'हा' आहे पोटॅशियमच्या कमतरतेमुळे होणारा जीवघेणा आजार! लगेच आहारात 'या' 5 गोष्टींचा करा समावेश

केळी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, केळी पोटॅशियमचा चांगला स्रोत मानली जाते.
    • Author, आनंदमणी त्रिपाठी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

पोटॅशियम म्हटलं की सर्वात आधी लोकांच्या लक्षात येते ती केळी. परंतु, शरीराला जितकं पोटॅशियम लागते, त्यासाठी फक्त केळी पुरेशी नसतात.

पोटॅशियम म्हणजे नक्की काय?

पोटॅशियम हा शरीरासाठी आवश्यक खनिज आहे. तो शरीराचं कामकाज नीट सुरू ठेवण्यासाठी मदत करतो.

रक्तदाब नियंत्रणात ठेवतो आणि किडनीला (मूत्रपिंड) जास्त सोडियम बाहेर टाकण्यासाठी मदत करतो.

याशिवाय, पोटॅशियम हाडं मजबूत ठेवतो, पेशी योग्यरीत्या कार्य करण्यास मदत करतो आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यात महत्त्वाची भूमिकाही बजावतो.

सॅप डायट क्लिनिकच्या संस्थापक आणि वरिष्ठ आहारतज्ज्ञ डॉ. अदिती शर्मा म्हणतात, "पोटॅशियम हे एक असं सूक्ष्म पोषक खनिज (मायक्रो न्यूट्रिएंट मिनरल) आहे, जे शरीराला आवश्यक पोषक द्रव्यं पोहोचवायला आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी मदत करतं."

पोटॅशियम शरीरात इलेक्ट्रोलाइटसारखं काम करतं.

  • हे स्नायूंना व्यवस्थित काम करायला मदत करतं.
  • हे हृदयाचे ठोके नियंत्रित करतं.
  • हे नसांना योग्य प्रकारे संदेश पोहोचवण्यासाठी मदत करतं.
ग्राफिक कार्ड

एम्सच्या माजी आहारतज्ज्ञ आणि वन डाएट टुडेच्या संस्थापक डॉ. अनू अग्रवाल सांगतात, "पोटॅशियम शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन राखण्यास मदत करतं. हे इलेक्ट्रोलाइट शरीरातील प्रत्येक पेशीत असतं. हृदय, मेंदू आणि सर्व स्नायूंना निरोगी ठेवण्यास ते मदत करतं."

त्या सांगतात की, पोटॅशियम शरीरातील स्नायूंच्या कार्यासाठी खूप गरजेचं आहे. हे स्नायूंचे ताण दूर करण्यास आणि त्यांना आराम देण्यास मदत करतं.

याशिवाय, हे शरीरातील पीएच संतुलित ठेवायला आणि जास्तीचं सोडियम बाहेर काढण्यासाठीही मदत करतं.

पोटॅशियमची गरज का आहे?

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, प्रौढांनी दररोज सुमारे 3,500 मिलीग्रॅम पोटॅशियम घेणं आवश्यक आहे. हे फक्त रक्तदाब (ब्लडप्रेशर) नियंत्रणात ठेवत नाही, तर हृदयाच्या आजारांचा धोकाही कमी करतं.

पोटॅशियम मिळवण्यासाठी कोणत्या प्रकारचं अन्न खावं?

जर आहारात पुरेशा प्रमाणात फळं आणि भाजीपाला असतील तर पोटॅशियम सहज मिळतं.

पण वस्तुस्थिती अशी आहे की, बहुतेक लोक आठवड्यातून पाच दिवस देखील पुरेशी फळं आणि भाज्या खात नाहीत.

त्यांच्या अर्ध्याहून अधिक कॅलरी प्रक्रिया (प्रोसेस्ड) केलेल्या अन्नातून येतात.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पोटॅशियम आपल्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट बॅलन्स करण्याचं काम करतं.

यूकेतील एका सर्वेक्षणानुसार 10 टक्के पुरूष आणि 24 टक्के महिला दररोज त्यांना आवश्यक असणारी पोटॅशियमची मात्रा पूर्ण करु शकत नाहीत.

पोटॅशियम कमी झाल्यास काय होतं?

पोटॅशियमची कमतरता सहसा केवळ आहारामुळे होत नाही.

कधी कधी उलट्या-जुलाब, काही औषधांचा परिणाम किंवा जास्त मद्यपानामुळेही पोटॅशियमची कमतरता जाणवू लागते.

पोटॅशियमच्या कमतरतेमुळे रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयरोगाचा किंवा स्ट्रोकचा धोकाही वाढतो.

डॉ. अनू अग्रवाल म्हणतात की, "पोटॅशियमच्या कमतरतेमुळे स्नायूंमध्ये ताण-तणाव वाढतो. सतत थकल्यासारखं वाटतं. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रासही होऊ शकतो. सर्वांत महत्वाचं म्हणजे, पोटॅशियम कमी असल्यास हृदयाची धडधड किंवा ठोके अनियमित होऊ शकतात. याचा थेट परिणाम रक्तदाबावर पडतो."

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पोटॅशियमच्या कमतरतेमुळे हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात.

शरीरात पोटॅशियम जास्त होणं

सामान्यतः किडनी जास्तीचे पोटॅशियम लघवीद्वारे बाहेर टाकते, पण किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये ही प्रक्रिया योग्य प्रकारे होत नाही.

अशा परिस्थितीत पोटॅशियम शरीरात जमा होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात आणि हृदय निकामी होण्याचा धोका वाढतो.

ग्राफिक कार्ड

म्हणूनच किडनीचा आजार असलेल्या रुग्णांना सहसा कमी पोटॅशियम असलेला आहार घेण्याचा सल्ला दिला जातो.

डॉ. अदिती शर्मा सांगतात की, पोटॅशियमच्या कमतरतेमुळे हृदय, मज्जातंतू आणि स्नायूंवर परिणाम होतो. पण जास्तीचे पोटॅशियम खूप धोकादायक आहे.

यामुळे हृदय बंद होऊ शकतं. म्हणून पोटॅशियमचं अतिसेवन टाळावे, असा सल्ला दिला जातो.

केळी हे पोटॅशियमचे सर्वोत्तम स्रोत आहे का?

केळी पोटॅशियम देतं, पण हे सर्वात चांगलं किंवा सर्वात जास्त पोटॅशियम देणारं अन्न नाही

दररोज लागणाऱ्या पोटॅशियमपैकी सुमारे 10 टक्के एक केळी देते. तर भाजलेल्या बटाट्यातून सुमारे 30 टक्के पोटॅशियम मिळू शकतं.

केळी खाणारा माणूस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दररोज लागणाऱ्या पोटॅशियमपैकी सुमारे 10 टक्के एक केळी देते. तर एक बेक केलेल्या (भाजलेला) बटाट्याने सुमारे 30 टक्के पोटॅशियम मिळू शकतं.

पोटॅशियम मिळवण्यासाठीचे चांगले स्रोत म्हणजे सुका मेवा, हिरव्या पालेभाजी, नट्स, बिया, दूध आणि दही, डाळी आणि मासे.

डॉ. अनू अग्रवाल सांगतात की, पोटॅशियम संतुलित ठेवण्यासाठी जितकी शक्य तितकी फळं आणि भाजीपाला खाणं आवश्यक आहे.

नारळ पाणी, संत्रा, केळी, बीटरूट, हिरव्या पालेभाज्या यांमध्ये पोटॅशियम सहज मिळतं. साधारण सर्व फळं आणि भाजीपाल्यात ते आढळून येतं.

सप्लिमेंट आणि पोटॅशियम

बहुतेक लोकांसाठी 3,700 मिलीग्रॅम किंवा त्याहून कमी पोटॅशियम सप्लिमेंट घेणं सुरक्षित मानलं जातं.

परंतु, वृद्ध आणि किडनीचा आजार असलेल्यांनी हे (सॉल्ट सब्स्टिट्यूट्ससह) डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये.

खरं म्हणजे, त्यांची किडनी जास्तीचं पोटॅशियम सहजासहजी बाहेर टाकू शकत नाही.

डॉ. अदिती शर्मा सांगतात की, डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांची परवानगी न घेता पोटॅशियम जास्त प्रमाणात घेऊ नये. जर कोणी दररोज हंगामी फळं आणि भाजीपाला खात असेल, तर त्याला पुरेसं पोटॅशियम मिळतं आणि त्यासाठी अतिरिक्त सप्लिमेंटची गरज भासत नाही.

स्पोर्ट्स ड्रिंकमध्ये पोटॅशियम आवश्यक आहे का?

घामामुळे खूप कमी प्रमाणात पोटॅशियम बाहेर पडतं. व्यायामानंतर त्याची भरपाई करण्यासाठी नैसर्गिक अन्नाचा पर्याय अधिक चांगला आहे.

टोमॅटोचा ज्यूस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, टोमॅटोच्या एक ग्लास ज्यूसमध्ये सुमारे 460 मिलीग्रॅम पोटॅशियम असतं.

तुम्ही टोमॅटोच्या ज्यूसचं सेवन करू शकता. त्याच्या एका ग्लासमध्ये सुमारे 460 मिलीग्रॅम पोटॅशियम असतं.

याशिवाय, सालीसह भाजलेला केलेला बटाटा हा देखील चांगला पर्याय आहे. यात फक्त पोटॅशियमच मिळत नाही, तर त्यातील कार्बोहायड्रेट शरीराला ऊर्जा देखील देतात.

पोटॅशियमचे प्रमाण कसे वाढवावे?

शरिरात पोटॅशियमचे प्रमाण वाढवण्यासाठी काही गोष्टी फायद्याच्या ठरू शकतात.

आहारात काही गोष्टींचा समावेश केल्यास त्याचा पोटॅशियमचं प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी मदत होऊ शकते. त्यासाठी खालील 5 गोष्टी करता येतील.

वेगवेगळी फळं आणि भाजीपाला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दररोज पाच वेगवेगळी फळं आणि भाजीपाला खा.
  • दररोज पाच वेगवेगळी फळं आणि भाजीपाला खा. (उदाहरणार्थ, नाश्त्यात एक फळ, दुपारच्या जेवणात एक फळ आणि एक भाजी, रात्रीच्या जेवणात दोन भाज्या.)
  • दररोज तीन डेअरी पदार्थांचा समावेश करा. (उदाहरणार्थ, दूध असलेली कॉफी, चीज किंवा दही)
  • आठवड्यात डाळी आणि बीन्स अवश्य खा, स्नॅक्ससाठी ड्रायफ्रूट, नट्स आणि सीड्सची निवड करा.
  • भाजी उकडण्याऐवजी स्टीम करा किंवा वाफवून घ्या. हलकं तळा किंवा मायक्रोवेव्हमध्ये गरम करा.
  • दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासोबत सॅलड नक्की खा. कारण कच्च्या भाज्या पोटॅशियमचा चांगला स्रोत आहेत.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.