पीपीएफमधून निवृत्तीनंतर तुम्हाला दोन कोटींपेक्षा जास्त रुपये कसे मिळतील?

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पीपीएफ ही बचतीची एक खूप जुनी पण लोकप्रिय पद्धत आहे.
    • Author, बीबीसी प्रतिनिधी

कोट्याधीश बनायची इच्छा कुणाला नसते? पण लवकरात लवकर जास्तीचा परतावा मिळवण्याची इच्छा ही तेवढीच जोखमीची देखील ठरू शकते.

पण जर का तुम्हाला अजिबात जोखीम घ्यायची नसेल, तर पब्लिक प्रोव्हिडंट फंड म्हणजे पीपीएफ हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.

पीपीएफ ही बचतीची एक खूप जुनी पण लोकप्रिय पद्धत आहे. कारण तुम्हाला त्यात गुंतवलेल्या रकमेवर कोणत्याही प्रकारचा कर भरण्याची गरज पडत नाही. ही योजना तुम्हाला करोडपती देखील बनवू शकते.

पण पीपीएफमध्ये गुंतवणूक कशी करायची आणि त्याचे फायदे काय आहेत? शिवाय, त्यात गुंतवलेल्या पैशावर, मिळालेल्या व्याजावर आणि मॅच्युरिटीनंतर मिळालेल्या रकमेवर कर देण्याबाबत काय नियम आहेत? ते जाणून घेऊयात.

पब्लिक प्रोव्हिडंट फंड म्हणजे नेमकं काय?

खरंतर पीपीएफ म्हणजे 'पब्लिक प्रोविडंट फंड' म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, हा एक दीर्घकालीन गुंतवणुकीचा अतिशय उत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे.

कारण बचतीसोबत कर सुद्धा वाचवणारी म्हणजेच दुहेरी फायदा देणारी ही योजना आहे.

भारत सरकारने लोकांच्या दीर्घकालीन बचतीसाठी सुरू केलेल्या या योजनेमुळे, निवृत्तीनंतरचं आयुष्य सुखकर घालवण्यासाठी, थोडीफार रक्कम हाताशी जमा करून ठेवण्याचा विचार करणाऱ्या लोकांसाठी हा एक सुरक्षित मार्ग आहे.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पीपीएफ म्हणजे 'पब्लिक प्रोविडंट फंड' म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, हा एक दीर्घकालीन गुंतवणुकीचा अतिशय उत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे.

यात तुम्ही गुंतवलेली रक्कम सुरक्षित तर राहतेच पण त्यावर आकर्षक व्याजदेखील मिळते. शिवाय, गुंतवलेली रक्कम करमुक्त असते आणि व्याज दरही बाजारातील अन्य योजनांच्या तुलनेत चांगला असतो.

त्यामुळे, दीर्घकालीन बचतीसाठी आणि निवृत्तीनंतरच्या काळासाठी सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर पीपीएफ हा नक्कीच एक आदर्श पर्याय आहे.

खातं उघडण्यासाठी वयाची कोणतीही अट नसते. त्यामुळे कोणत्याही वयाची व्यक्ती खातं उघडू शकते. भारत सरकार दर तीन महिन्याला पीपीएफ आणि इतर बचत योजनांवर व्याजदराची घोषणा करत असते.

पीपीएफचे नियम

पीपीएफमध्ये गुंतवणूक करण्याचे काही नियम असतात.

पीपीएफमध्ये दरवर्षी कमीत कमी 500 रूपये तर जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतात. या योजनेवर सध्या 7.1 टक्के दराने व्याज मिळत आहे.

हे खाते 15 वर्षांत मॅच्युअर होते. अनेक जण 15 वर्षांनंतर पैसे काढून खर्च करतात. तर काही पीपीएफची मुदत वाढवून घेतात.

तुम्ही पीपीएफ खात्यात दरमहिन्याला पैसे टाकू शकता किंवा वर्षभराची सगळी रक्कम एकदाच भरू शकता.

पीपीएफ खाते 15 वर्षांचे असते, म्हणजे हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमचे सगळे पैसे काढू शकता.

पण तुम्हाला कोणत्याही कारणासाठी अचानक पैसे लागले तर सहा वर्षानंतर पीपीएफ खात्यातील काही पैसे काढू शकता.

पैसे काढताना तुमच्या खात्यात किती रक्कम जमा झाली आहे, यावर पैसे काढण्याची मर्यादा ठरत असते.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पीपीएफमध्ये दरवर्षी कमीत कमी 500 रूपये तर जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतात.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

जर तुम्ही तुमचं पीपीएफ खातं मॅच्युरिटीपुर्वीच बंद केलं, तर तुम्हाला मिळणारं व्याज कमी होऊ शकतं. त्यामुळे पैसे काढण्याआधी नीट विचार करूनच ठरवा. हे पैसे काढण्यासाठी, तुम्हाला संबंधित बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज करावा लागतो.

तुम्ही पीपीएफचं जॉइंट अकाउंट काढू शकत नाही, कारण पीपीएफ खातं हे एकच व्यक्ती फक्त तिच्याच नावानं काढू शकते. अल्पवयीन व्यक्तीचं पीपीएफ खातं हे त्याच्या एका पालकासोबत उघडता येतं.

तुम्ही तुमच्या पीपीएफ खात्यासाठी कोणालाही नॉमिनेट करू शकता. तुमचं पीपीएफ खातं एका पोस्ट ऑफिस किंवा बँक शाखेतून दुसऱ्या शाखेतही हस्तांतरित करता येतं.

15 वर्षांपूर्वी खाते बंद करण्यासाठी, खाते 5 वर्षे चालवणे आवश्यक आहे. दरवर्षी तुम्ही तुमच्या पीपीएफ खात्यात कमीत कमी 500 रूपये जमा नाही केले तर तुमचं खातं बंद होऊ शकतं.

मात्र, दंड भरून ते तुम्हाला पुन्हा चालू करता येतं. खात्यात जमा केलेली रक्कम, मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीनंतर मिळालेली रक्कम करमुक्त असते.

पीपीएफ खात्यातील रक्कमेवरून तुम्हाला तिसऱ्या वर्षापासून कर्ज घेण्याची सुविधा मिळते, मात्र यात काही अटी असतात.

पीपीएफ खातं कसं उघडावं?

भारतीय नागरिक असलेली कोणतीही व्यक्ती पीपीएफमध्ये गुंतवणूक करू शकते. तुम्हाला तुमच्या जवळच्या कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ऑफलाइन पद्धतीनं पीपीएफ खातं उघडता येऊ शकतं.

तसेच आजच्या ऑनलाइन जगात काही बँकांमध्ये तुम्ही घरबसल्या पीपीएफ खातं उघडू शकता. पीपीएफ खातं उघडण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते. ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, पॅन कार्डची गरज असते.

राहत्या घराचा पुरावा लागतो. ज्यात तुम्ही तुमच्या घराचं वीज बिल, रेशन कार्ड हे दाखवू शकता. पासपोर्टच्या आकाराचे फोटो तसेच खातं उघडण्यासाठीचा फॉर्म वैयक्तिक माहिती भरून द्यावा लागतो.

पीपीएफच्या माध्यमातून उभारू शकता दोन कोटीपेक्षा जास्तीचा निधी

तुम्हाला माहिती आहे का, की पीपीएफच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या निवृत्तीनंतर दोन कोटी रूपयांपेक्षा जास्तीचा निधी उभारू शकता. पीपीएफ योजना 15 वर्षांत मॅच्युअर होते.

अनेक जण 15 वर्षांनंतर पैसे काढून खर्च करतात. पण निवृत्तीनंतर दोन कोटी रूपयांपेक्षा जास्तीचा निधी मिळवायचा असेल तर मॅच्युअर झाल्यानंतर तुम्हाला त्याची मुदत अजून पुढे वाढवावी लागते.

जेव्हा जेव्हा तुम्हाला पीपीएफ योजनेची मुदत वाढवायची असेल, तेव्हा ती मॅच्युअर होण्याच्या एक वर्ष आधी तुम्हाला त्यासाठी अर्ज करावा लागतो.

ज्या ठिकाणी तुम्ही पीपीएफ खातं उघडलेलं असतं, तिथेच हा अर्ज भरून जमा करावा लागतो. जर ठरलेल्या मुदतीच्या आत तुम्ही हा अर्ज केला नाही, तर तुम्हाला खात्यात पैसे भरता येणार नाहीत.

पीपीएफ खाते म्यॅचुअर झाल्यानंतर 5-5 वर्षांच्या टप्प्यात तुम्हाला त्याची मुदतवाढ करता येते.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पीपीएफच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या निवृत्तीनंतर दोन कोटी रूपयांपेक्षा जास्तीचा निधी उभारू शकता.

निवृत्तीनंतर दोन कोटी रूपयांपेक्षा जास्तीचा निधी मिळवण्यासाठी तुम्हाला दर वर्षी पीपीएफ खात्यात दिड लाख रूपये गुंतवावे लागतील, म्हणजे महिन्याला 12 हजार 500 रूपये जमा करावे लागतील.

त्यानंतर 5-5 वर्षांच्या टप्प्यानं चार वेळी तुम्हाला खात्याची मुदत वाढवावी लागेल. अशा प्रकारे तुमच्या पीपीएफ खात्याचा कालावधी एकूण 35 वर्षांचा होईल.

जर तुम्ही असं केलं, तर 35 वर्षामध्ये एकूण 52 लाख 50 हजार रूपयांची गुंतवणूक होईल. यावर तुम्हाला तिप्पट व्याज मिळेल, म्हणजे जवळपास 1 कोटी 80 हजार रूपये.

म्हणजेच जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षीपासून जर पीपीएफ मध्ये गुंतवणूक करायला सुरूवात कराल आणि ती 35 वर्षांपर्यंत चालू ठेवली, तर तुम्ही जेव्हा 60 वर्षांचे व्हाल तेव्हा तुमच्याकडे 2 कोटी 32 लाख रूपये एवढी रक्कम निवृत्तीनंतर मिळू शकेल.

अशा प्रकारे तुम्हाला मॅच्युरिटीवर दोन कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळून शकते.

(हा लेख केवळ गुंतवणुकीचे कोणते पर्याय उपलब्ध असतात याची माहिती देण्यासाठी आहे. गुंतवणूक करण्याआधी तुमच्या तज्ज्ञाशी किंवा गुंतवणूक सल्लागाराशी सल्ला मसलत करावी.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.