कोरोना व्हायरस : कोव्हिड-19 विषयी मुलांना कशी माहिती द्याल?

फोटो स्रोत, Getty Images
कोरोना व्हायरसच्या संक्रमणाच्या जगभरातून येणाऱ्या बातम्या घाबरवून टाकणाऱ्या आहेत. अनेकजण यामुळे काळजीत पडले आहेत. या संकटाविषयी लहान मुलांना कसं सांगायचं, यासाठी या काही टिप्स.
मुलांचं शंकानिरसन
ब्रिटनमधल्या पेशाने फॅमिली डॉक्टर असणाऱ्या पून कृष्णन यांना सहा वर्षांचा मुलगा आहे. बीबीसी रेडिओ स्कॉटलंडशी बोलताना डॉक्टर पूनम यांनी सांगितलं, "तुम्ही मुलांच्या मनातल्या शंका दूर करायला हव्या.
जसं सर्दी -खोकला किंवा उलट्या - जुलाब विषाणूमुळे होतात, तसाच कोरोनाव्हायरसही एकप्रकारचा विषाणू असल्याचं त्यांना सांगायला हवं.
"पालकांनी याविषयी मुलांशी मोकळेपणाने बोलण्याची गरज असल्याचं डॉक्टर पूनम सांगतात. "मीदेखील माझ्या मुलाशी याविषयी बोलतेय. आणि उपचारांसाठी माझ्याकडे येणाऱ्या पालकांनाही असं करण्यासाठी प्रोत्साहित करतेय."
कोरोना व्हायरससारख्या प्रत्येक मोठ्या गोष्टीविषयी मुलांशी नेमकं कसं बोलायचं हे त्यांचं वय किती आहे, यावर अवलंबून असल्याचं लहान मुलांचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रिचर्ड वुल्फसन सांगतात.
ते म्हणतात, "लहान मुलं, विशेषतः सात वा सहा वर्षांपेक्षा कमी वय असणारी मुलं त्यांच्या आजूबाजूला होत असलेल्या घटनांविषयींच्या चर्चांमधून अनेक गोष्टी शिकत असतात. कारण त्यांचे आई-वडीलही या घटनांविषयी बोलत असतात. मुलांसाठी हे सगळं घाबरवून टाकणारं ठरू शकतं.
सगळ्यात आधी तुम्ही मुलांना दिलासा द्यायला हवा. नेमकं काय होणार आहे हे तुम्हालाही माहीत नाही. पण मुलांना ती सुरक्षित असतील, सगळेजण ठीक असतील याची हमी द्यायला हवी. काहीजण आजारी पडू शकतात, पण त्यापेक्षा जास्त काही घडणार नसल्याचं त्यांना सांगायला हवं."
व्यवहार्य काय?
तुमच्या मुलांना याचा संसर्ग होईल की नाही याविषयी तुम्हाला माहिती नसलं तरी आशावादी असणं महत्त्वाचं असल्याचं डॉ.वुल्फसन सांगतात. उगीच काळजी करत राहू नये. ते सांगतात, "फक्त मुलांना दिलाला देऊन भागणार नाही. तुम्ही त्यांना सशक्त बनवायला हवं." संसर्गाचा धोका टाळण्यासाठी काय करायला हवं हे मुलांना सांगणं गरजेचं असल्याचं डॉ. वुल्फसन म्हणतात. गोष्टी आपल्या नियंत्रणात असल्याची जाणीव मुलांना करून द्यावी.
डॉक्टर वुल्फसन म्हणतात, "मुलांना हे सांगायला हवं की काही गोष्टी स्वतःच्या स्वतः करूनही ती स्वतःला आणि सगळ्यांनाच निरोगी ठेवू शकतात. म्हणजे वारंवार हात धुणं, खोकताना तोंड झाकणं..."
"म्हणजे मुलांच्याही लक्षात येईल की आपणही काहीतरी करू शकतो, त्यांना काहीही न करता बसून रहायला सांगणं योग्य नाही."
असा विश्वास मुलांच्या मनात निर्माण केल्याने आणि बचावासाठीच्या काही गोष्टी त्यांना शिकवल्याने या आजारापासून स्वतःचं आणि कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी आपणही काही करू शकतो, याची जाणीव मुलांना होईल.
बचाव
पण इतकंच करून भागणार नाही.
लहान मुलांमध्ये सगळ्या गोष्टींविषयी कुतुहल असतं. ती सतत प्रश्न विचारतात. गोष्टींना हात लावतात आणि आपलं जेवण - पाणी दुसऱ्यांसोबत वाटून घेतात. याचा अर्थ म्हणजे 'लहान मुलं ही संसर्ग पसरण्याचं एक मोठं माध्यम असतात आणि आपण त्यांना सुरुवातीपासूनच या महत्त्वाच्या गोष्टी शिकवायला हव्यात' असं डॉ. पूनम कृष्णन सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
लहान मुलांना स्वच्छताविषयक सवयींविषयी शिकवल्याने एकप्रकारे समाजाच्या सुरक्षिततेलाच हातभार लागतो.
फेक न्यूज आणि मुलं
आई-वडिलांमुळेच मुलांची काळजी वाढू शकते, असं डॉक्टर वुल्फसन सांगतात. ते म्हणतात, "लहान मुलांवर त्यांच्या आई-वडिलांचा प्रभाव असतो. जर आई-वडील चिंतेत असल्याचं, काळजीत असल्याचं त्यांना दिसलं, आई-वडील त्यांच्या मित्रमंडळींसोबतही गंभीर चर्चा करताना दिसले, तर लहान मुलंही अनेकदा काळजीत पडतात."
म्हणूनच मुलं आजूबाजूला असताना पालकांनी स्वतःच्या वर्तनाविषयी खबरदारी घ्यायला हवी. पण शाळेत घडतं ते पालकांच्या हाताबाहेरचं असतं.
डॉक्टर वुल्फसन म्हणतात, "शाळेत अनेक गोष्टींची चर्चा होते. मला तीन नातवंडं आहेत, वय आहे 12, 10 आणि 8 वर्षं. आपल्या शाळेत कोणीतरी आलं होतं, त्याआधी ती व्यक्ती कुठेतरी गेलेली होती, शाळेत आल्यानंतर या विद्यार्थ्याला परत जाण्यास सांगण्यात आलं, आणि अशाप्रकारे सगळ्यांना हा आजार झाला, असं या तिघांनीही मला सांगितलेलं आहे. "
अशा गोष्टी किती झपाट्याने पसरतात, हे यावरून दिसून येतं. म्हणूनच मुलांना ती सुरक्षित असल्याबद्दल आश्वस्त करणं आणि अशा गंभीर गोष्टींविषयी त्यांच्याशी प्रामाणिकपणे बोलणं गरजेचं आहे.
किशोरवयीन मुलांशी संवाद
एखाद्या संसर्गाविषयी किशोरवयीन मुलांशी वेगळ्या पद्धतीने बोलावं लागेल. कारण जगभरातल्या घडामोडींविषयी जाणून घेण्यासाठी ही मुलं त्यांच्या आई-वडिलांवर तुलनेने कमी अवलंबून असतात. त्यांना बहुतेक माहिती त्यांच्या मित्रपरिवारातून मिळते.
डॉक्टर वुल्फसन म्हणतात, "किशोरवयीन मुलांचं स्वतःचं वेगळं नेटवर्क असतं. ते त्यांच्या वयाच्या सोबत्यांवर अवलंबून असतात. पण त्यांच्याबाबतची वेगळी गोष्ट म्हणजे या वयातली मुलं जास्त व्यवहार्य विचार करू शकतात. सगळं काही ठीक आहे, काळजी करायची गरज नाही असं 14 वर्षांच्या मुलाला सांगून भागणार नाही. कारण असं सांगितल्यावर तो उलट तुम्हाला म्हणेल, तुम्हाला काहीच माहित नाही."
"पण मुलं कोणत्याही वयाची असोत, एक गोष्ट सगळ्याच मुलांना लागू होते. तुम्ही त्यांच्यासाठी कशी वातावरण निर्मिती करता, यावर सगळं अवलंबून असतं. आपल्या मनातली प्रत्येक गोष्ट मोकळेपणाने बोलण्याचं स्वातंत्र्य तुम्ही मुलांना द्यायला हवं. इतका मोकळेपणा असायला हवा."

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









