Corona Virus: कोरोना व्हायरसचा चीनच्या अर्थव्यवस्थेला असा बसतोय फटका

फोटो स्रोत, EPA
- Author, अँड्रयू वॉकर
- Role, आर्थिक प्रतिनिधी, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे एकीकडे बळी जात आहेत तर दुसरीकडे अर्थव्यवस्थेलाही याचा मोठा फटका बसतोय.
सोमवारी एकट्या हुबेई प्रांतातच 103 जणांचा बळी गेला. यामुळे कोरोना व्हायरसमुळे जाणाऱ्या एकूण बळींची संख्या आता 1,016 झालीय.
पण नव्याने लागण झालेल्या रुग्णांची संख्या रविवारच्या तुलनेत सोमवारी सुमारे 20 टक्क्यांनी कमी होती.
रविवारी 3,062 जणांना संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं. तर सोमवारी 2,478 जणांना या विषाणूची लागण झाल्याचं समोर आलंय.
चीन सरकारने याची गांभीर्याने दखल घेत अनेक उच्चपदस्थांची हकालपट्टी केली आहे. त्यात सरकारचे आरोग्य सचिव तसंच हुबेई आरोग्य समितीचे प्रमुख यांचा समावेश आहे.
ही या प्रकरणी शिक्षा सुनावलेली आजवरची सर्वांत मोठी नावं आहेत.
हुबेई प्रांतामध्ये कोरोना व्हायरसची नवीन 2,097 प्रकरणं आढळल्याचं हुबेईच्या आरोग्य विभागाने सांगितलंय.
हा व्हायरस आणखी पसरू नये म्हणून करण्यात आलेल्या उपाययोजनांवरच्या खर्चामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान होतंय.
1.1 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या वुहान शहरातून बाहेर पडण्यावर पूर्णपणे बंदी आहे.
हुबेई प्रांतातील इतर भागांमध्ये पूर्णपणे 'लॉकडाऊन' आहे. कामासाठीचा प्रवास, सामान आणि लोकांचं दळणवळण याच्यावरही बंदी आहे.
व्हायरसच्या भीतीने लोक घराबाहेर पडत नाहीयेत. त्याचा परिणाम रेस्टाँरंट्स, सिनेमा हॉल, वाहतूक व्यवस्था, हॉटेल्स आणि दुकानांवर स्पष्टपणे दिसून येतोय.
चीनी नववर्ष सुरू होण्याच्या आधीच कोरोना व्हायरस पसरला. याचा परिणाम उद्योग क्षेत्रावरही झालाय.
कोरोना व्हायरस पसरल्याने चीनी नव-वर्षाची सुटीही वाढवण्यात आली होती. यामुळे अनेक उद्योगांतलं कामकाज सुरू व्हायला उशीर झाला. त्यामुळे उत्पादन आणि विक्री घटलेली आहे आणि कंपन्यांकडे पुरेसे पैसे येत नाहीत.

फोटो स्रोत, Reuters
याचा सगळ्यात मोठा परिणाम लहान उद्योगांवर झालाय.
शिवाय या कंपन्यांना हे काम होत नसलं तरी काही खर्च पूर्वीप्रमाणेच करावा लागत आहेत. बिल भरावी लागतायत आणि कर्मचाऱ्यांना वेतनही द्यावं लागतंय.
चीनबाहेरही नुकसान
चीनी उत्पादकांचं चीनमध्येच नाही तर चीनच्या बाहेरही नुकसान होतंय. कारण चीनमध्ये तयार करण्यात आलेल्या वस्तू खरेदी करण इतर देशांमध्ये टाळलं जातंय.
गुआंगडाँग प्रांतातील 'विंग सँग इलेक्ट्रिकल'चे मालक हर्बर्ट वुन हे हेअर स्ट्रेटनर आणि ब्लो ड्रायरसारखी उत्पादनं तयार करतात. हा व्हायरस परसल्यानंतर चीनी वस्तू न घेता इतर कुठून तरी उत्पादनं घेण्याचा प्रयत्न ग्राहक करत असल्याचं त्यांनी बीबीसीला सांगितलं.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवरही याचा परिणाम झालेला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
फर्निचर कंपनी आयकिया आणि स्टारबक्स कॅफेसारख्या अनेक मोठ्या कंपन्यांनी चीनमधलं आपलं कामकाज बंद केलंय.
अनेक विमान कंपन्यांनी आपली उड्डाणं रद्द केली असून आंतरराष्ट्रीय हॉटेल्स ग्राहकांना आगावू घेतलेले पैसे परत करत आहेत.
चीनमधून कारसाठी लागणाऱ्या सुट्या भागांचा पुरवठा होत नसल्याने ह्युंदाई या दक्षिण कोरियन कंपनीने आपल्या कार्सचं उत्पादन काही काळासाठी बंद केलंय.
चीन हा ऑटो इंडस्ट्री आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगासाठी एक जागतिक पुरवठादार आहे. शिवाय अनेक मोबाईल आणि कम्प्युटर कंपन्यांचे सुटे भागही चीनमध्ये तयार होतात.
शेअरबाजार कोसळला
चीनी वित्तीय बाजारांवरही याचा परिणाम झालेला आहे. सुट्यांनंतर खुला झालेला चीनचा शेअर बाजार ट्रेडिंगच्या पहिल्या दिवशी 8 टक्के कोसळला होता.
चीनमधल्या मंदावलेल्या उद्योगांचा अंदाज कमी झालेल्या तेलाच्या मागणीवरून लावला जाऊ शकतो. सिनोपॅक या एका मोठ्या तेलकंपनीच्या अहवालानुसार गेल्या दोन आठवड्यांमध्ये 15%मागणी कमी झालेली आहे.
मागणी कमी झाल्याने कोसळणाऱ्या किंमती रोखण्यासाठी तेल उत्पादन आणि निर्यात करणाऱ्या देशांचा एक गट तेल उत्पादन कमी करण्याच्या विचारात आहे.
गेल्या दोन आठवड्यांत तांबंही 13%नी स्वस्त झालेलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
बांधकाम उद्योगासाठी हा महत्त्वाचा घटक असून कोरोना व्हायरसमुळे हे क्षेत्रही प्रभावित झालेलं आहे. पण व्हायरसमुळे नेमकं किती नुकसान झालं हे समजायला आता कुठे सुरुवात होतेय.
चीन या विषाणूचा किती प्रभावीपणे मुकाबला करतो, यावर किती मोठं नुकसान होतंय, हे अवलंबून असेल.
आर्थिक प्रगतीवर परिणाम
आर्थिक प्रगतीच्या जागतिक आकडेवारीचा अंदाज वर्तवणाऱ्या संस्थांनी काही आकडेवारी देण्याचा प्रयत्न केलाय.
ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स या कन्सलटन्सी फर्मनुसार 2020च्या पहिल्या तिमाहीत चीनच्या अर्थव्यवस्थेची गेल्या वर्षीच्या तुलनेत 4% कमी वृद्धी होईल. तर पूर्ण वर्ष 5.6% च्या दराने प्रगती होण्याचा अंदाज आहे. कोरोना व्हायरस उद्भवण्याच्या आधी हा अंदाज 6 टक्क्यांचा होता.
परिस्थिती बिघडल्यास जागतिक अर्थव्यवस्थेचीच या काळात 0.2 टक्के कमी प्रगती होईल. पण हे टाळता येण्याजोगं असल्याचं ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, Reuters
चीनी सरकारचे समर्थक असणाऱ्या चायनीज अॅकॅडमी ऑफ सोशल सायन्सेसचे अर्थतज्ज्ञ झांग मिंग यांच्या म्हणण्यानुसार कोरोना व्हायरसमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा दर पहिल्या तीन महिन्यांत 5 टक्क्यांपेक्षा कमी असू शकतो.
कोरोना व्हायरसच्या संकटामुळे काही काळासाठी जागितक अर्थव्यवस्ता मंदावण्याची शक्यता असल्याचं इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या मुख्य संचालक क्रिस्टलिना जॉर्जिवा यांनी म्हटलं होतं.
पण पुढच्या काळाबद्दल आताच काही म्हणणं घाईचं ठरेल, असंही त्यांनी पुढे म्हटलं होतं.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









