कोरोनाची लस मासिक पाळीच्या काळात घेता येते का?

फोटो स्रोत, Getty Images
कोरोना लसीकरणाला सुरूवात झाल्यानंतर लशीचे फायदे-तोटे सांगणारे वेगवेगळे मेसेज सोशल मीडियावर फिरू लागले होते. मासिक पाळीत लस घ्यावी की नाही, हे सांगणारा एक मेसेज मध्यंतरी खूप व्हायरल झाला होता.
अनेकजण त्याबाबत प्रश्न विचारू लागले. पाळी सुरू असताना लस घ्यायची की नाही, असा गोंधळही काही जणींचा उडाला. त्यामुळेच मासिक पाळीत लस घ्यायची की नाही याबद्दल आम्ही तज्ज्ञांकडूनच शंका निरसन करून घेतलं.
पण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याआधी सोशल मीडियावर नेमका कोणता मेसेज व्हायरल झाला होता ते वाचा- "एक तारखेपासून 18 पेक्षा जास्त वयाच्या सगळ्यांसाठी लसीकरण सुरू होत आहे. लसीकरणासाठी नोंदणी करताना मासिक पाळी कधी येते आहे त्याच्याकडे लक्ष ठेवा. मासिक पाळीच्या पाच दिवस आधी आणि पाच दिवस नंतर लस घेऊ नका. कारण मासिक पाळीदरम्यान आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेली असते. लशीचा पहिला डोस आपली रोगप्रतिकार क्षमता कमी करतो आणि मग हळूहळू रोगप्रतिकारक क्षमता वाढवतो. त्यामुळे मासिक पाळीदरम्यान लस घेतली तर कोरोना संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक आहे. त्यामुळे मासिक पाळी काळात लस घेऊ नका."
गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअप तसंच अन्य मेसेजिंगच्या अॅपवर हा आणि अशा स्वरुपाचे मेसेज फिरू लागले आहेत.
केंद्र सरकारनं नव्या धोरणानुसार 1 मे पासून 18 वर्षांवरील सगळ्या व्यक्तींसाठी लसीकरण सुरू केलं.
पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्स, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी यांना लस देण्यात आली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक म्हणजे 60पेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस देण्यात आली. त्यानंतर 45 पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना लसीकरण खुलं करण्यात आलं.
या निर्णयाच्या घोषणेनंतर मासिक पाळीदरम्यान लस घेऊ नका असं सांगणारे मेसेज सोशल मीडियावर फिरू लागले.
'लशीने तुमच्या शरीराला अपाय नाही'
लसीकरणाचा मासिक पाळीवर परिणाम होतो का? किंवा मासिक पाळीदरम्यान रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्याने लस घेऊ नये असं खरंच तज्ज्ञांचं म्हणणं आहे का यासंदर्भात आम्ही डॉक्टर गायत्री देशपांडे यांच्याशी बोललो.
डॉ. गायत्री देशपांडे या नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ऑब्स्ट्रेट्रिक्स आणि गायन्कॉलॉजी विभागाच्या सीनियर कन्संल्टंट आहेत.
डॉ. देशपांडे सांगतात, "मासिक पाळी ही नैसर्गिक गोष्ट आहे. त्याच्यामध्ये कोणताही अडथळा असू नये. तुम्हाला ज्यावेळी वेळ मिळाली असेल तेव्हा जरूर लस घ्या. तरुण मुली कामानिमित्ताने घराबाहेर पडत असतील कारण सगळ्यांना वर्क फ्रॉम होम शक्य नसतं. अत्यावश्यक सेवेत अनेक महिला काम करतात. त्यांची मासिक पाळी केव्हाही सुरू असू शकते किंवा नसू शकते. त्यांची नोंदणी झाली असेल आणि लस मिळत असेल तर त्यांनी जरूर लस घ्यावी."

फोटो स्रोत, Getty Images
लशीने तुमच्या शरीराला अपाय होण्याची भीती नाही, असंही डॉ. गायत्री देशपांडे सांगतात.
भारत सरकारनं काय स्पष्टीकरण दिलंय?
सोशल मीडियावर मासिक पाळी आणि लसीकरणासंदर्भात मेसेज फिरू लागल्यानंतर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने यासंदर्भात फॅक्ट चेक जारी केलं.
त्यात असं म्हटलं की, मुलींनी तसंच महिलांनी मासिक पाळीच्या आधी पाच दिवस आणि नंतर पाच दिवस लस घेऊ नये असे मेसेज फिरत आहेत. ते मेसेजफेक आहेत. अफवांवर विश्वास ठेऊ नका.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
कोरोनाचा मासिक पाळीवर परिणाम होतो का? यासंदर्भात बीबीसी मराठीने याआधीही डॉक्टरांकडून माहिती घेतली होती.
कोव्हिडमुळे बदलू शकतं मासिक पाळीचं चक्र?
महाराष्ट्रात कोरोनारुग्णांच्या एकूण संख्येपैकी जवळपास 40 टक्के महिला आहेत. त्यामुळे स्त्रीरोगतज्ज्ञांकडून आम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, कोव्हिडमुळे महिलांच मासिक पाळीचं चक्र बदलतं का?
याबाबत बीबीसीशी बोलताना फोर्टिस हॉस्पिटलच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सोनल कुमटा सांगतात, "कोरोनामुक्त झालेल्या महिलांमध्ये पाळी अनियमित येणं, पाळी येण्यास उशिरा होणं, रक्तस्राव होण्याचा पॅटर्न बदलणं, खूप जास्त रक्तस्राव होणं अशा तक्रारी आढळून आल्या आहेत."

फोटो स्रोत, Getty Images
तज्ज्ञांच्या मते, कोरोनासंसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांमध्ये इतर वैद्यकीय समस्या दिसून येतात. त्यामुळे पाळीत बदल कोव्हिडमुळे झाला का? याबाबत ठोस सांगता येणार नाही.
याबाबत बीबीसीशी बोलताना सर जे.जे रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागाचे माजी प्रमुख डॉ. अशोक आनंद सांगतात, "कोव्हिडनंतर महिलांच्या अंडाशयाला सूज येण्याच्या माहितीची कागदोपत्री नोंद आहे. या केसेस नोंदवण्यात आल्या आहेत."

- वाचा -कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-लहान मुलांमध्ये कोव्हिड-19ची कोणती लक्षणं आढळतात? MIS-C म्हणजे काय?
- वाचा-कोरोनाची लक्षणं जाणवल्यावर कोणती टेस्ट करायची?
- वाचा-लस घेण्यासाठी Co-Win वर नोंदणी कशी करायची?
- वाचा- कोरोना लसीकरणाबाबत तुम्हाला पडलेले 15 प्रश्न आणि त्यांची उत्तरं

"कोरोना संसर्गानंतर अंडाशयाला सूज असेल तर, मासिक पाळी दरम्यान त्रास किंवा बदल होण्याची शक्यता असते" असं डॉ. आनंद पुढे सांगतात.
'अॅमेनोरिहा' (Amenorrhea) म्हणजे काय?
वेब-एमडीच्या माहितीनुसार, 'अॅमेनोरिहा' म्हणजे पाळी न येणं. एखाद्या महिलेला हा त्रास असेल तर तिला पाळी येणार नाही. हा आजार नाही. पण, डॉक्टरांना याबद्दल माहिती दिली पाहिजे.
कोरोना आणि मासिक पाळीचा संबंध आहे?
तज्ज्ञ सांगतात, कोरोनाचा मासिक पाळीवर थेट परिणाम झाल्याचा ठोस पुरावा नाही.
हिरानंदानी रुग्णालयाच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मंजिरी मेहता म्हणतात, "मासिक पाळीत झालेल्या बदलाचा थेट कोव्हिड-19 शी संबंध लावता येणार नाही. कोरोना संसर्गाचा मासिक पाळीवर परिणाम होतो हे दाखवणारा पुरावा अजूनही उपलब्ध नाही."

फोटो स्रोत, GEETA BORA
मुंबईतील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कोमल चव्हाण यांच्याकडे कोरोनामुक्त झाल्यानंतर मासिक पाळीचा त्रास असल्याची तक्रार घेऊन एकही महिला आलेली नाही.
बीबीसीशी बोलताना त्या सांगतात, "लॉंगटर्म आजारानंतर महिलांच्या मासिक पाळीत बदल होतात. काहीमध्ये जास्त किंवा कमी रक्तस्राव होतो. पण, कोव्हिडमुक्त झाल्यानंतर मासिक पाळीत बदल किंवा त्रास झाल्याची तक्रार माझ्याकडे कोणीही केली नाहीये."
"पण, यावर अभ्यास होणं गरजेचं आहे," असं डॉ. कोमल यांचं मत आहे.
कोव्हिडनंतर महिलांच्या प्रजनन प्रणालीत बदल होतात?
कोरोना संसर्गात शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. काहींना फुफ्फुसाचा त्रास होतो, तर काहींमध्ये इतर वैद्यकीय समस्या निर्माण होतात.
"कोव्हिडनंतर रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने प्रजनन प्रणाली कमकुवत होण्याची शक्यता असते," असं फोर्टिस रुग्णालयाच्या डॉ. सोनल कुमटा सांगतात.
महिलांनी काय करावं?
स्त्रीरोगतज्ज्ञांच्या मते, महिलांनी स्वतःची काळजी घ्यायला हवी.
- योग्य आहार, व्यायाम गरजेचा आहे
- शरीराला योग्यवेळी रिलॅक्स केलं पाहिजे
- झोप वेळेवर हवी
- जास्त वेळ बसून काम करू नये. कामातून मध्येच थोडा ब्रेक घ्यावा.
कोव्हिड-19 संसर्गानंतर शरीराची झालेली झीज हळूहळू भरून येत असते. "त्यामुळे मासिक पाळीचं चक्र हळूहळू पूर्वपदावर येईल," असं डॉ. कुमटा सांगतात.
लॉकडाऊनमध्ये महिलांना पाळीचा त्रास झाला का?
डॉ. मंजिरी पुढे सांगतात, "लॉकडाऊनच्या काळात पीसीओडी (पॉलिसिस्टिक ओव्हेरिअन डिसीज) असलेल्या महिलांनी व्यायाम केला नाही. वर्क फ्रॉम होम असल्याने खाण्या-पिण्याच्या वेळा बदलल्या. जंकफूड खाणं जास्त झालं. त्यामुळे वजन वाढल्याचा त्रास झाला. यामुळे महिलांना मासिक पाळीचे त्रास सुरू झाले होते."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








