कोरोना व्हायरसच्या धोक्याचा इशारा देणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू, नागरिकांनी व्यक्त केला संताप

फोटो स्रोत, Weibo
- Author, स्टेफनी हेगार्टी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
कोरोना व्हायरसच्या धोक्याविषयी सगळ्यांत आधी इशारा देणारे डॉक्टर ली वेनलियांग यांचा मृत्यू झाला आहे.
त्यांच्या प्रकृतीविषयी अनेक बातम्या आल्या होत्या. आधी चीनचा सरकारी मीडिया आणि जागतिक आरोग्य संघटनेनं त्यांच्या मृत्यूची बातमी दिली. पण, त्यांची स्थिती गंभीर असल्याचं वुहान सेंट्रल हॉस्पिटलनं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं.
सोशल मीडियावर संताप
डॉक्टरांच्या मृत्यूनंतर चीनमधील जनतेनं मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त केला आहे.
त्यांच्या मृत्यूच्या बातमीनंतर चीनच्या सोशल मीडिया साईटवर मोठ्या प्रमाणावर शोक व्यक्त करण्यात आला, पण काही वेळानं त्याचं रुपांतर रोषात झालेलं पाहायला मिळालं.
सरकार कोरोना व्हायरसविषयी चुपचाप राहिलं, असा आरोप जनतेनं केला आहे.
आता डॉक्टरांच्या मृत्यूनंतर जनतेच्या रोषात वाढ झाली आहे. यामुळे चीनमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयीच्या संभाषणानं जोर धरला आहे.
"Wuhan government owes Dr Li Wenliang and apology" आणि "We want freedom of speech" हे दोन हॅशटॅग ट्रेंड होत आहेत.
ली यांच्यासहित इतर प्रकरणांची चौकशी सुरू करण्यात येईल, असं देशाच्या भ्रष्टाचारविरोधी पथकानं म्हटलं आहे.
काही क्षणात हे हॅशटॅग हटवण्यात आले. बीबीसीनं वेईबो या साईटवर शुक्रवारी पाहिलं तेव्हा हजारो कमेंट्स हटवण्यात आल्या होत्या, फक्त काही शिल्लक ठेवण्यात आल्या.
कोरोना व्हायरस प्रकाशझोतात आणणाऱ्या व्यक्तीचा हा मृत्यू नव्हे, तर एका हीरोचा मृत्यू आहे, असं एका यूझरनं म्हटलं आहे.
सत्याला नेहमीच अफवा असं समजलं जातं. किती दिवस तुम्ही खोटे बोलणार आहात? असा प्रश्न दुसऱ्या एका यूझरनं विचारलाय.
जे काही घडलंय, त्यामुळे तुम्हाला दु:ख झालं असेल, तर उठून उभे राहा. या पीढीतल्या तरुणांकडे बदल घडवून आणण्याची ताकद आहे, असंही एका यूझरनं लिहिलंय.

फोटो स्रोत, Twitter
चीनी मीडियानुसार, वुहान सेंट्रल हॉस्पिटलचे नेत्र-तज्ञ ली वेनलियांग यांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती आणि इतर काही जणांना ही लागण झाल्याचं त्यांनी 30 डिसेंबरलाच सहकाऱ्यांना सांगितलं होतं.
यावर तोंड बंद ठेवा, असं स्थानिक पोलिसांनी त्यांना सांगितलं होतं. तसंच लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नका, असंही म्हटलं होतं. पण, काही कालावधीनंतर ली वेनलियांग यांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरली.
चीनमध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे 636 जणांचा बळी गेला आहे तसेच 31,161 लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे.
'प्रशासनाविरोधात आवाज उठवला'
चीनमध्ये एक महाभयंकर व्हायरस येऊ शकतो आणि त्यामुळे लाखो लोक प्रभावित होऊ शकतात अशी माहिती जगासमोर जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच समोर आली असती. पण ही माहिती दडपण्याचा चीनमधील काही प्रशासकीय अधिकारी प्रयत्न करत होते.
आपल्या सहकाऱ्यांचा विरोध पत्करून एका डॉक्टरने ही माहिती जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्याला तसं करण्यापासून रोखलं. त्यानंतरही तो डॉक्टर थांबला नाही त्याने कोरोना व्हायरसच्या धोक्याचा इशारा वेईबो या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून दिला.
जर या डॉक्टरच्या इशाऱ्याकडे लक्ष दिलं असतं तर चीनमधील अनेकांचं आरोग्य धोक्यात नसतं आलं असं सोशल मीडियावर म्हटलं जात आहे.
एका महिन्यानंतर हा डॉक्टर चीनमध्ये हिरो ठरला आहे. त्याने त्याची कहाणी हॉस्पिटलच्या बेडवरून सोशल मीडियावर शेअर केली.
काय म्हणाले होते ली वेनलियांग?
सगळ्यांना नमस्कार. मी ली वेनलियांग. वुहान सेंट्रल हॉस्पिटलमध्ये मी नेत्रतज्ज्ञ आहे.
विषाणूसंबंधित वॉर्डमध्ये डॉ. ली कार्यरत होते. सार्ससारखी लक्षणं दिसणारे सात रुग्ण तिथे दाखल झाले होते.
2003 मध्ये सार्स या रोगाने जगात थैमान घातलं होतं. वुहानमधल्या हुआनन सीफूड मार्केटशी निगडीत परिसरातून हे रुग्ण आल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. हॉस्पिटलमध्ये या रुग्णांना स्वतंत्र विभागात ठेवण्यात आलं होतं. जेणेकरून अन्य रुग्णांना त्यांच्या माध्यमातून कोरोना व्हायरसची लागण होऊ नये.

फोटो स्रोत, LI WENLIANG
30 डिसेंबर रोजी डॉ. ली यांनी आपल्या सहकाऱ्यांना एक मेसेज केला. झपाट्याने पसरणाऱ्या एका व्हायरसबद्दल त्यांनी ग्रुपमधल्या सहकाऱ्यांना सांगितलं. संसर्ग होऊ नये यासाठी डॉक्टरांनी मास्क परिधान करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सहकाऱ्यांना सांगितलं.
डॉ. ली यांना या आजारामागे कोरोना व्हायरस आहे हे माहिती नव्हतं.
चार दिवसांनंतर त्यांना पब्लिक सिक्युरिटी ब्युरोमध्ये पाचारण करण्यात आलं. त्यांच्याकडून एक पत्र लिहून घेण्यात आलं. चुकीची माहिती दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. सामाजिक व्यवस्थेत तणाव निर्माण होईल असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला.
"आम्ही तुम्हाला इशारा देतो. तुम्ही उतावळेपणा करत माहिती पसरवू नका. बेकायदेशीर पद्धतीने माहिती पसरवलीत तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. हे तुम्हाला नक्की समजलं का?" असा दम त्यांना देण्यात आला.
या पत्राखाली डॉ. ली यांच्या हस्ताक्षरात 'हो, मला हे समजलं' असं लिहिलं आहे.

फोटो स्रोत, Weibo
अफवा पसरवल्याप्रकरणी पोलिसांनी आठ लोकांची चौकशी केली त्यामध्ये डॉ. ली यांचा समावेश होता.
जानेवारी महिन्याच्या शेवटी डॉ. ली यांनी पत्राची एक प्रत वेईबोवर शेअर केली आणि नक्की काय घडलं हे सविस्तरपणे कथन केलं. दरम्यानच्या काळात स्थानिक प्रशासनाने त्यांची माफी मागितली. मात्र ही माफी मागायला प्रशासनाने बराच उशीर केला.
जानेवारीच्या सुरुवातीच्या काही आठवड्यांमध्ये वुहान प्रशासनाचा दावा असा होता की या व्हायरसची लागण झालेल्या प्राण्यांशी संपर्क आलेल्या लोकांनाच हा आजार होऊ शकतो. डॉक्टरांना याची लागण होऊ नये यासाठी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वं जारी करण्यात आली नव्हती.

फोटो स्रोत, Getty Images
पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आठवडाभरात डॉ. ली यांनी ग्लुकोमा झालेल्या एका महिलेला तपासलं. त्या महिलेला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे याची डॉ. ली यांना कल्पना नव्हती.
वेईबोवरच्या पोस्टमध्ये त्यांनी काय झालं त्याचं वर्णन केलं. 10 जानेवारीला कफचा त्रास होऊ लागला. दुसऱ्या दिवशी त्यांना ताप आला. दोन दिवसांनंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. त्यांच्या पालकांनाही त्रास जाणवू लागला. त्यांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
डॉ. ली यांची कोरोना व्हायरसची चाचणी झाली. मात्र ती चाचणी निगेटिव्ह झाली.
30 जानेवारीला त्यांनी पुन्हा एक पोस्ट शेअर केली. 'न्यूक्लिक अॅसिड टेस्ट झाली. त्याचे रिर्पोट्स पॉझिटिव्ह आले आहेत.' म्हणजे त्यांना देखील विषाणूची लागण झाली असं त्यांनी सूचित केलं.
त्यांनी एका कुत्र्याचा इमोजी शेअर केला. त्या कुत्र्याचे डोळे रोडावले आहेत आणि जीभ बाहेर निघाली आहे असा तो इमोजी होता.
त्या पोस्टवर हजारो कमेंट्स आल्या. गेट वेल सून असे मेसेज त्यांना करण्यात आले.
'डॉ. ली हिरो आहेत. भविष्यात डॉक्टरांना असे इशारा द्यायला भीती वाटेल. आपलं वातावरण सुरक्षित राहावं यासाठी डॉ. ली सारखे हजारो लोक हवेत,' असं एका युझरने म्हटलं आहे.
कोरोना व्हायरसच्या धोक्याचा इशारा देणाऱ्या डॉक्टर ली यांचा अंत कोरोनामुळेच झाला.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









