त्यांच्या पतीला शांततेचं नोबेल मिळालं आणि त्या आज नजरकैदेत मरायला तयार आहेत

चीनचं सरकार म्हणतं त्या मुक्त नागरीक आहेत.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, चीनचं सरकार म्हणतं त्या मुक्त नागरीक आहेत.

चीनचे नोबेल पुरस्कार विजेते दिवंगत लिऊ शियाओबो यांच्या पत्नींनी आपण आता आपण आपल्या घरातच मरण पत्करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. कुठलाही आरोप नसतानाही चीन सरकारने लिऊ शिआ यांना 2010 पासून त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवलं आहे.

शांततेचा नोबेल प्राप्त लिऊ शियाओबो यांनी नेहमीच लोकशाहीच्या समर्थनार्थ आवाज उठवला. याच कारणांमुळे चिनी सरकारने त्यांच्यावर विद्रोहाचा ठपका ठेवत त्यांना अकरा वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्याच शिक्षेदरम्यान त्यांचं गेल्या वर्षी, 61 वर्षांचे असताना निधन झालं होतं.

आता चिनी सरकारचा निषेध करतानाच आपण आपल्या घरातच प्राणत्याग करू, असा इशारा त्यांच्या पत्नी लिऊ शिआ यांनी दिला आहे. शियाओबो यांच्या निधनानंतर त्यांत्या शिआंच्या प्रकृतीविषयी चिंता वाढली आहे.

कवयित्री असलेल्या शिआंवर जाचक पद्धतीनं पाळत ठेवण्यात आली आहे, म्हणून त्यांना भयंकर नैराश्य आल्याचं सांगितलं जात आहे. त्यांचे मित्र आणि वकिलांच्या मते त्यांना कुणाशीही संपर्क साधू दिला जात नाहीये, आणि पत्रकरांनाही त्यांना भेटण्यास मनाई आहे.

लिऊ शियाओबो यांच्यावर सतत आरोप लावत सरकारने त्यांना कैदेत ठेवलं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लिऊ शियाओबो यांच्यावर सतत आरोप लावत सरकारने त्यांना कैदेत ठेवलं.

लिऊ शिआ यांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी काही संघटना बीजिंगकडे करत असलं तरी चिनी सरकार त्या एक मुक्त नागरीक असल्याचं सांगत आहे. पतीच्या निधनानंतर त्या कुणाच्याही संपर्कात येत नसल्याचं सरकारचं म्हणणं आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला मी त्यांच्याशी फोनवर बोललो, अशी माहिती लिऊ शिआ यांचे मित्र लियाओ यीऊ यांनी दिली. "जिवंत राहण्यापेक्षा मृत्यू पत्करलेला बरा. कारण हा अपमान सहन करणं माझ्यासाठी मृत्यूपेक्षाही कठीण आहे," असं त्यावेळी त्या फोनवर बोलल्याचं ते म्हणाले.

सध्या जर्मनीत राहणारे लेखक लियाओ यांनी ChinaChange या वेबसाईट लिहिल्याप्रमाणे, लिऊ शिआ त्यांना म्हणाल्या की, "मला कशाचीच भीती बाळगण्याचं काही एक कारण नाही. जर मी घर सोडू शकत नसेल तर मी घरातच मरण पत्करेन. शियाओबो तर निघून गेलेत. त्यांच्याशिवाय या जगात आता माझं काही नाही."

"जिवंत राहण्यापेक्षा मृत्यू पत्करलेला बरा. कारण मृत्यूपेक्षा अपमान सहन करणं माझ्यासाठी कठीण आहे,"

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, "जिवंत राहण्यापेक्षा मृत्यू पत्करलेला बरा. कारण मृत्यूपेक्षा अपमान सहन करणं माझ्यासाठी कठीण आहे,"

लिऊ शिआ यांच्याशी एप्रिलमध्ये फोनवर झालेले संभाषण लियाओ यांनी वेबसाइटवर अपलोड केले आहे. त्यात त्या अनेक मिनिटं रडत असल्याचं आणि "मी इथं मरायला तयार आहे. जर मला मृत्यू आला तर यातून मुक्तता तरी मिळेल," असंही ऐकायला मिळते.

लिऊ शिआ यांना परदेशात प्रवास करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पश्चिमी राजायिकांनी चीन सरकारकडे केली आहे. त्यांचं जर्मनीत स्वागत केलं जाईल, असं जर्मनीच्या राजदूतांनी चीनला सांगितल्याचं 'चायना मॉर्निंग पोस्ट'मध्ये म्हटलं आहे.

इथंच त्यांना नजरकैदेत ठेवल्याचं म्हटलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इथंच त्यांना नजरकैदेत ठेवल्याचं म्हटलं जातं.

लिऊ यांच्या सद्यस्थितीबद्दल आपल्याकडे माहिती नसल्याचं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चनयिंग यांनी गुरुवारी सांगितलं.

"लिऊ शिआ या चीनच्या नागरीक आहेत. संबंधित चीनी अधिकारी कायद्यानुसार संबंधित मुद्दा हाताळतील," असं त्या म्हणाल्या.

1938मध्ये नाझी जर्मनीमध्ये मृत पावलेले जर्मन शांततावादी कार्ल फोन ओझाइत्स्की यांच्यानंतर कैदेत मरण पावलेले लिऊ शियाओबो हे पहिलेच नोबेल पुरस्कार विजेते आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)