कोरोना लशीचा दुसरा डोस लोक का घेत नाहीयेत?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
महाराष्ट्रात 92 लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी कोव्हिड-19 विरोधी लशीचा दुसरा डोस अद्यापही घेतलेला नाहीये.
तज्ज्ञांच्या मते, लोकांमध्ये कोरोनाबाबत दिवसेंदिवस कमी होणारी भीती, कोरोनाग्रस्त रुग्णांची सातत्याने कमी होणारी संख्या, कोव्हिडविरोधी लशीबाबतचे गैरसमज आणि इतर कारणांमुळे लोक लस घेण्यासाठी पुढे येत नाहीत.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात 80 टक्के लोकांनी कोरोनाविरोधी लशीचा पहिला डोस घेतलाय. तर, लशीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या मात्र, फक्त 40 टक्के आहे.
केंद्र सरकारच्या कोव्हिड टास्कफोर्सचे डॉ. पॉल यांनी, देशभरात 10 कोटी लोकांनी कोव्हिडविरोधी लशीचा दुसरा डोस न घेतल्याबाबत चिंता व्यक्त केली होती.
दुसरा डोस बाकी असलेल्या नागरिकांची संख्या किती?
राज्यात कोरोनासंसर्गाच्या दुसऱ्या लाटेनंतर लसीकरणाने वेग घेतला. लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. कोरोनापासून सुरक्षा मिळावी यासाठी लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी लोकांच्या लांबच-लांब रांगा पहायला मिळाल्या.
तज्ज्ञ सांगतात, पण ऑगस्टपासून हे चित्र बदललंय. कोरोनासंसर्ग नियंत्रणात येऊ लागल्याने लसीकरणाकडे लोकांचा ओढा कमी झालेला पहायला मिळतोय.
लस घेण्यासाठी लोक खरंच दुर्लक्ष करू लागलेत का? हे तपासण्यासाठी आम्ही आरोग्य विभागाच्या आकडेवारीचा अभ्यास केला. तर, राज्यभरात 92 लाखांपेक्षा जास्त लोकांचा लशीचा दुसरा डोस बाकी असल्याचं निदर्शनास आलं.

फोटो स्रोत, Getty Images
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार,
- कोव्हिशिल्ड लशीचा दुसरा डोस न घेतलेल्यांची संख्या 77 लाख 12 हजारापेक्षा जास्त
- तर 15 लाख 38 हजार नागरिकांनी कोव्हॅक्सिन लशीचा दुसरा डोस अद्याप घेतलेला नाहीये
(22 नोव्हेंबरपर्यंत)
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (IMA) अमरावती विभागाचे अध्यक्ष, फुफ्फुसविकारतज्ज्ञ डॉ. अनिल रोहनकर म्हणाले, "ऑगस्टपासून महाराष्ट्रात कोरोनासंसर्गाची साथ नियंत्रणात आलीये. त्यामुळे कोरोनाविरोधी लस घेण्याकडे लोक दुर्लक्ष करू लागलेत."
जिल्ह्यांची परिस्थिती काय सांगते?
लसीकरण मोहिमेने वेग घेतल्यानंतर सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात आठवड्याला 50 लाखांपेक्षा जास्त डोस देण्यात आले. मात्र, ऑक्टोबर महिन्यात लसीकरणाचं सरासरी प्रमाण 30 टक्क्यांनी कमी झालं. ऑक्टोबर महिन्यात 35 ते 40 लाख डोस दिले गेले.
आरोग्य विभागाचे अधिकारी सांगतात पुणे, मुंबई, औरंगाबाद, परभणी, बुलढाणा आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये दुसरा डोस न घेतलेल्यांची संख्या जास्त आहे.
लशीचा दुसरा डोस बाकी असलेल्यांची जिल्हानिहाय आकडेवारी
- पुणे- 12,04,872
- मुंबई- 7,75,191
- नागपूर- 5,88,154
- ठाणे- 4,89,618
- कोल्हापूर- 4,86,742
- औरंगाबाद- 3,08,542
- गोंदिया- 2,32,395
- सोलापूर- 2,23,540
- बुलढाणा- 1,98,498
- अमरावती- 1,94,658
- परभणी- 1,53,421
राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये लाखापेक्षा जास्त लोकांचे कोव्हिशिल्ड लशीचा दुसरा डोस बाकी आहे.
लसीकरण वाढवण्यासाठी काय करतंय राज्य सरकार?
राज्यात कोरोनासंसर्ग नियंत्रणात असला तरी दुसरा डोस न घेतलेल्यांची वाढणारी संख्या सरकारसमोरची डोकेदुखी आहे.
लसीकरणाबाबत जनजागृती आणि दुसरा डोस घेण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.
बीबीसीशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, "काही जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचं प्रमाण राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे. या जिल्ह्यांना टार्गेट देण्यात आलंय. लस न घेतलेल्यांची यादी तयार करून आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांना देण्यात आलीये."
महाराष्ट्रात आत्तापर्यंत कोरोनाविरोधी लशीचे 10 कोटी 84 लाख डोस देण्यात आलेत. सद्यस्थितीत राज्यात दररोज 5 लाख लोकांना लस देण्यात येतेय.

फोटो स्रोत, Getty Images
टोपे पुढे सांगतात, "घराघरात जाऊन लोकांना लसीकरण केंद्रापर्यंत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लसीकरण मोहिमेचा शेवटचा टप्पा आव्हानात्मक आहे. लोकांचं विविध माध्यमातून समुपदेशन करून त्यांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित केलं जातंय."
लशीचा दुसरा डोस न घेतलेल्यांना फोन केले जात असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलीये.
लस घेण्यासाठी लोकांचा निरूत्साह का?
लस घेण्याचं प्रमाण दिवसेंदिवस कमी का होतंय? हे आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
तज्ज्ञ सांगतात, लस न घेण्यासाठी या गोष्टी कारणूभीत आहेत
- लोकांमध्ये कोरोनाविरोधी लशीबाबत असणारे गैरसमज
- कोरोनासंसर्ग संपला अशी निर्माण झालेली भावना
- कोरोनारुग्णांची कमी झालेली संख्या
- आम्हाला संसर्ग होणार नाही असा फाजील आत्मविश्वास
फुफ्फुसविकारतज्ज्ञ डॉ. अनिल रोहनकर म्हणतात, "रुग्णांची संख्या कमी झाल्याने लोकांमध्ये कोरोनासंसर्ग संपला अशी भावना निर्माण झालीये. लोक बिना मास्क फिरतायत. एवढंच नाही, लस घ्या म्हणून डॉक्टर उगाच घाबरवतात असं त्यांना वाटतं, त्यामुळे लोक लस घेत नाहीयेत."
मराठवाड्यात ऑक्टोबर महिन्यात झालेला अवकाळी पाऊस आणि दिवाळी आणि सणासुदीचे दिवस ही देखील प्रमुख कारणं आहेत.
लसीकरण वाढवण्यासाठी औरंगाबादमध्ये काय केलं जातंय?
राज्यात लसीकरणाचं प्रमाण 74 टक्के असलं तरी औरंगाबादमध्ये लसीकरण फक्त 64 टक्के आहे. लसीकरणात औरंगाबाद जिल्हा 26 क्रमांकावर असल्याचं जिल्हाधिकारी कार्यालयातून काढण्यात आलेल्या परिपत्रकात सांगण्यात आलंय.
औरंगाबादमध्ये 3,08,542 लोकांनी लशीचा दुसरा डोस घेतलेला नाही.
लोक लस का घेत नाहीत? याबाबत बीबीसीशी बोलताना जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण म्हणाले, "लोकांनी लस न घेणं म्हणजे दुसऱ्यांना त्रास देण्यासारखं आहे."
लस न घेण्याचं प्रमुख कारण ऑगस्टपासून कमी झालेले कोरोनारुग्ण असल्याचं ते सांगतात. "गेल्या तीन महिन्यात रुग्णसंख्या फार कमी झालीये. ऑक्टोबरमध्ये फक्त 10-12 रुग्ण आढळून येतायत. जिल्ह्यातील रुग्णालयात 100 रुग्ण आहेत. त्यामुळे लोकांना कोरोना संपला असं वाटू लागलंय," असं ते पुढे सांगतात.
लसीकरण वाढवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नोव्हेंबर महिन्यात कठोर भूमिका घेत लस न घेतलेल्यांना दुकानात प्रवेश देऊ नये असा आदेश काढला होता.
- दुकानात जाण्यासाठी लशीचा किमान एक डोस आवश्यक
- बाहेरील राज्यांतून येणाऱ्यांना पेट्रोल भरण्याआधी लसीकरण प्रमाणपत्र मागावं
- लशीचा एक डोस घेतला नसेल तर पेट्रोल, डिझेल आणि गॅस मिळणार नाही
- लशीचा एक डोस घेतलेल्या ग्राहकांना मद्य विक्री केली जाईल
याबाबत जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण सांगतात, "लोकांना वाटतंय आम्ही त्यांचं अन्यधान्य बंद केलंय. पण असं नाहीये. आम्ही विविध मार्गांनी लोकांना लस घेण्याची आठवण करून देतोय."
ते पुढे म्हणाले, गेल्याकाही दिवसांपासून लोकांमध्ये चांगली जनजागृती झालीये. धार्मिकस्थळी जाऊनही आम्ही लोकांना लस घेण्याबाबत माहिती देतोय.
लस न घेतल्यामुळे धोके काय?
लशीचा एक डोस घेतला, आता कोरोना होणार नाही असा लोकांना गैरसमज झालाय.
"कोरोनाविरोधी लस घेतली म्हणजे कोरोना होणार नाही असं नाही," डॉ अनिल पाचणेकर म्हणतात.
लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाही कोरोनासंसर्ग झाल्याची अनेक उदाहरणं आहेत.
जनरल फिजीशिअन डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, "लस घेतल्यानंतर 14 दिवसांनी शरीरात अॅन्टीबॉडीज तयार होतात. पहिल्या डोसनंतर फक्त 50 टक्के अॅन्टीबॉडीज तयार होतात. तर दुसऱ्या डोसनंतर ही संख्या 85 टक्क्यांपर्यंत पोहोचते." त्यामुळे पहिल्या डोसनंतर कोरोनासंसर्ग होण्याची शक्यता 50 टक्के असतेच.
लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना कोरोनासंसर्ग होण्याची शक्यता 15 टक्के असते असं संशोधनातून समोर आलंय. तर कोरोनाविरोधी लशीचा एक डोस घेऊन घरातील संसर्ग 50 टक्क्यांनी कमी होतो असं पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या संशोधनात स्पष्ट झालं होतं.
डॉ. पाचणेकर पुढे म्हणाले, "लस घेतल्यानंतर कोरोनासंसर्ग झाला तरी तो गंभीर स्वरूपाचा होत नाही. दोन्ही डोस घेतल्यानंतर संसर्ग झाला तरी तो सौम्य असतो." पण, लस न घेतलेल्यांना कोरोनाचा संसर्ग गंभीर स्वरूपाचा होण्याचा धोका असतो.
फोर्टिस एस.एल.रहेजा रुग्णालयाचे डॉ. परितोष बघेल सांगतात, "लसीकरण न केल्यास धोका नक्की वाढेल."
युरोप, अमेरिकेत लसीकरण मोठ्या संख्येने झालं असूनही कोरोनासंसर्ग पुन्हा वाढण्यास सुरूवात झालीये. युरोपात कोरोनासंसर्गाची पाचवी लाट येण्याची भीती आहे. तर जर्नमी, डेनमार्क यांसारख्या शहरातही केसेसे वाढू लागल्यात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








