Coronavirus : सुपर-स्प्रेडर्समुळे वाढतोय धोका

फोटो स्रोत, Getty Images
काही लोक त्यांना झालेल्या संसर्गाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव करतात. कोरोना विषाणू बाबतीतही हेच घडतंय का?
एखाद्या आजाराच संसर्ग झालेली व्यक्ती तो संसर्ग इतरांना देते म्हणजे त्याचा मोठ्या प्रमाणावर फैलाव करते. याला वैद्यकीय भाषेत सुपर-स्प्रेडिंग म्हणतात. कुठल्याही साथीसाठी बहुतांश हेच सुपर-स्प्रेडिंग जबाबदार असतं.
यात त्या रुग्णाची किंवा व्यक्तीची काहीच चूक नसते. मात्र, आजार पसरण्यात त्याची मोठी भूमिका असते.
चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोना विषाणूबाबतीतही हेच सुपर-स्प्रेडिंग कारणीभूत असल्याचं काही अहवालांमध्ये सांगण्यात आलं आहे.
सिंगापूरमध्ये जाऊन आलेले ब्रिटनचे स्टिव्ह वॉल्श यांच्यामुळे युकेमध्ये चार जणांना तर फ्रान्समध्ये पाच जणांना आणि मजोरकामध्ये एकाला कोरोनाची लागण झाल्याचं म्हटलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
सुपर-स्प्रेडर म्हणजे काय?
सुपर-स्प्रेडर याची कुठलीही निश्चित अशी व्याख्या नाही. मात्र, ढोबळमानाने सांगायचं तर एखादी व्यक्ती जेव्हा सामान्यपेक्षा जास्त जणांना एखादा संसर्ग देते तेव्हा तिला सुपर-स्प्रेडर म्हटलं जातं. सुपर-स्प्रेडर म्हणजेच आजाराचे 'वाहक'.
सरासरी कोरोना विषाणूची लागण झालेल्या प्रत्येक व्यक्तीमुळे दोन ते तीन जणांना हा संसर्ग होतो आहे.
मात्र, ही केवळ सरासरी आहे. म्हणजेच कोरोना बाधित एखाद्या व्यक्तीमुळे कुणालाचा संसर्ग झाला नसेल. तर काही जण मोठ्या प्रमाणावर त्याचा फैलाव करत असतील.

फोटो स्रोत, EPA
सुपर-स्प्रेडिंगची व्याप्ती किती असू शकते?
सुपर-स्प्रेडिंगची व्याप्ती 'प्रचंड' असू शकते आणि एखाद्या आजाराचा उद्रेक होण्यात त्याची मोठी भूमिका असू शकते.
2015 साली सुपर-स्प्रेडिंगची अशी घटना घडली होती. एका हॉस्पिटलमधल्या एकाच रुग्णामुळे तब्बल 82 जणांना एक सिन्ड्रोम झाला होता. मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिन्ड्रोम असं त्या सिन्ड्रोमचं (Mers) नाव होतं. विशेष म्हणजे तोसुद्धा कोरोना विषाणूचाच एक प्रकार होता.
पश्चिम आफ्रिकेत जेव्हा इबोला विषाणुची साथ पसरली होती त्यावेळीसुद्धा केवळ 3% रुग्णांमुळे 61% लोकांना इबोलाचा संसर्ग झाला होता.

फोटो स्रोत, EPA
काही लोक संसर्गाचा फैलाव अधिक प्रमाणात का करतात?
काही व्यक्ती जास्त लोकांच्या संपर्कात येतात. संसर्गाचा फैलाव अधिक होण्याचं हे एक कारण असू शकतं. काही व्यक्ती व्यवसायानिमित्ताने खूप जणांना भेटत असतात. किंवा काही जण खूप गजबजलेल्या ठिकाणी राहतात. या कारणांमुळे त्यांचा लोकांशी संपर्क अधिक येतो. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की संसर्गाचा फैलाव करणाऱ्या व्यक्तीमध्ये संबंधित आजाराची लक्षणं दिसतीलच असं नाही किंवा ते स्वतः रुग्ण असतीलच असं नाही.
लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसीनचे डॉ. जॉन एडमंड म्हणतात, "संसर्गाच्या फैलावासाठी शालेय विद्यार्थी प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे शाळा बंद ठेवणे एक चांगला उपाय आहे."
तर युनिव्हर्सिटी ऑफ इडिनबर्गचे प्राध्यापक मार्क वुलहाऊस म्हणतात, "HIVच्या फैलावामध्ये व्यावसायिक सेक्स वर्कर महत्त्वाच्या ठरतात."
याव्यतिरिक्त काही माणसंच अशी असतात की ज्यांच्या शरीरातून जास्त प्रमाणात विषाणू बाहेर फेकले जातात. त्यांना सुपर-स्प्रेडर म्हणतात. त्यामुळे अशा व्यक्तींच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना संसर्ग होऊ शकतो.
Severe Acute Respiratory Syndrome (Sars) या श्वसनाशी संबंधित आजारावर उपचार करणारे हॉस्पिटल्सदेखील सुपर-स्प्रेडर्स असतात. कारण या आजाराच्या रुग्णाला मोठ्या प्रमाणावर संसर्ग झालेला असतो आणि तो त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर, नर्स आणि हॉस्पिटलचा इतर स्टाफ अशा अनेक लोकांच्या संपर्कात येतो.

फोटो स्रोत, EPA
संसर्गाचं रुपांतर साथीत कसं होतं?
बीबीसीशी बोलताना डॉ. एडमंड म्हणाले, "जेव्हा एखादा विषाणू एस्टॅब्लिश होण्याचा प्रयत्न करत असतो तो सुरुवातीचा काळ महत्त्वाचा असतो."
कोरोना विषाणूसह इतरही नवीन संसर्ग प्राण्यांपासून झाले आहेत. जेव्हा असा विषाणु माणसाच्या शरीरात प्रवेश करतो तेव्हा त्याचा उद्रेक होण्याआधी तो नष्टदेखील होऊ शकतो.
मात्र, नष्ट होण्याआधी त्याने सुपर-स्प्रेडरच्या शरीरात प्रवेश केला तर मात्र साथीच्या रोगाचा उद्रेक होण्याची शक्यता बळावते. हाच नियम संसर्ग झालेली व्यक्ती एखाद्या देशात दाखल होते, तिथे लागू होतो.
डॉ. मॅकडिमोट म्हणतात, "तुमच्या आजूबाजूला बरेच सुपर-स्प्रेडर असतात तेव्हा तुम्हाला त्याची लागण होऊ नये, यासाठी तुम्हाला बराच संघर्ष करावाच लागतो."

फोटो स्रोत, Getty Images
सुपर-स्प्रेडिंग होत असेल तर कोरोना विषाणुला कशाप्रकारे आळा घातला जाऊ शकतो?
नवीन कोरोना विषाणूच्या सुपर-स्प्रेडिंगमध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही आणि यामुळे आजाराला आळा घालण्याच्या उपायांमध्ये लक्षणीय बदलही होणार नाही.
सध्यातरी आपण रुग्ण आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची ओळख पटवणे, यावरच अवलंबून आहोत.
प्रा. वुलहाऊस म्हणतात, "त्यामुळे खूप चुका करणं आणि सुपर-स्प्रेडरची ओळख पटवू न शकणं, हे परवडणारं नाही."

ही सुपर-स्प्रेडरची चूक आहे का?
सामान्यपणे सुपर-स्प्रेडरला चुकीसाठी जबाबदार धरलं जातं
याचं एक जगप्रसिद्ध उदाहरण म्हणजे 'टायफॉईड मेरी.' मेरी मेलोन (1869-1938) असं तिचं खरं नाव. ती एक आयरिश स्वयंपाकीण होती. मेरी विषमज्वराची सुपर-स्प्रेडर होती. तिच्यामुळे अमेरिकेत अनेकांना विषमज्वराची लागण झाली होती. अनेकांनी जीव गमावला होता. ती या आजाराची वाहक असल्याचं कळल्यावर तिच्यावर खटला चालला आणि तिला अनेक दशकं तुरुंगवासात आणि एकांतवासात घालवावी लागली होती.
मात्र, खरंतर यात रुग्णाची किंवा वाहकाची काही चूक नसते. डॉ. मॅकडरमॉट म्हणतात, "बोलताना आपण भाषा जपून वापरली पाहिजे."
"त्यांनी काहीही चुकीचं केलेलं नसतं. त्यांच्या शरीरात विषाणू गेलेले असतात आणि यात त्यांचा दोष नसतो."
"ते कदाचित घाबरलेले असतात आणि त्यांना प्रेम आणि सांत्वनेची गरज असते."

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









