Nobel Prize : अल्फ्रेड नोबेल कोण होते? कोणत्या क्षेत्रांत नोबेल पुरस्कार दिले जातात?

अलफ्रेड नोबेल

फोटो स्रोत, Getty Images / Bettmann

फोटो कॅप्शन, अलफ्रेड नोबेल
    • Author, अमृता दुर्वे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य, शांतता क्षेत्रातल्या कामगिरीसाठी दरवर्षी नोबेल पुरस्कार दिले जातात. नोबेल पुरस्कार समिती दरवर्षी अर्थशास्त्रातल्या कामगिरीसाठीही पुरस्कार जाहीर करते.

नोबेल मानपत्र, पदक आणि पुरस्कार निधी असं या मानाचं स्वरूप असतं.

ल्फ्रेड नोबेल कोण होते?

21 ऑक्टोबर 1833ला अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म स्वीडनमधल्या स्टॉकहोममध्ये झाला. त्यांचे वडील इमॅन्युएल नोबेल हे पेशाने इंजिनियर आणि संशोधक होते. त्यांनी स्टॉकहोममध्ये अनेक ब्रिज आणि इमारती बांधल्या होत्या.

अल्फ्रेड हे रशियामध्ये लहानाचे मोठे झाले. फ्रान्स आणि अमेरिकेमध्ये त्यांनी रसायनशास्त्र आणि तंत्रज्ञानाचं शिक्षण घेतलं.

व्हीडिओ कॅप्शन, नोबेल पुरस्कारांबद्दल या गोष्टी माहीत आहेत का?

अल्फ्रेड नोबेल यांचा विविध भाषांमध्ये हातखंडा होता. वयाच्या 17व्या वर्षी त्यांना स्विडीश, रशियन, फ्रेंच, इंग्लिश आणि जर्मन या भाषा येत होत्या.

ते कविता रचत आणि नाटकंही लिहीत. साहित्य, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रात त्यांना रस होता.

सामाजिक आणि शांततेशी संबंधित घडामोडींमध्ये नोबेल यांना रस होता. आणि त्यांची मत त्या काळासाठी प्रागतिक होती.

डायनामाईटचा शोध अल्फ्रेड नोबेल यांनी लावला होता.

नोबेल यांनी शोध लावलेलं डायनामाईट

फोटो स्रोत, Getty Images / Heritage Images

फोटो कॅप्शन, अल्फ्रेड नोबेल यांची कंपनी विकत असलेलं डायनामाईट

नोबेल यांनी आपल्या मृत्यूपत्राद्वारे तब्बल 26.5 कोटी डॉलर्सची संपत्ती जागतिक पातळीवरचे पुरस्कार स्थापन करण्यासाठी दान केली.

त्यांनी त्यांची बहुतांश संपत्ती या पुरस्कारांसाठी दिल्याने त्यांच्या कुटुंबीयांचा तेव्हा नोबेल पुरस्कारांना विरोध होता.

त्यांच्या मृत्यूच्या तब्बल 5 वर्षांनी 1901मध्ये पहिल्यांदा नोबेल पुरस्कार देण्यात आले. रेड क्रॉसच्या हेन्री डनंट यांना पहिलं नोबेल मिळालं.

कोणत्या क्षेत्रांत नोबेल पुरस्कार दिले जातात?

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रातल्या कामगिरीसाठी नोबेल पुरस्कार देण्यात येतात. या सगळ्या क्षेत्रांमध्ये अल्फ्रेड नोबेल यांना प्रचंड रस होता.

आधीच्या 12 महिन्यांमध्ये ज्यांनी मानवजातीसाठी अतिशय महत्त्वाचं काम केलेलं आहे, अशांचा सन्मान या पुरस्काराने करण्यात येतो.

नोबेल यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात लिहीलं आहे, "prizes to those who, during the preceding year, have conferred the greatest benefit to humankind" म्हणजेच आधीच्या वर्षभरात मानवजातीसाठी महत्त्वाचं ठरणारं काम करणाऱ्यांना हे पुरस्कार देण्यात यावेत.

या पुरस्कारांमध्ये स्वीडनच्या सेंट्रल बँकेने 1968 मध्ये अर्थशास्त्राच्या पुरस्काराची भर टाकली. पण याला नोबेल पुरस्कार म्हटलं जात नाही. अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो.

नोबेल विजेत्यांची निवड कशी केली जाते?

दर वर्षी प्रत्यक्ष क्षेत्रासाठीच्या विजेत्यांची निवड विविध संस्थांद्वारे केली जाते. 6 पैकी 5 पुरस्कार विजेत्यांची निवड स्वीडनमध्ये केली जाते तर नोबेल शांतता पुरस्कार विजेत्याची निवड नॉर्वेमध्ये केली जाते.

शिक्षणतज्ज्ञ, विद्यापीठांचे प्राध्यापक, वैज्ञानिक, पूर्वीचे विजेत आणि इतर मिळून नामांकनं (nominations) दाखल करतात. त्यानंतर त्यातून काही नावं शॉर्टलिस्ट केली जातात.

पुरस्कारासाठी विचार करण्यात येत असलेल्या व्यक्तींची यादी नोबेल फाऊंडेशनच्या नियमांनुसार पुढची 50 वर्षं प्रसिद्ध केली जाऊ शकत नाही.

पुरस्कार विजेत्यांना Laureates म्हटलं जातं. प्राचीन ग्रीसमध्ये विजेत्यांना Bay Laurel च्या पानांनी गुंफलेली डोक्यावर अडकवायची wreath किंवा शिरपेच दिला जाई. त्यावरुन हा लॉरिएट्स (Laureates) शब्द आलेला आहे.

मारी क्युरी

फोटो स्रोत, Getty Images /Bettmann

फोटो कॅप्शन, मेरी क्युरी यांना भौतिक आणि रसायनशास्त्रातलं नोबेल मिळालं होतं. त्यांचे पती पियर क्युरी आणि मुलगी आयरिन यांनाही नोबेल पुरस्कार मिळालेला आहे.

नोबेल फाऊंडेशनच्या नियमांनुसार प्रत्येक क्षेत्रात जास्तीत जास्त 3 विजेत्यांची निवड एकाच वर्षी केली जाऊ शकते.

अशीही काही वर्षं होती ज्यावेळी हे पुरस्कार देण्यात आले नाही. पहिल्या आणि दुसऱ्या जागतिक महायुद्धादरम्यान हे पुरस्कार देण्यात आले नव्हते.

यासोबतच नोबेल फाऊंडेशनच्या नियमांनुसार जर एखाद्या वर्षी, एखाद्या क्षेत्रात कोणीच जर पुरस्कारासाठी पात्र नसेल तर पुरस्कार दिला जात नाही. त्या बक्षीसाचा निधी पुढच्या वर्षीसाठी राखून ठेवला जातो.

नोबेल पुरस्कारांचे प्रसिद्ध विजेते

इथिओपियाचे पंतप्रधान अॅबी अहमद यांना 2019साठीचा शांतता पुरस्कार देण्यात आला होता. त्यांनी पुढाकार घेत इथिओपियाचा एरिट्रियासोबतचा 20 वर्षांपासूनचा लष्करी तिढा सोडवला होता.

अण्वस्त्र विरोधी गट असणाऱ्या 'इंटरनॅशनल कॅम्पेन टू अबॉलिश न्युक्लियर वेपन्स' अर्थात 'आयकॅन' (ICAN ) चळवळीला 2017चा नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला होता.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना 2009 मध्ये शांततेसाठीचं नोबेल देण्यात आलं. "आंतरराष्ट्रीय संबंध सुधारण्यासाठी आणि लोकांमधील सहकार्य भावना वाढवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल" त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

आपल्यासाठी हा एक सुखद धक्का असून याबद्दल आपण कृतज्ञ असल्याचं ओबामांनी म्हटलं होतं. पण त्यांना पुरस्कार देण्यात आल्याबद्दल टीकाही झाली होती. कारण हा पुरस्कार जाहीर होण्याआधी केवळ 12 दिवसांपूर्वी त्यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली होती.

यासोबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर (2002), मुलींच्या शिक्षणासाठी चळवळ उभारणारी कार्यकर्ती मलाला युसुफजाई (संयुक्तपणे 2014मध्ये), युरोपियन युनियन (2012), युनायटेड नेशन्स आणि त्यांचे सरचिटणीस कोफी अन्नान (2001मध्ये संयुक्तपणे) आणि मदर टेरेसा (1979) यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.

तर अल्बर्ट आईनस्टाईन (1921 भौतिकशास्त्र), मेरी क्युरी (1903 भौतिकशास्त्र आणि 1911 रसायनशास्त्र), हॅरल्ड पिंटर (साहित्य 2005) यांनाही नोबेल पुरस्कार मिळाला होता.

रविंद्रनाथ टागोर यांना 1913 साली साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. हा पुरस्कार मिळणारे ते पहिले युरोपियन नसलेले साहित्यिक ठरले होते.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

लेखक आणि विचारवंत जॉन - पॉल सार्त्र यांनी 1964मध्ये हा पुरस्कार नाकारला होता.

तर व्हिएतनामचे राजकारणी ल ड्युक थो यांनी 1973मध्ये पुरस्कार नाकारला.

तर इतर चार जणांवर त्यांच्या देशांनी हा पुरस्कार नाकारण्याची जबरदस्ती केली. 2016मध्ये साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार गायक बॉब डिलन यांना देण्यात आला होता.

कोणत्या भारतीयांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे?

रविंद्रनाथ टागोर हे नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय होते.

भारतीय नोबेल विजेते

  • रविंद्रनाथ टागोर - 1913 साहित्य
  • सर चंद्रशेखर वेंकट ऊर्फ सी. व्ही. रमण - 1930 भौतिकशास्त्र
  • हरगोविंद खुराणा - 1968 वैद्यकशास्त्र
  • मदर टेरेसा - 1979 शांतता पुरस्कार (वाचा मदर तेरेसा यांना नोबेल पुरस्कार मिळण्यामागचं कारण तुम्हाला माहीत आहे का?)
  • सुब्रमण्यम चंद्रशेखर - 1983 भौतिकशास्त्र
  • अमर्त्य सेन - 1998 अर्थशास्त्रासाठीचा नोबेल समितीने सुरू केलेला पुरस्कार
  • सर व्ही. एस. नायपॉल - 2001 साहित्य
  • वेंकटरमणन रामकृष्णन - 2009 रसायनशास्त्र
  • कैलाश सत्यार्थी - 2014 - शांतता पुरस्कार (मलाला युसुफजाई यांच्यासह)
  • अभिजीत बॅनर्जी - 2019 - अर्थशास्त्रासाठीचा नोबेल समितीने सुरू केलेला पुरस्कार (एस्थर डुफ्लो यांच्यासह)

महात्मा गांधींना नोबेल का मिळालं नाही?

शांततेच्या नोबेलचा विषय निघाला की अनेकदा भारतीयांना हा प्रश्न पडतो. की महात्मा गांधींना नोबेल का मिळालं नाही? गांधींना या पुरस्कारासाठी 1937, 1938, 1939, 1947 आणि 1948 साली नामांकन मिळालं होतं, असं काही वर्षांपूर्वी समोर आलेल्या कागदपत्रांतून स्पष्ट झालं.

आधी गांधींचा अहिंसेचा मार्ग कितपत यशस्वी होईल याविषयी शंका होती आणि त्यांचं काम भारतापुरतं तसंच दक्षिण आफ्रिकेतल्या भारतियांपुरतंभारतीयांपुरतं मर्यादित होतं, कृष्णवर्णीयांसाठी त्यांनी काही केलं नाही, असं या समितीच्या सदस्यांचं मत होतं.

विरोधाभास म्हणजे मार्टिन ल्यूथर किंग आणि नेल्सन मंडेलांना नोबेल मिळालं, तेव्हा त्यांनी गांधींकडून आपण शिकल्याचं मान्य केलं.

1948 साली गांधीजीनागांधीजींना पुन्हा नामांकन मिळालं, पण त्यांची हत्या झाली. मृत्यूपश्चात नोबेल पुरस्कार न देण्याचा प्रघात असल्यानं आणि पुरस्काराची रक्कम कुणाला द्यावी याविषयी गांधींचं मृत्यूपत्र नव्हतीनव्हतं. नोबेल समितीनं मग 1948 साली कोणालाच हा पुरस्कार दिला नही. कुठलीही जीवंतजिवंत व्यक्ती त्यासाठी पात्र नसल्याचं समितीनं म्हटलं होतं.

नोबेल पुरस्काराविषयी अशीच रंजक माहिती सविस्तर वाचण्यासाठी आणि यंदाचे नोबेल विजेते कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या.

नोबेल पुरस्कार विजेत्यांना बक्षीस काय मिळतं?

प्रत्येक नोबेल लॉरिएट म्हणजेच पुरस्कार विजेत्याला 3 गोष्टी मिळतात.

नोबेल डिप्लोमा. हा प्रत्येक डिप्लोमा म्हणजेच मानपत्र कलाकुसरीचं सर्वोत्तम उदाहरण असतं.

मेरी क्युरी यांना 1911 मध्ये प्रदान करण्यात आलेलं मानपत्र

फोटो स्रोत, Twitter / The Nobel Prize

फोटो कॅप्शन, मारी क्युरी यांना 1911 मध्ये प्रदान करण्यात आलेलं मानपत्र, म्हणजेच नोबेल डिप्लोमा

यासोबतच पुरस्कार विजेत्यांना नोबेल पदक दिलं जातं. प्रत्येक क्षेत्रानुसार याचं डिझाईनही वेगवेगळं असतं. शांततेसाठीच्या नोबेल पुरस्कार पदकावरील अल्फ्रेड नोबेल यांचं चित्रं इतर पदकांपेक्षा थोडं वेगळं असतं.

2020 साठीच्या नोबेल साहित्य पुरस्काराचं पदक

फोटो स्रोत, Twitter / The Nobel Prize

फोटो कॅप्शन, 2020 साठीच्या नोबेल साहित्य पुरस्काराचं पदक

मानपत्र आणि पदक यासोबत विजेत्याला 90 लाख स्वीडिश क्रोना (Krona) म्हणजे सध्याच्या दरानुसार सुमारे 7.65 कोटी रुपयांचं बक्षीस दिलं जातं.

एका क्षेत्रात जर एकापेक्षा जास्त विजेते असतील तर हा निधी विभागून दिला जातो.

पुरस्कार विजेत्यांनी लेक्चर दिल्यानंतरच त्यांना हा निधी मिळतो.

आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतिदिनी 10 डिसेंबरला हा पुरस्कार सोहळा स्टॉकहोम आणि ओस्लो इथे पार पडतो.

यापूर्वीच्या विजेत्यांनी पैशांचं काय केलं?

मेरी आणि पिअर क्युरी यांना 1903मध्ये भौतिकशास्त्रासाठीचं नोबेल मिळालं. त्यांनी या बक्षीसाच्या पैशांचा वापर पुढच्या वैज्ञानिक संशोधनासाठी केला.

2006 चे भौतिकशास्त्राच्या नोबेलचे विजेते जॉन मॅथर यांनी हा निधी त्यांच्या फाऊंडेशनला दान केला.

1993चं वैद्यकशास्त्राचं नोबेल मिळालेल्या ब्रिटीश जैववैज्ञानिक रिचर्ड रॉबर्ट्स यांनी या पैशांनी क्रोके (Croquet) खेळासाठीचं लॉन तयार केलं.

तर 1993 सालीच नोबेल मिळालेल्या फिलिप शार्प यांनी बक्षीसाच्या पैशांनी भलंमोठं घर घेतलं.

2001 सालचं वैद्यकशास्त्राचं नोबेल मिळालेल्या सर पॉल नर्स यांनी एक हायएन्ड मोटरसायकल विकत घेतली.

तर 2006चे नोबेल साहित्य पुरस्कार विजेते ऑहन पामुक (Orhan Pamuk) यांनी या निधीतून इस्तंबूलमध्ये म्युझियम सुरू केलं.

नोबेल पुरस्काराविषयीच्या रंजक गोष्टी

  • 2014मध्ये शांततेसाठीचं नोबेल मिळालेली मलाला युसुफजाई ही आतापर्यंतची वयाने सर्वांत लहान विजेती आहे. वयाच्या 17व्या वर्षी मलालाला हा पुरस्कार मिळाला.
  • जॉन गुडइनफ हे वयाने सर्वांत ज्येष्ठ नोबेल विजेते आहेत. 2019मध्ये वयाच्या 97व्या वर्षी त्यांना रसायनशास्त्रासाठीचं नोबेल मिळालं.
  • 1901 ते 2020 या काळात 57 महिलांना नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.
  • जॉन पॉल सार्त्र आणि ल ड्युक थो या दोघांनी नोबेल पुरस्कार नाकारला.
  • मेरी क्युरी आणि ए. पॉलिंग या दोघांना दोन वेगवेगळ्या विषयातंली नोबेल मिळाली आहेत.
  • क्युरी कुटुंब हे नोबेल पुरस्कार विजेत्यांचं कुटुंब म्हणता येईल. मेरी क्युरी, त्यांचे पती पियर क्युरी आणि या जोडप्याची मुलगी आयरिन ज्युलियट क्युरी या सगळ्यांनाच नोबेल मिळालेला आहे.
  • रेड क्रॉसला आतापर्यंत तीनदा नोबेल पुरस्कार मिळाला आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)