पृथ्वीबाहेर खरंच जीवसृष्टी आहे का? एलियन्स पृथ्वीवर येतात का?

परग्रहवासी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, परग्रहवासींचं कल्पनाचित्र

गेले काही दिवस परग्रहवासी म्हणजे एलियन्स चर्चेत आहेत.

एकीकडे 12 सप्टेंबर 2023 रोजी मेक्सिकोच्या संसदेत ममीसदृश सांगाडे सादर करण्यात आले, जे एलियन्स असल्याचा दावा करण्यात आला.

दोनच दिवसांनी 14 सप्टेंबरला अमेरिकी अंतराळसंस्था नासाला एका पत्रकार परिषदेत बीबीसीनं त्याविषयी विचारलं. मेक्सिकन सरकारनं शास्त्रज्ञांना या अवशेषांचा अभ्यास करू द्यावा म्हणजे हे नेमकं काय आहे हे आम्ही सांगू शकू, असं नासाच्या डेव्हिड स्पेर्गल यांनी सांगितलं.

नासानं ही पत्रकारपरिषद घेतली कारण गेले काही महिने अमेरिकेन संसदेत परग्रहवासींविषयी चर्चा सुरू आहे.

त्याचं झालं असं की, जुलै 2023 मध्ये अमेरिकेच्या एका संसदीय समितीच्या सदस्यांना तीन व्हिडियो दाखवण्यात आले होते. अमेरिकेन नौदलाच्या लढावू विमानांवरील कॅमेऱ्यांनी ते व्हिडियो आकाशात टिपले होते.

त्या ब्लॅक अँड व्हाईट आणि अस्पष्ट अशा व्हिडियोंमध्ये एक चमकदार अंडाकृती वस्तू आकाशात वेगानं उडताना दिसत होती.

हे व्हिडियो फुटेज खरंतर काही काळापूर्वी लीक झालं होतं. पण 2020 साली अमेरिकन संरक्षण मंत्रालयानं ते अधिकृतरित्या जाहीर केलं. यावर्षी जुलैत अमेरिकन काँग्रेसच्या म्हणजे तिथल्या संसदेच्या एका समितीच्या सदस्यांनी त्यावर चर्चा सुरू केली.

या संदर्भात नासानं तपासणी केली. नासानं त्यानंतर म्हटलंय की अशा दाव्यांमागे परग्रहवासींच्या अस्तित्वाचा कुठला पुरावा सापडलेला नही, पण तशी शक्यता नाकारताही येत नाही.

मग प्रश्न पडतो, की पृथ्वीशिवाय विश्वात इतर कुठे सजीवसृष्टी आहे का?

अवकाशावर नजर

अनेक शतकांपासून लोकांना आकाशात रहस्यमयी वस्तू दिसत आल्याचे उल्लेख आहेत. अशा उडत्या रहस्यमयी वस्तूंना यूएफओ म्हणजे अनआयडेंटिफाईड फ्लाईंग ऑब्जेक्ट म्हटलं जातं.

उडती तबकडी (कल्पनाचित्र)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, उडती तबकडी (कल्पनाचित्र)
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अमेरिकेच्या पेन स्टेट यूनिवर्सिटीत इतिहास आणि बायोएथिक्सचे प्राध्यापक ग्रेग ऐगिगियन सांगतात की, “यूएफओविषयी पहिल्यांदा चर्चा सुरू झाली 1947 मध्ये. त्यावेळी केनेथ अर्नाल्ड नावाच्या एका खासगी पायलटनं अमेरिकेच्या पाश्चिमात्य किनाऱ्याजवळ उड्डाण करताना काही वस्तू एका खास फॉर्मेशनमध्ये वेगानं उडत असताना पाहिल्या. त्यांना हा काहीतरी अजब प्रकार वाटला.

“ही बातमी लवकरच आगीसारखी पसरली आणि एका पत्रकारानं त्याला फ्लाईंग सॉसर म्हणजे उडती तबकडी असं नाव दिलं. तेव्हापासून हा शब्द प्रचलित झाला आणि लोकांची धारणा झाली की या वस्तू कदाचित दुसऱ्या कुठल्या ग्रहावरून आलेल्या असू शकतात. म्हणजेच त्या ‘एक्सट्राटेरेस्ट्रियल’ गोष्टी आहेत.”

त्यानंतर 1950 च्या दशकात यूएफओ दिसण्याच्या घटनांची जणू लाट आली होती.

अमेरिकेत वॉशिंग्टन, युरोपात इटली आणि स्पेनपाठोपाठ मग लॅटिन अमेरिकेतही यूएफओ दिसल्याच्या बातम्या येऊ लागल्या. फ्रान्समध्ये तर यूएफओमध्ये कोणीतरी बसलेलं दिसल्याचा दावाही करण्यात आला.

काहींचा असाही समज होता की दुसऱ्या ग्रहांवर राहणाऱ्या एलियन्सनी हिरोशिमा आणि नागासाकीवर झालेला अणूहल्ला पाहिला असावा आणि उत्सुकतेपोटी किंवा भीतीपोटी ते पृथ्वीवर आले असावेत.

1951 साली आलेल्या 'द डे द अर्थ स्टूड स्टिल' या चित्रपटातील परग्रहवासी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 1951 साली आलेल्या 'द डे द अर्थ स्टूड स्टिल' या चित्रपटातील परग्रहवासी

सत्तर, ऐंशीच्या दशकात असे दावे वाढले. ग्रेग ऐगिगियन सांगतात की अमेरिका आणि सोव्हित रशिया यांच्यातलं शीतयुद्ध हे यामागचं एक कारण असाव. कारण तेव्हा दोन्ही गटातील देश एकमेकांविषयी गुप्त माहिती गोळा करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरत होते.

दोन्ही गटांत अंतराळातही चढाओढ रंगत होती.

“यूएफओविषयी समजुतींना स्पेसएजदरम्यान आलेल्या विज्ञानकथा आणि फिल्म्सनीही बळ दिलं. चंद्रावर किंवा मंगळावर माणसं राहण्याच्या शक्यतेवीर पहिल्यांदाच चर्चा होत होती कारण तंत्रज्ञान प्रगती करत होतं.

"साहजिकच लोक हा विचार करत होते, की जर आपल्याकडे ही क्षमता येऊ शकते, तर आपल्यापेक्षा विकसित असलेल्या परग्रहवासींकडे यापेक्षाही प्रगत तंत्रज्ञान असेल. “

अमेरिकेत यूएपी सापडल्याचे दावे पुन्हा चर्चेत

मीडियाला यूएफओमध्ये इतका रस का वाटतो याविषयी आम्ही शोधपत्रकार लेस्ली किन यांच्याशी बातचीत केली. लेस्ली गेल्या 23 वर्षांपासून यूएफओविषयी बातम्यांचं वार्तांकन करत आल्या आहेत.

त्या सांगतात की, अमेरिकेचा संरक्षण विभाग 2010 सालापासून यूएफओविषयी माहिती गोळा करण्यासाठी एक गुप्त मोहिम चालवतोय. ते याला यूएफओ नाही तर यूएपी म्हणजे अनआयडेंटिफाईड अनामोलस फिनॉमेना म्हणतात. म्हणजे अशा रहस्यमयी घटना, ज्यांचा अर्थ लावता येत नाही.

“यूएफओविषयी अनेक समज हास्यास्पद होते. दुसरं म्हणजे फक्त आकाशात नाही तर पाण्याखालीही अचाट, रहस्यमयी गोष्टी दिसल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. तेव्हा अशा घटनांचा व्यापक समावेश करता यावा, यासाठी यूएपी म्हणजे अनआयडेंटिफाईड अनामोलस फिनॉमेना ही संज्ञा वापरात आली.”

2017 साली अमेरिकन यूएपी टास्क फोर्सच्या प्रमुखांनी निधी आणि मदत मिळण्यात अडचणी येत असल्यानं वैतागून राजीनामा दिला आणि या प्रकल्पाविषयीची माहिती सार्वजनिक केली.

त्यांनी दिलेल्या माहितीवर आधारीत एक वृत्तांत लेस्ली यंनी न्यूयॉर्क टाईम्समध्ये छापला आणि या विषयावर बरीच चर्चा सुरू झाली. गांभीर्यानं तपासही होऊ लागला.

अमेरिकना संरक्षण मंत्रालयानं जाहीर केलेल्या व्हिडियोतलं दृश्य.
फोटो कॅप्शन, अमेरिकना संरक्षण मंत्रालयानं जाहीर केलेल्या व्हिडियोतलं दृश्य.

जून 2023 मध्ये लेस्ली किन यांनी डेव्हिड ग्रश नावाच्या एका व्हिसल ब्लोअरची मुलाखत घेतली आणि त्याआधारे आणखी एक बातमी छापली.

ग्रश आधी अमेरिकेच्या गुप्तचर विभागात एक वरिष्ठ अधिकारी होते आणि अफगाणिस्तानात अमेरिकेच्या लष्करी मोहिमेतही सहभागी झाले होते. त्यांनी दावा केला की अमेरिका अनेक वर्षांपासून एक गुप्त प्रकल्प राबवत आहे.

या प्रकल्पाअंतर्गत अपघातग्रस्त झालेले यूएपी ताब्यात घेतले जातात आणि त्यावरच्या वस्तू आणि चालकांच्या अवशेषांचा रिव्हर्स इंजिनियरिंग द्वारा अभ्यास केला जातो, असंही ग्रश म्हणाले.

लेस्ली सांगतात, “ग्रश यांनी कुठल्या दिवशी आणि कुठे यूएपी पडले होते आणि कोणत्या लोकांनी त्या वस्तू ताब्यात घेतल्या याची माहिती अमेरिकन संसदेत सादर केली. त्यात यूएपी दिसलेल्या त्या व्हिडियोंचाही समावेश होता. सरकार या घटनांविषयी काही लपवत नाहीये ना, हे जाणून घेणं हा या संसदीय समितीच्या सुनावणीमागचा उद्देश आहे.

“अनेकांनी दावा केला की डेव्हिड ग्रश यांनी यूएपीचे अवशेष स्वतः पाहिलेले नाहीत किंवा त्यांना स्पर्श केलेला नाही. पण ही सगळी माहिती क्लासिफाईड आहे, म्हणजे ती जाहीर करता येणार नाही. अमेरिकन संसदेला याचा तपास करायला हवा.”

अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे की याचा तपासयंत्रणांकडे या दाव्यांची पुष्टी झाल्याची कुठली माहिती नाही. यूएपीचं रिव्हर्स इंजिनियरिंग करण्याचा कुठला प्रकल्प ना आधी होता ना आता आहे.

तरीही या दाव्यांची पडताळणी व्हायला हवी असं लेस्ली सांगतात.

“हा मुद्दा हवाई वाहतुकीची सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत आहे आणि याचा तपास व्हायला हवा. मला म्हणयाचं होतं की यूएफओ खरंच अस्तित्वात आहेत आणि हे एक वेगळंच जग आहे.

"संसदेच्या सदस्यांना गुप्त माहिती देण्यात आली आहे आणि त्यामुळेच ते याकडे गांभीर्यानं पाहात आहेत. पण या विश्वात पृथ्वीवरच नाही तर बाहेरही जीवन आहे आणि आपल्याकडे त्याचे पुरावे आहेत याविषयी माहिती मिळणं हा जगातल्या सर्वसामान्य लोकांचाही अधिकार आहे.”

विज्ञान काय सांगतं?

अ‍ॅडम फ्रँक हे रोचेस्टर विद्यापीठात खगोलशास्त्राचे प्राध्यापक आहेत. ते सांगतात की अजूनपर्यंत यूएफओ किंवा यूएपीवरील चर्चेशी विज्ञानाचा अजूनतरी काही संबंध नाही, कारण विज्ञान कुठल्या समजांवर किंवा कहाण्यांवर नाही, तर ठोस पुराव्यांवर काम करतं.

“परग्रहवासींविषयी बहुतांश गोष्टी ऐकीव माहिती आणि कहाण्यांच्या स्वरूपात आहेत. कोणी पोलिस किंवा मानसोपचारतज्ज्ञही हे सांगेल की केवळ लोकांच्या आठवणी हा एखाद्या गोष्टीचा विश्वासार्ह पुरावा ठरत नाही. यावर संशोधन करण्यासाठी वैज्ञानिकांकडे आवश्यक माहिती नाही.”

K2-18 b

फोटो स्रोत, NASA/ESA/CSA/ Ralf Crawford

फोटो कॅप्शन, K2-18 b या दूरच्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहाचं कल्पनाचित्र. जेम्स वेब दुर्बिणीनं या ग्रहाच्या वातावरणात कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन असल्याचा शोध लावला आहे.

दुसऱ्या ग्रहांवर जीवन किंवा प्रगत तंत्रज्ञानाचा शोध घेण्यासाठी अमेरिकन अंतराळ संस्था नासानं एक हीट सिग्नेचर शोधण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. अ‍ॅडम फ्रँकही या प्रकल्पात एक मुख्य संशोधक म्हणून काम करत आहेत.

ते सांगतात, “सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की परग्रहवासींचा शोध कुठे घ्यायचा. उदाहरणार्थ, तुम्ही नेब्रास्कामध्ये राहणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी हिमालयातल्या कुठल्या गावात नाही तर नेब्रास्कामध्येच तपास कराल. हीच गोष्ट एलियन्सनाही लागू होते.

“अवकाशात चारशे अब्ज तारे आहेत आणि अनेक ग्रह आहेत. पृथ्वी तर हिमालयातल्या एका छोट्या गावासारखी आहे. एलियंसचा शोध अशा ग्रहांवर घ्यायला हवा, जिथे ते राहतात.”

अमेरिकेच्या संसदीय समितीसमोर नौसेनेच्या पायलट्सनी दिलेल्या साक्षीविषयी अ‍ॅडम फ्रँक सांगतात, की यावर पारदर्शकपणे चर्चा आणि तपास होणं जास्त योग्य ठरेल. पण व्हिसलब्लोअरनं केलेल्या यूएपीचे अवशेष मिळाल्याच्या दाव्याविषयी ते साशंक आहेत.

“यूएपी विषयी दाव्यांवर विश्वास ठेवता येणं कठीण आहे की मागच्या सत्तर वर्षांत एलियन्स किंवा यूएपीच्या अवशेषांचा एकही फोटो समोर आलेला नाही. ताऱ्यांमध्ये एवढं लांबवरचं अंतर असतं की ते मोजतानाच डोकं भंजाळून जाईल. मग एखादा जीव किंवा संस्कृतीकडे एवढं प्रगत तंत्रज्ञान असेल आणि ते एवढं अंतर पार करू शकतील असं गृहित धरणं किंवा त्यांच्या यानाला इथे येऊन अपघात झाला असं सांगणं हे थोडं अविश्वसनीय वाटतं.”

सूक्ष्मजीव

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पृथ्वीबाहेरची जीवसृष्टी म्हणजे प्रगत मानवसदृश्य प्राणीच असतील असं नाही, तर ती सूक्ष्मजीवांच्या रुपातही असू शकते.

नासाच्या वैज्ञानिकांनी त्या व्हिडियोचा अभ्यास केला, तेव्हा लक्षात आलं की त्यात काहीतरी उडताना तर दिसतंय, पण त्याचा वेग ताशी चाळीस मैल एवढाच आहे. एखाद्या एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल वस्तूचा वेग असा नसतो. त्यामुळे कुठल्या पुराव्याअभावी वैज्ञानिक या व्हिडियोकडे अटकळ किंवा कयास म्हणूनच पाहतील.

दुसऱ्या ग्रहांवर जीवन किंवा प्रगत तंत्रज्ञानाचा शोध घेण्यासाठी अमेरिकन अंतराळ संस्था नासानं एक हीट सिग्नेचर शोधण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. अ‍ॅडम फ्रँकही या प्रकल्पात एक मुख्य संशोधक म्हणून काम करत आहेत.

ते सांगतात, “सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की परग्रहवासींचा शोध कुठे घ्यायचा. उदाहरणार्थ, तुम्ही नेब्रास्कामध्ये राहणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी हिमालयातल्या कुठल्या गावात नाही तर नेब्रास्कामध्येच तपास कराल. हीच गोष्ट एलियन्सनाही लागू होते.

“अवकाशात चारशे अब्ज तारे आहेत आणि अनेक ग्रह आहेत. पृथ्वी तर हिमालयातल्या एका छोट्या गावासारखी आहे. एलियंसचा शोध अशा ग्रहांवर घ्यायला हवा, जिथे ते राहतात.”

अमेरिकेच्या संसदीय समितीसमोर नौसेनेच्या पायलट्सनी दिलेल्या साक्षीविषयी अ‍ॅडम फ्रँक सांगतात, की यावर पारदर्शकपणे चर्चा आणि तपास होणं जास्त योग्य ठरेल.

पण व्हिसलब्लोअरनं केलेल्या यूएपीचे अवशेष मिळाल्याच्या दाव्याविषयी ते साशंक आहेत.

व्हीडिओ कॅप्शन, 3 बोटं, लांब गळा, मेक्सिकोमध्ये दाखवलेले ते सांगाडे एलियन्सचे?

“यूएपी विषयी दाव्यांवर विश्वास ठेवता येणं कठीण आहे की मागच्या सत्तर वर्षांत एलियन्स किंवा यूएपीच्या अवशेषांचा एकही फोटो समोर आलेला नाही. ताऱ्यांमध्ये एवढं लांबवरचं अंतर असतं की ते मोजतानाच डोकं भंजाळून जाईल.

"मग एखादा जीव किंवा संस्कृतीकडे एवढं प्रगत तंत्रज्ञान असेल आणि ते एवढं अंतर पार करू शकतील असं गृहित धरणं किंवा त्यांच्या यानाला इथे येऊन अपघात झाला असं सांगणं हे थोडं अविश्वसनीय वाटतं.”

नासाच्या वैज्ञानिकांनी त्या व्हिडियोचा अभ्यास केला, तेव्हा लक्षात आलं की त्यात काहीतरी उडताना तर दिसतंय, पण त्याचा वेग ताशी चाळीस मैल एवढाच आहे. एखाद्या एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल वस्तूचा वेग असा नसतो. त्यामुळे कुठल्या पुराव्याअभावी वैज्ञानिक या व्हिडियोकडे अटकळ किंवा कयास म्हणूनच पाहतील.

अ‍ॅडम फ्रँक सांगतात की अ‍ॅस्ट्रोबायोलॉजीमध्ये होणारी प्रगती पाहता, या पिढीतच पृथ्वीबाहेर जीवन आहे की नाही, याचा शोध लागू शकतो.

“आपल्याकडे जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप सारख्या शक्तिशाली दुर्बिणी अनेक प्रकाशवर्ष दूर असलेल्या इतर ग्रहांवरच्या एलियन्सच्या जगात डोकावू शकतात. तिथे कुठे ऑक्सिजन असेल, तर ही दुर्बिण त्याचा शोध लावू शकते. आपल्याला अशा ग्रहाची बायो सिग्नेचर मिळेल ज्यामुळे तिथे कशी जैवविविधता आहे याची माहिती मिळू शकेल.”

चंद्रयान 3 चा विक्रम लँडर 17 ऑगस्टला प्रपल्शन मोड्यूलपासून वेगळा झाला. हे मोड्यूल आता पृथ्वीचा अभ्यास करत आहे.

फोटो स्रोत, ISRO

फोटो कॅप्शन, चंद्रयान 3 चा विक्रम लँडर 17 ऑगस्टला प्रपल्शन मोड्यूलपासून वेगळा झाला. हे मोड्यूल आता पृथ्वीचा अभ्यास करत आहे.

भारताची अंतराळसंस्था इस्रो अशाच बायोसिग्नेचरच्या शोधासाठी महत्त्वाचं काम करते आहे. इस्रोच्या चंद्रयान-३ च्या प्रपल्शन मोड्यूलवररचं SHAPE हे उपकरण सध्या आपल्या पृथ्वीकडून परावर्तित होणाऱ्या प्रकाशाच्या नोंदी ठेवतंय.

त्या नोंदीची तुलना सूर्याशिवाय इतर ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या ग्रहांशी केली जाईल आणि पृथ्वीसारख्या ग्रहांचा शोध घेता येऊ शकतो, जिथे सजीवसृष्टी असण्याची शक्यताही जास्त असेल.

पण पृथ्वीबाहेर जीवन असलं, तर काय होईल?

परग्रहवासींचा प्रभाव

सेटी म्हणजे सर्च फॉर एक्स्ट्राटेरेस्ट्रियल इंटेलिजन्स ही युकेमधली संस्था आहे. परग्रहवासींचा शोध लागला तर त्यांच्या तंत्रज्ञानाचा सामना करण्यासाठी मानवाला कसं तयार करायचं यावर या सेटी संस्थेचं पोस्ट डिटेक्शन हब काम करतं आणि या हबच्या चेल्सी हेरेमिया सदस्य आहेत.

त्या सांगतात, एलियन्सचा शोध लागला तर काय करायचं याची काही कुठली लिस्ट वगैरे आपल्याकडे नाही.

“त्या त्या वेळेवर बरंच काही अवलंबून राहील. अशा परिस्थितीत आपल्याला न्याय आणि शोषण अशा मुद्द्यांचा विचार करावा लागेल. सत्तेत असलेले लोक अनेकदा अशा परिस्थितीत शोषण करण्याचा प्रयत्न करतात, समोरच्याला चांगलं वागवत नाहीत हे आपल्याला माहिती आहे. पृथ्वीवरही आपण दुसरीकडून आलेल्या परप्रांतियांना एलियन्स म्हणतो, त्यांच्याशी माणूसकीनं वागत नाही.”

रोझवेल यूएफओ फेस्टिवल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिकेच्या न्यू मेक्सिकोमधील रोझवेल शहरात दरवर्षी यूएफओ फेस्टिवलचं आयोजन होतं.

दुसरीकडे मुळात एलियंसचा शोध लागला तरी त्यांच्याशी संपर्क कसा करायचा, हाही प्रश्नच आहे. चेल्सी यांना वाटतं की काही सरकारं नैतिकदृष्ट्या योग्य निर्णय घेतील आणि काहीजण असं करणार नाहीत.

“काहींसाठी ही सत्ता आणि ताकद मिळवण्याची संधी असेल. काही सत्ताधारी परग्रहवासींसोबत संपर्काचा एकाधिकार मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात. काहीजण त्यांच्याविषयीची माहिती इतरांसोबत शेअर करणार नाहीत. हा विज्ञानाच्या वापरातील नैतिकतेचा मुद्दा आहे.”

यासाठी अनेक देशांनी, तिथल्या सरकारांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज पडेल. त्यात अडचणी येऊ शकतात कारण त्यासाठी अनेक देशांना आपलं तंत्रज्ञान एकमेकांसोबत शेअर करावं लागू शकतं. ही सगळी किचकट माहिती सामान्य लोकांपर्यंत सहजपणे पोहोचवणंही कठीण जाईल.

आपल्या मूळ प्रश्नाकडे वळूयात. विश्वात पृथ्वीशिवाय कुठे जीवन आहे की नाही? याचं उत्तर तुम्ही प्रश्न कुणाला विचारताय, यावर अवलंबून आहे.

गुप्तहेर संस्थांचे आजी-माजी अधिकारी, व्हिसलब्लोवर आणि अनेक लोक आहेत ज्यांना वाटतं की त्यांनी यूएपी पाहिलं आहे.. ते हेच सांगतील की ‘हो, पृथ्वीबाहेर जीवसृष्टी अस्तित्वात आहे’.

पण जोवर सबळ पुरावे मिळत नाहीत आणि त्यांची खोलवर तपासणी होत नाही, तोवर वैज्ञानिक या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाहीत.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)