Corona Virus : जागतिक आरोग्य संघटनेकडून 'सार्वजनिक आरोग्य आणीबाणी' जाहीर

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

कोरोना व्हायरसमुळं मृत्यूमुखी पडणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) 'सार्वजनिक आरोग्य आणीबाणी' जाहीर केलीय.

कोरोना व्हायरसने चीनमध्ये शेकडो लोक आजारी आहेत आणि अनेक लोकांचा जीव गेला आहे.

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जागतिक आरोग्यविषयक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे का, याचा आढावा घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची काल म्हणजे 30 जानेवारी 2020 रोजी बैठक झाली. त्यानंतरच सार्वजनिक आरोग्य आणीबाणीचा निर्णय जाहीर करण्यात आला.

News image

"सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर करण्याचं कारण केवळ चीनमध्ये काय घडतंय हे नाहीय, तर इतर देशामध्ये काय होतंय, हे आहे," असं जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस एडहेनम यांनी म्हटलंय.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस एडहेनम

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस एडहेनम

ज्या देशांमध्ये आरोग्य व्यवस्था अत्यंत कमकुवत आहे, अशा देशांमध्ये कोरोना व्हायरस पसरण्याची भीती व्यक्त केली जातेय.

एकट्या चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळं आतापर्यंत 213 जणांच्या मृत्यूंची नोंद झालीय.

WHO च्या माहितीनुसार, चीन वगळता जगातील इतर देशांमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेले 98 रुग्ण आढळले आहेत. मात्र, चीनबाहेर अद्याप कुठल्याही रुग्णाचा मृत्यू झाला नाहीय.

ट्वीट

फोटो स्रोत, Twitter

चीनमधील वुहान शहरात कोरोना व्हायरसचा विषाणू सर्वप्रथम आढळला. चीनबाहेरील ज्या देशांमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळले, ते वुहान शहरातून प्रवास करुन आल्याचं दिसून आलंय. मात्र, त्याचवेळी जर्मनी, जपान, व्हिएतनाम आणि अमेरिकेत असेही काही रुग्ण आढळले, ज्यांना इतर रुग्णांपासून झालेल्या संसर्गातून लागण झाली. असे जवळपास आठ रुग्ण आढळलेत.

याआधी कधी कधी सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर झाली होती?

अत्यंत टोकाची स्थिती असेल, तेव्हाच जागतिक आरोग्य संघटना 'जागतिक आरोग्य आणीबाणी' जाहीर करते. गेल्या काही वर्षात तीन ते चारवेळा अशी आणीबाणी जाहीर करण्यात आली होती.

  • स्वाईन फ्ल्यू (2009) - H1N1 व्हायरसने 2009 साली धुमाकूळ घातला होता. जगभरात हा व्हायरस पसरत होता. जवळपास दोन लाख लोकांना या विषाणूची लागण झाली होती. त्यावेळी सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आली होती.
  • पोलिओ (2014) - पोलिओचं 2012 साली पूर्णपणे निर्मुलन झाल्याचं बोललं जात असतानाच, 2013 साली पुन्हा या रोगानं डोकं वर काढलं. त्यावेळी जागतिक आरोग्य संघटनेनं आणीबाणी जारी करत वेगानं पावलं उचलली होती.
ट्वीट

फोटो स्रोत, Twitter

  • झिका (2016) - अमेरिकेमध्ये झिका व्हायरस इतक्या झपाट्यानं पसरला होता की, 2016 साली जागतिक आरोग्य संघटनेनं तात्काळ सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जारी केली आणि झिकाविरोधात लढण्यासाठी संशोधनाला प्रोत्साहन दिलं. झिकाची लक्षणं सौम्य होती, मात्र याचा सगळ्यात जास्त त्रास गर्भवती महिलांना होत होता.
  • इबोला (2014 आणि 2019) - पश्चिम आफ्रिकेत इबोला व्हायरसनं अक्षरश: उच्छाद मांडला होता. 11 हजारहून अधिक जणांचा जीव इबोलानं घेतला. याची दखल घेत जागतिक आरोग्य संघटनेनं ऑगस्ट 2014 ते मार्च 2016 या काळात सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली. इबोलानं गेल्या वर्षी म्हणजे 2019 साली डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ द काँगो या देशात डोकं वर काढलं होतं. त्यावेळीही सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आली होती.

बहुतांश प्रकरणं चीनमध्येच

चीनमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग शेकडो जणांना झाला आहे. देशाच्या मध्यभागी असणाऱ्या हुवेई प्रांताला या विषाणूचा सर्वांत जास्त फटका बसला आहे. येत्या काही दिवसांत या विषाणूचा संसर्ग वाढण्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

चीन प्रशासनाने कोरोना व्हायरसचा प्रभाव रोखण्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. हुवेई शहरात प्रवासावर निर्बंध घातले आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालून जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

चीन सरकारने शांघायच्या फॉरबिडन सिटी आणि ग्रेट वॉल चायना आणि इतकंच काय तर काही बौद्ध मंदिरंही बंद केली आहेत. सध्या तेथील लोक चिनी नवीन वर्ष साजरे करत आहेत. तिथे आठवडाभर सुट्ट्या आहेत. लाखो लाख घरी जाण्याच्या तयारीत आहेत.

अशा वेळी निर्बंधांची यादी दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या जागतिक आरोग्य संघटनेने या संकटाला आंतरराष्ट्रीय आपत्तीचा दर्जा दिलेला नाही. त्यामुळे चीनच्या बाहेर कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची तुलनेने कमी प्रकरणं उजेडात आली आहेत.

कोरोना विषाणू आहे काय?

रुग्णांमधून घेतलेल्या या विषाणूच्या सॅम्पलची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. त्यानंतर चीनचे अधिकारी आणि जागतिक आरोग्य संघटनेने हा कोरोना वायरस असल्याचं सांगितलं.

कोरोना विषाणूचे अनेक प्रकार आहेत. मात्र, यापैकी केवळ सहा प्रकारच्या विषाणूंची माणसाला बाधा होऊ शकते. मात्र, नव्या विषाणूचा शोध लागल्यानंतर संक्रमित होणाऱ्या कोरोना विषाणूंची संख्या आता सात झाली आहे.

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, KEVIN FRAYER

या नव्या कोरोना विषाणूच्या जेनेटिक कोडचं विश्लेषण करण्यात आलं. कोरोना विषाणूचा एक प्रकार म्हणजे सार्स. हा नवा विषाणू सार्सच्या जवळचा असल्याचं संशोधकांनी केलेल्या विश्लेषणात आढळलं आहे.

सार्स प्रकारातला कोरोना विषाणू अत्यंत घातक मानला जातो. 2002 साली चीनमध्ये 8,098 लोकांना सार्स विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यापैकी 774 लोकांचा मृत्यू झाला होता.

कोरोना विषाणू आला कुठून?

हा विषाणुचा नवीन प्रकार आहे. हे प्राण्यांच्या एका प्रजातीतून दुसऱ्या प्रजातीत संक्रमित होतात आणि त्यानंतर मानवालाही संसर्ग होतो. या संक्रमणावस्थेच्या काळात त्याचा शोध लागत नाही.

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

नॉटिंगम युनिवर्सिटीत वायरोलॉजीचे प्राध्यापक असलेले जोनाथ बॉल यांच्या मते, "हा अगदी नवीन प्रकारचा कोरोना विषाणू आहे. या विषाणूची लागण प्राण्यांमधूनच माणसाला झाली असावी, अशी दाट शक्यता आहे."

सार्स हा विषाणू मांजरातून माणसांत आला होता. मात्र, या विषाणूचा मूळ स्रोत कोणता आहे, याची अधिकृत माहिती चीनने अजून दिलेली नाही.

कोरोना संसर्गाची लक्षणं

कोरोना व्हारसच्या संसर्गाची लक्षणं अगदी सामान्य आहेत. श्वास घेण्यात अडथळा, खोकला किंवा वाहतं नाक, ही मुख्य लक्षणं आहेत. मात्र कोरोना व्हायरसच्या काही प्रजाती अतिशय धोकादायक आहे. सार्स (Severe Acute Respiratory Syndrome) आणि MARS (Middle East Respiratory System) अशी या दोन प्रजातींची नावं आहेत.

सध्या ज्या व्हायरसची साथ पसरली आहे त्या व्हायरसला nCoV असं नाव दिलं आहे. कोरोना व्हायरसचा हा नवीन प्रकार आहे. आतापर्यंत तो मनुष्यप्राण्यात आढळला नव्हता.

कोरोना संसर्गाची जी प्रकरणं सध्या समोर आली आहेत त्यावरून असं लक्षात येतं की या आजाराची सुरुवात तापापासून होते.त्यानंतर त्याचं रुपांतर कोरड्या खोकल्यात होतं. आठवडाभरात अशीच स्थिती राहिली तर श्वासाचा त्रास सुरू होतो.

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

मात्र गंभीर प्रकरणात या संसर्गाचं रुपांतर न्युमोनिया किंवा सार्समध्ये होतं. किडनी निकामी होण्याची स्थिती निर्माण होते. इतकंच काय तर रुग्णाचा मृत्यूही ओढवू शकतो. कोरोनाचे बहुतांश रुग्ण वृद्ध आहेत. ज्यांना पार्किन्सन किंवा डायबिटीज आहे त्यांना या विषाणूची लागण होण्याची शक्यता जास्त असते.

लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसीनचे संचालक प्रा. पीटर पायोट सांगतात, "कोरोना व्हायरस सार्सपेक्षा कमी धोकादायक आहे ही त्यातल्या त्यात सुखद बाब आहे. गेल्या काही काळाच्या तुलनेत माहितीचं आदान प्रदान योग्य प्रकारे होत आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण अशा संकटांशी एकट्याने लढू शकत नाही."

या विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी काही विशेष उपाययोजना नाहीत. सध्या रोगांच्या लक्षणांनुसार डॉक्टर रुग्णांवर उपचार करत आहेत.

बचावासाठी काय खबरदारी घ्यावी?

कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने अगदी साध्या उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. हात स्वच्छ करणं, मास्क घालणे, आणि योग्य आहार या उपाययोजनांचा समावेश आहे.

ज्या लोकांना श्वसनाचे विकार आहेत, त्यांच्या जवळपास जाण्यापासून लोकांना मज्जाव करण्यात आला आहे. ज्यांना विषाणूंचा संसर्ग झाला आहे त्यांची भेट घेतल्यावर तातडीने हात धुणे, पाळीव किंवा रानटी प्राण्यापासून दूर राहण्याचाही सल्ला दिला आहे. कच्चं किंवा अर्धवट शिजलेले मांस खाण्यासही मज्जाव करण्यात आला आहे.

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, GOV.CN

कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या व्यक्तीस शिंक आली तर समोरच्या व्यक्तीची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उदा. नाकावर टिश्यू पेपर किंवा रुमाल धरणं, निरोगी व्यक्तींपासून दूर राहणं, नियमित स्वच्छता अशा उपाययोजनांचाही त्यात समावेश आहे.

जवळच्या किंवा कुटुंबातल्या व्यक्तींना या रोगाची लागण झाल्याची अनेक प्रकरणं समोर आल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. कारण कुटुंबातल्या एका व्यक्तीला लागण झाली की दुसरी व्यक्ती त्याची काळजी घेण्यास सुरुवात करतो. मात्र बाह्यजगाशी संपर्क आल्यावर किती प्रमाणात लागण होते याची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही.

बीबीसी

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)