नेहमी एकमेकींसोबत राहणाऱ्या स्त्रियांची पाळी एकाच वेळी येते का?

एकत्र महिला

फोटो स्रोत, AFP

    • Author, शार्लट मॅकडोनल्ड
    • Role, बीबीसी रेडिओ 4

एकत्र राहाणाऱ्या स्त्रियांची मासिक पाळीही एकाच वेळी येते, असा सर्वसाधारण समज आहे. पण यात कितपत तथ्य आहे?

यामागे एक विचार हा आहे की, एकत्र राहाणाऱ्या स्त्रियांचे फेरमॉन्स (माणसं किंवा प्राण्यांच्या शरीरातून स्त्रवणारं एक संप्रेरक) एकाच वेळेस स्त्रवतात.

यामुळेच कदाचित एकत्र राहाणाऱ्या स्त्रियांची मासिक पाळी एकाच वेळेस येऊ शकते. बऱ्याच जणींना यात तथ्य आहे, असं वाटतं.

"हो, हे नक्कीच खरं आहे," असं एमा सांगते. "हा फक्त योगायोग असू शकत नाही. "चोवीस वर्षी एमा शिकत असताना चार मुलींसोबत राहायची. "आम्ही एकत्र राहायला लागल्यानंतर काही महिन्यांतच आमची मासिक पाळी एकाच वेळी यायला लागली."

एमा आणि तिच्या मैत्रिणी एकाच वेळी टॅम्पॉन विकत घ्यायच्या. त्यांना एकाच वेळी मूडस्विंगचे त्रास व्हायचे. गंमत म्हणजे हे सगळं त्यांच्या एका पुरुष मित्राच्या लक्षातही आलं.

एकत्र राहाणाऱ्या स्त्रियांची मासिक पाळीही एकाच वेळेस येते हा एक सर्वसाधारण समज असल्याचं ऑक्सफर्ड विद्यापीठातील मानववंश शास्त्राच्या सहाय्यक प्राध्यापक अलेक्झांड्रा अॅलव्हर्न सांगतात.

"एक माणूस म्हणून आपल्याला नेहमीच रंजक कथा आवडतात. आपण जे पाहातो, ऐकतो त्याला काहीतरी अर्थ असला पाहिजे, असं आपल्याला वाटतं. त्याला निव्वळ योगायोग म्हणून सोडून द्यायला आपण तयार नसतो", असंही त्या सांगतात.

फेरमॉन्स संप्रेरकं मासिक पाळीवर काही प्रभाव टाकतात का, यावर प्रा. अलेक्झांड्रा अॅलव्हर्न यांनी अभ्यास केला. यावर उपलब्ध असणाऱ्या पुराव्यांचा शोध घेतला.

संप्रेरकांचा परिणाम?

त्या सांगतात की, 1971 मध्ये प्रसिद्ध झालेल्या नेचर या वैज्ञानिक संशोधन मासिकात त्यांना या संदर्भात एक लेख सापडला. हा लेख मार्था मॅकक्लिंटोक यांनी लिहिला होता.

डॉ. मॅकक्लिंटोक यांनी अमेरिकेतल्या कॉलेजमधे शिकणाऱ्या 135 स्त्रियांच्या मासिक चक्राचा अभ्यास केला होता.

अभ्यासाअंती त्यांना असं लक्षात आलं की, मैत्रिणी किंवा रूममेट असणाऱ्या महिलांची मासिक पाळी एकाच वेळी यायची. मात्र एकमेकींना न ओळखणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत असं काही घडत नव्हतं.

"मग यावरच आणखी संशोधन करण्याची कल्पना माझ्या डोक्यात आली", असं डॉ. मॅकक्लिंटोक यांनी सांगितलं.

एकमेकींना ओळखणाऱ्या स्त्रिया एकमेकींसोबत जास्त वेळ घालवत होत्या. त्यामुळे त्यांच्यातल्या फेरमॉन्सनी एकमेकांवर प्रभाव टाकण्याची शक्यता जास्ती होती असं डॉ मॅकक्लिंटोक यांच म्हणणं पडलं.

पण असं का होत असेल? यामागचा एक प्रचलित विचार असा आहे की, हे स्त्रियांमधलं एकमेकींना साहाय्य करण्याचं धोरण असावं. एकाच पुरुषाच्या अंतःपुराचा भाग होण्यापासून वाचण्यासाठी याची त्यांना मदत होते.

एकाच वेळी सगळ्या स्त्रियांची मासिक पाळी आल्यास पुरुष त्या कालावधीत दुसऱ्या स्त्रीशी शरीर संबंध ठेवू शकत नाही. यामुळेच कदाचित एकमेकींच्या सान्निध्यातल्या स्त्रियांची मासिक पाळी एकाच वेळी येत असावी, असंही सांगितलं जातं.

"असं झालं तर पुरुष स्त्रियांचे शोषण करू शकत नाहीत," अकेक्झांड्रा या विचारामागचा तर्क सांगतात.

सत्तरच्या दशकात एकत्र पाळी येण्याची कल्पना पुढे आल्यानंतर स्त्रीवादी चळवळीचा उद्रेक झाला का?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सत्तरच्या दशकात एकत्र पाळी येण्याची कल्पना पुढे आल्यानंतर स्त्रीवादी चळवळीचा उद्रेक झाला का?

सत्तरच्या दशकात हे संशोधन प्रसिद्ध झालं त्यावेळी स्त्रीवादाचा पुरस्कार करणाऱ्या चळवळी देखील उदयास येत होत्या. प्रा. अलेक्झांड्रा अॅलव्हर्न यांच्या मते ही संकल्पना इतकी लोकप्रिय होण्यामागे हेही एक कारण असू शकतं.

"मला वाटतं की, या गृहितकात काही 'समाज मूल्यं' दडलेली आहेत. स्त्रीवादी दृष्टिकोनातून बघायचं झालं तर पुरुषांचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी स्त्रिया एकमेकींना सहकार्य करत आहेत ही कल्पनाच फार आकर्षक आहे."

मानवाचा तसंच इतर सस्तन प्राण्यांच्या झालेल्या काही अभ्यासातही यासारखेच निष्कर्ष समोर आले आहेत.

अभ्यासामधल्या त्रुटींवर टीका

अर्थात असेही काही अभ्यास समोर आलेत ज्यात एकत्र राहणाऱ्या स्त्रियांची मासिक पाळी एकत्र येत नाही असा निष्कर्ष काढला गेला आहे. काही लोकांनी आधीच्या अभ्यांसांमध्येही बऱ्याच त्रुटी आढळल्या आहेत.

अभ्यासकांनी हा अभ्यास करण्यासाठी निवडलेल्या लोकांविषयी टीकाकारांना शंका आहेत. त्यांच्या मते आधीच्या अभ्यासकांची 'पाळी एकत्र येण्याची' व्याख्या फारच पसरट आहे. त्यात नेमकेपणा नाही.

समीक्षकांच्या मते, मॅकक्लिंटोक यांनी त्यांच्या अभ्यासात स्त्रियांची पाळी एकाच वेळी यायचं एक कारण निव्वळ योगायोगही हेही असू शकतं, हे गृहीत धरलं नव्हतं.

पण स्त्रियांची मासिक पाळी फक्त योगायोगाने एका वेळी येते असं म्हणणं म्हणजे बहुतांश स्त्रियांना आपल्या बाबतीत जे घडतं असं वाटतं त्याविरुद्ध जाण्यासारखं आहे.

अनेकींना आपली पाळी इतर जणींच्या बरोबरच येते असं वाटत, पण ते कितपत खरं आहे?

फोटो स्रोत, Science Photo Library

फोटो कॅप्शन, अनेकींना आपली पाळी इतर जणींच्या बरोबरच येते असं वाटत, पण ते कितपत खरं आहे?

"मी जर मासिक पाळी सुरू असणाऱ्या मुलीसोबत वेळ घालवला, कमी किंवा जास्त... तर माझीदेखील मासिक पाळी सुरू होईल," 26 वर्षाची इनेझ सांगते.

"माझं गर्भाशय म्हणजे जणु काही एखाद्या सांघिक खेळातला खेळाडू आहे. कुणाचीही मासिक पाळी सुरू झाली तर माझीही सुरू होईलं," ती गंमतीत सांगते.

इनेझच नाही तर इतर अनेक स्त्रियांना वाटतं की, काही स्त्रियांची गर्भाशयं इतर स्त्रियांच्या गर्भाशयांचं नेतृत्व करतात आणि नेतृत्व करणाऱ्या स्त्रीची मासिक पाळी सुरू झाली की, इतर स्त्रियांचीही मासिक पाळी सुरू होते.

इनेझच्या मते, काही ठराविक महिलांचं गर्भाशय या सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतं.

अल्फा आणि बीटा गर्भाशय

"माझं गर्भाशय हे बी़टा गर्भाशय आहे. माझी मैत्रिणीचं अल्फा गर्भाशय आहे. तिची मासिक पाळी सुरू असेल तर तिच्या आसपासच्या स्त्रियांची मासिक पाळी हमखास सुरू होणार. तिची मासिक पाळी सुरू असताना ती रस्त्यावरून चालायला जरी लागली तरी आसपासच्या 10 मैल परिसरातल्या बायका सॅनिटरी नॅपकिन किंवा टॅम्पॉन शोधायला लागतात."

तरीही प्रचलित विचारांना छेद देणारी गोष्ट इनेझच्या बाबतीत घडली आहे. तिची आणि तिच्या रूममेटची पाळी कधीच एका वेळी आलेली नाही.

"मी बारा वर्षांची असल्यापासून तिला ओळखते. एवढी वर्षं सोबत असूनही आमची मासिक पाळी एकाच वेळी येत नाही आणि याचा तिला राग येतो असं मला वाटतं," इनेझ सांगते.

अभ्यासक अलेक्झांड्रा अॅलव्हर्न यांना स्त्रियांची मासिक पाळी एकाच वेळेस येते याचं आश्चर्य वाटत नाही. "प्रश्न हा आहे की हा फक्त योगायोग आहे की नाही? जर योगायोग असेल तर असेल तर निदान निम्म्या वेळी तरी हे होऊ शकतं अशी तुम्ही अपेक्षा करू शकता.

काही अभ्यासकांनी नुकतंच मासिक पाळी एकाच वेळेस येणं हा फक्त योगायोग असू शकतो का हे पडताळून पाहाण्याचे ठरवलं. त्यांनी दोन चुलत बहिणींच्या गेल्या सहा वर्षांतल्या मासिक पाळीचा अभ्यास केला.

menstrual cycle

फोटो स्रोत, iStock

"त्यांनी दोन मॉडेल्स मांडले," अॅलव्हर्न सांगतात. "एक होतं 'evolved strategy' मॉडेल. हे मॉडेल फारच आकर्षक होतं यात स्त्रियांच्या मासिक पाळी येणं म्हणजे पुरुषी अधिपत्या विरूद्ध बचाव करण्याचं साधन होतं. दुसरं मॉडेल मात्र थोडं कंटाळवाणं होतं ज्यात स्त्रियांच्या मासिक पाळी एकत्र यायचं कारण योगायोग हे होतं.

अभ्यासकांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे दोन्ही मॉडेल्सची तुलना केली. त्यातून योगायोग' हेच मॉडेल सर्वोत्तम असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं.

या विषयावर अजून संशोधन होईल, तेव्हा स्त्रियांची मासिक पाळी एकाच वेळी येण्याची इतरही कारणं समोर येतील. पण सध्यातरी संशोधकांना या संदर्भात अनेक शंका आहेत.

"असंही असू शकेल की, आत्तापर्यंत आपण जे पाहिलं किंवा अनुभवलं आहे, हा निव्वळ योगायोग असेल," अॅलव्हर्न सांगतात.

(एलिझाबेथ कॅसिन यांनी दिलेल्या तपशीलासह)

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)