सोन्याचे दर एवढे का वाढले? ही तेजी किती काळ राहणार? सोनं 2 लाखांवर जाणार का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अजित गढवी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
नवरात्रोत्सवात सोनं आणि चांदीचे दर पुन्हा एकदा नव्या विक्रमी पातळीवर पोहोचलेले पाहायला मिळाले.
याआधी, 10 ग्रॅम सोन्याचा दर 1.16 लाख रुपयांवर पोहोचला होता, तर चांदीच्या दरानं 1.35 लाख रुपये प्रति किलोची पातळी गाठली होती. चांदीचा दर एका दिवसात 3,500 रुपये प्रति किलोनं वाढला होता.
गेल्या वर्षी नवरात्रीच्या काळात 10 ग्रॅम सोन्याचा दर 78,200 रुपये होता. यावर्षी सोन्याच्या दरात जबरदस्त तेजी येत तो 10 ग्रॅमसाठी 1.16 लाखांवर गेला आहे. याचाच अर्थ जवळपास वर्षभराच्या कालावधीत सोन्याचा दर 48 टक्क्यांनी वाढला आहे.
सोने आणि चांदीच्या दरात इतकी तेजी येण्यामागचं कारण काय? ही तेजी किती काळ राहील? भविष्यात सोन्याचे दर 10 ग्रॅमसाठी 2 लाख रुपयांचीही पातळी ओलांडतील का? या लेखात या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया.
शेअर बाजाराशी सोन्याची तुलना
गेल्या वर्षभरात, शेअर बाजारातून गुंतवणुकदारांना फायदा होण्यापेक्षा तोटाच अधिक झाला आहे. तर सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मात्र अनुक्रमे 48 टक्के आणि 45 टक्क्यांची दणदणीत वाढ झाली आहे.
सेन्सेक्स हा मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) निर्देशांक आहे. 23 सप्टेंबर 2024 ला सेन्सेक्स 84,900 अंशाच्या पातळीवर होता.
सध्या सेन्सेक्स 81,000 ते 81,500 अंशावर दरम्यान आहे. म्हणजेच वर्षभराच्या कालावधीत सेन्सेक्समध्ये 3 टक्क्यांची घसरण झाली आहे.
तर निफ्टी या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) निर्देशांकात देखील 1 टक्क्याची घसरण नोंदवण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
चौमिल गांधी एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक आहेत. त्यांनी बीबीसीला सोने आणि चांदीच्या दरात वाढ होण्यामागचं कारण सांगितलं.
ते म्हणाले, "सोने आणि चांदीच्या दरात वाढ होण्यामागं तीन प्रमुख कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे, जगभरात गोल्ड ईटीएफ आणि सिल्व्हर ईटीएफमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली आहे.
जागतिक अनिश्चिततेमुळ सोन्याची मागणी वाढली आहे, तर उद्योग क्षेत्रात चांदीची मागणी वाढली आहे."
"दुसरं कारण, अमेरिकेच्या फेडरल बँकेच्या गेल्या बैठकीत असं संकेत मिळाले होते की अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनं यावर्षाच्या अखेरीआधी दोन वेळा व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे.
त्यामुळे अमेरिकेचा डॉलर निर्देशांक आणि अमेरिकेच्या ट्रेझरी म्हणजे कर्जरोख्यांचा परतावा कमी होऊ शकतो. त्याचा फायदा सोने आणि चांदीला होईल." (अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह म्हणजे अमेरिकेतील मध्यवर्ती बँक)

फोटो स्रोत, BSE
चौमिल गांधी तिसऱ्या कारणाबद्दल पुढे म्हणाले की, "काही दिवसांपूर्वी, असा समज तयार झाला होता की रशिया-युक्रेन युद्ध लवकरच संपेल. मात्र प्रत्यक्षात तसं झालं नाही.
त्यामुळे जागतिक स्तरावरील भू-राजकीय परिस्थितीच्या अनिश्चिततेमुळे सोन्याची मागणी वाढली आहे. कारण सोनं हे सुरक्षित गुंतवणूक प्रकार मानलं जातं."
रॉयटर्सनं वृत्त दिलं आहे की, रशियानं युक्रेनचा काही भाग ताब्यात घेतल्याचं सांगितल्यानंतर सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. 22 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात एकाच दिवसात सोन्याचे दर दोन टक्क्यांनी वाढले होते.
"अमेरिकेत व्याजदरात कपात होण्याच्या अपेक्षेनं, सोनं आणि चांदीचे दर वाढत आहेत. मात्र दरात वाढ झाल्यामुळे या पातळीवर खरेदीचं प्रमाण कमी झालं आहे. अर्थात दर या पातळीवर असूनदेखील, यात आणखी वाढ होईल या आशेनं छोटे गुंतवणुकदार सोने आणि चांदीची खरेदी करत आहेत," असं अहमदाबादमधील सोने व्यापारी हेमंत चोक्सी यांनी बीबीसीला सांगितलं.
सोने-चांदीतील तेजी किती काळ राहील?
सोने आणि चांदीच्या दरातील ही तेजी आणखी किती काळ टिकेल यावर एचडीएफसी सिक्युरिटीजचे चौमिल गांधी म्हणाले, "सोने आणि चांदीच्या मागणीत सातत्यानं वाढ होते आहे. त्यामुळे या मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता नाही. भविष्यात त्यांचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे."
"मात्र, सोन्याच्या दरात वाढ होत असल्यामुळे, त्यात घसरण होण्याची शक्यता आहे. जगभरातील शिखर किंवा मध्यवर्ती बँका सध्या सोने खरेदी करत आहेत.
या बँका जेव्हा सोन्याची विक्री करण्यास सुरुवात करतील, तेव्हाच त्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे," असं हेमंत चोक्सी यांना वाटतं.

फोटो स्रोत, Saumil Gandhi
अमेरिकेचं फेडरल रिझर्व्ह पुढील ऑक्टोबर आणि डिसेंबरमध्ये दोनदा व्याजदरात 0.25 टक्क्यांची कपात करण्याची शक्यता आहे.
मेटल फोकस ही धातूंच्या संदर्भातील कन्सल्टन्सी फर्म आहे. ती सोन्याच्या मागणीचा ट्रॅक ठेवते. मेटल फोकसनुसार, 2016 मध्ये 53 टक्के सोन्याची खरेदी दागिन्यांसाठी झाली होती, 28 टक्के गुंतवणुकीसाठी झाली होती आणि उर्वरित सोन्याची खरेदी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी आणि उद्योगांनी केली होती.
मात्र आता परिस्थिती बदलली आहे. आता फक्त 40 टक्के सोन्याची खरेदी दागिन्यांसाठी होते आहे. तर 29 टक्के सोनं गुंतवणुकीसाठी खरेदी केलं जातं आहे आणि 24 टक्के सोन्याची खरेदी मध्यवर्ती बँकांकडून केली जाते आहे. तर उर्वरित 7 टक्के सोनं औद्योगिक गरजांसाठी खरेदी केलं जातं आहे.
सोनं 2 लाखांवर जाणार का?
एका अहवालानुसार, यावर्षी अमेरिकेत आतापर्यंत गोल्ड ईटीएफमध्ये 32.7 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिकची गुंतवणूक झाली आहे. तर जागतिक पातळीवर, 2025 मध्ये गोल्ड ईटीएफमध्ये आतापर्यंत 57.1 अब्ज डॉलर्सहून अधिकची गुंतवणूक झाली आहे.
जगभरात सध्या गोल्ड ईटीएफमध्ये 445 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे. त्यातील निम्मी गुंतवणूक एकट्या अमेरिकेत म्हणजे अमेरिकेतील शेअर बाजारात सूचीबद्ध झालेल्या फंड्समध्ये करण्यात आली आहे. ईटीएफमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्यामुळे किमतीत वाढ होते आहे.

फोटो स्रोत, Getty Images
चौमिल गांधी यांना, आगामी काही वर्षांमध्ये 10 ग्रॅम सोन्याचा दर दोन लाख रुपयांहून अधिक होईल का, असं विचारलं असता, ते म्हणाले, "याबद्दल आताच काही अंदाज वर्तवणं शक्य नाही. मात्र, सध्या सोन्याचा दर आहे, त्यापेक्षा त्यात थोडी वाढ होऊ शकते."
"औद्योगिक क्षेत्रातून चांदीला मोठी मागणी आहे आणि ईटीएफद्वारे केली जाणारी गुंतवणूकदेखील वाढली आहे. गेल्या चार वर्षांमध्ये सोन्याचे दर जितके वाढले आहेत तितक्या प्रमाणात चांदीचे दर वाढलेले नाहीत. त्यामुळे चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे," असं चौमिल गांधी म्हणाले.
"आजही लोकांना वाटतं की सोन्याच्या दरात वाढ होतच राहील. त्यामुळेच लोक सोन्याची विक्री करत नाहीत किंवा त्यातील गुंतवणूक काढून त्यातील मिळणारा नफा हाती पाडून घेत नाहित," असं हेमंत चोक्सी म्हणाले.
"जे लोक सोन्याची खरेदी दागिन्यांच्या स्वरुपात करतात ते त्याची विक्री करत नाहीत. मात्र ज्या लोकांना घर विकत घ्यायचं किंवा इतर एखादी आर्थिक आवश्यकता आहे असे लोक सोनं विकू शकतात," असं ते पुढे म्हणाले.
दर वाढत असतानाही लोक सोने खरेदी करतात का?
"जीएसटीमध्ये कपात झाल्यानंतर जर लोकांच्या हाती बचत असेल, तर ते सोने आणि चांदीची खरेदी करतील अशी अपेक्षा आहे," असं चौमिल गांधी म्हणाले.
"सणासुदीच्या हंगामाला आता सुरुवात झाली आहे. या काळात सोने खरेदी केली जाते. मात्र सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे लोक 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांऐवजी 15 ते 18 कॅरेट सोन्याचे दागिने खरेदी करण्यास प्राधान्य देतील."
"ज्या लोकांकडे आधीचं सोनं आहे ते त्याचा पुन्हा वापर करून, त्यापासून नवीन दागिने तयार करून घेण्याची शक्यता आहे. गुंतवणुकदार मात्र या पातळीवर देखील सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत. ईटीएफच्या आकडेवारीतून ही बाब स्पष्ट होते," असं ते म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
सणासुदीच्या हंगामात सोन्याच्या खरेदीची काय स्थिती आहे, याबद्दल हेमंत चोक्सी म्हणाले, 'ट्रेडर्समध्ये सोने खरेदीबाबत उत्साह नाही.
मात्र ग्राहक कमी कॅरेटचे दागिने विकत घेत आहेत. याआधी सोन्याचा दर एमसीएक्सवरील किमतीपेक्षा 2,000 रुपयांनी कमी होता. आता तो 200 रुपयांच्या अधिकच्या प्रीमियमवर व्यवहार करतो आहे."
(एमसीएक्स म्हणजे मल्टी कमोडिटी एक्सचेंज. ज्याप्रमाणे शेअर मार्केटमध्ये शेअर्सचे व्यवहार होतात, त्याचप्रमाणे एमसीएक्सवर वेगवेगळे धातू आणि इतर वस्तूंचे व्यवहार होतात.)
"आता लोक त्यांच्याकडे असलेलं जुनं सोनं वापरून त्यापासून नवीन दागिने बनवून घेत आहेत. सध्या ते 9 कॅरेट आणि 14 कॅरेटचे दागिने विकत घेत आहेत. कारण ते तुलनेनं स्वस्त आहेत. चढ्या दरांमुळे 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांमधील लोकांचा रस कमी झाला आहे," असं ते पुढे म्हणाले.
चौमिल गांधी आणि हेमंत चोक्सी हे दोघेही सद्यस्थितीत सोनं ठेवण्याचा किंवा जेव्हा दर कमी होतील तेव्हा खरेदी करण्याचा सल्ला देतात.
(महत्त्वाची सूचना: या लेखात दिलेली माहिती केवळ आर्थिक साक्षरतेच्या उद्देशाने देण्यात आली आहे. तो आर्थिक सल्ला समजू नये. वाचकांना सल्ला दिला जातो की, त्यांनी स्वतः माहिती घेऊन गुंतवणुकीसंबंधी निर्णय घेण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्यावी. बीबीसी मराठी या माहितीच्या आधारावर केलेल्या गुंतवणुकीमुळे होणाऱ्या कोणत्याही आर्थिक नुकसानासाठी जबाबदार नाही.)
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











