कोरोना : कोव्हिडमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी लस घ्यावी?

कोरोना लस

फोटो स्रोत, Getty Images

मला कोरोना होऊन गेलाय, तर मी आता लस घेतली तर चालेल का? किंवा किती दिवसांनी मी लस घेऊ? असे प्रश्न अनेकजण आता विचारताना दिसतात. कोरोना आजाराबाबत लोकांमध्ये वाढलेली जागरूकता पाहता, हे प्रश्न सहाजिक आणि तितकेच महत्त्वाचे आहेत.

बीबीसी मराठीनं या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला आणि यादरम्यान आम्हाला भारत सरकारच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वेबसाईटवर यासंबंधी माहिती सापडली.

या वेबसाईटवर दोन प्रश्नांमार्फत कोरोनातून बरे झालेल्या लोकांच्या मनातील प्रश्नांचं निरसन केलं आहे.

ज्या व्यक्तीला आता कोरोना विषाणूची लागण झालीय किंवा लागण झाल्याचा संशय आहे, अशा व्यक्तीने लस घ्यावी का?

तर या प्रश्नाच्या उत्तरात आरोग्य मंत्रालयानं म्हटलंय, "ज्या व्यक्तीला कोरोनाची लागण झालीय किंवा तसा संशय आहे, ती व्यक्ती लस घेण्यासाठी केंद्रावर गेल्यास आणखी काही लोकांपर्यंत विषाणूचा प्रसार करू शकते. त्यामुळे कोरोनाची लक्षणं पूर्णपणे गेल्यानंतर 14 दिवसांनी अशा व्यक्तींनी लस घेणं योग्य ठरेल."

कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तीने लस घ्यायला हवी का? किंवा जर कोरोनाची लागण झाली असेल आणि त्यावर उपचार झाले असतील, तर मग लस घ्यायला हवी का?

तर या प्रश्नावर उत्तरात आरोग्य मंत्रालयानं म्हटलंय, "होय, कोरोनामुक्त झाल्याचा वैद्यकीय इतिहास असला, तरीही लस घेण्याची प्रक्रिया पार पाडणं आवश्यकच आहे. यामुळे तुमच्या शरीरात विषाणूविरोधात लढण्यासाठी मजबूत रोगप्रतिकारक शक्ती तयार होण्यास मदत होईल."

कोरोना लस

फोटो स्रोत, JOHN CAIRNS/UNIVERSITY OF OXFORD

कोरोनातून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी लस घ्यावं याबद्दल केंद्र सरकारने नियमावली 19 मे रोजी प्रसिद्ध केली होती. त्यानुसार-

1. कोव्हिड-19 ची लक्षणं असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांनी बरे झाल्यानंतर 3 महिन्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी.

2. कोरोनासंदर्भात प्लाझ्मा अथवा अँटी सार्स-2 मोनोक्लोनल अँटीबॉडीज देण्यात आलेल्या रुग्णांनीही 3 महिन्यांनंतरच लस घ्यावी.

3. लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाली असेल तर अशा व्यक्तींनीही बरे झाल्यानंतर 3 महिन्यांनीच कोरोना लस घ्यावी.

4. इतर गंभीर व्याधींनी ग्रस्त असलेल्या रुग्णांनीही बरे झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने 4 ते 8 आठवड्यांनी लस घ्यावी.

लसीकरण

फोटो स्रोत, Getty Images

याबाबत मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॅा राहुल पंडित सांगतात, "कोव्हिड संसर्गात रुग्णांना प्लाझ्मा थेरपी देण्यात आली असल्यास, अशा रुग्णांनी लस घेण्यासाठी 8 ते 12 आठवडे थांबावं."

तसंच, कोणत्याही लशीसंदर्भात अॅलर्जिक रिअॅक्शन असेल तर त्या व्यक्तीने लस घेऊ नये, असंही डॉ. पंडित सल्ला देतात.

याचसोबत बीबीसी मराठीने लसीकरणाबाबतच्या आणखी 14 प्रश्नांची उत्तरं शोधली आहेत. ती तुम्हाला इथं वाचता येतील :

1. कोविनवरून लशीसाठी नोंदणी कशी करायची?

https://www.cowin.gov.in/home या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा फोन नंबर रजिस्टर करू शकता. त्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तींना लस घ्यायची आहे, त्यांचा तपशील भरून त्यांचं नाव नोंदवता येईल. यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या लसीकरण केंद्रांमधले उपलब्ध स्लॉट्स तपासून तुमच्यासाठी एक वेळ बुक करू शकता.

Co-Win वरून नोंदणी करण्यासाठीची तपशीलवार प्रक्रिया इथे वाचा - Co-WIN अॅपवरून कोरोना लसीकरणासाठी नोंदणी कशी करायची?

2. थेट रुग्णालयात गेलो तर लस मिळेल का?

केंद्र आणि राज्य सरकारच्या विमा योजनेशी संलघ्न खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाच्या माहितीप्रमाणे, राज्यांना यासाठी तीन पद्धतीने नोंदणी करण्यास सांगण्यात आलंय.

  • आगाऊ स्वयं नोंदणी
  • प्रत्यक्ष जागेवर नोंदणी
  • सुविधात्मक सहकारी नोंदणी

महाराष्ट्राच्या लसीकरण कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. डी. एन. पाटील सांगतात, "केंद्राच्या नियमावलीनुसार खासगी रुग्णालयात को-विन अॅपमध्ये नोंदणी केल्याशिवाय लस मिळणार नाही. सरकारी रुग्णालयात मात्र वॉक-इन किंवा ऑन-साइट नोंदणी करून लस घेता येऊ शकते."

त्यामुळे नोंदणीशिवाय खासगी रुग्णालयात लसीकरणासाठी दाखल झालात तर तुम्हाला लस मिळणार नाही.

पण तुम्ही सरकारी रुग्णालयात को-विन अॅपशिवाय थेट रुग्णालयात जाऊन नोंदणी करून लस घेऊ शकता.

3. माझ्या फोनवरून शेजारच्या आजींचं नाव नोंदवता येईल का?

लोकांना को-विन अॅपबाबत माहिती मिळावी यासाठी केंद्र सरकारने युजर मॅन्युअल जारी केलंय.

या युजर मॅन्युअलनुसार, एका मोबाईलवरून स्वत:सोबत इतर 3 लोकांची लसीकरणासाठी नोंदणी करता येऊ शकते.

त्यामुळे तुमच्या घरातील ज्येष्ठ नागरिकांची नोंद केल्यानंतर तुम्ही शेजारच्या आजी-आजोबा यांची नोंदणी करू शकता.

लसीकरण

फोटो स्रोत, JOHN CAIRNS/UNIVERSITY OF OXFORD

4. मोबाईल किंवा इंटरनेट नाही, त्यांना लस कशी मिळेल?

राज्यातील ग्रामीण भागात आणि शहरी भागात रहाणाऱ्या अनेकांकडे स्मार्टफोन नाहीत. मग अशा ज्येष्ठ नागरिकांनी किंवा इतर आजार असलेल्यांनी काय करावं?

याबाबत डॉ. पाटील सांगतात, "राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयात ऑन-साइट नोंदणी आहे. लोक थेट लसीकरण केंद्रावर जाऊन रजिस्ट्रेशन करू शकतात."

5. पहिली लस घेतली पण, दुसरी राहिली तर?

महाराष्ट्राचे लसीकरण मोहीम प्रमुख डॉ. डी. एन. पाटील पुढे सांगतात, "लसीचा एक डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागेल. लस घेतल्यानंतर 28व्या दिवशी पुन्हा एक मेसेज पाठवला जाईल. जेणेकरून लोकांना दुसरा डोस घेण्यासाठी जायचंय हे समजेल."

"मेसेजनंतर दोन-तीन दिवसांनी लस घेतली तरी चालेल. पण, दुसरा डोस घ्यायचा, हे आपणच लक्षात ठेवलं पाहिजे. सरकार प्रत्येक गोष्टीवर लक्ष कसं ठेवणार? लोकांनी सहकार्य केलं पाहिजे," असं लसीकरण मोहिमेतील एक अधिकारी सांगतात.

6. लसीकरण वेळेचे काही स्लॉट आहेत?

लसीकरणासाठी राज्यांना विविध स्लॉट किंवा वेळा ठरवण्यासंदर्भात केंद्राने नियमावली दिली आहे.

मोबिलायझेशन स्लॉट - या वेळेत ऑन-साईट नोंदणी करून लसीकरण केलं जाणार आहे. आधी नोंदणी केलेल्यांना यावेळात लसीकरण करता येणार नाही.

लसीकरण केंद्रावर काही वेळ पहिला डोस घेऊन दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्यांसाठी ठेवण्यात आलाय.

ओपन स्लॉट - यावेळात सामान्य नागरिक लस घेऊ शकतील.

त्यामुळे जर रजिस्ट्रेशनच्या वेळी तुम्हाला सकाळी, दुपारी अशा वेळा मिळाल्या असतील तर त्या वेळेत पोहोचून लस घ्या.

7. किडनी, मधुमेह, हृदयरोग असेल तर लस घेणं सुरक्षित आहे?

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, लस इतर आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी सुरक्षित आहे. अशा रुग्णांना कोरोनाविरोधी लस घेण्याचे खूप फायदे आहेत.

पण, लसीबद्दल प्रश्न असतील तर डॉक्टरांना विचारून शंका निरसन करून घ्यावं

लस

फोटो स्रोत, Getty Images

8. लस घेण्याआधी औषधं घेऊ नयेत?

मधुमेह, किडनी आणि हृदयरोगाने ग्रस्त रुग्णांना औषध घ्यावी लागतात. सरकारच्या माहितीनुसार, कोव्हिड-19 लस घेण्याआधी कोणती औषधं घेऊ नयेत याबाबत विशेष सूचना नाही. सामान्यतः सुरू असलेली औषधं घेता येऊ शकतात.

लस देणाऱ्यांना तुम्ही कोणती औषधं घेत आहात याबाबत माहिती द्या.

9. लस घेतल्यावर काय खबरदारी घेऊ?

तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक लशीचे साइट इफेक्ट असतात. त्यामुळे घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही.

लस दिल्यानंतर अर्धातास लसीकरण केंद्रावरच लस दिलेल्या व्यक्तीवर लक्ष ठेवलं जातं.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, लस सुरक्षित आहे. लस घेतल्यानंतर काही त्रास जाणवला तर, जवळच्या आरोग्य केंद्रात जावं किंवा कोविन अॅपवरून लसीकरण झाल्यानंतर आलेल्या एसएमएसमध्ये नाव दिलेल्या डॉक्टरला फोन करावा.

10. लस फुकट आहे की पैसे देऊन?

सरकारी लसीकरण केंद्रांवर कोव्हिड-19 विरोधी लस मोफत दिली जात आहे.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयं, जिल्हा रुग्णालयं, ग्रामीण रुग्णालयं, कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कोरोनाविरोधी लस फुकट दिली जाईल. केंद्रीय आरोग्य विभागाच्या रुग्णालयातही कोव्हिड-19 विरोधी लस मोफत मिळणार आहे.

खासगी रुग्णालयांमध्ये मात्र लस घेण्यासाठी 250 रूपये मोजावे लागतील. यात 150 रूपये लशीची किंमत आणि 100 रुपये ऑपरेशन चार्जसाठी घेतले जातील.

11. लस घेतल्यानंतर किती दिवसात शरीरात रोगप्रतिकारशक्ती निर्माण होईल?

कोव्हिड-19 विरोधी लस दोन टप्प्यात दिली जाणार आहे. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस दिला जातो. तर कोव्हिशील्डसाठी दोन डोसदरम्यान 12 ते 16 आठवड्यांचं अंतर ठेवण्यात येतंय.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर 2 ते 3 आठवड्यांनी रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते.

महाराष्ट्राचे आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास सांगतात, "पहिला डोस घेतल्यानंतर साधारणत: 42 दिवसांनी शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार होते. पण, यासाठी लसीचा दुसरा डोसही घेणं गरजेचं आहे."

लसीकरण

फोटो स्रोत, Getty Images

12. लस घेतल्यानंतर संरक्षण किती दिवस मिळेल?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, कोव्हिड-19 विरोधी लस घेतल्यानंतर शरीरात तयार झालेली रोगप्रतिकारशक्ती किती दिवस टिकेल हे अजूनही निर्धारित करण्यात आलेलं नाही. त्यामुळे लस घेतल्यानंतरही मास्क घालणं, हात धूणं, सोशल डिस्टंसिंगचं पालन महत्त्वाचं आहे.

13. कोरोनाविरोधी लस म्युटेट झालेल्या कोव्हिड-19 वर प्रभावी आहे?

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, लस व्हायरसविरोधात एकापेक्षा जास्त अॅन्टीबॉडी तयार करतात. स्पाईक प्रोटीन विरोधातही अॅन्टीबॉडी तयार होतात. त्यामुळे लस म्युटेट झालेल्या कोव्हिड-19 व्हायरसवर प्रभावी नक्कीच असेल. त्यासोबत अभ्यासातून निदर्शनास आलंय की, म्युटेशनमुळे लसीच्या प्रभावावर काही परिणाम होणार नाही.

14. एचआयव्हीग्रस्त व्यक्ती लस घेऊ शकतात?

केंद्र सरकारच्या माहितीनुसार, एचआयव्हीग्रस्त आणि कॅन्सरची औषध घेणाऱ्यांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी असते.

पण, सद्य स्थितीत उपलब्ध असलेल्या लशींमध्ये जिवंत व्हायरस नाही. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी असणारे व्यक्ती लस घेऊ शकतात. पण, त्यांच्यासाठी लस तेवढी प्रभावी नसेल.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)