कोरोना व्हायरसमुळे बेघर झालेल्या पाळीव प्राण्यांना मदतीचा हात

फोटो स्रोत, SUPPLIED
- Author, सोफी विल्यम्स
- Role, बीबीसी न्यूज
कोरोना व्हायरसने आतापर्यंत 2000हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. अनेक जण भीतीच्या सावटाखाली जगत आहेत पण आता कोरोना व्हायरसचा फटका इतर प्राण्यांनाही बसू लागलाय. चीनमध्ये शेकडो कुत्रे रस्त्यावर सोडून दिले जातायत.
कोरोना व्हायरस प्राण्यांमधून पसरत नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगूनही चीनमधील लोक कुत्र्यांना घरात ठेवण्यास तयार नाहीत. किंवा ज्यांना कोरोना व्हायरसची लागण झालीय, असे लोक आपल्या पाळीव कुत्र्यांना सोबत ठेवू शकत नाहीत. त्यामुळं कुत्र्यांना रस्त्यावर सोडून दिलं जातंय.
मात्र, अशा स्थितीतही आपल्यातली संवदेनशील आणि माणुसकी जपणारी माणसंही काही कमी नाहीत.
अनेक समाजसेवी माणसं कुत्र्यांना जवळ करतायत, आसरा देतायत.
बीबीसीनं चीनमधील वुहान शहरातील अशाच एका स्वयंसेवी व्यक्तीशी संवाद साधला. वुहान हे कोरोना व्हायरसचं केंद्र बनलंय. इथूनच जगभरात कोरोना व्हायरस पसरला.
ती व्यक्ती म्हणाली, "या एका महिन्यात मी अनेक कुत्र्यांची सुटका केलीय. यातले अनेक कुत्र्यांना त्यांच्या मालकांनी सोडून दिलं होतं."

फोटो स्रोत, FURRY ANGELS HEAVEN
कुणा व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं लक्षात आल्यास, त्या व्यक्तीला इतरांपासून वेगळं ठेवलं जातं. परिणामी त्यानं समजा कुत्रा किंवा इतर प्राणी पाळला असेल, तर त्याच्यावर बेघर होण्याची वेळ येते.
अशा पाळीव प्राण्यांना एका महिलेनी आश्रय दिला आहे. त्यांना आपली ओळख जाहीर करायची नाही.
आपली ओळख उघड झाली तर आपल्या समस्या वाढतील अशी भीती त्या व्यक्तीला वाटत असल्यामुळे बीबीसीने त्याची ओळख जाहीर न करण्याचा निर्णय घेतलाय.
त्यांच्याकडे 35 कुत्री आणि 28 मांजरी आहेत. त्यांच्या अपार्टमेंटमध्येच त्यांननी 'रेस्क्यू होम' (निवारा केंद्र) बनवलं आहे.
"इथं खूपच वाईट स्थिती आहे. आम्हाला बाहेर पडू दिलं जात नाहीय. प्राण्यांसाठीचे खाद्यपदार्थ संपण्याची मला भिती वाटतेय. शिवाय, जर मी किंवा माझ्या कुटुंबातील कुणाला कोरोना व्हायरसची लागण झाली, तर या प्राण्यांना पोलीस सरळ मारूनच टाकतील."
"आता तर स्थिती अशी आहे की, नियमित पगाराशिवाय माझ्याकडे कमाईचं दुसरं कुठलंच माध्यम उरलं नाहीय. त्यामुळं काही दिवसांनी प्राण्यांसाठी गोळा केलेले पैसेच वापरण्याची वेळ येईल," असंही ती सांगते.
प्राण्यांना सोडवणं, सांभाळणं फार खार्चिक गोष्ट आहे. त्यामुळं कोरोना व्हायरसचं संकट टळलं, तर तातडीनं या सर्व प्राण्यांना दत्तक घेण्यासाठी आवाहन केलं जाणार आहे.
अनेकांच्या घरात कुत्रे, मांजरं अडकून पडली
चीनमध्ये कोरोना व्हायरसचा उद्रेक डिसेंबर 2019 मध्ये झाला. लोक नववर्षासाठी वेगवेगळ्या शहरात आपापल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले. याच दरम्यान म्हणजे जानेवारीच्या सुरूवातीलाच कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढली.
नववर्षानिमित्त दुसऱ्या शहरांमध्ये गेलेले चिनी लोक आपल्या घरातील पाळीव प्राण्यांना पुरेसं अन्न ठेवून गेले होते. मात्र, कोरोना व्हायरस झपाट्यानं पसरू लागल्यानं लोकांच्या प्रवासावर बंदी आली.

फोटो स्रोत, FURRY ANGELS HEAVEN
चीनमधील हुबेई प्रांतातील सहा कोटी लोकांवर प्रवासबंदी लादली गेली. त्यामुळं अर्थात, नववर्षासाठी घराबाहेर पडलेले हे लोक घरात परतू शकले नाहीत. या सर्वाचा परिणाम असा झाला की, जे अन्न घरातल्या पाळीव प्राण्यासाठी ठेवून गेले होते, ते संपू लागलं.
गोंधळलेले लोक आपापल्या पाळीव प्राण्यांसाठी विबो या चीनमधील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून मदत मागू लागले.
एका महिलेनं वुहानजवळील शहरातून सोशल मीडियावर लिहिलं होतं, 'मदत करा, मी इझोऊ शहरात राहते आणि तिथं माझी मांजर अडकलीय.'
घरातील मांजरीची कुणी काळजी घेण्यास तयार आहे का, याचा शोध ही महिला घेत होती. माजंरीची काळजी घेणाऱ्यास पैसे देण्याचीही तिची तयारी होती.
प्राण्यांना वाचवण्यासाठी लोकही पुढे आली
आम्हाला असाच एक स्वयंसेवक भेटला. लाओ माओ असं त्यानं त्याचं नाव सांगितलं. जे लोक घरापासून दूर आहेत आणि त्यांच्या घरात अडकलेल्या पाळीव प्राण्याला मदतीची गरज आहे, त्यांना मदत करणारा एक ग्रुप आहे. या ग्रुपचा लाओ सदस्य आहे. या ग्रुपनं आतापर्यंत हजारहून अधिक पाळीव प्राण्यांची सुटका केलीय.
या ग्रुपनं सोशल मीडियावर एक व्हीडिओही शेअर केलाय. लाओ घरात शिरतोय, पाळीव प्राण्यांना खायला देतोय आणि प्राण्यांना काही जखम वैगरे झाली असल्यास औषधोपचारही करतोय, असं या व्हीडिओत दिसतं.
कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्यानंतर चीनमधील परिस्थिती प्रचंड भयानक झालीय, अनेक प्राण्यांना आपली नितांत गरज असल्याचं लाओ बीबीसीला सांगत होता.
"अनेक पाळीव प्राणी तर उपासमारीमुळं मृत्युमुखी पडतायत. काही प्राण्यांपर्यांतच आम्ही पोहोचू शकतोय. आम्ही याहून अधिक काही करू शकत नाही, मात्र जेवढं शक्य आहे, तेवढं नक्कीच करू," असंही लाओ म्हणतो. त्याच्या डोळ्यांमधली संवेदनशीलता आणि प्राण्यांप्रती असलेला जिव्हाळा प्रकर्षानं दिसून येत होता.
हे वुहानमध्येच घडतंय असं नाही, तर संपूर्ण चीनमध्ये हीच परिस्थिती आहे.
खास कुत्र्यांसाठी निवारा चालवणाऱ्या नाना नामक व्यक्तीशी बीबीसीनं बातचीत केली. त्यांनी सांगितलं, "नववर्षांमुळं अनेक कुत्र्यांना निवाऱ्यात सोडलं जातं. आता अनेक विमानं रद्द झाल्यानं लोक घरी परतली नाहीत त्यामुळं निवाऱ्यातही कुत्र्यांची संख्या अधिक झालीय. 120 कुत्र्यांसाठी क्षमता असलेल्या निवाऱ्यात सध्या 350 कुत्रे ठेवलेत. आम्हीही हताश झालोय."

फोटो स्रोत, SUPPLIED
शेंचेनमधील एका स्वयंसेवकाशी आम्ही बोललो. तिनं अनेक कुत्र्यांना वाचवलंय.
"सर्व दुकानं बंद असल्यानं कुत्र्यांना खाण्यासाठी काही मिळत नाहीय. मांजरं आणि कुत्री रस्त्यावर फिरताना, भुंकताना दिसणं आता सामान्य होऊन गेलंय," असं ती सांगत होती.
मात्र, "आता पाळीव प्राण्यांना वाचवण्यासाठी अनेकजण आमच्या सोबत येतायत. लोकांचा सहभाग खरंच सुखावणारा आहे. लोक पुढे येतायत, मदतीसाठी प्रत्यक्ष सहभाग नोंदवतायत, काहीजण तर प्राण्यांना आपल्या घरात निवारा देतायत," असंही ती सांगते.
चिनी आणि चीनबाहेरील लोकही पाळीव प्राण्यांना वाचवण्यासाठी पुढे येत असल्याचं ती सांगते आणि त्याबाबत समाधानही व्यक्त करते.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









