कोरोना व्हायरस : लहान मुलांमध्ये आढळणारी कोव्हिड-19ची लक्षणं कोणती? MIS-C म्हणजे काय?

मुलांची कोरोना टेस्ट

फोटो स्रोत, Getty Images / TAUSEEF MUSTAFA

    • Author, अमृता दुर्वे
    • Role, बीबीसी मराठी

कोव्हिड 19च्या दुसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांनाही कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याचं आढळलं, यानंतर तिसरी लाट आली तर त्यामध्ये लहान मुलांना जास्त धोका असेल, असा इशारा देण्यात आलाय.

यामुळेच राज्यामध्ये बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स स्थापन करण्यात आलाय. डॉ. सुहास प्रभू यांच्या अध्यक्षतेखालच्या या टास्कफोर्समध्ये महाराष्ट्रभरातले बालरोग तज्ज्ञ आहेत.

राज्यभरातल्या कोव्हिड सेंटर्समध्ये लहान मुलांसाठी बेड्स राखून ठेवावेत, अशी सूचना या टास्कफोर्सने केलीय. यासोबतच लहान मुलांवरील उपचारांसाठीच्या सूचना आणि पद्धती याविषयी राज्यभरातले डॉक्टर्स आणि आशा कर्मचारी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येतंय.

कोरोना व्हायरसच्या पहिल्या लाटेदरम्यान लहान मुलं किंवा कुमारवयीन मुलांमध्ये कोव्हिड- 19 चं प्रमाण फारसं नव्हतं. पण दुसऱ्या लाटेदरम्यान मात्र 18 वर्षांपर्यंतच्या वयोगटातल्या रुग्णांची संख्या वाढलेली दिसते. या दुसऱ्या लाटेतल्या संसर्गादरम्यान मुलांमध्ये लक्षणं दिसून येतायत.

कोरोना व्हायरसमध्ये बदल घडून झालेले नवीन स्ट्रेन, रुग्णसंख्या कमी झाल्याने मुलांनी खेळायला घराबाहेर पडणं, घरातल्या मोठ्यांची सुरू झालेली ऑफिसेस आणि त्यानिमित्ताने होणारा प्रवास ही कारणं या रुग्णसंख्येमागे असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

लहान मुलांमध्ये कोरोना व्हायरसची कोणती लक्षणं आढळतात?

कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या मुलांमध्ये नेहमीच्या ताप, घसा खवखवणं यासोबतच इतर काही लक्षणं आढळून येत आहेत. लहान मुलांना नेहमी होणाऱ्या पोट बिघडणं, उलट्या होणं याच्याशी या लक्षणांचं साधर्म्य असल्याचं बालरोगतज्ज्ञांचं म्हणणं आहे. म्हणून मुलांचं पोट बिघडलं वा दुखू लागलं, उलट्या झाल्या तर त्याचा संबंध कोरोनाशीही असू शकतो, हे लक्षात असू द्या.

मुलांची कोरोना टेस्ट

फोटो स्रोत, Getty Images /NurPhoto

बोलू न शकणारी मुलं सतत चिडचिड करत असतील, न थांबता रडत असतील, त्रागा करत असतील, तर हे त्यांचं अंग दुखत असल्याचं लक्षण असू शकतं.

बॉम्बे हॉस्पिटलचे कन्स्लटिंग पीडिआट्रिशियन डॉ. मुकेश संकलेचा यांचा लहान मुलांमधल्या संसर्गजन्य रोगांविषयी अभ्यास आहे. लहान मुलांमध्ये आढळणाऱ्या लक्षणांबाबत बीबीसी मराठीशी बोलताना डॉ. संकलेचा म्हणाले, "मुलांना त्यांचे पालक वा कुटुंबातल्या कोणाकडून तरी कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. बहुतेक मुलांमध्ये अगदी सौम्य लक्षणं दिसून आली आहेत. काहींना जास्त ताप भरल्याचंही आढळलं. यासोबतच काही वेगळी लक्षणंही आढळून आली आहेत.

तोंडाची चव गेल्याचं वा वास येणं थांबल्याचं लहान मुलांना सांगता येणार नाही. पण मुलांची अन्नावरची वासना अचानक जाणं, त्यांनी खाणं कमी करणं हे याचं लक्षण असू शकतं. पण मुलं लवकर बरी होतात. मोठ्यांप्रमाणे लहान मुलांवर आयसीयूमध्ये अॅडमिट करायची पाळी येत नाही."

सामान्य लक्षणं

  • ताप
  • कोरडा खोकला, घसा खवखवणं
  • धाप लागणं
  • तोंडाची चव जाणं, वास येणं बंद होणं

दुसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये आढळलेली वेगळी लक्षणं

  • पोट बिघडणं
  • उलट्या होणं
  • डोकेदुखी
  • बेशुद्ध पडणं
  • सतत चिडचिड करणं, त्रागा करणं (अगदी लहान मुलांमध्ये)
  • अंगावर पुरळ येणं
  • डोळे लाल होणं
  • हाताच्या वा पायाच्या नखांना किंवा बोटांना निळसर झाक येणं. याला 'कोव्हिड टोज' (Covid Toes) असं म्हटलं जातं.

मुलांची कोव्हिड चाचणी कधी करायची?

डॉ. संकलेचा सांगतात, "जर पालकांपैकी कोणी पॉझिटिव्ह असेल तर ते मूल पॉझिटिव्ह असण्याची शक्यता दाट असते. कारण अगदी लहान मुलं आई-वडिलांच्या आजूबाजूलाच असतात. विशेषतः आईच्या. आपण मोठ्यांच्या टेस्टिंगवर भर देतो, कारण त्यांची तब्येत बिघडल्यास त्यांच्यावरच्या उपचारांमध्ये तसे बदल करावे लागू शकतात.

लहान मुलांच्या बाबतीत बोलायचं झालं, तर बहुतेक मुलांना वेगळ्या उपचारांची गरज भासत नाही. त्यामुळे त्यांच्या टेस्टिंगची गंभीर गरज नसते. पण अनेकदा पालक गोष्टी स्पष्ट व्हाव्यात म्हणून लक्षणं दिसत नसताना मुलांचीही टेस्ट करतात. ही टेस्ट पॉझिटिव्ह आली, तरी मुलांना फार मोठी ट्रीटमेंट लागत नाही. पण असं मूल बाहेर जाऊन खेळलं, मित्रांच्या घरी गेलं, तर त्या मुलांसोबत त्यांच्या पालकांनाही कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचा धोका असतो."

मुलांची कोरोना टेस्ट

फोटो स्रोत, Getty Images /SUJIT JAISWAL

पण मुलांमध्ये लक्षणं दिसत असल्यास त्यांची चाचणी करून घ्यावी.

मुलांना लक्षणं आढळल्यास घ्यायची खबरदारी

  • मुलांना ताप आला तर त्यांना घरीच ठेवा. ताप उतरल्यावर खेळायला पाठवू नका. हा ताप हवामान बदलामुळे आलेला असू शकतो, पण सोबतच कोरोना व्हायरसच्या संसर्गाचंही हे लक्षण असू शकतं. लगेच डॉक्टरांना संपर्क करा.
  • मुलांमध्ये कोरोनासारखी लक्षणं वाटत असल्यास घराबाहेर पडू नका. अनेक डॉक्टर्सनी पुन्हा एकदा व्हीडिओ कॉलच्या माध्यमातून कन्सलटिंग सुरू केलेलं आहे. कोरोनाची लक्षणं असताना मुलाला क्लिनिकमध्ये नेणं इतर मुलांसाठी धोकादायक ठरू शकतं. डॉक्टरांनी प्रत्यक्ष तपासणीसाठी बोलावलं, तरच क्लिनिकमध्ये जा.
  • लहान मुलांमध्ये ताप किंवा इतर लक्षणं दिसू लागल्यास, त्याची कागदावर व्यवस्थित चार्ट करून नोंद ठेवा. यामध्ये तारीख, वेळ, किती ताप होता, SPO2 (रक्तातील ऑक्सिजन पातळी), पल्स रेट या गोष्टींची दर 7-8 तासांनी अशी दिवसातून साधारण तीन वेळा (सकाळी - दुपारी - रात्री) अशा प्रकारे नोंदी ठेवा.
  • लहान मुलं हात हलवत असल्यास पल्स ऑक्सिमीटर योग्यरीतीने बोटावर बसलाय का, ते तपासून पहा
  • SPO2 वरील ऑक्सिजनची पातळी 94 पेक्षा कमी दाखवत असल्यास तातडीने तुमच्या फॅमिली डॉक्टरना / बालरोग तज्ज्ञांना संपर्क करा.
  • लहान मूल पॉझिटिव्ह आल्यास त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी एका खोलीत थांबवून ठेवणं कठीण असतं. अशा घरात आजी-आजोबा असतील तर त्यांनाही हा संसर्ग होण्याचा धोका असतो. अशा वेळी या कालावधीसाठी आजी-आजोबांचा वावर एका खोलीपुरता सीमित करावा, त्यांना एका खोलीत क्वारंटाईन करावं, आणि मुलाला घरात वावरू द्यावं.
  • बाळ वा लहान मूल आजारी पडल्यास आई किंवा बाबा यापैकी एकानेच त्याच्याजवळ थांबून काळजी घ्यावी. याने घरातल्या इतर सदस्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता कमी केली जाऊ शकते. आजारी बाळासोबत असणाऱ्या पालकाने मास्क वापरावा.
  • आजारी पडलेलं मूल 2 वर्षांपेक्षा मोठं असेल, तर त्यांनाही मास्क घालावा.

मुलांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून येण्याचं प्रमाण वाढलं असलं, तरी मुलं यातून पटकन बरी होत असल्याने घाबरून जाण्याची गरज नसल्याचं डॉक्टर्सचं म्हणणं आहे.

स्तनपान देणारी आई पॉझिटिव्ह झाली तर?

तुमच्या बाळाच्या डॉक्टरांशी बोलून याचा निर्णय घेता येईल. पण या महिलेला लक्षणं सौम्य असल्यास मास्क लावून बाळाला स्तनपान देता येईल. 6 महिन्यांपेक्षा लहान बाळ असल्यास ते आईसोबतच क्वारंटाईन होऊ शकतं का, हे तुमच्या डॉक्टरना विचारा.

कारण आईने बाळाला दूध पाजून त्याला परत खोलीबाहेर आजी-आजोबा वा इतर कुटुंबियांकडे देताना, संसर्ग घरातल्या ज्येष्ठांमध्ये पसरण्याची शक्यता जास्त आहे.

डॉ. मुकेश संकलेचा म्हणतात, "आई पॉझिटिव्ह आल्यानंतरही स्तनपान सुरू ठेवावं, या बाळाला संसर्ग होण्याची शक्यता असली तरी बाळावर संसर्गाची लक्षणं दिसण्याची फारशी शक्यता नाही. आणि या लहानशा धोक्याच्या तुलने बाळाला स्तनपानाद्वारे मिळणाऱ्या पोषणाचे फायदे कित्येक पटींनी जास्त आहेत."

कोरोना मुलं

फोटो स्रोत, Getty Images /SAJJAD HUSSAIN

ही खबरदारी घ्या :

  • लहान बाळांना मालिश करायला बाहेरून येणारी मालिशवाली संसर्गाचं माध्यम ठरू शकते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने काही काळ घरच्या घरीच बाळांना मालिश करा.
  • लहान मुलांचे साबण, कंगवे आणि इतर गोष्टी वेगळ्या ठेवा.
  • लहान बाळांना दूध पाजताना, अन्न भरवताना, कपडे बदलण्याआधी हात स्वच्छ धुवून घ्या.
  • कारचा वापर करत असल्यास कार वेळोवेळी सॅनिटाईझ करून घ्या.
  • मुलांची खेळणी सॅनिटाईझ करा.
  • मुलांनी पुरेसा वेळ हात धुवावेत यासाठी लहान मुलांना हात धुताना दोनदा 'हॅपी बर्थडे' गायला सांगा.
  • मुलांना थेट मल्टी व्हिटॅमिनची औषधं वा प्रोटीन पावडर देऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्याने पूरक औषधं सुरू करा. कारण औषधांचं हे प्रमाण मुलांच्या वयाप्रमाणे आणि वजनाप्रमाणे बदलतं. उदा. एखाद्या मुलाला किती प्रमाण दररोज झिंक वा व्हिटॅमिन - सी गेलं पाहिजे हे त्याचं / तिचं वय आणि वजन यावरून डॉक्टर ठरवतात.

MIS - C काय आहे?

MIS - C म्हणजे मल्टीसिस्टीम इन्फ्लमेटरी सिंड्रोम इन चिल्ड्रन (Multi Inflammatory Syndrom in Kids).

मुंबईतल्या बालरोगतज्ज्ञ डॉ. गीतांजली शहा सांगतात, "कोव्हिड 19 होऊ गेल्याच्या 2 ते 4 आठवड्यांनंतर लहान मुलांमध्ये या सिंड्रोमची लक्षणं आढळतात. या मुलांच्या शरीरात कोव्हिडसाठीच्या अँटीबॉडीज असतात आणि त्यांच्या शरीरातली रोग प्रतिकारक शक्ती हा जास्त कार्यरत झाल्याने ही परिस्थिती उद्भवते.

ही गोष्ट अतिशय दुर्मिळ आहे त्यामुळे पालकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. पण याबद्दल त्यांना माहिती असायला हवी. असं होऊ शकतं हे लक्षात ठेवायला हवं. म्हणून कोव्हिड बरा झाल्यानंतर निर्धास्त होऊन जाऊ नये."

लहान मुलांमधील कोव्हिड19

फोटो स्रोत, Getty Images / ajijchan

यामध्ये मुलांच्या शरीरातल्या महत्त्वाच्या अवयवयांचा दाह (Inflamation), पोट बिघडणं, पोटात दुखणं, उलट्या, अंगावर पुरळ उमटणं, डोळे लाल होणं, ताप येणं, जीभ - घसा लाल होणं अशा गोष्टी आढळतात.

हृदय, फुफ्फुसं, किडनी, मेंदू, डोळे, त्वचा, पोटातील आतडी या अवयवांवर याचा परिणाम होऊ शकतो.

मुलांमध्ये आढळणाऱ्या कावासाकी सिंड्रोमसारखीच ही लक्षणं असतात. कावासाकी सिंड्रोम हा 5 वर्षांखालच्या मुलांमध्ये आढळतो.

महाराष्ट्र सरकारने MIS-C या आजाराची माहिती सरकारी यंत्रणेला देणं कायद्यानेच बंधनकारक केलं आहे.

MIS - C वर तातडीने उपचार होणं गरजेचं असतं. यासाठी मुलांमध्ये ही लक्षणं आढळल्यास त्यांना पूर्वी कोव्हिड होऊन गेला होता का, याविषयी डॉक्टरांना सांगणं आवश्यक आहे.

मुलांची कोव्हिड टेस्ट केलेली नसल्यास, काही काळापूर्वी घरातलं कोणी कोव्हिड पॉझिटिव्ह होतं का आणि परिणामी या काळात मूलही एसिम्प्टमॅटिक असण्याची शक्यता आहे का, याचीही डॉक्टरना कल्पना द्या.

मुलांमध्ये आढळणाऱ्या लक्षणांचा संबंध इतर कोणत्याही विकाराशी लागत नसल्यास मुलांना कोव्हिड होऊन गेला होता का, याची तपासणी अँटीबॉडी टेस्ट द्वारे केली जाऊ शकते.

डॉ. संकलेचा सांगतात, " काही महिन्यांपूर्वी आमच्याकडे एका 12 वर्षांच्या मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्या आधीच्या महिन्यांमध्ये त्याला कोणताही त्रास झाला नव्हता. पण तो हॉस्पिटलमध्ये येण्याच्या 3-4 दिवस त्याला सतत भरपूर ताप होता, उलट्या होत होत्या, अंगावर पुरळ होता आणि त्याचा रक्तदाब कमी झालेला होता. त्याला अॅडमिट करावं लागलं.

आम्ही त्याच्या कोव्हिड अँटीबॉडीज तपासल्या तर त्याच्या शरीरात भरपूर अँटीबॉडीज होत्या. अशा प्रकारच्या लक्षणांवर तातडीने उपचार करावे लागतात. नाहीतर याचा हृदयक्रिया बंद पडण्यापर्यंतचा परिणाम होऊ शकतो आणि तो जीवघेणा ठरू शकतो."

MIS-C हा अतिशय दुर्मिळ असला तरी वेळेवर उपचार झाल्यास मृत्यूदर कमी राहतो.

मुंबईमधल्या चार हॉस्पिटलमध्ये MIS-Cचे 23 रुग्ण दाखल झाले होते, त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

लहान मुलांना लस मिळणार का?

सध्या तरी लहान मुलांना कोरोनासाठीची कोणतीही लस देण्यात येत नाही. पण कोव्हॅक्सीन' लस निर्माण करणारी कंपनी भारत बायोटेक, 2 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांवर लशीची चाचणी करणार आहे.

औषध महानियंत्रकांनी (DCGI) लहान मुलांवर कोव्हिडविरोधी लशीच्या चाचणीला मंजुरी दिली आहे.

2 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांवर लशीची चाचणी होणार असून दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे.

525 स्वयंसेवकांवर ही चाचणी केली जाणार आहे. यासाठी ही लस स्नायूंमधून दिली जाईल. लशीचे दोन डोस शून्य आणि 28व्या दिवशी दिले जाणार आहेत.

तर औषध नियामकांनी सिरम इन्स्टिट्यूटला 2 ते 17 वयोगटातल्या मुलांवर कोवोव्हॅक्स लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्या घेण्याची परवानगी दिली आहे.

एकूण 920 मुलांवर या ट्रायल्स घेतल्या जातील. यामध्ये 12 ते 17 आणि 2 ते 11 वयोगटातली प्रत्येकी 460 मुलं असतील, आणि 10 ठिकाणी या चाचण्या होतील.

जगभरात लशीचं उत्पादन करणाऱ्या विविध औषध कंपन्यांनी या वयोगटासाठीच्या लशीच्या चाचण्या सुरू केल्या आहेत.

चाचण्यांदरम्यान आपली लस 12 ते 15 वयोगटासाठी 100 टक्के परिणामकारक ठरली असून ही लस घेतल्यानंतर शरीरात चांगली रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाल्याचं फायझर कंपनीने मार्च अखेरीस म्हटलं.

अमेरिकेत 2,260 मुलांवर ही चाचणी घेण्यात आली. फायझर - बायोएनटेकच्या लशीची आता 12 वर्षांखालच्या मुलांवर चाचणी घेण्यात येणार आहे.

अॅस्ट्राझेनकानेही युकेमध्ये 6 ते 17 वयोगटामध्ये लशीच्या चाचण्या घेणार असल्याचं जाहीर केलं होतं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)