कर्नाटक निवडणूकः 'मुस्लीम मतं त्याला जाऊ शकतात जो भाजपला नमवेल'

कर्नाटकाचे मुस्लीम कोणाबरोबर आहेत?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कर्नाटकाचे मुस्लीम कोणाबरोबर आहेत?
    • Author, इमरान कुरैशी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

कर्नाटकच्या निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाने मुस्लिमांपासून सुरक्षित अंतर ठेवण्याचं धोरण अवलंबिलं आहे. कदाचित हेच कारण आहे की, आता मुस्लिमांसमोर काँग्रेस किंवा जनता दल सेक्युलर (JDS) यांच्यापैकी एकाची निवड करण्याचा पर्याय आहे.

काँग्रेसच्या बाजूने एकगठ्ठा होण्याविषयी मुस्लिमांमध्ये एकमत होऊ लागल्याचं चित्र दिसत आहे. असं असलं तरी या समाजातील अनेक जण हे जात किंवा धर्माचा विचार न करता JDSच्या भरवशाच्या उमेदवारालाही मतदान करू शकतील.

माजी आमदार आणि राजकीय विश्लेषक अरशद अली म्हणतात, "काँग्रेस आणि JDS यांच्यात जवळपास थेट लढत असलेल्या दक्षिण कर्नाटकातील जिल्ह्यांमध्येच मुस्लिमांसमोर हा पर्याय आहे. उत्तर कर्नाटक, किनारपट्टीचा प्रदेश आणि मध्य कर्नाटकातील जिल्ह्यांमधील 150 जागांवर तर JDSची अस्तित्व नसल्यातच जमा आहे."

कर्नाटकातील मुस्लिमांच्या निवडणूक स्थितीवर पुस्तक लिहिणारे अरशद अली पुढे सांगतात, "साधारणतः मुस्लीम हे राष्ट्रीय स्तरावरील वातावरणाचा अंदाज घेऊन मतदान करत असतात. त्यांची सर्वांत मोठी चिंता ही सुरक्षेशी संबधित आहे. 2014 पासून हे स्पष्ट झालं आहे की मुस्लीम हे घाबरलेले आहेत. जर त्यांच्यासमोर असा एखादा उमेदवार असेल जो भाजपला हरवू शकतो तर ते त्याला मतदान करू शकतात, मग तो अपक्ष उमेदवार असला तरी."

कर्नाटकाची लोकसंख्या 6.1 कोटी असून त्यात मुस्लिमांची लोकसंख्या 12 टक्के आहे. 60 जागांवर त्यांचा प्रभाव महत्त्वाचा ठरतो. काँग्रेसने 17 आणि JDSने 20 मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे.

काँग्रेस सत्ता टिकवू शकेल का?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, काँग्रेस सत्ता टिकवू शकेल का?

सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियानेही अनेक जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.

ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादूल मुसलमीनचे प्रमुख असदउद्दीन ओवेसी यांनी घोषणा केली होती की त्यांचा पक्ष हैदराबाद-कर्नाटक क्षेत्रात 60-70 जगांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. पण शेवटी पक्षाने आपले उमेदवार उभे न करता JDSला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला आहे.

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : बेळगावमधले लोक कोणाला कुंदा वाटणार आणि का?

विधान परिषदेचे आमदार आणि युवा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रिजवान अरशद म्हणतात, "कर्नाटकातील मुस्लीम हा उत्तर प्रदेश किंवा बिहारच्या मुस्लिमांपेक्षा वेगळा आहे. इथला मुस्लीम समाज हा मुख्य प्रवाहाशी जोडला गेलेला असून तो इतर समाजांशी चर्चा करून कोणाला मतदान करायचं, याचा निर्णय घेईल. उदाहरणार्थ, या वेळेस OBC, दलित, लिंगायत आणि वोक्कालिगा समाजासोबतच मतदान करायचा निर्णय झालेला आहे."

ध्रुविकरणाचा परिणाम

रिजवान पुढे म्हणतात, "इतर समाज हा एकजूट असल्यानेही भाजप त्यामुळे यावेळेस ध्रुवीकरणाचा विचार करत नाही."

काँग्रेसचे रिजवान आणि JDSचे तनवीर अहमद यांच्या मते मुस्लीम मतदार त्यांच्याच पक्षाला मतदान करतील.

भाजपसमोर अनेक आव्हानं आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भाजपसमोर अनेक आव्हानं आहेत.

तनवीर अहमद म्हणतात, "मुस्लिमांचा एक वोटिंग पॅटर्न ठरलेला असतो. सुनियोजितपणे ते मतदान करत असतात. त्यांचं कुणाबरोबर पटतं हे यावर ठरतं."

पण म्हैसूर विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक मुज्जरफर असादी यांचं कर्नाटकातील मुस्लीम मतदारांविषयी वेगळं मत आहे.

एकत्रितपणे मतदान

प्राध्यापक असादी म्हणतात, "या वेळेस अल्पसंख्याक एकगट्ठा मतदान करतील. याचे तीन कारणं आहेत. एकतर सिद्धरामय्या सरकार हे आधीसारखंच त्यांचं संरक्षण करेल. दंगली झालेल्या नसल्या तरी किनारपट्टीच्या भागात धार्मिक ताणतणाव पहायला मिळालेला आहे. दुसरं म्हणजे JDSवर मुस्लिमांचा विश्वास घटला आहे, कारण या पक्षाने 2006मध्ये भाजपबरोबर युतीचं सरकार स्थापन केलं होतं."

कर्नाटक

फोटो स्रोत, Getty Images

"तिसरं कारण हे भाजपने उमेदवारी देताना मुस्लिमांना डावलणं हे आहे. एक उमेदवार जरी असता तर त्यांचा परिणाम मुस्लिमांच्या निर्णयावर झाला असता. हे हिंदुत्वाचं राजकारण आहे. कर्नाटकातील मुस्लिमांची मुख्य समस्या ही आहे की, इथं उत्तर प्रदेश किंवा बिहारसारखा एकही मजबूत प्रादेशिक राजकीय पक्ष नाही."

काँग्रेसचे आमदार रिजवान म्हणतात, "तुम्ही ही शक्यताही नाकारू शकत नाही की, पक्षीय राजकारणाच्या बाहेर जाऊन मुस्लीम एखाद्या असामान्य उमेदवारालाही पाठिंबा देऊ शकतात."

कर्नाटक

फोटो स्रोत, Getty Images

रामनगरम इथून निवडणूक लढवत असलेले JDS नेता कुमारास्वामी सारखे उमेदवार सगळ्या मुस्लिमांची मते मिळवू शकतात. त्याच वेळी शेजारच्या चन्नापटनामध्ये कदाचित हे शक्य होणार नाही. कुमारास्वामी लढवत असलेला हा दुसरा मतदारसंघ आहे.

प्राध्यापक असादी म्हणतात, "कुमारास्वामी यांचे मुस्लीम मतदारांशी चांगले संबंध आहे. पण शिकारीपूरामध्ये भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी.एस. येडियुरप्पा यांना मुस्लीम आणि कुरबा समाजाची मतं मिळू शकतील, कारण या मतदारसंघावर त्यांची घट्ट पकड आहे."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)