मिशन मंगळ : मंगळयान मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या महिलेची गोष्ट

- Author, गीता पांडे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
घर चालवणं ही एक पूर्णवेळ जबाबदारी आहे. एखाद्या नोकरीपेक्षाही ती फार मोठी असते. पण हे सर्वं करत असताना जेव्हा एखादी महिला नोकरीसुद्धा करते तेव्ह तिनं एक उंची सुरुवातीलाच गाठलेली असते. पण हीच उंची तेव्हा 'मंगळझेप' ठरते जेव्हा ती माऊली इस्रोसारख्या संस्थेत मंगळयानाची गणितं निश्चित करते.

जग त्यांना 'रॉकेट वुमन' वा 'मंगळावरून आलेली स्त्री' म्हणून ओळखतं. चार वर्षांपूर्वी भारताच्या अवकाश संशोधन केंद्राच्या मंगळ यानानं यशस्वी प्रक्षेपण केल्याचं घवघवीत यश साजरं करणाऱ्या साडी परिधान केलेल्या महिलांचा सूचक फोटो प्रसिद्ध झाला.
यातून देशाच्या अवकाश कार्यक्रमात महिलांचा असलेला महत्त्वपूर्ण सहभाग अधोरेखित झाला होता, बी. पी. दाक्षयणी त्यांच्यापैकीच एक होत्या. त्यांनी एका अशा चमूचं नेतृत्व केलं ज्या गटानं उपग्रहाच्या उड्डाणाबाबत महत्त्वपूर्ण जबाबदारी पेलली, उपग्रहानं नेमक्या कोणत्या दिशेनं उड्डाण करायचं, ते सुनिश्चित करत, मूळ मार्गापासून तो भरकटू नये याची खात्री देण्याचं जोखीमेचं काम त्यांच्याकडे होतं.
त्यांच्या एका सहकारी मैत्रिणीनं या कामाचं अगदी चपखल वर्णन केलं- त्या म्हणाल्या, हे म्हणजे असं आहे की भारतातून गोल्फ बॉल मारायचा आणि लॉस एंजेलिसमधल्या एका होलमध्ये तो अचूक गेला पाहिजे, अशी अपेक्षा करायची. ते होलसुद्धा असं की जे अखंडपणे फिरतं आहे.
हे नक्कीच अवघड काम होतं, त्यात एका भारतीय पत्नीनं ते पार पाडावयाचं म्हणजे तिच्यासाठी ती तारेवरची कसरतच. पण प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर, खूप वर्षांपूर्वीच एका 'पारंपारिक, जुन्या विचारांच्या आणि कर्मठ' घरातल्या मुलीनं विज्ञान शाखेत करियर करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हाच ही दिशा सुस्पष्ट झाली होती.

फोटो स्रोत, Getty Images
कर्नाटकमधल्या भद्रावती शहरात 1960च्या दशकात त्यांचं बालपण गेलं, सुरूवातीला वडिलांनीच त्यांच्या आवडीला प्रोत्साहन दिलं आणि पुढे त्याची चांगली भरभराट झाली. त्याकाळी त्यांच्या शहरात, फक्त एकच स्त्री अभियांत्रिकी शाखेतून शिक्षण घेतलेली होती, त्याचं एवढं अप्रुप होतं की ती जेव्हा जेव्हा यांच्या घराच्या आजूबाजूनं जात असे, तिला पाहण्यासाठी दाक्षयणी धावत जात असत.
त्यावेळी मुलींना शिक्षण देण्याला तितकेसं प्राधान्य नव्हतं आणि शिकल्या तरी विद्यापीठात वगैरे जाणं हा खूपच दुर्मिळ मामला असे. पण मुलीनं शिक्षण घेण्याची त्यांच्या वडिलांची खूप इच्छा होती. गणितात उत्तम गती असणारे त्यांचे वडील लेखापाल होते. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच दाक्षयणी यांनी अभियांत्रिकी शाखेचं शिक्षण घेण्याची इच्छा दर्शवली.
मात्र त्यानंतर मतभेदाची ठिणगी पडली. दाक्षयणी यांना पदव्यूत्तर पदवीचं शिक्षण घ्यायचं होतं. तर त्यांच्या वडिलांना बीएस.सी पर्यंतचं शिक्षण पुरेसं वाटलं.
अखेरीस दाक्षयणीला तिचा मार्ग सापडला, आणि पुन्हा एकदा उत्तम श्रेणीसह तिचं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालं.

यानंतर त्यांनी कॉलेजात गणित शिकवण्याची नोकरी स्वीकारली, मात्र अवकाश आणि उपग्रह यांबाबत त्यांना असलेला रस अधिकाधिक वृद्धिंगत होत गेला.
एके दिवशी त्यांनी इस्रोमधल्या (भारतीय अवकाश संशोधन संस्था) भरतीची जाहिरात वाचली. त्यांनी ताबडतोब अर्ज केला- विशेष म्हणजे त्यांची तात्काळ निवडही झाली.
ते वर्ष होतं 1984. आणि दाक्षयणी यांना ऑरबिटल डायनामिक्स अर्थात उपग्रहांच्या कक्षांशी संबंधित चलनशास्त्र आणि त्याच्याशी निगडीत काम सोपवण्यात आलं. आज या क्षेत्रातल्या त्या वाकबगार झाल्या आहेत, पण त्यावेळी मात्र पायाभूत गोष्टी समजून घेण्यासाठी त्यांना खूप कष्ट घ्यावे लागले.
त्यांना संगणकावरील प्रोग्रामिंग करण्याची जबाबदारीही देण्यात आली, मात्र तिथं थोडी अडचण आली- तोपर्यंत त्यांनी कधीही संगणक पाहिलासुद्धा नव्हता, वापरणं तर दूरच.
त्याकाळात संगणक खरंच इतकी सहज उपलब्ध होणारी बाब नव्हती. खूपच कमी लोकांकडे संगणक असे आणि स्मार्टफोन वा टॅबलेट यांचा तर परिचयही नव्हता. पण त्यांच्याकडे पुस्तकं होती. मग त्यांनी पदर खोचून सुरूवात केली. दरदिवशी त्या कामावरून घरी गेल्यावर, संगणक प्रोग्रामिंगवरील पुस्तकांचा अभ्यास करत आणि याविषयात अधिक गती यावी यासाठी प्रयत्न करीत.
लवकरच, आणखी एका प्रकारचा गृहपाठ करण्याची वेळ त्यांच्यावर येऊन ठेपली.
इस्रोमध्ये काम सुरू केल्याच्या साधारण वर्षभरातच, त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचं लग्न जमवलं, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. मंजुनाथ बसवलिंगप्पा यांच्याशी. थोडक्यात लवकरच त्यांच्यावर गृहकृत्यदक्ष होण्याचीची वेळ येऊन ठेपणार होती.

ऑफिसात, उपग्रहांना मार्गदर्शनपर ठरतील अशा फारच क्लिष्ट आणि मोठाल्या आकडेमोडीसह संगणकीय प्रोग्रामिंग त्यांना करावं लागे, तर घरी एका मोठ्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडावी लागे. त्यांच्या कुटुंबात सासू-सासरे, यजमानांची पाच भावंडं आणि काहीच वर्षांत त्यांना झालेली दोन मुलं असे सगळे होते.
"मला पहाटे पाचलाच उठावं लागे कारण सात-आठ माणसांचा स्वयंपाक उरकावा लागे आणि ते सोपे नव्हते." जुने दिवस आठवून त्या पुढे सांगतात, "त्यात आमच्या कुटुंबाच्या खाण्याच्या सवयी अशा की सगळ्यांना जेवणात पोळ्या हव्याच, ज्या बनवण्यासाठी वेळ लागे. थोडक्यात सगळ्यांचे खाण्याचे सगळे तंत्र सांभाळून, ते पूर्ण करून मी ऑफिस गाठत असे."
ऑफिसातही कामाचा व्याप असे. फक्त एकदाच घरी फोन करण्याची सवड मिळत असे, किंबहुना काढावी लागत असे. दुपारी घरी फोन करून मुलं कशी आहेत याची चौकशी त्या करत. संध्याकाळी घरी परत आल्यावर पुन्हा स्वयंपाकाची भट्टी सुरू, कारण रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू करावी लागे.
"हे खूप कठीण होतं", त्या प्रांजळपणे याची कबुली देतात. धावपळ होत असे. घड्याळ्याच्या काट्यावर सारं जमवण्यात त्यांची दमछाक होत असे. त्यांच्या काही नातेवाईकांनी तर आता दाक्षयणी नक्कीच नोकरी सोडतील असा अंदाजही बांधला होता. पण त्या म्हणतात, "अशी सहजा-सहजी हार मानणारी कच्ची खेळाडू मी नव्हते."

"आणि माझे वडिलही नेहमी सांगायचे, की आपण शेवटपर्यंत प्रयत्न केला पाहिजे. अगदी तांत्रिकबाबींविषयी जरी बोलायचं म्हटलं तरी समजा एखादी बाब मला कळाली नाही, तर ती अनेकदा वाचायची, तिचं पारायण करायचे ते थेट ती पूर्ण समजेपर्यंत, असाच माझा खाक्या होता."
काहीवेळेला त्यांना झोपायला जाईपर्यंत रात्रीचे 1-2 वाजत. पण तरी सकाळी पुन्हा 4 वाजता उठावं लागे, कारण कामाची घडी विस्कटून चालणार नव्हतं.
मात्र दाक्षयणी याची तक्रार करत नाहीत. त्यांना कुठलीही सल नाही, की खंत नाही. उलट घराचं तंत्र सांभाळताना कामाचा डोलारा कसा पेलला, हा तोल कसा सांभाळला हे सांगताना त्यांच्या आवाजात वेगळाच उत्साह जाणवतो. इस्त्रोतलं काम त्यांना खूप आनंद देत असे, या आघाडीवर येणाऱ्या समस्या सोडवण्यात त्यांना एक वेगळीच मजा येत असे.

फोटो स्रोत, Getty Images
स्वयंपाकाची आवडही त्यांना याकामी पूरकच ठरली असावी.
"मी स्वयंपाकात नेहमी काही लहान-सहान बदल करत असे आणि त्यातून नवा पदार्थ वा नवी चव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असे. स्वयंपाक करणे कोडींग करण्यासारखेच आहे, असे मी म्हणेन-कोड लिहितांना केलेल्या एक छोटाशा बदलामुळेही शेवटी हाती येणाऱ्या निकालात एक वेगळाच आकडा समोर येऊ शकतो, त्याचप्रमाणे स्वयंपाकाच्या साहित्यातील एकाद्या घटकाचं प्रमाण कमी-जास्त केल्यामुळे पदार्थाला वेगळीच चव येऊ शकते," त्या सांगतात.
एकेदिवशी संध्याकाळी, दाक्षयणी यांनी बंगळुरूजवळच्या त्यांच्या घरी भेटण्यासाठी येण्याचं आमंत्रण दिलं. त्यांच्या यजमानांशी ओळख झाली, आगत-स्वागत झालं. मग त्यांनी चहा -नाश्ता आणला. चहासोबत गप्पा रंगल्या, त्या दोघांनी भरभरून एकत्र घालवलेल्या गेल्या दहा वर्षांतल्या आठवणी सांगितल्या, कठीण प्रसंगात एकमेकांना कसं सांभाळून घेतलं, आधार दिला हे सांगितलं. काळाबरोबर त्यांना एकमेकांबद्दल वाटणारा आदर वाढत गेला आणि नातं बहरत गेलं, हे त्यांना पाहून जाणवत होतंच.
मात्र सुरूवातीच्या काळात, त्यांच्या यजमानांना त्यांच्या कामाचं नेमकं स्वरुप कळत नव्हतं, असं दाक्षयणी सांगतात. "काही वेळेला गरज असेल तेव्हा मला शनिवारीही ऑफिसला जावं लागे. आणि ह्यांना वाटे मी माझं काम नीट करत नाही म्हणून जास्तीचा वेळ ऑफिसला द्यावा लागत आहे."

मात्र यथावकाश त्यांना हे कळलं की उपग्रहांच्या गणितांवर त्यांच्या बायकोच्या कामकाजाचं वेळापत्रक ठरतं! आणि "आपल्याला हवं तसं हे नेहमी साधता येईल असं नाही."
आज मात्र डॉ. बसवलिंगप्पा यांना आपल्या बायकोचा अत्यंत अभिमान वाटतो. दाक्षयणी यांनी कठोर मेहनतीच्या जोरावर पार केलेलं यश त्यांना सुखावतं- उदा- मंगळ मिशन. यासह स्पेस रिकव्हरी प्रोजेक्टमध्येही त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. यानाच्या यशस्वी उड्डाणानंतर मागे उरणारा भाग पुन्हा एकदा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना पेट घेऊ नये तसंच त्याचं समुद्रात सुरक्षितपणे आगमन व्हावं यासंबंधीची आकडेमोड दाक्षयणी यांनी पार पाडली होती.
एकमेकांना 10 पैकी किती मार्क्स द्याल? या प्रश्नावर डॉ. बसवलिंगप्पा यांनी दिलखुलासपणे दाक्षयणी यांना 10 पैकी 10 मार्क देऊन टाकले. तर दाक्षयणी हसून यजमानांचा अर्धा मार्क कापून त्यांना साडेनऊच गुण दिल्याचं जाहीर करतात.
"कारण तुम्ही कधीही मला घरातल्या कामात मदत करण्याचा मुहूर्त शोधला नाहीत," असं लटक्या स्वरात सांगून मोकळ्याही होतात.
एका पारंपारिक भारतीय कुटुंबात, स्त्रियांनीच घराची बरीचशी जबाबदारी पेलण्याचं आव्हान स्वीकारायचं असतं. आणि बहुतांशी घरात स्त्रिया हे निमुटपणे करतातही. दाक्षयणीही याला अपवाद नाहीत.
डॉ. बसवलिंगप्पा आपल्यापरीनं याचं स्पष्टीकरण देऊ पाहतात. डॉक्टर म्हणून त्यांना अनेकदा दिवसाच्या 18 तासांपर्यंत रुग्णांना सेवा द्यावी लागे. तर दाक्षयणी कार्यालयीन वेळेत काम करत असत. दाक्षयणी यांचं या उत्तरानं समाधान झालेलं दिसतं.
आताशा घरच्या आघाडीवर तितकी धावपळ नसते, त्या सांगतात. त्यांचा मुलगा आणि मुलगी दोघे अभियंते असून, ते आता अमेरिकेत असतात.
मी दाक्षयणी यांना त्यांच्या निवृत्तीनंतरच्या काही योजनांविषयीची चौकशी केली, पण संपूर्ण निवृत्ती त्यांच्या अजेंड्यावरच नसल्याचं मला जाणवलं.
त्यांना मंगळ ग्रहावरचा अभ्यास सुरू ठेवायचा आहे. त्यांनी मंगळ आणि पृथ्वी यांच्यातले समान दुवे आणि टोकाचे विरोधाभास यांची यादी करत त्यांचा अभ्यास सुरू केला आहे.
लालसर मंगळ ग्रहानं त्यांना प्रेरणा दिली, तर अनेक तरुण मुलींसाठी त्या आज आदर्श ठरल्या आहेत. त्यांना मात्र असंच काम सुरू ठेवायचं आहे, मंगळाविषयीचं संशोधन पुढे न्यायचं आहे, त्यामुळेच
दाक्षयणी यांना 'मंगळावरुन आलेली स्त्री' म्हणणं अधिक समर्पक ठरेल, नाही का!
हेही वाचलं का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








