इस्रोच्या गगनयान मोहिमेत सहभागी होणारी अंतराळवीर ‘व्योममित्रा’ कोण आहे?

अंतराळवीर

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, दिगवल्ली पवन
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

भारताच्या महत्त्वाकांक्षी ‘गगनयान’ मोहिमेतील चार अंतराळवीरांपूर्वी आणखी एक व्यक्ती अंतराळात जाणार आहे. व्योममित्रा असं तिचं नाव आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)ने ‘व्योमित्रा’ नावाच्या एका ह्यूमनॉइड (मानवी रोबोट) महिला अंतराळवीराची निर्मिती केली आहे.

‘इस्रो’ची महत्त्वाकांक्षी मोहिम असलेल्या ‘गगनयान’ अंतर्गत 2025 पर्यंत 4 अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्याचं उद्दिष्ट आहे. या प्रमुख मोहिमेपूर्वी चाचणीच्या पहिल्या टप्प्यात स्पेस कॅप्सूल अंतराळात सोडून ते परत पृथ्वीवर आणलं जाणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात अंतराळात मानवी रोबोट असलेली कॅप्सूल पाठवून परत आणण्याचा इस्रोचा मानस आहे.

वैशिष्ट्य काय आहेत?

व्योममित्राही मानवी रोबोट असून तिच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आणि सेन्सर्सच्या एकत्रिकरणातून तयार झालेली अत्याधुनिक प्रणाली असेल, असं निवृत्त शास्त्रज्ञ आणि सतीश धवन अंतराळ केंद्राचे (एसडीएससी) माजी उपसंचालक बी. व्ही. सुब्बाराव यांनी बीबीसीला सांगितलं.

मॉडेल अंतराळवीर व्योममित्रा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, व्योममित्रा

‘गगनयान’ मोहिमेअंतर्गत चार अंतराळवीर तीन दिवस अंतराळात घालवतील आणि माघारी येतील.

त्यामुळे ह्युमनॉइड रोबोट व्योमित्रालाही तीन दिवसांहून अधिक काळ अंतराळात ठेवण्यात येणार असल्याचं ते म्हणाले.

अंतराळवीर अंतराळात काय करतात?

व्योममित्राच्या बौध्दिक क्षमतेला मर्यादा आहेत. रॉकेटचं कंट्रोल पॅनल वाचणं, ऑपरेट करणं आणि स्वत:च्या आवाजात पृथ्वीवरील शास्त्रज्ञांशी थेट संवाद साधू शकेल अशा प्रकारे व्योमित्राला तयार करण्यात आलंय, असं ‘द हिंदू’ने म्हटलंय.

‘एसडीएससी’चे माजी उपसंचालक बी. व्ही. सुब्बाराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतराळवीर अवकाशातील परिस्थितीला कशाप्रकारे प्रतिसाद देतात, श्वासोच्छ्वास, इतर जैविक घटक, दिवस आणि रात्रीची परिस्थिती आणि अनपेक्षित घटनांमध्ये घ्यावयाची खबरदारी यांसारख्या गोष्टी शास्त्रज्ञ अंतराळवीरांकडून शिकण्याचा प्रयत्न करतील.

रोबोट

शिवाय, क्रायो सिस्टीम, पॉवर सिस्टीम, लाईफ सपोर्ट सिस्टीम इत्यादीला व्योममित्रा कशाप्रकारे प्रतिसाद देतेय याचा देखील अभ्यास केला जाईल. यावरून ‘गगनयान’ मोहिमेवरील अंतराळवीरांच्या प्रतिसादाची कल्पना येईल.

रॉकेटच्या प्रवासादरम्यान शक्तीशाली वायुगतीमुळे बसणारे हादरे आणि कंपनांचा सामना करता यावा या अनुषंगाने व्योमित्राचं डिझाइन तयार करण्यात आलंय.

अंतराळातील प्रयोग यशस्वी झाल्यास...

गगनयान मोहिमेच्या मानवरहित चाचण्या यशस्वीपणे पार पडल्यास इस्रोतर्फे 2025 मध्ये ‘गगनयान’ मोहिमेअंतर्गत 4 अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्यात येईल.

मानवी मोहिमेद्वारे अंतराळवीरांना जमिनीपासून 400 किलोमीटरच्या कक्षेत पोहोचवण्यात येईल. तीन दिवस या कक्षेत प्रयोग केल्यानंतर अंतराळवीरांना जमिनीवर सुखरूप परत आणलं जाईल.

गगनयान मेहिमेसाठी भारत 9023 कोटी रुपये खर्च करणार आहे. चंद्रयानच्या यशानंतर भारताने सूर्याच्या अभ्यासासाठी 'आदित्य एल-1' यान अवकाशात पाठवलं आहे.

गगनयान मोहिमेचं पोस्टर

फोटो स्रोत, Getty Images

आता ‘गगनयान’ मोहिमेसह आणखी एक मैलाचा दगड पार करण्यासाठी ‘इस्रो’ सज्ज आहे.

गगनयान मोहिमेची श्रृंखला त्यापुढेही सुरूच राहणार असून, 2035 पर्यंत भारतीय अवकाश स्थानाची निर्मिती करणं आणि 2040 पर्यंत भारतीय अंतराळवीरांना चंद्रावर उतरवण्याचं ‘इस्त्रो’चं लक्ष्य आहे.

यापूर्वी कोणत्या देशांनी अवकाशात रोबोट पाठवले आहेत?

2011 मध्ये नासाने पहिला ह्युमनॉइड रोबोट अवकाशात पाठवला. त्याचं नाव होतं ‘रोबोनॉट 2’.

त्यानंतर 2013 साली जपानने देखील किरोबो नावाचा एक छोटा ह्युमनॉइड रोबोट अवकाशात पाठवला होता.

अंतराळवीर

फोटो स्रोत, Getty Images

रशियाने 2019 मध्ये फेडोर नामक ह्युमनॉइड रोबोट अवकाशात पाठवला. आता, प्रक्षेपण यशस्वी झाल्यास अंतराळात ह्युमनॉइड रोबोट पाठवणारा भारत हा चौथा देश ठरेल.

हेही नक्की वाचा