कोरोना लशीच्या दोन डोसनंतर बूस्टर डोस घेण्याची गरज आहे?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, राहुल गायकवाड
- Role, बीबीसी मराठीसाठी
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांची मंगळवारी (16 नोव्हेंबर) दिल्लीत भेट घेतली. कोव्हिशील्ड लशीच्या दोन डोस मधील 84 दिवसांचं अंतर कमी करण्याची मागणी त्यांनी या भेटीत केली.
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला आता 10 महिने होत आले आहेत त्यामुळे त्यांना बूस्टर डोस देण्याबाबतदेखील चर्चा करण्यात आली.
जगातील अनेक देशांमध्ये बूस्टर डोस दिला जात आहे. कोव्हिशील्डचे उत्पादन करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख सायरस पूनावाला यांनीदेखील मध्यंतरी पुण्यातील एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना बूस्टर डोस घ्यावा लागेल, असं वक्तव्य केलं होतं.
त्यामुळे खरंच लशीचे दोन डोस घेतल्यानंतर तिसऱ्या डोसची गरज लागेल का ? कोव्हिशिल्डच्या दोन डोस मधील अंतर खरंच कमी करणं शक्य आहे का ? अशा तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे बीबीसी मराठीने इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांच्याकडून जाणून घेतली.
लशीच्या दोन डोसनंतर बूस्टर डोसची गरज पडू शकते का ?
डॉ. भोंडवे : बूस्टर डोसची गरज संपूर्ण भारताला पडू शकते. 16 जानेवारी 2021ला भारतात लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. हा टप्पा 16 जानेवारी ते 28 फेब्रुवारी या दरम्यान होता. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना लस घेऊन 10 ते 11 महिने पूर्ण होत आहेत.
जगभरात जे संशोधन होत आहे, विशेषतः अमेरिकेच्या एफडीएने जे संशोधन केलं त्यानुसार लसीकरणानंतर ज्या अॅण्टीबॉडिज तयार होतात त्या सहा महिन्यानंतर कमी व्हायला लागतात आणि आठ महिन्यानंतर त्या पूर्णपणे कमी होतात असं समोर आलंय. त्यामुळे अनेक देशांमध्ये तिसरा डोस दिला जात आहे. भारतात अजूनही कोरोनाचा धोका आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना बुस्टर डोस देण्याची गरज आहे.
कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील 84 दिवसांचं अंतर कमी केलं जाऊ शकतं का?
डॉ. भोंडवे : ज्यावेळी लसीकरण सुरु झालं तेव्हा दोन डोसमधील अंतर 28 दिवसांचं होतं. त्यावेळी जे संशोधन होतं त्याप्रमाणे हे अंतर ठरविण्यात आलं होतं. परंतु एप्रिल 21 मध्ये 'लॅन्सेट'मध्ये जे संशोधन प्रकाशित झालं त्यात कोव्हिशिल्डचा दुसरा डोस 84 दिवसांनी दिला तर जास्त प्रतिकारशक्ती निर्माण होऊ शकते, असं समोर आलं. त्यामुळे या संशोधनाला अनुसरुन 84 दिवसांनी दुसरा डोस देण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला.

फोटो स्रोत, TWITTER
आज पुन्हा एकदा एक नवीन संशोधन समोर आलंय त्यानुसार 6 ते 8 आठवड्यांनी कोव्हिशिल्डचा दुसरा डोस घेतला तर त्याने सु्द्धा 80 टक्क्यांपर्यंत प्रतिकारशक्ती निर्माण होत आहे.
भारतात फक्त 25 टक्के लोकांचे दोन डोस झाले आहेत. आता लसींचा साठा सुद्धा मुबलक उपलब्ध आहे. त्यामुळे नवीन संशोधनानुसार 6 ते 8 आठवड्यात दुसरा डोस दिला तर लसीकरण वेगाने होईल.
केवळ पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना किती सुरक्षा मिळते?
डॉ. भोंडवे :लस घेतल्यानंतर 14 दिवसांनी अँटीबॉडिज तयार होतात. पहिला डोस घेतल्यानंतर 50 टक्के अँटीबॉडिज तयार होतात. जेव्हा दुसरा डोस घेतला जातो तेव्हा त्या 80 - 85 टक्क्यांपर्यंत वाढतात. याचा अर्थ असा आहे की, केवळ पहिला डोस घेतल्यानंतर तुम्हाला कोरोना होण्याची शक्यता ही 50 टक्के असते.
दोन डोस घेतल्यानंतर कोरोना होण्याची शक्यता 15 टक्के असते असं अनेक संशोधनातून पुढे आलंय. तसंच दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोना झाला तर त्याची लक्षणे सौम्य असतात, तुम्हाला रुग्णालयात भरती व्हावे लागत नाही.

फोटो स्रोत, Getty Images
दोन्ही डोसनंतर कोरोना झाल्यास मृत्युची शक्यता देखील जवळजवळ नगण्य असते. त्यामुळे दोन डोस घेणं गरजेचं आहे.
भारतात हर्ड इम्युनिटी कधी येईल?
डॉ. भोंडवे :हर्ड इम्युनिटी म्हणजे सामूहिक प्रतिकारशक्ती. ज्यावेळी एखाद्या समुहामध्ये किंवा देशामधल्या 70 टक्के लोकांनी लस घेतली असेल किंवा त्यांना कोरोना होऊन गेला असेल आणि त्यांच्या शरीरात अँटीबॉडिज निर्माण झाल्या असतील तर हर्ड इम्युनिटी आली असं म्हणता येईल.
भारतात एक अब्ज दोन कोटी लोकांच लसीकरण झालंय. अजूनही बराच मोठ्या प्रमाणात लसीकरण व्हायचं आहे. त्यामुळे 70 टक्के लोकांमध्ये इम्युनिटी येण्यासाठी त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणं आवश्यक आहे. त्यामुळे भारतात हर्ड इम्युनिटी येण्यासाठी काही काळ लागेल.
ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट येईल असं म्हटलं जात होतं. अजूनही तिसऱ्या लाटेचा धोका आहे का?
डॉ. भोंडवे :तिसऱ्या लाटाबाबात अनेकांना शंका आहे. भारतात नवीन व्हेरियंट आला तर तिसरी लाट येऊ शकते. डेल्टा प्लस आपल्याकडे एप्रिलपासून दिसून येतोय पण त्याचं प्रमाण एक टक्क्यापेक्षा जास्त नाहीये. त्यामुळे कुठला नवीन विषाणू वेगाने वाढला तर तिसरी लाट येऊ शकते.

फोटो स्रोत, Getty Images
रशिया, युरोप, इंग्लंडमध्ये ए वाय 4.2 व्हेरियंट सापडतोय आणि त्यामुळे तिथे तिसरी लाट आली आहे. या विषाणुला आपण रोखू शकलो तर आपल्याकडे तिसरी लाट येणार नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








