शेअर बाजार गडगडला असताना SIP सुरू ठेवाव्यात की बंद कराव्यात? तज्ज्ञ काय सांगतात?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अजित गठवी
- Role, बीबीसी न्यूज गुजराती
गेल्या काही वर्षांमध्ये म्युच्युअल फंडातील एसआयपीद्वारे गुंतवणूक करण्याचा पर्याय चांगलाच लोकप्रिय झाला आहे.
मात्र, गेल्या काही महिन्यांपासून सध्या शेअर बाजारात होत असलेल्या घसरणीमुळे अनेक गुंतवणुकदार एसआयपी बंद करत आहेत किंवा त्यात गुंतवलेले पैसे काढून घेत आहेत.
अशा परिस्थितीत नेमकं काय केलं पाहिजे, गुंतवणूक कशाप्रकारे केली पाहिजे या महत्त्वाच्या मुद्द्यांचा आढावा घेणारा हा लेख.
गेल्या वर्षी भारतीय शेअर बाजारात सुरू झालेली घसरण अजूनही सावरताना दिसत नाहीये. यादरम्यान लाखो गुंतवणुकदारांनी त्यांचे कोट्यवधी रुपये गमावले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यानंतर जागतिक पातळीवरील अनिश्चितता वाढली आहे. शिवाय, डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण झाली आहे. विविध क्षेत्रातील कंपन्यांच्या तिमाही निकालांमुळे देखील चिंतेत भर पडली आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या सेन्सेक्सनं सप्टेंबर 2024 मध्ये 86,000 ची विक्रमी पातळी गाठली होती. मात्र, त्यात मोठी घसरण झाली असून 18 फेब्रुवारी 2025 ला सेन्सेक्स जवळपास 75,783 पातळीपर्यंत कोसळला आहे.
शेअर बाजारातील या पडझडीदरम्यान जे गुंतवणुकदार म्युच्युअल फंडात दरमहा सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे एसआयपी (SIP) च्या माध्यमातून गुंतवणूक करत असतात, त्यांच्यामध्ये चिंतेचं वातावरण आहे.
शेअर बाजारातील घसरणीमुळे त्यांनी म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे (SIP) केलेल्या गुंतवणुकीचं मूल्य गेल्या काही महिन्यांमध्ये खाली आलं आहे. यातील काही म्युच्युअल फंडांमध्ये तर फारच घसरण झाली आहे.
बीबीसीने यासंदर्भात गुंतवणूक तज्ज्ञांशी चर्चा केली आणि सर्वसामान्य गुंतवणुकदारांनी सद्यपरिस्थितीत म्युच्युअल फंडाच्या एसआयपीमध्ये गुंतवणूक करावी की करू नये याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला.
शेअर बाजारात गेल्या काही काळात झालेल्या घसरणीमागचं मुख्य कारण फॉरेन इन्स्टिट्यूशन इनव्हेस्टर्स (FII's) असल्याचं म्हटलं जात आहे. तज्ज्ञही कधीकधी कमी दरात खरेदी करणाऱ्या डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सवर लक्ष केंद्रीत करत आहेत.
म्युच्युअल फंडच्या शिवाय DII's हे विमा कंपन्या, लिक्विड फंड आणि इतर आर्थिक क्षेत्रांतही गुंतवणूक करत आहेत.


एसआयपीचं (SIP) काय करावं?
तज्ज्ञांना वाटतं की सध्या शेअर बाजारात घसरण झालेली असली तरी ही एसआयपी बंद करण्याची किंवा त्यातील गुंतवणूक काढून घेण्याची वेळ नाही. किंबहुना अशावेळी जितकी शक्य असेल तितकी गुंतवणूक केली पाहिजे.
अहमदाबादस्थित गुंतवणूक सल्लागार मिथून जथाल यांनी बीबीसीला सांगितलं, "याक्षणी माझा सल्ला आहे की पुढील 12 महिन्यांसाठी तुम्ही तुमच्या एसआयपीची रक्कम दुप्पट करा. त्यानंतर 13 व्या महिन्यापासून पुढे जर तुम्ही एसआयपीच्या रकमेत कपात केली तरी काही हरकत नाही."
"शेअर बाजारात जेव्हा घसरण होते आणि एसआयपीद्वारे केलेल्या गुंतवणुकीचं मूल्य घटलेलं दिसतं, तेव्हा चिंता करण्याचं किंवा घाबरण्याचं कारण नाही," असं ते म्हणाले.
मिथून जथाल यांच्या मते, "जेव्हा सोन्याच्या भावात घसरण होते, तेव्हा आपण सर्वसाधारणपणे सोनं विकत घेतो. जेव्हा जमीन किंवा घर स्वस्त होतं तेव्हा आपण रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतो. मग जेव्हा शेअर बाजारात घसरण होते तेव्हा आपण एसआयपी का थांबवावी?"
ते पुढे सल्ला देतात की, "जेव्हा एखादा गुंतवणुकदार म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे गुंतवणुकीची सुरुवात करतो, तेव्हा सुरुवातीच्या पहिली पाच वर्षे त्यानं फक्त गुंतवणूक करत जावं. त्यानंतर मग त्यानं त्याच्या गुंतवणुकीच्या मूल्याबद्दल विचार करावा."

फोटो स्रोत, Getty Images
"जरी शेअर बाजार गडगडलेला असला आणि एसआयपीद्वारे केलेल्या गुंतवणुकीतून उणे परतावा मिळालेला दिसत असला तरी तुमची जी आर्थिक उद्दिष्टे आहेत त्याचाच विचार केला पाहिजे. शेअर बाजारातील चढउतारांचा विचार करता कामा नये," असं विनोद फोगला म्हणतात. ते जयपूरस्थित सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आहेत.
ते म्हणाले, "शेअर बाजार गडगडणं किंवा त्यात मोठी घसरण होणं ही काही नवी बाब नाही. कोरोनाच्या संकटकाळात शेअर बाजारात तब्बल 38 टक्के घसरण झाली होती. मात्र त्यानंतर पुन्हा शेअर बाजारानं उसळी घेतली. त्यामुळे जे गुंतवणुकदार म्युच्युअल फंडात शिस्तबद्धपणे आणि सातत्यानं गुंतवणूक करतात, त्यांना नक्कीच चांगला परतावा मिळतो."
विनोद पुढे म्हणाले, "शेअर बाजारातील गुंतवणूक दीर्घकालीन असते. सध्या शेअर बाजारातील घसरणीमुळे जी घबराट आहे ती थोड्या कालावधीसाठी आहे. त्यामुळे चिंता करण्याऐवजी गुंतवणुकदारांनी एसआयपीमधील गुंतवणूक वाढवली पाहिजे."
"जे गुंतवणुकदार सध्या एसआयपीमधील गुंतवणूक थांबवत आहेत किंवा म्युच्युअल फंडातील युनिट्सची विक्री करून पैसे काढून घेत आहेत, ते चूक करत आहेत."
सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर असलेले विनोद फोगला गुंतवणुकदारांना एसआयपी बंद करण्याऐवजी किंवा त्यातून पैसे काढून घेण्याऐवजी एसआयपीतील गुंतवणूक वाढवण्याचा देखील सल्ला देतात.
विनोद म्हणाले, "याच्याबरोबरच जर तुमच्याकडे अतिरिक्त पैसे असतील किंवा तुम्हाला बोनस किंवा भत्ता मिळाला असेल, तर ती रक्कम एसआयपीद्वारे गुंतवा."

गुंतवणुकीसंदर्भातील या बातम्याही वाचा:

कालावधी किती असावा?
गुंतवणूक सल्लागार मिथून जथाल म्हणाले, "भारतात सर्वसाधारणपणे 100 पैकी 18 टक्के गुंतवणुकदार पाच वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी एसआयपी सुरू ठेवतात. 100 पैकी फक्त 3 टक्के गुंतवणुकदार 10 वर्षांसाठी एसआयपीमधील गुंतवणूक सुरू ठेवतात."
"जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीतून चांगला परतावा हवा असेल तर तुम्ही दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक केली पाहिजे."

फोटो स्रोत, Getty Images
"सरासरी, रिअल इस्टेटमध्ये लोक 40 वर्षांसाठी गुंतवणूक करतात. तर सर्वसाधारणपणे लोक सोन्याची विक्री कधीही करत नाहीत. सामान्यपणे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) मधील गुंतवणूक 15 वर्षांसाठी केली पाहिजे आणि त्यानंतर दर पाच वर्षांनी त्यात मुदतवाढ केली पाहिजे."
"त्यामुळे चांगला परतावा मिळवण्यासाठी दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक करणं महत्त्वाचं आहे."
त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणुकदारानं एसआयपीमध्ये किती वर्षांसाठी गुंतवणूक केली पाहिजे? या प्रश्नावर मिथून जथाल म्हणतात, "जितकी जास्त वर्षे शक्य असेल तितकी वर्षे गुंतवणूक केली पाहिजे."
शेअर बाजारातील चढ-उतार
तज्ज्ञांना वाटतं की जेव्हा म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे गुंतवणूक करता तेव्हा तुम्ही कमी किंमतीत म्युच्युअल फंडाचे जास्तीत युनिट्स विकत घेण्यावर लक्ष दिलं पाहिजे. त्यावेळेस तुम्ही शेअर बाजारातील चढ आणि उतारांवर लक्ष देता कामा नये.
मिथून जथाल म्हणाले, "दर आठ वर्षांनी शेअर बाजारात अशा प्रकारचं चढ उतारांचं चक्र येत असतं. 1992 मध्ये हर्षद मेहता घोटाळ्यामुळे शेअर बाजार कोसळला होता. त्यानंतर 2000 मध्ये Y2K फुगवट्यामुळे शेअर बाजार गडगडला होता."
"तर 2008 मध्ये अमेरिकेतील सब-प्राईम संकटामुळे जगभरात वित्तीय संकट येऊन जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्यामुळे शेअर बाजार कोसळला होता. आठ वर्षांनी नोटबंदी आणि कोरोनाच्या संकटाचा परिणाम होत शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती."
"त्यामुळे शेअर बाजारात होणारी घसरण हा काही मोठा चिंता करण्याचा मुद्दा नाही. मात्र अशा घसरणीत खरेदीची किंवा गुंतवणुकीची चांगली संधी निर्माण होते."

फोटो स्रोत, Getty Images
ते पुढे म्हणाले, "जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता, तेव्हा तुमच्या आर्थिक उद्दिष्टांना लक्षात घेत गुंतवणुकीच्या कालावधीचा एक आराखडा निश्चित करा."
"जर तुम्हाला तीन वर्षांनी पैसे लागणार असतील, तर फक्त डेट फंडात एसआयपी करा. जर तुमचं आर्थिक उद्दिष्टं तीन ते पाच वर्षांचं असेल तर हायब्रीड फंडात गुंतवणूक करा."
"हायब्रीड फंड हे डेट फंड आणि इक्विटी फंड यांचं मिश्रण असतात. यात बॅलन्स्ड हायब्रीड फंड, ॲग्रेसिव्ह फंड आणि इक्विटी सेव्हिंग्स फंडांचाही समावेश आहे."
ते म्हणाले की, "जर तुमचं आर्थिक उद्दिष्ट पाच किंवा सात वर्षांचं असेल तर तुम्ही फक्त लार्ज कॅप श्रेणीतील म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली पाहिजे."
"मात्र जर तुमचा गुंतवणुकीचा कालावधी 7 ते 10 वर्षांचा असेल, तर तुम्ही फ्लेक्सी-कॅप, मल्टी-कॅप आणि लार्ज-कॅप म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे."
"जर तुम्हाला 10 ते 15 वर्षांसाठी गुंतवणूक करायची असेल तर मिड-कॅप श्रेणीतील फंडांची निवड करा. तसंच जर तुमचा गुंतवणुकीचा कालावधी 15 वर्षांहून अधिकचा असेल तर तुम्ही स्मॉल-कॅप आणि मायक्रो-कॅप श्रेणीतील फंडांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे."
'एनएफओ'मध्ये गुंतवणूक करावी की नाही?
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया म्हणजे ॲम्फीच्या (AMFI) आकडेवारीनुसार, जानेवारी 2025 मध्ये 12 एनएफओ (न्यू फंड ऑफर्स) आल्या होत्या. म्हणजे नवीन म्युच्युअल फंड बाजारात लाँच झाले होते. यात एनएफओच्या माध्यमातून एकूण 4,544 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.
या 12 एनएफओपैकी पाच इक्विटी फंड होते, दोन डेट प्रकारातील फंड होते, चार इंडेक्स फंड होते आणि एक ईटीएफ होता.
गुंतवणूक तज्ज्ञांना वाटतं की एनएफओच्या (न्यू फंड ऑफर्स) माध्यमातून गुंतवणूक करणं टाळलं पाहिजे. कारण या नव्या फंडांच्या कामगिरीचा कोणताही ट्रॅक नसतो. हे म्युच्युअल फंड बाजारात नव्यानंच आलेले असतात.

फोटो स्रोत, Getty Images
मिथून जथाल म्हणाले, "गुंतवणूक करताना चांगले स्थिरावलेले, उत्तम परतावा देत असलेले आणि किमान आठ वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड असलेले म्युच्युअल फंड निवडावेत. एनएफओपासून दूर राहणंच योग्य ठरतं."
तर विनोद फोगला यांना वाटतं की "जर एनएफओमध्ये गुंतवणूक केल्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओची गुणवत्ता सुधारणार असेल तरच त्यात गुंतवणक केली पाहिजे. नाहीतर एनएफओमध्ये गुंतवणूक करण्याचा कोणताही फायदा नसतो."
"तुम्ही ज्या एनएफओमध्ये गुंतवणूक करणार असाल तो फंड जर आधीच तुमच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये असेल तर त्यामुळे त्याची पुनरावृत्तीच होईल. त्यामुळे एनएफओ मधील गुंतवणूक टाळा."
विनोद फोगला पुढे म्हणाले, "म्युच्युअल फंड कंपन्या बाजारात नवनवीन म्युच्युअल फंड आणत असतात. मात्र त्यामध्ये अडकण्याऐवजी तुम्ही एक चांगला वैविध्यपूर्ण गुंतवणूक पोर्टफोलिओ तयार केला पाहिजे."
थेमॅटिक फंडापासून दूर राहा
म्युच्युअल फंड तज्ज्ञांना वाटतं की थेमॅटिक फंडांमध्ये गुंतवणूक करणंदेखील टाळलं पाहिजे.
थेमॅटिक फंड म्हणजे एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील कंपन्यांमध्ये किंवा विशिष्ट ट्रेंडमध्ये किंवा विशिष्ट थीमच्या कंपन्यांचा समावेश असलेला म्युच्युअल फंड.
फार्मा, संरक्षण, एफएमसीजी, स्पेशल ऑपर्च्युनिटीज इत्यादीसारख्या थीमवर आधारित म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणं टाळलं पाहिजे. कारण अशा गुंतवणुकीत अधिक जोखीम असते.

फोटो स्रोत, Getty Images
विनोद फोगला म्हणाले, "जर तुम्ही योग्यप्रकारे वैविध्य असलेल्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली असेल तर त्याद्वारे तुम्ही सर्व क्षेत्रातील चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केलेली असतेच. त्यामुळे तुम्ही थेमॅटिक फंडांमध्ये गुंतवणूक करण्याची आवश्यकता नसते. तसंच थेमॅटिक फंडांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला नाही."
मिथून जथाल यांच्या मते, 'जुन्या नेहमीच्याच पण फारशा आकर्षक न वाटणाऱ्या' म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणुकदारांनी गुंतवणूक करावी आणि थेमॅटिक फंडांपासून लांब राहिलं पाहिजे.
भारतातील म्युच्युअल फंड क्षेत्राचा विस्तार
भारतीय शेअर बाजार स्थिर ठेवण्यात आणि टिकवून ठेवण्यात देशातील म्युच्युअल फंड क्षेत्राची मोठी भूमिका आहे.
कारण, इक्विटी म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून भारतीय शेअर बाजारातील कंपन्यांमध्येच गुंतवणूक केली जात असते. त्यामुळे शेअर बाजारातील थेट गुंतवणुकीबरोबरच म्युच्युअल फंडाद्वारे देखील गुंतवणुकीचा ओघ सुरू असतो.
म्युच्युअल फंडात एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणुकदार अगदी दरमहा 500 रुपयांनी देखील गुंतवणूक करतात.
शेअर बाजारात घसरण झाल्यावर अनेक गुंतवणुकदारांनी चिंता किंवा भीतीपोटी त्यांच्या एसआयपी बंद केल्या आहेत.
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया म्हणजे ॲम्फीच्या (AMFI) आकडेवारीनुसार, डिसेंबर 2024 च्या तुलनेत जानेवारी 2025 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडात होणाऱ्या गुंतवणुकीचा ओघ 3.6 टक्क्यांनी घटला आहे.
जानेवारी 2025 मध्ये एसआयपीच्या माध्यमातून 39,687 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.
त्याउलट, डिसेंबर 2024 मध्ये एसआयपीद्वारे 41,155 कोटी रुपयांची गुंतवणूक इक्विटी श्रेणीतील म्युच्युअल फंडांमध्ये झाली होती.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र, जेव्हा आपण म्युच्युअल फंडात झालेली गुंतवणूक विरुद्ध त्यातून काढून घेण्यात आलेले पैसे याकडे पाहतो, तेव्हा गेल्या सलग 47 महिन्यांपासून म्युच्युअल फंडातील निव्वळ गुंतवणूक सकारात्मक किंवा वाढती आहे.
म्हणजेच म्युच्युअल फंडातून काढून घेण्यात येत असलेल्या रकमेपेक्षा त्यात होणाऱ्या गुंतवणुकीची रक्कम अधिक आहे.
ॲम्फीच्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2025 मध्ये देशातील एकूण म्युच्युअल फंड फोलिओंची संख्या 22.92 कोटींवर पोहोचली आहे. तर म्युच्युअल फंडात करण्यात आलेल्या एकूण गुंतवणुकीत (ॲसेट अंडर मॅनेजमेंट - AUM) घट होत ती 39.91 लाख कोटी रुपयांवरून 38.77 लाख कोटी रुपयांवर आली आहे.
जानेवारी महिन्यात म्युच्युअल फंडात झालेल्या एकूण गुंतवणुकीपैकी 26,400 कोटी रुपयांची गुंतवणूक एसआयपीच्या माध्यमातून झाली होती. गुंतवणुकदारांनी जानेवारी 2025 मध्ये लार्ज-कॅप फंडांमध्ये 3,063 कोटी रुपये, मिड-कॅप फंडांमध्ये 5,147 कोटी रुपये आणि स्मॉल-कॅप फंडांमध्ये 5,720 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
म्युच्युअल फंड काय आहे? गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी?
भारतात म्युच्युअल फंडचं व्यवस्थापन अॅसेट मॅनेजमेंट कंपनी (AMCs) करतात. गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या पैशातून एक निधी तयार केला जातो. त्यानंतर म्युच्युअच फंड मॅनेजर या निधीच्या गुंतवणुकीचं व्यवस्थापन पाहतात.
AMCs नियमितपणे NFOs (New Fund Offers) आणत असतात पण त्याची कामगिरी कशी असेल, याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. त्यामुळं NFOs मध्ये गुंतवणूक करताना काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.
म्युच्युअल फंडचं अत्यंत कमी धोका असलेले आणि अत्यंत जास्त धोका असलेले असं वर्गीकरण केलं जातं. गुंतवणूकदार हे त्यांच्या क्षमतेनुसार आणि ते बाजारानुसार किती धोका पत्करू शकतात यानुसार फंडची निवड करत असतात. शेअर बाजाराप्रमाणे म्युच्युअल फंडमध्येही नकारात्मक रिटर्न मिळण्याचा धोका असतो.

फोटो स्रोत, Getty Images
साधारणपणे स्मॉलकॅप, मिडकॅप आणि थेमॅटिक फंड हे सर्वाधिक धोक्याचे समजले जातात. सरकारी योजना किंवा संस्थांमध्ये गुंतवणूक करणारे फंड हे कमी धोक्याचे समजले जातात. भारतात म्युच्युअल फंडचे एसआयपी हे महिन्याला 250 रुपयांच्या गुंतवणुकीपासून सुरू होतात.
म्युच्युअल फंडाची गुंतवणूक ही बाजारातील धोक्यांवर अवलंबून असते. त्यामुळं कधी बाजाराची स्थिती चांगली नसली तर नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता असते.
(आर्थिक अभ्यासकांनी व्यक्त केलेली मत त्यांची वैयक्तिक मतं आहेत. बीबीसी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. गुंतवणूकदारांनी बाजाराशी संबंधित आर्थिक अभ्यासकांच्या सल्ल्यानेच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











