इंडेक्स फंड म्हणजे काय? म्युच्युअल फंड्स आणि इंडेक्स फंड्समध्ये नेमका फरक काय?

इंडेक्स फंड

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, तुषार कुलकर्णी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवायचा आहे, पण नेमकं कुठून सुरू करायचं हे माहीत नाहीये? तेलाच्या किमती पडणे, कधी रशिया-युक्रेन युद्ध, कधी टॅरिफ अशा गोष्टींमुळे आपण कमावलेला घामाचा पैसा उडून जाईल अशी भीती वाटते? भीती वाटत नाही पण नेमकं कुठे पैसे टाकायचे हे लक्षात येत नाही. नेमका सुरक्षित पर्याय कोणता हे लक्षात येत नसेल तर प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरन बफे यांचा हा सल्ला ऐका.

'तुमच्याजवळ असलेल्या पैशांपैकी बहुतांश रक्कम सर्वांत कमी किमतीच्या S&P 500 इंडेक्स फंडमध्ये टाका.'

दरवर्षी वॉरन बफे त्यांची कंपनी बर्कशायर हाथवे इनकॉपोरेशनच्या गुंतवणूकदारांना एक पत्र लिहितात. त्या पत्रात त्यांनी हा सल्ला दिला आहे.

बफे यांनी आपल्या मृत्यूपत्रात पुढील गुंतवणूक कशी करायची हे सांगताना असे म्हटले आहे की, 'बहुतांश रक्कम ही इंडेक्स फंडमध्ये टाका.'

त्यांचा हा सल्ला अनेक जण अगदी शिरोधार्य मानतात. याचे अर्थात सर्वांत मोठे कारण आहे ते म्हणजे तो वॉरन बफेंचा सल्ला आहे.

पण त्याचबरोबर अनेक जण या कारणासाठी देखील हा सल्ला ऐकतात, याचे कारण म्हणजे मोठ्यातील मोठे गुंतवणूकदार हे संख्याशास्त्रानुसार सिद्ध करतात की, समजा तुम्ही 30 वर्षं इंडेक्स फंडमध्ये गुंतवणूक केली तर त्यातून मिळणारा परतावा हा कोणत्याही गुंतवणूकदाराने म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केटमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या तुलनेत जास्त असेल.

जगातील केवळ 1 टक्का गुंतवणूकदारच इंडेक्स फंडमध्ये मिळणाऱ्या परताव्यापेक्षा जास्त परतावा मिळवतात.

वॉरन बफे

फोटो स्रोत, Getty Images

इंडेक्स फंडच्या गुंतवणुकीबाबत प्रसिद्ध (इंडेक्स फंड) गुंतवणूकदार जे. एल. कॉलिन्स यांनी त्यांचे पुस्तक 'सिंपल पाथ टू वेल्थ' या पुस्तकात इंडेक्स फंडबाबत काय लिहिलंय हे आपण पाहू.

"असं देखील मानणाऱ्यांचा एक गट आहे की, त्यांना वाटतं दिग्गज गुंतवणकूदार जसं की वॉरन बफे, पीटर लिंच आणि मायकल प्राईस हे केवळ नशीबवान आहेत. माझ्या सारख्या इंडेक्स फंडमध्येच गुंतवणूक करणाऱ्या हाडाच्या गुंतवणूकदाराला देखील हे पटणं जरा अवघडच आहे.

"पण असं असलं तरी संशोधन हेच सांगतं की, बड्या गुंतवणूकदारांपैकी 1 टक्का गुंतवणूकदारच इंडेक्स फंडच्या परताव्याहून अधिक परतावा मिळवतात. हे देखील सांगणं अवघड आहे की, हे त्यांचं कौशल्य आहे की नशीब," असं जे. एल. कॉलिन्स आपल्या पुस्तकात सांगतात.

शेअर बाजारातले हे चढ-उतार, बातम्या किंवा सार्वजनिक चर्चेच्या माध्यमातून आपल्या कानावर पडत असतात

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शेअर बाजारातले हे चढ-उतार, बातम्या किंवा सार्वजनिक चर्चेच्या माध्यमातून आपल्या कानावर पडत असतात

जर हा पैसे मिळवण्याचा 'हमखास' मार्ग आहे असं स्वतः मोठे गुंतवणूदारच सांगत असतील तर मग इंडेक्स फंड हे स्वतंत्रपणे निवडलेल्या शेअर्सपेक्षा अधिक लोकप्रिय का नाहीत? याची अनेक कारणं आहेत त्यापैकी एक मुख्य कारण कॉलिन्स यांना वाटतं की इंडेक्स फंड हे 'अॅव्हरेज रिटर्नस' देतात.

म्हणजे 11 किंवा 12 टक्के. आणि आपण शेअर बाजारात पैसे गुंतवून केवळ 12 टक्केच परतावा घेतोय ही गोष्ट अर्थातच काही जणांना कमीपणाची वाटते. हुशार लोकांना हे पचवणं अवघड जातं की इंडेक्स फंडमध्ये असलेल्या सर्व कंपन्यांच्या सरासरीपेक्षा आपण चांगली कामगिरी करू शकत नाही.

हे सर्व वाचल्यावर तुम्ही म्हणाल की इंडेक्स फंडचं महत्त्व तर कळलं पण इंडेक्स फंड म्हणजे नेमकं काय? त्याची उदाहरणं काय? हे इंडेक्स फंड प्रकरण आलं तरी कुठून? याची आपण या लेखात चर्चा करू.

इंडेक्स फंड म्हणजे काय?

इंडेक्स फंड म्हणजे हा शेअर मार्केटमधील इंडेक्सचा एक आरसाच असतो असं इनवेस्टोपेडिया सांगतं. जसा बाजार चढतो किंवा उतरतो त्याप्रमाणे इंडेक्स फंडमध्ये असलेल्या कंपन्यात बदल होतो. हे एक प्रकारे त्या मार्केटचे अनुकरणच असते.

जसं की, अमेरिकेचे एक्सचेंज S&P 500, NASDAQ, DOW Jones हे आहेत. एका एक्सचेंजमध्ये विविध कंपन्या सहभागी असतात आणि त्यांच्या कामगिरीचे त्या त्या दिवसाचे एक मूल्य असते. भारतातील एक्सचेंजचे उदाहरण NSE, BSE हे आहेत.

आपण जेव्हा म्हणतो की, आज स्टॉक मार्केट कोसळलं किंवा वधारलं तर तेव्हा आपण जो आकडा सांगतो तोच असतो इंडेक्स किंवा निर्देशांक. आपण म्हणतो की, आज 'निफ्टी-50' हा 25,000 अंकाच्या वर गेला. तो त्या दिवशीच्या इंडेक्सची किंमत असते.

इंडेक्स फंड

फोटो स्रोत, Getty Images

इंडेक्स फंड नेमकं कसं काम करतं हे समजून घेण्यासाठी बीबीसी मराठीने मुंबईस्थित अर्थ अभ्यासक कौस्तुभ जोशी यांच्याशी संपर्क साधला.

कौस्तुभ सांगतात, "सर्वसाधारणपणे म्युच्युअल फंडाचं नियोजन एका फंड मॅनेजरकडून केलं जात असतं. यात गुंतवणुकदारांनी गुंतवलेल्या पैशांची गुंतवणूक कुठे आणि कशी करायची हे फंड मॅनेजर ठरवतो किंवा ठरवते. याला अ‍ॅक्टिव्ह फंड व्यवस्थापन म्हणतात. याच्या उलटं असतं पॅसिव्ह फंड व्यवस्थापन.

"यात इंडेक्स फंडांचा समावेश असतो. इंडेक्स म्हणजेच शेअर बाजाराचा निर्देशांक. उदाहरणार्थ, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आहे सेन्सेक्स, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक आहे निफ्टी.

"सेन्सेक्समध्ये आघाडीच्या 30 कंपन्या असतात, तर निफ्टीमध्ये राष्ट्रीय शेअर बाजारातील आघाडीच्या 50 कंपन्या असतात," असं कौस्तुभ सांगतात.

इंडेक्स फंड म्हणजे हा शेअर मार्केटमधील इंडेक्सचा एक आरसाच असतो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इंडेक्स फंड म्हणजे हा शेअर मार्केटमधील इंडेक्सचा एक आरसाच असतो

एक उदाहरण घेऊन आपण हे समजून घेऊ.

जानेवारी 2005 मध्ये निफ्टी-50चा इंडेक्स 2008 इतका होता. समजा, तुम्ही तेव्हा ठरवलं असतं की, आपल्याला इंडेक्स फंडमध्ये गुंतवणूक करायची आहे आणि तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले असते तर तुम्हाला तेव्हाच्या किमतीनुसार एक लाख रुपयांत 50 युनिट मिळाले असते.

आता वीस वर्षानंतर तुम्ही ते 50 युनिट विकायचे ठरवले. तर आता म्हणजेच 2025 मध्ये निफ्टी-50 ची आजची किंमत किती आहे ते पाहा. आज निफ्टी-50 चा निर्देशांक 25,111 इतका आहे.

जर आपण ते 50 युनिट आज विकले तर त्याची किंमत 12,25,000 इतकी होते. म्हणजेच 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला ही रक्कम मिळाली.

अर्थात, हा व्यवहार बाजाराच्या मूल्यावर अवलंबून आहे. जर 20 वर्षांत बाजाराचा निर्देशांक जर कमीच झाला असता, तर ही रक्कम मिळाली नसती.

(हे केवळ समजून घेण्यासाठी आहे.)

इंडेक्स फंडची कल्पना आली कुठून ?

इंडेक्स फंड याचे स्वरूप जर आपल्या लक्षात आले असेल तर आता आपण हे पाहू की इंडेक्स फंडची कल्पना नेमकी कुठून आली?

1975 मध्ये जेव्हा जॉन (जॅक) बॉगल या फंड मॅनेजरनी अशी कल्पना मांडली की शेअर बाजारात खूप चढाव उतार होत असतात. त्यामुळे शेअर बाजारातून हमखास परतावा मिळेल आणि जोखीम अत्यंत कमी होईल असे म्युच्युअल फंड्स आपण विकले तर?

जॉन (जॅक) बॉगल

जॉन बॉगल यांच्या या कल्पनेची थट्टाच झाली. अनेकांना वाटलं ते तर गंमतच करत आहेत. कारण शेअर बाजार म्हणजे जोखीम आणि जो जोखीम उचलतो त्याच व्यक्तीला त्याची फळं चाखता येतात अशी त्या पूर्वी एक धारणा होती. पण बॉगल यांनी केवळ इंडेक्स फंडची सुरुवातच नाही केली तर अनेकांना अल्प जोखिमेचा पर्याय देऊन एक क्रांती घडवली.

त्यांचा गौरव करताना वॉरन बफे यांनी म्हटले होते 'अमेरिकन गुंतवणूकदारांसाठी सर्वाधिक काम कुणा एका व्यक्तीने केलं असेल तर ते जॅकच आहेत. सामान्य गुंतवणूकदारांनी शेअर मार्केटमध्ये लावलेले अब्जावधी डॉलर्स पुन्हा त्यांच्या खिशात टाकण्याचे काम जॅक यांनी केले आहे.'

इंडेक्स फंड

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

1974 साली बॉगल यांनी व्हॅनगार्डची स्थापना केली आणि 1976 ला इंडेक्स फंड सामान्य माणसांसाठी खुला झाला. बॉगल यांच्या प्रयोगाला 'व्हॅनगार्ड एक्सपेरिमेंट' म्हणण्यात आलं.

आज ना उद्या बॉगल यांनी केलेला प्रयोग बंद होणारच असं त्यांच्या टीकाकारांना वाटत होतं. त्यामुळे अनेकांनी तर याला 'बॉगल्स फॉली' असं देखील म्हटले.

पण इंडेक्स फंड केवळ अमेरिकेसाठीच नाही तर पूर्ण जगासाठी एक यशस्वी प्रयोग ठरला. आजमितीला हे ट्रिलियन डॉलर्सचे क्षेत्र बनले आहे.

इंडेक्स फंडमुळे अनेक मोठ-मोठ्या संशोधकांची, ब्रोकर्सची मक्तेदारी संपुष्टात आली आणि शेअर बाजार खऱ्या अर्थाने सामान्यांसाठी खुला झाला. शेअर मार्केटचे विश्लेषण आणि अभ्यास करण्यात जी संसाधने, वेळ आणि पैसा लागतो त्यात बचत झाली आणि तो पैसा गुंतवणुकदारांनाच परत मिळाला.

इंडेक्स फंडने अनेकांना अर्थार्जनाचा एक पर्याय खुला केला त्यामुळे बीबीसी न्यूजने त्यांच्या एका महत्त्वाच्या मालिकेत 'इंडेक्स फंड'चा समावेश केला होता. 'आधुनिक अर्थव्यवस्थेला आकार देणाऱ्या 50 गोष्टी' या मालिकेत ही माहिती देण्यात आली आहे. ती तुम्ही या ठिकाणी ऐकू शकता.

इंडेक्स फंडचा 'फंडा' काय असतो?

एक्विटी फंडांच्या तुलनेत इंडेक्स फंड चांगले का? हे समजवताना कौस्तुभ जोशी सांगतात, "अॅक्टिव्ह फंडमध्ये फंड मॅनेजरला व्यवस्थापन करावं लागत असल्यामुळे त्या फंडात एक्सपेन्स रेशो म्हणजे एक प्रकारचं शुल्क गुंतवणुकादाराला द्यावं लागतं. मात्र इंडेक्स फंडात अशा प्रकारचं व्यवस्थापन करावं लागत नसल्यामुळे त्याचा एक्सपेन्स रेशो फारच कमी असतो.

"शिवाय या फंडात कोणत्या शेअर्समध्ये पैसे गुंतवायचे याची निवड फंड मॅनेजर करत नाही. निर्देशांकाच्या प्रमाणात आपोआपच त्या त्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवले जातात. इंडेक्स फंडाचा शेअर बाजारातील चढउतारांशी थेट संबंध असतो. म्हणजे शेअर बाजार घसरला की इंडेक्स फंडाची कामगिरी घसरते आणि बाजार वधारला तर इंडेक्स फंडाची कामगिरी उंचावते," असं कौस्तुभ सांगतात.

"ज्या लोकांना इक्विटी प्रकारात दीर्घकालीन गुंतवणूक करायची, जास्त जोखीमदेखील घ्यायची नाही आणि टॉप कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करायची आहे, अशांसाठी इंडेक्स फंड हा चांगला पर्याय ठरतो."

अर्थात याची एक दुसरी बाजू देखील असल्याचे कौस्तुभ सांगतात, "जर शेअर बाजार वधारला तर तुमची गुंतवणूक वाढू शकते आणि कमी झाला तर तुमची गुंतवणूक कमी होऊ शकते. जपानमध्ये निक्कीचा निर्देशांक 1989 साली होता तो पूर्वपदावर येण्यासाठी 34 वर्षं लागले. पण हे जागतिक शेअर बाजारातील एकमेव उदाहरण आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.

"जर शेअर मार्केटच कोसळले तर इंडेक्स फंडमधील परताव्यावर परिणाम होतो," असं कौस्तुभ जोशी सांगतात.

(इंडेक्स फंड किंवा म्युच्युअल्स फंडमधील गुंतवणूक ही शेअर बाजाराच्या मूल्यावर अवलंबून असते. हा लेख केवळ गुंतवणुकीचे कोणते उत्पादनं उपलब्ध असतात याची माहिती देण्यासाठी आहे. गुंतवणूक करण्याआधी तुमच्या तज्ज्ञाशी किंवा गुंतवणूक सल्लागाराशी सल्ला मसलत करावी.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)