भारताचं PSLV-C62 रॉकेट अंतराळातच भरकटलं; सलग दुसऱ्यांदा अपयश येण्याचं कारण काय?

श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून उड्डाणासाठी सज्ज असलेलं पीएसएलव्ही-62.

फोटो स्रोत, X/ISRO

फोटो कॅप्शन, इस्रोची महत्त्वाकांक्षी मोहीम दुसऱ्यांदा अपयशी ठरली आहे. या मोहिमेत 16 पेलोड आणि इतर उपकरणं नेली जात होती.

पृथ्वीवर लक्ष ठेवणारा म्हणजेच निरीक्षण करणारा उपग्रह, इतर उपकरणं आणि 16 पेलोड घेऊन जाणारे भारतीय रॉकेट प्रक्षेपणानंतर आपल्या नियोजित मार्गावरून भरकटलं आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या विश्वासार्ह मानल्या जाणाऱ्याप्रक्षेपण यानासाठी हा आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे.

पोलर सॅटेलाइट लाँच व्हेइकलला (पीएसएलव्ही) अवघ्या आठ महिन्यांत दुसऱ्यांदा अपयश आलं आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेनुसार, यामुळे त्याच्या विश्वासार्हतेच्या प्रतिमेला धक्का बसला आहे.

आतापर्यंतच्या सुमारे 60 मोहिमांपैकी 90 टक्क्यांहून अधिक मोहिमा यशस्वी ठरल्या आहेत.

पीएसएलव्ही-सी62 ने सोमवारी (12 जानेवारी) सकाळी 10 वाजून 18 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून उड्डाण केलं. या रॉकेटमधून इओएस-ए1 निरीक्षण उपग्रहासह भारत आणि परदेशातील स्टार्टअप्स व शैक्षणिक संस्थांनी विकसित केलेले आणखी 15 पेलोड नेले जात होते.

इस्रोच्या मिशन कंट्रोलनुसार, उड्डाणाच्या बहुतांश वेळेत रॉकेटची कामगिरी सामान्य होती. मात्र नंतर अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि रॉकेट आपल्या मार्गावरून भरकटलं.

इस्रोने एका निवेदनात सांगितलं की, "पीएसएलव्ही-सी62 मोहिमेला पीएस-3 टप्प्याच्या शेवटी तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागला. या घटनेचं सविस्तर विश्लेषण सुरू करण्यात आलं आहे."

मात्र नेमका कोणता बिघाड झाला किंवा रॉकेट शेवटी कुठे पोहोचलं, याबाबत या निवेदनात स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.

इस्रोचे प्रमुख व्ही. नारायणन यांनी सांगितलं की, "पीएसएलव्ही-सी62/इओएस-एन1 मोहिमेदरम्यान रॉकेटच्या उड्डाण मार्गात विचलन दिसून आलं. ज्या मार्गाने मिशन पुढे जाणं अपेक्षित होतं, त्या मार्गावर ते पुढे जाऊ शकलं नाही. सर्व ग्राउंड स्टेशनकडून माहिती मिळाली असून, तिचं विश्लेषण सुरू आहे."

पीएसएलव्ही हा भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा आधार आहे. याच रॉकेटनं चांद्रयान-1 आणि आदित्य-एल1 सौर वेधशाळेसारख्या महत्त्वाच्या मोहिमा यशस्वीपणे प्रक्षेपित केल्या आहेत.

खासगी उद्योगांसाठी अंतराळ निर्मितीचं क्षेत्र खुलं करण्याच्या भारताच्या उपक्रमाचा हा महत्त्वाचा कणा मानला जातो.

भारताच्या अंतराळ कार्यक्रमासाठी हा धक्का किती मोठा?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अंतराळ विज्ञान विषयांचे पत्रकार पल्लव बागला सांगतात की, गेल्या वर्षी पीएसएलव्ही-सी61 मिशन अपयशी ठरल्यावर चौकशी समिती नेमण्यात आली होती आणि त्रुटी दुरुस्त केल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र प्रत्येक रॉकेट आणि प्रत्येक मोहीम वेगळी असते.

बागला म्हणतात की, "पीएसएलव्ही-सी62 चे अपयश इस्रोसाठी मोठा धक्का आहे. यावेळी सात देशांचे उपग्रहही या मोहिमेत होते आणि या अपयशामुळे ते सर्व नष्ट झाले. इस्रोच्या प्रतिमेला यामुळे धक्का बसला असला, तरी इस्रो भविष्यात ही मोहीम अधिक ताकदीने पूर्ण करेल, असा मला विश्वास आहे."

"पीएसएलव्ही हे खूप चांगलं रॉकेट आहे. आतापर्यंत याच्या 64 उड्डाणांपैकी फक्त पाचच अपयशी ठरले आहेत. मागील मोहिमेमधील त्रुटी दूर करून हे रॉकेट लवकरच पुन्हा लाँच केलं जाईल, अशी अपेक्षा आहे."

पीएसएलव्ही-2 मोहिमेत सात देशांचे उपग्रह नेले जात होते. मात्र ही मोहीम अपयशी ठरली. त्यामुळे भारताच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या प्रश्नावर ते म्हणाले की, "इस्रोची प्रतिमा चांगली आहे. मात्र पीएसएलव्ही-62 मोहिमेमध्ये जे अपयश आलं आहे, त्याचं सखोल विश्लेषण करावं लागेल. नेमकं काय बरोबर झालं आणि काय चुकलं, हे लोकांना समजावून सांगावं लागेल. हा नक्कीच एक मोठा धक्का आहे.

"अलीकडे मोहिमेच्या अपयशाचं विश्लेषण करणाऱ्या समित्यांचे अहवाल सार्वजनिक केले जात नाहीत. आधी हे अहवाल जाहीर होत असत, त्यामुळे नेमक्या कोणत्या त्रुटी आल्या आणि त्या दूर करण्यासाठी काय केलं, हे लोकांना समजायचं."

श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून उड्डाणासाठी सज्ज असलेलं पीएसएलव्ही-62.

फोटो स्रोत, X/ISRO

फोटो कॅप्शन, श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून उड्डाणासाठी सज्ज असलेलं पीएसएलव्ही-62.

इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांनी गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या सी-61 मिशनच्या अपयशाचं कारण स्पष्ट केलं होतं. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिलं होतं की, "तिसऱ्या टप्प्यातील सॉलिड मोटरच्या विकासादरम्यान आलेल्या गंभीर अडचणींची मला पूर्ण जाणीव आहे."

"हा असा प्रयत्न होता ज्यात अनेकदा अपयशाला सामोरं जावं लागलं. या टप्प्यावर पुन्हा अशी गडबड होणं असामान्य आहे. तरीही टीम लवकरच आणि प्रभावीपणे यामागचं मूळ कारण शोधून काढेल, असा मला पूर्ण विश्वास आहे."

इस्रोने नंतर सुमारे आठ महिन्यांसाठी सर्व पीएसएलव्ही प्रक्षेपणे थांबवली आणि या काळात कठोर गुणवत्ता नियंत्रणाचे उपाय राबवले गेले.

तिसऱ्या टप्प्याचे डिझाइन मजबूत केल्याचे सांगण्यात आलं. तरी यावेळीही अपयश आलं.

रॉकेट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इस्रोने पीएसएलव्ही रॉकेटच्या मदतीने अनेक मोहिमा यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत.

भारतातील इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसने लिहिलं आहे की, "पीएसएलव्ही-सी62 मोहिमेत 16 उपग्रह होते, त्यापैकी सात उपग्रह इतर देशांचे होते. हे रॉकेट सलग दुसऱ्यांदा अपयशी ठरले आहे, जे गेल्या तीन दशकांहून इस्रोचे मुख्य प्रक्षेपण यान राहिले आहे.

शेवटचं अपयश मागील वर्षी मे महिन्यात आलं होतं. दोन्ही प्रकरणांमध्ये रॉकेटने सुरळीत उड्डाण केलं आणि पहिले दोन टप्पे पूर्ण केले, पण तिसऱ्या टप्प्यात समस्या आली."

इंडियन एक्सप्रेसने लिहिलं की, "मागील वर्षीच्या मिशनच्या अपयशाचं कारण इंजिनच्या कम्बशन चेंबरमधील (ज्वलन कक्षातील) दाब अचानक कमी होणं होतं. इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनीही हेच कारण सांगितलं होतं.

मात्र, फेल्युअर अनॅलिसिस कमिटीचा अहवाल जाहीर करण्यात आला नाही. सोमवारी झालेल्या अपयशाचं कारण अद्याप स्पष्ट नाही, पण तेही अशाच प्रकारचं असू शकतं.

तिसऱ्या टप्प्यात रॉकेटला पृथ्वीभोवती आपली कक्षा तयार करण्यासाठी खूप वेगाने गती वाढवावी लागते. तरीही ही अंतिम कक्षा नसते. जर कम्बशन चेंबरमधील दाब कमी झाला, तर आवश्यक गती मिळवण्यासाठी लागणारी ताकदही कमी होते."

ग्राफिक कार्ड

एक्सप्रेसच्या वृत्तानुसार,"पीएसएलव्ही म्हणजे पोलर सॅटेलाइट लाँच व्हेइकल हे चार टप्प्यांचं रॉकेट आहे. टप्पे म्हणजे रॉकेटचे वेगवेगळे भाग असतात, ज्यांचे स्वतःचे इंजिन आणि इंधन असते.

हे सर्व टप्पे आपापल्या वेळेवर मिशन पुढे नेतात. आपलं काम पूर्ण झाल्यावर ते वेगळे होतात. कधीकधी 'टप्पा' हा शब्द रॉकेटच्या उड्डाणातील वेगळ्या टप्प्यांसाठीही वापरला जातो."

पहिला टप्पा म्हणजे रॉकेट लाँच (प्रक्षेपण) होताना (लिफ्ट-ऑफ) चालतो. हा टप्पा साधारण 50 ते 60 किलोमीटर उंचीपर्यंत जवळजवळ सरळ उड्डाण करतो.

हा टप्पा सर्वात कष्टदायक असतो, कारण रॉकेटला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणासोबत हवेतल्या घर्षणाशीही लढावं लागतं. त्यामुळे या टप्प्यात खूप शक्तिशाली इंजिन आणि जास्त इंधनांची गरज असते.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, पीएसएलव्हीच्या पहिल्या टप्प्यात सॉलिड प्रोपेलेंट इंधन वापरलं जातं. हा टप्पा रॉकेटचा मोठा भाग असतो आणि रॉकेटच्या एकूण वजनाचा बहुतेक भाग यामध्ये असतो.

हा टप्पा फक्त दोन मिनिटांपर्यंत चालतो, पण या काळात खूप इंधन खर्च होतं. जेव्हा इंधन संपतं, तेव्हा हा टप्पा रॉकेटसाठी अतिरिक्त ओझं बनतो.

म्हणून हा टप्पा मुख्य रॉकेटपासून वेगळा होऊन पडतो आणि दुसऱ्या टप्प्याला मिशन पुढे नेत राहण्याची जबाबदारी दिली जाते.

'मागच्या मोहिमेत नेमकं काय झालं होतं?'

इंग्रजी वृत्तपत्र 'द हिंदू'ने मागील वर्षी 18 मे रोजी पीएसएलव्ही-सी61 मिशन अपयशी ठरल्याचं कारण आपल्या वृत्तात सांगितलं होतं, "पीएसएलव्ही रॉकेटचे चार टप्पे असतात. सी61 मिशनमध्ये रॉकेट एक्सएल स्थितीत होते आणि त्यात पहिल्या टप्प्यासोबत सहा बूस्टर जोडलेले होते.

"त्याचा मुख्य पेलोड इओएस-09 होता. हा एक जड रडार-इमेजिंग उपग्रह आहे, जो सर्व प्रकारच्या हवामानात पृथ्वीचा पृष्ठभाग पाहण्यासाठी बनवला गेला होता. याचा उपयोग आपत्ती व्यवस्थापन आणि धोरणात्मक निरीक्षणासाठी होणार होता. रॉकेटने हा उपग्रह सुमारे 529 किलोमीटर उंचीवर सूर्य-समानकालीन ध्रुवीय कक्षेत ठेवायचा होता."

इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इस्रोचे तत्कालीन प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी मे 2025 मध्ये पीएसएलव्ही-सी61 च्या अपयशाचं कारण सांगितलं होतं.

'द हिंदू'नुसार, "प्रक्षेपण सुरळीत सुरू झालं. पहिला आणि दुसरा टप्पा अपेक्षेप्रमाणे काम करत वेगळे झाले आणि त्या टप्प्यांमध्ये रॉकेट योग्य मार्गावर होतं. नंतर तिसऱ्या टप्पात पीएस-3 मध्ये बिघाड दिसला. हा टप्पा सॉलिड इंधनावर चालतो."

"उड्डाणाच्या सुमारे 203 सेकंदांनी, टेलिमेट्री डेटाने तिसऱ्या टप्प्यातील मोटरच्या कम्बशन चेंबरमधील दाब अचानक आणि अनपेक्षितरीत्या कमी नोंदवलं. या दाबामुळे इंजिन आवश्यक ताकद निर्माण करू शकले नाही आणि परिणामी रॉकेट आपल्याला ठरवलेल्या कक्षेत पोहोचू शकला नाही. त्यानंतर इस्रोने मोहीम रद्द केली आणि रॉकेट इओएस-09 उपग्रहासह खाली पडले."

'हिंदू'ने लिहिलं की, यानंतर अपयश विश्लेषण समितीने तपास सुरू केला आणि (कदाचित) समस्या फक्त पीएस-3 सॉलिड मोटर सिस्टिमपुरती मर्यादित असल्याचं आढळून आलं.

असं दिसतं की, "ही समस्या तिसऱ्या टप्प्याच्या नॉझल किंवा केसिंगमध्ये काही रचना किंवा साहित्याशी संबंधित चुकीमुळे झाली, ज्यामुळे दाब कमी झाला. संशयित भाग कोणता होता? फ्लेक्स नॉझल नियंत्रण प्रणाली किंवा इन्सुलेशन लाइनिंगमध्ये शक्य तुटीमुळे दाब असलेल्या गॅसला योग्यरीत्या रोखता आलं नाही, ज्यामुळे इंजिनची ताकद प्रभावीपणे कमी झाली."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)