डिमॅट खात्याचा उपयोग काय असतो, ते कसं काढतात?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, कोटेरू श्रावणी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अलीकडच्या काळात देशात डिमॅट खात्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. डिसेंबर 2024 अखेरपर्यंतच्या आकडेवारीनुसार ही संख्या 17 कोटींच्या पुढे गेली आहे.
पण अनेकांना अजूनही डिमॅट अकाउंट म्हणजे नेमकं काय, ते कशासाठी आवश्यक असतं, बँक अकाउंट आणि डिमॅट अकाउंटमध्ये नेमका काय फरक आहे, शेअर बाजारात गुंतवणूकीसाठी डिमॅट अकाउंट आवश्यक असतं का, त्याचे फायदे काय आहेत, असे प्रश्न पडतात.
या प्रश्नांचीच उत्तरं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात.
डिमॅट अकाउंट म्हणजे काय?
डिमॅट अकाउंट हे 'डिमटेरियलायझेशन अकाउंट' या शब्दाचं संक्षिप्त रूप आहे. ते बँक अकाउंटसारखंच असतं. जसे तुम्ही तुमचे पैसे बँकेत ठेवता, तसेच तुम्ही कंपनीचे शेअर्स, बाँड्स, म्युच्युअल फंड, विमा, ईटीएफ आणि सिक्युरिटीज मार्केटमधून खरेदी केलेल्या इतर सिक्युरिटीज इलेक्ट्रॉनिक स्वरूपात या अकाउंटमध्ये जमा करून ठेवू शकता.
सिक्युरिटीज मार्केटमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी हे अकाउंट अत्यंत आवश्यक आहे.
पूर्वी गुंतवणूकदार खरेदी केलेले शेअर्स कागदी स्वरूपात जवळ बाळगत असतं.

फोटो स्रोत, Getty Images
त्यातून कधीकधी शेअर खरेदी करण्यात विलंबही व्हायचा. कागदी स्वरुपात व्यवहार व्हायचे तेव्हा अशा चुका होत असत. शिवाय, त्यासाठी बराच वेळ लागत असे. सेकंडरी मार्केट ऑपरेशन्समध्ये, कधीकधी स्वाक्षऱ्यांमध्ये फरक आणि बनावट प्रमाणपत्रेही असायची. काही असेदेखील लोक होते जे ही प्रमाणपत्रे चोरी करायचे.
गुंतवणूकदारांना यावर फारसा विश्वास नव्हता. कारण त्यांना ते मिळण्यास उशीर व्हायचा. शिवाय, शेअर सर्टिफिकेट छापण्याचा आणि गुंतवणूकदारांना पाठवण्याचा खर्चही जास्त होता.
या पार्श्वभूमीवर, 1996 मध्ये भारतात डिमॅट अकाउंट सिस्टम सुरू करण्यात आली. यामुळे कागदी स्वरूपात शेअर्स पाठवण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबली. तसेच, ही प्रक्रिया अधिक जलद आणि विश्वासार्ह बनली.
डिमॅट खातं कसं उघडायचं?
ज्यांना बाजारात गुंतवणूक करायची आहे; त्यांनी प्रथम डिमॅट खातं कसं उघडायचं, हे जाणून घेतलं पाहिजे.
पूर्वी, डिमॅट खातं उघडणं ही एक वेळखाऊ आणि लांब पल्ल्याची प्रक्रिया असायची. तुम्हाला डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) कडे एक मोठा अर्ज भरावा लागायचा. डिपॉझिटरी पार्टिसिपंट करारावर स्वाक्षरी करावी लागायची आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागायची. तुम्हाला तुमचा पत्ता, ओळखीचा पुरावा, बँक खात्याचे तपशील आणि पॅन कार्डच्या प्रती स्वतः प्रमाणित कराव्या लागायच्या आणि मग त्या 'डीपी'ला द्याव्या लागायच्या.
पडताळणी प्रक्रियेदरम्यान, 'डीपी' अधिकारी या सर्व कागदपत्रांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी करत असत. यामुळे, 'डीपी' खातं सक्रिय होण्यासाठी पाच ते सहा दिवस लागायचे. परंतु आता सर्व काही ऑनलाइन झालं आहे.
'एसबीआय'ने एसबीआय सिक्युरिटीज डिमॅट खात्याच्या तपशीलांमध्ये म्हटलं आहे की, वैध पॅन कार्ड, आधारशी लिंक केलेला वैध मोबाइल नंबर आणि ईमेल ऍड्रेससह डिमॅट खातं ऑनलाइन माध्यमातून उघडता येतं.
डिमॅट खातं उघडल्यानंतर...
डिमॅट खातं उघडल्यानंतर, तुम्हाला तुमच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडून खालील तपशील प्राप्त होतात.
1. डिमॅट खाते क्रमांक, ज्याला 'बेनिफिशियरी आयडी' असंही म्हणतात.
2. डिपॉझिटरी पार्टिसिपंट आयडी प्राप्त होतो. 'डीपी आयडी' हा डिमॅट खाते क्रमांकाचा देखील एक भाग असतो.

फोटो स्रोत, Getty Images
3. पॉवर ऑफ अॅटर्नी करार (पीओए) क्रमांक. गुंतवणूकदार स्टॉक ब्रोकरला या करारात नमूद केलेल्या सूचनांनुसार त्याच्या खात्याचं व्यवस्थापन करण्यास अधिकृतपणे परवानगी देतो.
तुम्हाला डिमॅट आणि ट्रेडिंग खात्यांसाठी एकमेव असा लॉगिन आयडी आणि पासवर्ड देखील मिळतो.
सेबीचे नियम काय आहेत?
डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) मध्ये बँका, स्टॉक ब्रोकर आणि वित्तीय संस्थांचा समावेश होतो. हे नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) किंवा सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे नियुक्त केले जातात.
डिपॉझिटरी पार्टिसिपंट हे वर उल्लेख केलेल्या दोन्ही संस्था आणि गुंतवणूकदारांमध्ये एखाद्या दुव्याप्रमाणे काम करतात.

फोटो स्रोत, Getty Images
तुम्ही डीपींसोबत डीमॅट खाते उघडू शकता.
तसेच, गुंतवणूकदार बँक खात्यांप्रमाणेच एकापेक्षा जास्त डीमॅट खाती उघडू शकतो.
मात्र, सर्व डीमॅट खाती एकाच पॅन कार्डशी जोडलेली असली पाहिजेत. डीमॅट खाते उघडताना मूळ पॅन कार्ड सादर करणं अत्यंत आवश्यक आहे.
काय फायदे आहेत?
डिमॅट खात्यांचे अनेक फायदे आहेत. बँका आणि स्टॉक ब्रोकिंग कंपन्यांच्या वेबसाइटवर देखील याबाबतची माहिती उपलब्ध करुन दिलेली आहे.
एचडीएफसी बँकेने त्यांच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या खात्यात तुम्ही हवे तितके शेअर्स साठवू शकता. तसेच, शेअर्स जलद गतीने ट्रान्सफर करण्यासाठी तुम्ही डिमॅट खात्याचा वापर करु शकता.

फोटो स्रोत, Getty Images
स्मार्टफोन किंवा लॅपटॉप वापरून डिमॅट खाते अॅक्सेस करता येते. ते तुम्हाला कुठूनही, कधीही शेअर्स ट्रेड करण्याची परवानगी देते.
डिमॅट खात्यात नामांकनाचीही सुविधा आहे. डिपॉझिटरीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच, तुमच्यानंतर तुमच्या शेअर्सचे मालक कोण असतील, याचे नामांकन करण्याची प्रक्रिया दिलेली आहे. गुंतवणूकदाराला काही झालं तर खाते नामांकित करण्यात आलेल्या व्यक्तीला दिलं जातं. यामुळे कायदेशीर वाद देखील टाळता येतात.
तुम्ही एकाच खात्यात विविध प्रकारच्या सिक्युरिटीज, जसे की इक्विटीज, डिबेंचर्स, बाँड्स, सरकारी सिक्युरिटीज, सॉवरेन गोल्ड बॉन्ड्स आणि म्युच्युअल फंड ठेवू शकता.
ट्रेडिंग अकाउंट असणं आवश्यक आहे का?
तुम्ही खरेदी केलेले शेअर्स साठवण्यासाठी डिमॅट अकाउंट वापरलं जातं, तर स्टॉक एक्सचेंजवर सिक्युरिटीजची खरेदी आणि विक्री करण्यासाठी 'ट्रेडिंग अकाउंट' वापरलं जातं.
ज्यांना बाजारात गुंतवणूक करायची आहे, त्यांच्याकडे बँक अकाउंट, डिमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट असणं आवश्यक आहे.
जेव्हा तुम्ही कंपन्यांमध्ये शेअर्स खरेदी करता, तेव्हा तुम्ही ते तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये जमा करू शकता. स्टॉक एक्सचेंजवर शेअर्सचे ट्रेडींग करण्यासाठी हे अकाउंट पुरेसं नाही. यासाठी ट्रेडिंग अकाउंटही आवश्यक आहे.

फोटो स्रोत, Getty Images
उदाहरणार्थ, जर तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले तर ते डिमॅट अकाउंटमध्ये जमा केले जातात. नंतर, जर तुम्हाला काही महिन्यांनी ते विकायचे असतील तर ते तुमच्या डिमॅट अकाउंटमधून डेबिट केले जातात. तुम्ही ते तुमच्या ट्रेडिंग अकाउंटद्वारे बाजारात विकू शकता. त्या व्यवहाराशी संबंधित पैसे त्यांच्याशी जोडलेल्या बँक अकाउंटमध्ये जमा केले जातात.
गुंतवणूकदारांच्या फायद्यासाठी, अलीकडेच थ्री-इन-वन अकाउंट्सही ऑफर केले जात आहेत. म्हणजेच, डिमॅट अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट आणि बँकेचं बचत अकाउंट हे सर्व एकत्रितच असतील.
मात्र, तुम्ही डीमॅट खातं नसतानाही ट्रेडिंग खातं उघडू शकता. तुम्ही केवळ फ्युचर्स आणि ऑप्शन्स ट्रेडिंगसाठी 'ट्रेडिंग खातं' घेऊ शकता. मात्र, हे लक्षात ठेवलं पाहिजे की हे खातं तुम्हाला स्टॉक ट्रेड करण्याची परवानगी देत नाही.
डिमॅट खात्यासाठी शुल्क भरावं लागेल का?
भारतातील डिमॅट खात्याच्या शुल्कामध्ये वार्षिक देखभाल शुल्क (Annual Maintenance Fees), कस्टडी शुल्क (Custody Charges) आणि व्यवहार शुल्क (Transaction Charges) यांचा समावेश आहे.
डिमॅट खातं उघडताना देखील शुल्क आकारलं जातं.
तुम्ही निवडलेल्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटवर अवलंबून असलेले वार्षिक देखभाल शुल्क 300 ते 800 रुपयांच्या दरम्यान असते, अशी माहिती 'पीटीआय' या वृत्तसंस्थेनं दिली आहे.
'सेबी'च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर तुमचा पोर्टफोलिओ 4 लाख रुपयांपर्यंत असेल, तर बेसिक सर्व्हिस डिमॅट खात्यासाठी वार्षिक देखभाल शुल्क आकारलं जाणार नाही.
जर पोर्टफोलिओ 4 लाख ते 10 लाख रुपयांच्या दरम्यान असेल, तर 100 रुपये भरावे लागतील. जर ते 10 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर बेसिक सर्व्हिस डिमॅट खाते रेग्यूलर डिमॅट खात्यात रूपांतरित केलं जाईल.
जर तुमचे बेसिक सर्व्हिस डिमॅट खातं असेल, तर इलेक्ट्रॉनिक स्टेटमेंटसाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. जर तुम्हाला हार्ड कॉपीमध्ये स्टेटमेंट हवं असेल, तर तुम्हाला प्रति स्टेटमेंट 25 रुपये द्यावे लागतील.
'डीपी' कसा निवडावा?
बचत खातं उघडण्यासाठी बँकेची निवड करण्याप्रमाणेच, तुम्ही 'डीपी' देखील निवडू शकता. 'डीपी' निवडताना आपण कोणत्या मुख्य गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे, हे पाहूयात.
सोय: त्यांचं ऑफिस तुमच्या घराच्या अथवा ऑफिसच्या नजीक आहे का, याची खात्री करा.

फोटो स्रोत, Getty Images
शुल्क: डीपीसाठीचं सेवा शुल्क आणि पुरवल्या जाणाऱ्या सेवा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे.
डिमॅट खात्यात सिक्युरिटीजसाठी 'मिनिमम बॅलेन्स' असणं आवश्यक आहे का?
नाही. ठेवीसाठी 'मिनिमम बॅलेन्स' आवश्यक नाही. तुमच्या डिमॅट खात्यात शून्य बॅलेन्स असला तरीही काही हरकत नसते.
डिमॅट खातं बंद करायचं आहे का?
डिमॅट खाते बंद करण्यासाठी, तुम्हाला सर्वप्रथम त्या खात्यातील सर्व सिक्युरिटीज आणि फंड्स क्लिअर करावे लागतील. त्यानंतर, तुम्ही डिमॅट खातं उघडणाऱ्या 'डीपी'शी संपर्क साधावा लागेल. 'डीपी'कडे 'क्लोजर ऍप्लिकेशन फॉर्म' भरावा लागेल.
तुम्हाला आवश्यक कागदपत्रे जसे की पॅन कार्डची प्रत, पत्त्याचा पुरावा, ओळखीचा पुरावा सादर करावा लागेल. जर तुमच्या डिमॅट खात्यावर काही देणी किंवा शुल्क प्रलंबित असतील तर खाते बंद करण्यापूर्वी ती रक्कम चुकती करावी लागेल.
डीपी तुमचा क्लोजर फॉर्म आणि कागदपत्रांची तपासणी करेल आणि जर सर्व काही व्यवस्थित असेल तर ते खातं बंद करण्याची प्रक्रिया सुरू करतील.
डिमॅट अकाउंट्स का वाढले आहेत?
'एसबीआय सिक्युरिटीज'ने त्यांच्या ब्लॉगवर नमूद केलेल्या माहितीनुसार, कोरोना महासाथीनंतर भारतातील डिमॅट अकाउंट्समध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
याबाबत, म्युच्युअल फंड कंपनीत शाखा प्रमुख म्हणून काम करणारे कल्याण म्हणाले की, "कोरोना काळात बरेच लोक शेअर मार्केट आणि गुंतवणुकीबद्दल अधिक जागरूक झाले आहेत."

फोटो स्रोत, Getty Images
"कोरोनानंतर, अनेक कर्मचारी घरून काम करत होते. त्यावेळी कर्मचाऱ्यांमध्ये शेअर मार्केटबद्दल जागरूकता वाढण्यास अनेक कारणांनी हातभार लावला. त्यावेळी त्यांनी उत्पन्नाचा दुसरा स्रोत म्हणून शेअर मार्केटची निवड केली. त्यांना जाणवलं की ते गुंतवणुकीद्वारे पैसे कमवू शकतात. नवीन आयपीओ आणि सोशल मीडियावरील जागरूकता यामुळेही बाजारात गुंतवणूक वाढण्यास हातभार लागला आहे. कोरोनानंतर बाजारातील रिकव्हरीदेखील चांगली झालेली असल्याने, अनेक लोकांनी बाजारात गुंतवणूक करण्यात रस दाखवला. या सर्वांमुळे डिमॅट अकाउंट्समध्ये वाढ होत आहे," असं ते म्हणाले.
पुढे ते सांगतात की, "बरेच लोक कमी वेळात पैसे कमवू इच्छितात. कारण मार्केट वाढत आहेत. बरेचदा मार्केट त्यांना इप्सित असलेलं ध्येय गाठत नाहीत. मात्र दीर्घकाळात, ते बाजारात चांगला नफा कमवू शकतात."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











