सोन्यामध्ये किती गुंतवणूक करावी? त्यातून कसा आणि किती परतावा मिळू शकतो?

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

सोन्याशी भारतीयांचं एक भावनिक नातं आहे. त्यामुळेच आपल्याकडे थोडंफार सोनं मग ते दागिन्यांच्या स्वरूपात असो किंवा इतर कोणत्याही असायलाच हवं असं प्रत्येकाला वाटतं.

सोनं हे संपत्तीचं प्रतीक आहेच, पण संकटकाळातला एक मजबूत आर्थिक आधारही आहे.

त्यामुळेच केवळ व्यक्तीच नाही, तर देश आणि वित्तीय संस्थाही राखीव आधार म्हणून सोनं बाळगतात.

पण, सोनं म्हणजे केवळ दागिने किंवा अगदी शुद्ध स्वरुपातलं वळं किंवा बिस्कीटच का? यापलीकडे सोन्यात गुंतवणूकीचे काही पर्याय आहेत का? त्यांपैकी सर्वांत उत्तम पर्याय कोणता? सोन्यातील गुंतवणूकीतून कसा आणि किती परतावा मिळू शकतो? अशा प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊया.

शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा?

तुम्ही ज्येष्ठ मंडळींकडून ऐकलं असेल की, सोने खरेदी करणाऱ्यांचे नुकसान होत नाही, फक्त फायदा होतो.

पण यात तथ्यं नाही. कोणतीही वस्तू जास्त दराने खरेदी केली, तर तोटा सहन करावा लागतो. सोने त्याला अपवाद नाही.

मात्र तरीही, गेल्या काही वर्षांपासून सोन्याने चांगला परतावा दिला आहे. विविध ॲसेट क्लासमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

निफ्टीच्या तुलनेत सोन्याने दिलेला सरासरी वार्षिक परतावा :

1 वर्ष : 30.7 %

3 वर्षे : 17.1 %

5 वर्षे : 14.3 %

10 वर्षे : 10.5 %

याच कालावधीसाठी निफ्टीने दिलेला सरासरी वार्षिक परतावा :

1 वर्ष : 25.6 %

3 वर्षे : 12.1 %

5 वर्षे : 16.3 %

10 वर्षे : 12.3 %

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फक्त 'गुंतवणूक करा आणि विसरून जा' यापेक्षा सोनं हा गुंतवणुकीचा अधिक चांगला पर्याय ठरत आहे.

कारण बाजारातील अस्थिरता, तोटा, ट्रेडिंगमधली जोखीम आणि दबाव या परिस्थितीतदेखील सोनं चांगला परतावा देऊ शकते.

अनेक लोकांकडे सुरुवातीला गुंतवणुकीचे फारसे पर्याय उपलब्ध नव्हते. रिअल इस्टेट, सोनं आणि फिक्स्ड डिपॉझिट एवढंच त्यांना माहीत असायचं.

मात्र अलीकडच्या काळात लोक हळूहळू शेअर्स, डेरिव्हेटिव्ह्ज आणि म्युच्युअल फंडाकडे वळत आहेत. तरीसुद्धा, किरकोळ गुंतवणूकदारांचे शेअर्स आणि फंड्समधील प्रमाण केवळ 18.4 टक्के आहे.

गुंतवणुकीतला सोन्याचा वाटा अजूनही कायम आहे.

गुंतवणुकीत सोन्याचे प्रमाण किती असावे?

पर्सनल फायनान्सविषयातील तज्ञ्ज्ञ सांगतात की, गुंतवणुकीत विविधता असावी. सगळी गुंतवणूक एकाच प्रकारात केली तर जोखीम वाढू शकते. त्यामुळेच समजा तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी 100 रुपये असतील, तर ते तीन-चार ठिकाणी गुंतवायला हवेत.

या गुंतवणुकीचं सूत्र तज्ज्ञ सांगतात. तुमचं वय वजा 100 = शेअर बाजार/म्युच्युअल फंडातील टक्केवारी

उदाहरणार्थ - तुमचं वय जर 35 वर्षे असेल. 100-35 = 65 म्हणजेच तुम्ही तुमच्याजवळच्या रकमेपैकी 65 टक्के रक्कम शेअर्स किंवा म्युच्युअल फंडात गुंतवू शकता.

उरलेल्या 35 टक्के भागापैकी 10 टक्के सोन्यात, 15 टक्के सरकारी योजनेत आणि 10 टक्के रोख स्वरुपात ठेवणे योग्य राहील.

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

1) प्रत्यक्ष दागिन्यांची किंवा सोनं खरेदी

घरात मुली असतील तर त्यांच्या लग्नासाठी सोने साठवण्याची पद्धत असते. पण एकदम 30-40 ग्रॅमचे दागिने खरेदी करणं मध्यमवर्गीयांसाठी मोठा बोजा ठरतो.

त्यामुळे बरेच लोक ज्वेलर्सच्या योजनांमध्ये पैसे टाकतात. पण दागिने खरेदीत आपण किती पैसे खर्च करतो ते पाहू.

11 नोव्हेंबर 2024 रोजी हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 7220 रुपये प्रति ग्रॅम होता.

जर 30 ग्रॅम म्हणजेच तीन तोळ्याचे दागिने घेतले तर-

सोने किंमत : 7220 रुपये × 30 = 2,16,600 रुपये

मेकिंग/वेस्टेज (16 %) : 34,656 रुपये

जीएसटी (3%) : 6498 रुपये

एकूण किंमत : 2,52,754 रुपये.

म्हणजे प्रतिग्रॅम सोन्याची खरी किंमत पडली 8425 रुपये. यावरून दिसते की सोन्यात दागिन्यांच्या स्वरूपात गुंतवणूक केली तर किमान 16-19% जास्त पैसे खर्च होतात.

दागिने देऊन तेवढ्याच वजनाचे नवीन दागिने घेतले तरी पुन्हा घडणावळ (मेकिंग चार्जेस) आणि घट (वेस्टेज चार्जेस) लागतात.

त्यामुळे साधारणतः 20 टक्के तोटा होतोच. त्यामुळे गुंतवणुकीसाठी सोन्याचे दागिने हा फारसा व्यवहार्य पर्याय नाही ठरत.

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

ही गुंतवणूक कोणासाठी योग्य आहे?

  • लग्नासारख्या गरजेपोटी खरेदी करावी लागेल अशा लोकांसाठी.
  • ज्यांना दागिने घालण्याचा आनंद व थोडाफार परतावा हवा आहे, त्यांच्यासाठी.
  • पण फक्त गुंतवणुकीसाठी भौतिक सोने खरेदी करणे योग्य नाही.

सोन्याची बिस्किटं आणि नाण्यांमध्ये गुंतवणूक करणे योग्य आहे?

तुमची आर्थिक क्षमता चांगली असेल तर सोन्याच्या बिस्किटांच्या स्वरूपात खरेदी करणे योग्य ठरेल. हे सोन्याच्या त्या त्या दिवशीच्या दरानुसार उपलब्ध होतात.

याशिवाय, 'व्हॅल्यू अॅडिशन'च्या नावाखाली कोणताही अतिरिक्त खर्च येत नाही. मात्र, ते घरी ठेवायचे असल्यास सुरक्षिततेबाबत काळजी घेणे आवश्यक आहे.

काही लोक अर्धा ग्रॅम, एक ग्रॅम, दोन ग्रॅम अशा छोट्या आकाराची सोन्याची नाणी खरेदी करतात. पण यावर मेकिंग चार्जेस असतात.

त्यामुळेच 'वजनाच्या बदल्यात तेवढेच वजन' या पद्धतीने सोने खरेदीची सुविधा असेल, तरच नाणी खरेदी करण्याचा विचार करावा. अन्यथा हा खूप खर्चिक पर्याय ठरतो असे म्हणावे लागेल.

सोन्यात गुंतवणुकीचे अन्य पर्याय

1. गोल्ड ETF

गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक ही शेअर बाजाराशी मिळतीजुळती आहे. यामध्ये तुम्ही शेअर खरेदी करता त्याप्रमाणेच ही खरेदी करू शकता.

यामध्ये डिमॅट अकाऊंट उघडणं गरजेचं आहे. यामध्ये ETF ची खरेदी करता येऊ शकते. याची विक्री रोजच्या रोज होत असते.

काही कंपन्या गोल्ड ETF जारी करतात. तुम्ही ते विकत घेऊ शकतात. याची सिक्युरिटी म्हणजेच सोनं हीच असते. जेव्हा तुम्हाला गरज असते किंवा ETF चे भाव वाढले आहेत, हे तुमच्या निदर्शनास येताच तुम्ही ते विकू शकता.

यामध्ये फक्त एकच समस्या आहे. ती म्हणजे तुम्हाला ज्या दिवशी ETF विकायचे आहेत, त्याच वेळी ते विकले जातील किंवा नाही, हे महत्त्वाचं ठरतं.

म्हणजे तुम्हाला सोनं विकायचं आहे, पण खरेदी करणारा कुणीच नसल्यास समस्या निर्माण होते.

2. गोल्ड फंड्स

हे फंड सोन्याच्या खाणी व ट्रेडिंगमध्ये, तसेच गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक करतात. अशा प्रकारचे फंड बाजारात उपलब्ध आहेत.

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

3. Sovereign Gold Bonds (SGBs)

हे बाँड्स भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) जारी करते. यावर वार्षिक 2.5 टक्के परतावा मिळतो आणि मुदत पूर्ण होताना हे पूर्णपणे करमुक्त असतात. हे बाँड्स भारत सरकारकडून जारी केले जात असल्यामुळे यामध्ये जोखीम शून्य असते.

मात्र, हे बाँड्स सरकारच्या गरजेनुसार RBI कडूनच जारी केले जातात. हे बाँड्स शेअर बाजारातसुद्धा ट्रेड होतात. त्या वेळच्या सरासरी किमतीच्या आधारावर RBI त्यांची किंमत निश्चित करते.

4. 11 महिन्यांच्या योजना

लहान सोन्याच्या दुकानांपासून ते मोठ्या ज्वेलरी कंपन्यांपर्यंत सगळीकडे अकरा महिन्यांच्या सोन्याच्या बचत योजना उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्ही दर महिन्याला काही ठराविक रक्कम भरत असता.

त्यानंतर मुदत पूर्ण झाल्यावर काही व्यापारी एका महिन्याची रक्कम बोनस म्हणून देतात, तर काही जण आपण दर महिन्याला भरलेल्या रकमेप्रमाणे आपल्या खात्यात सोनं जमा करतात.

या सोन्यातूनम आपण संबंधित ज्वेलरकडून दागिनाही घेऊ शकतो.

(हा लेख केवळ गुंतवणुकीचे कोणते पर्याय उपलब्ध असतात याची माहिती देण्यासाठी आहे. गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञाशी किंवा तुमच्या गुंतवणूक सल्लागाराशी सल्ला मसलत करावी.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)