियमांचे पालन याला विशेष प्राधान्य देण्यात आलं आहे. कोणत्याही परिस्थितीत संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येईल, असं प्रतिपादन उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी केलं.

आपल्याकडे नेमकी काय माहिती आहे?

कोरोनाच्या या नव्या विषाणूला B.1.1.529 असं नाव देण्यात आलं आहे. व्हायरसच्या इतर व्हेरिएंटना देण्यात आलेल्या अल्फा आणि डेल्टा अशा ग्रीक नावांप्रमाणे या व्हेरियंटला Omicron - ओमायक्रॉन नाव देण्यात आलंय.

या विषाणूमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर बदल - म्युटेशन्स झाल्याचं आढळलं आहे. विषाणूच्या बदलामध्ये अत्यंत असामान्य असे काही घटक आढळून आले आहेत. त्यामुळं इतर व्हेरीएंटच्या तुलनेत हा प्रकार अत्यंत वेगळा आहे, असं दक्षिण आफ्रिकेतील सेंटर फॉर एपिडेमिक रिस्पॉन्स अँड इनोव्हेशनचे संचालक तुलिओ डि ऑलिव्हिरा यांनी म्हटलं.

"या नव्या प्रकारच्या विषाणूनं आम्हाला आश्चर्यचकित केलं. बदलांचा विचार करता यानं मोठी उडी घेतली आहे. आम्हाला अपेक्षा होती, त्यापेक्षा अधिक म्युटेशन झालं आहे," असं ते म्हणाले.

याबाबत माध्यमांना माहिती देताना ऑलिव्हिरा यांनी म्हटलंय, या नव्या विषाणूत एकूण 50 म्युटेशन आढळलेत. त्यापैकी 30 पेक्षा अधिक स्पाईक प्रोटीनवर आढळलेत. बहुतांश लसींद्वारे या स्पाईक प्रोटिनला लक्ष्य करण्यात आलं आहे. कोरोनाचा विषाणू याच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असतो.

कोव्हिड व्हेरियंट्स

फोटो स्रोत, Getty Images / Eugene Mymrin

यात अधिक खोलवर अभ्यास करून रिसेप्ट बाईंडिंग डोमेनचा (आपल्या शरिरातील पेशींच्या या भागाशी विषाणूचा सर्वप्रथम संपर्क येतो) अभ्यास केला असता यात 10 म्युटेशन आढळले. संपूर्ण जगाला हादरा देणाऱ्या डेल्टा व्हेरिएंटमध्ये या भागात केवळ 2 म्युटेशन झालेले होते.

कोरोनाच्या विषाणूवर मात करण्यात अपयशी ठरलेल्या एकाच रुग्णाच्या शरिरात एवढे म्युटेशन झालेले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

अनेक म्युटेशन हे वाईटच असतात असंही नाही. पण त्याचे परिणाम नेमके काय होतात, हे महत्त्वाचं असतं.

पण आता समोर आलेली चिंतेची बाब म्हणजे हा नवा विषाणू वुहान आणि चीनमध्ये आढळलेल्या मूळ विषाणूच्या तुलनेत प्रचंड वेगळा आहे. म्हणजे, या विषाणूच्या स्ट्रेनचा वापर करून तयार करण्यात आलेल्या लशी फारशा प्रभावी ठरू शकणार नाहीत.

काही म्युटेशन हे आधीच्या इतर काही प्रकारच्या विषाणूंमध्ये आढळलेले आहेत. त्यावरून या विषाणूतील त्यांच्या नेमक्या भूमिकेबाबत माहिती मिळते.

उदाहरण सांगायचं झाल्यास, N501Y यामुळं कोरोना विषाणूचा प्रसार हा आणखी सहजपणे होताना दिसतो. यापैकी काही विषाणूमुळं शरिरातील अँटिबॉडीला नेमका विषाणू ओळखणं कठिण ठरत असल्यानं त्यांचा प्रभाव कमी होतो. पण इतर काही पूर्णपणे नवीनही आहेत.

कोरोना व्हेरियंट्स

फोटो स्रोत, Getty images / artur carvalho

"या विषाणूच्या संसर्गाची क्षमता वाढण्याची शक्यता असल्यानं, काळजीचं कारण असू शकतं. यात एका व्यक्तीकडून दुसऱ्याला संसर्ग होण्याची क्षमताही वाढलेली असू शकते. त्याचबरोबर रोगप्रतिकार शक्तीशी संबंधित यंत्रणेतही त्याची वाढ झालेली असू शकते," अशी शक्यता दक्षिण आफ्रिकेतील क्वाझुलू नटाल विद्यापीठातील प्राध्यापक रिचर्ड लेसेल्स यांनी व्यक्त केली आहे.

अनेक अशीही उदाहरणं आहेत जी कागदावर अत्यंत धोकादायक वाटतात मात्र, प्रत्यक्षात त्याचा परिणाम कमी असतो. बीटा व्हेरिएंटबाबत प्रचंड चिंता आणि भिती होती, कारण रोग प्रतिकार शक्तीच्या तावडीतून तो सुटू शकत होता. पण त्याऐवजी डेल्टा व्हेरिएंटचाच वेगानं प्रसार झाला आणि त्याचे रुग्ण वाढले.

"बीटा व्हेरिएंटचा विषाणू केवळ रोग प्रतिकार यंत्रणेच्या तावडीतून सुटणारा होता, तर डेल्टा व्हेरिएंट मात्र या क्षमतेबरोबरच अधिक प्रभावीदेखील होता. त्यामुळं त्यांच्या संसर्गाचं प्रमाण उच्च पातळीवर असल्याचं पाहायला मिळालं," असं केम्ब्रिज विद्यापीठातील प्राध्यापक रवी गुप्ता म्हणाले.

शास्त्रज्ञांनी सखोल अभ्यास केल्यानंतर याबाबतचं चित्र अधिक स्पष्ट होईलच. मात्र, प्रत्यक्षात जास्तीत जास्त प्रमाणात निगराणी ठेवल्यास अधिक लवकर उत्तरं समोर येऊ शकतात.

याबाबत एवढ्यात एखाद्या निष्कर्षावर पोहोचणंही घाईचं ठरेल, मात्र चिंता करण्यासारख्या काही गोष्टी समोर आलेल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेच्या गौतेंग प्रांतामध्ये या नव्या विषाणूची लागण झाल्याची 77 प्रकरणं समोर आली आहे. त्याशिवाय बोस्तवानामध्ये चार आणि हाँग काँगमध्ये एक (सर्वांची दक्षिण आफ्रिकेतील प्रवासाची नोंद) रुग्ण आढळला आहे.

विषाणूचा हा प्रकार अधिक वेगानं प्रसरत असल्याचेही काही संकेत आहेत.

या विषाणूच्या चाचण्यांवरून काही विचित्र बाबीही (एस-जीन ड्रॉपआऊट सारख्या) समोर आल्यात. त्यावरून विषाणूच्या या व्हेरिएंटचं पूर्ण अनुवांशिक विश्लेषण न करताही त्यावरून त्याची माहिती घेता येऊ शकते.

त्यावरून गौतेंग प्रांतात असलेली 90% टक्के प्रकरणं या विषाणूची असू शकतात आणि दक्षिण आफ्रिकेच्या इतरही अनेक प्रांतात सध्या त्याचं अस्तित्व असू शकतं.

पण याचा संसर्ग डेल्टा व्हेरिएंटच्या विषाणूपेक्षा अधिक वेगानं होतो का? किंवा हा किती घातक आहे? आणि लशींद्वारे मिळणारं संरक्षण यात किती फायदेशीर ठरू शकतं, हे यावरून स्पष्ट होत नाही.

दक्षिण आफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर नागरिकांना कोव्हिडचा संसर्ग झाला होता. याठिकाणी पूर्ण लसीकरण झालेल्यांचं प्रमाण 24 टक्के आहे. यापेक्षा अधिक लसीकरणाचं प्रमाण असलेल्या देशांमध्ये या व्हेरिएंटचा संसर्ग कसा पसरेल हेही यावरून स्पष्ट होत नाही.

त्यामुळं आपल्याकडे सध्या अशा नव्या व्हेरिएंटचा प्रवेश झाला आहे ज्यामुळं मोठ्या प्रमाणावर चिंता वाढल्या आहेत, पण त्याबाबतची पुरेशी माहिती मात्र उपलब्ध नाही. त्यावर बारकाईनं लक्ष ठेवून केव्हा आणि काय करायला हवं याचा विचार करावा लागणार आहे. या साथीतून मिळालेला सर्वांत महत्त्वाचा धडाच हा आहे की, तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळण्याची वाट पाहू शकत नाही.

महाराष्ट्राला किती धोका?

कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटचा महाराष्ट्राला किती धोका आहे, याविषयी आम्ही अधिक जाणून घ्यायचा प्रयत्न केला.

महाराष्ट्र कोव्हिड टास्कफोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितलं, "सद्यस्थितीत घाबरून जाण्याची गरज नाही. पण सतर्क रहायाला हवं. आधीच्या व्हेरियंटमध्ये कमी म्युटेशन होते. पण याची परसण्याची क्षमता जास्त आहे. रोगप्रतिकारशक्ती आणि मोनोक्लोनल अँटीबॅाडीजला चकवा देण्याची क्षमता यामध्ये आहे.

"या व्हेरियंटच्या केसेस कमी आहेत. जागतिक आरोग्य संघटनेची या नवीन व्हेरियंटबाबत बैठक होणार आहे."

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

दरम्यान केंद्रीत आरोग्य सचिवांनी या नव्या व्हेरिएंटबाबत सर्व राज्यांना पत्र लिहिलं आहे. तसंच भारतात निर्बंध शिथिल केल्यामुळे आपण सतर्क रहायला हवं, असं त्यांनी सांगितलं आहे.

तर केंद्र सरकारच्या इंन्स्टिट्युट ऑफ जिनोमिक एंड इंटिग्रेटिव्ह बायोलॅाजीचे संशोधक विनोद स्कारिया ट्विटरवर लिहीतात, "या व्हेरियंटमध्ये स्पाईक प्रोटीनमधे 32 प्रकारचे म्युटेशन आढळून आलेत. यातील काही म्युटंट रोगप्रतिकारशक्तीला चकवा देणारे आहेत. ज्यामुळे त्यांची संसर्ग क्षमता जास्त आहे." "आपण सतर्क रहायला हवं आणि वेळीच योग्य उपाययोजना केल्या पाहिजेत."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)