ETF म्हणजे काय ? यात कसे पैसे गुंतवू शकता, शेअर्स आणि ETF मध्ये काय फरक आहे?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
शेअर बाजारात गुंतवणूक करायची आहे पण जोखीम कमी हवी त्यांच्यासाठी इंडेक्स फंड हा कमी जोखमेचा पर्याय मानला जातो. त्याच प्रमाणे एक्सचेंज ट्रेडेट फंड्स म्हणजेच ETF देखील एक चांगला पर्याय मानला जातो.
या लेखात आपण ETF म्हणजे काय, त्याचे फायदे तोटे काय आणि त्यात गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी तपासाव्यात या गोष्टी आपण पाहणार आहोत.
सर्वांत आधी आपण पाहू की ETF म्हणजे काय?
नॅशनल स्टॉक एक्सचेंजनी आपल्या संकेतस्थळावर ETF ची माहिती दिली आहे. ETF पहिल्यांदा अमेरिकेत 1993 साली दाखल झाले. लोक या उत्पादनाकडे आकर्षित होण्यासाठी बराच कालावधी लागला. भारतामध्ये ETF 2002 मध्ये सुरू करण्यात आले.
NSE नुसार सध्या ETFची बाजारपेठ 3.16 लाख कोटी रुपये इतकी आहे. त्यावरुन आपल्याला ETFची व्याप्ती समजू शकते.
ETF कसे काम करतात?
ETF हे गुंतवणुकीचं एक साधन आहे, ज्यात विविध अॅसेट क्लास एकत्र आणले जातात आणि त्यावर गुंतवणूक केली जाते.
ज्याप्रमाणे आपण शेअर बाजारातून एखाद्या कंपनीचा शेअर विकत घेऊ शकतो तसे आपल्याला ETF विकत घेता येतात.

फोटो स्रोत, Getty Images
जसं शेअर आपण एक्सचेंज करतो त्यात प्रमाणे हा फंड विकण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी उपलब्ध असावा लागतो. त्यातूनच याला एक्सचेंज ट्रेडेट फंड असे नाव पडले आहे.
जशा कंपन्या आपला स्टॉक IPO वेळी लाँच करतात. तसाच ETF देखील शेअर बाजारावर कंपनीकडून लिस्टेड केला जातो. त्याच्या विक्रीतून येणारे भांडवल संबंधित कंपनी आधी ठरवलेल्या क्षेत्रात किंवा इंडेक्समध्ये गुंतवते.
त्यामुळे आपण गुंतवणूक कोणत्या ETF मध्ये करत आहोत आणि ते ETF शेअर बाजारातील कोणत्या कमोडिटीचे अनुकरण करत आहे हे आधी पाहणे आवश्यक ठरते.
ETF मध्ये आपल्याला सोने, चांदी, स्टॉक्स, कच्चे तेल, इतकेच काय तर क्रिप्टो करन्सी या सारख्या कमोडिटीमध्ये गुंतवणूक करता येऊ शकता येते. तसेच जगभरातील विविध इंडेक्स, एक्सचेंज यांच्यावरील देखील गुंतवणूक करण्याचा पर्याय आपल्यासमोर उपलब्ध असतो.
तसेच रिअल इस्टेट, बँकिंग, नवरत्न कंपन्या, हरित ऊर्जा क्षेत्र, हॉस्पिटॅलिटी अशा वेगवेगळ्या क्षेत्रांचे ETF बाजारात उपलब्ध असतात. त्यातून देखील आपण पर्याय निवडू शकतो.
इंडेक्स फंड कसं काम करतात हे सांगताना अर्थ अभ्यासक कौस्तुभ जोशी यांनी बीबीसी मराठीला सांगितले, "इंडेक्स फंड एक प्रकारचे पॅसिव्ह फंड असतात. पॅसिव्ह फंड म्हणजेच ट्रॅकर फंड असे म्हणता येईल. एखाद्या गोष्टीला ट्रॅक करणे म्हणजेच तिचा मागोवा घेणे हे या फंडाचे वैशिष्ट्य असते. इंडेक्स फंड अशाच प्रकारचे पॅसिव्ह इन्वेस्टमेंट स्ट्रॅटेजी गुंतवणूक रणनीती अवलंबणारे फंड आहेत."
इंडेक्स ट्रॅक करणे म्हणजे काय? हे समजवताना जोशी सांगतात, "पॅसिव्ह फंड ज्या इंडेक्सला ट्रॅक करतात त्या इंडेक्स पेक्षा जास्त परतावे मिळावे अशी अपेक्षा त्यात नसते. उदाहरणार्थ निफ्टी मिडकॅप 100 इंडेक्स फंड हा फंड निफ्टी मिडकॅप 100 या इंडेक्स ला ट्रॅक करेल त्याचा मागोवा घेईल, म्हणजेच निफ्टी मिडकॅप 100 या निर्देशांकात असलेले 100 शेअर्स या म्युच्युअल फंड योजनेच्या पोर्टफोलिओ मध्ये असतील. या योजनेतील पोर्टफोलिओचा गुंतवणुकीसाठी वेगळा विचार करावाच लागणार नाही. ही फंड मॅनेजरचे काम सोपे करणारी बाब आहे."
'छोटीशी देखील गुंतवणूक करता येते'
आपल्याला वाटू शकतो की मग हे अगदी म्युच्युअल फंड किंवा इंडेक्स फंडसारखेच आहे. मग सरळ त्यांच्यातच गुंतवणूक का करू नये? तर हा प्रश्न अगदी योग्य आहे.
ETF देखील संबंधित कमोडिटी किंवा इंडेक्सच्या कामगिरीनुसार परतावा देतात. फक्त या ठिकाणी आपल्याला अल्प हिश्शांमध्ये सुद्धा गुंतवणूक करता येते.

फोटो स्रोत, Getty Images
इंडेक्स फंडमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर किमान 500 किंवा 1000 रुपये गुंतवावे लागतात.
पण ETF मध्ये मात्र तुम्ही ते ज्या किमतीला लिस्टेड आहेत तितके समभाग विकत घेऊ शकतात. समजा एखाद्या कंपनीचा ETF हा दहा रुपयांना आहे. तर अगदी तुम्ही तो देखील घेऊ शकता.
ETF चा सुटसुटीतपणा
ETF नेमके काय असतात त्याची नॅशनल स्टॉक एक्सचेंजने (NSE) केलेली व्याख्या आपण पाहू.
ETF हे असं गुंतवणुकीचं उत्पादन आहे ज्यात शेअर्समधील लवचिकता आणि म्युच्यअल फंडमधील गुंतवणुकीतील सोपेपणा आपल्याला एकाच वेळी मिळतो.
पुढे NSE ने म्हटलं आहे की, नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर ETF ची खरेदी-विक्री रोख भांडवलावर होते. जसं की एखाद्या स्टॉकची होते. ही खरेदी-विक्री बाजारमूल्यानुसार सातत्याने होत असते.
इक्विटी ETF ही पॅसिव्ह गुंतवणूक आहे यात निर्देशांक आणि ठेव्यांमध्ये सम प्रमाणात गुंतवणूक केली जाते.
ETF हे इंडेक्सचे अनुकरण करतात त्यामुळे याच्यावर इतर म्युच्युअल फंड्सच्या तुलनेत खर्च कमी होतो. त्यालाच एक्सपेन्स रेशो कमी असणे असे म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
म्युच्युअल फंडमध्ये आणि ETF मध्ये आणखी एक फरक असतो. म्युच्युअल फंड हे पूर्ण दिवस संपल्यानंतर बाजारभाव असतो त्याप्रमाणे त्याची विक्री होते.
पण ETF ला त्या दिवसाचा ट्रेड बंद होण्याची वाट पाहायची आवश्यकता नसते. ज्या वेळी तुम्हाला ते विकायचं आहे त्याच भावानुसार तुम्ही स्पॉट ट्रेडिंग करू शकता.
त्यांची किंमत ही अंडरलाइंग असेट्स (मूलभूत मालमत्ता) च्या किमतीनुसार कमी जास्त होत असते. म्हणजे ज्या संबंधित गोष्टीवर तो ETF आहे, त्या वस्तूच्या बाजारातील किमतीनुसार.
जसं की गोल्ड ETF असेल तर एकूणच सोन्याच्या समप्रमाणातील गुंतवणुकीनुसार (फक्त उदाहरण म्हणून) त्याची किंमत बदलू शकते.

फोटो स्रोत, Getty Images
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ सेक्युरिटीज मार्केटनुसार (NISM) ETF हा रिटेल इनवेस्टरसाठी एक सोपा आणि सुटसुटीत पर्याय आहे. हा म्युच्युअल फंडचा प्रकार आहे ज्याचे युनिट्स हे स्टॉक एक्सचेंजवर शेअर्स सारखे खरेदी किंवा विक्री करता येतात.
कोणत्याही म्युच्युअल फंडप्रमाणे गुंतवणूकदार आपला पैसा विविध ठेवींच्या किंवा कमोडिटीजच्या संग्रहात गुंतवू शकतो.
या संकेतस्थळानुसार ETF हे पॅसिव्ह असतात. ते शेअर मार्केटच्या इंडेक्सचे अनुकरण करतात, जसं की स्टॉक इंडेक्स, बाँड इंडेक्स, कमोडिटी इंडेक्स.
ETF मधून इंडेक्सच्या तुलनेत किती परतावा मिळतो?
ETF ची कामगिरी ही इंडेक्सपेक्षा जास्त चांगली होऊ शकत नाही. ती त्याच तुलनेत राहते. त्यामुळे परतावा हा इंडेक्सच्याच प्रमाणात असतो. त्यांच्यावरील खर्च देखील अॅक्टिव्ह म्युच्युअल फंडसच्या तुलनेत कमीच असतो.
NISM नुसार म्युच्युअल फंडच्या तुलनेत ETF हे कमी किमतीतही उपलब्ध होतात आणि वास्तविक वेळेनुसार त्यांची किंमत असते.
अनेक गुंतवणूक तज्ज्ञ आणि सल्लागारांची ETF ला पसंती असते. पॅसिव्ह पोर्टफोलिओंचा विचार केला तर ETF हे किफायतशीर आणि गुंतवणुकीसाठी सुलभ असतात.
त्यांची खरेदी विक्री युनिटप्रमाणे करता येते, त्यातून इंडेक्ससारखाच परतावा मिळतो.
ETF च्या मर्यादा
ETF चे जसे फायदे सांगितले जातात तशा मर्यादा देखील NISM ने सांगितल्या आहेत आणि गुंतवणुकीपूर्वी याचा विचार करणे देखील आवश्यक आहे.
म्युच्युअल फंडप्रमाणे आपण ETF चे युनिट्स अंशतः घेऊ शकत नाहीत. खरेदी विक्रीवेळी तुम्ही ज्या ब्रोकर्सचा प्लॅटफॉर्म वापरत असाल त्यांची फी देखील तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल.
ETF मध्ये गुंतवणूक केली असेल पण जर संबंधित ETF ला बाजारात मागणीच नसेल, म्हणजे खरेदीदारच नसेल तर तुमचे ETF विकले जाणार नाहीत.
कधी कधी त्याला लोवर सर्किटही लागू शकतो. ज्या प्रमाणे स्टॉक्सचा व्यवहार असतो तसाच हा असतो, त्यामुळे ही बाजू पण पाहणे आवश्यक आहे.
बाजारात अनेक कंपन्यांचे ETF उपलब्ध आहेत. तेव्हा खरेदी करताना आधी त्या संबंधित ETF ची खरेदी विक्री कशी होते हे तपासून घेतल्याशिवाय त्यात गुंतवणूक करू नये असं तज्ज्ञ सांगतात.
ETF संबंधी नेहमी पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे
ETF मध्ये गुंतवणूक करणे अनेकांना गुंतागुंतीचे वाटू शकते. त्यामुळे गुंतवणूकदारांना नेहमी पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे अर्थ अभ्यासक कौस्तुभ जोशी यांच्याकडून आम्ही समजून घेतली आहेत. ती या ठिकाणी देत आहोत.
प्रश्न- ETF आणि इंडेक्स फंड या दोघांमध्ये काय फरक असतो?
उत्तर - इंडेक्स फंड हे म्युच्युअल फंडाचा एक प्रकार असतात आणि तर ईटीएफ हे शेअर्ससारखे असतात. मात्र त्यांचं मूळ स्वरुप तसं सारखंच असतं.
इंडेक्स फंडमध्ये ट्रेडिंग करता येत नाही, तर ईटीएफमध्ये ट्रेडिंग करता येतं.
उदाहरणार्थ, समजा निफ्टी आयटी ईटीएफ किंवा बँक निफ्टी ईटीएफ हा आपण सकाळी 9:30 किंवा 9:45 च्या सुमारास विकत घेतला आणि तो साडेबारा वाजेपर्यंत वाढला, तर तो आपण विकू शकतो आणि नफा मिळवू शकतो. थोडक्यात शेअर्सचं जसं ट्रेडिंग होतं, तसंच हे असतं.
प्रश्न - ETF साठी डीमॅट अकाउंटची आवश्यकता असते का?
उत्तर - ETF मध्ये गुंतवणूक करण्यास डीमॅट अकाउंटची आवश्यकता असते. बडे गुंतवणुकदार जे खूप मोठ्या रकमेची गुंतवणूक करतात ते ETF ला प्राधान्य देतात.
म्युच्युअल फंडात करतात त्यासाठी डीमॅट अकाउंटची आवश्यकता नसते. कारण त्यात ट्रेडिंग होत नाही पण ETF साठी असते. हा इंडेक्स फंड आणि ईटीएफमधील मुख्य फरक आहे.
प्रश्न - ज्याप्रमाणे शेअर्सच्या खरेदी-विक्रीसाठी ते विकणारे आणि खरेदी करणारे लागतात तसंच ETFच्याही बाबतीत असतं का?
उत्तर - शेअर्समध्ये ज्याप्रमाणे खरेदी-विक्री, त्याचे जे मूलभूत नियम आहेत, ते सर्व ETF ला देखील लागू पडतात.
प्रश्न - शेअर्सप्रमाणे ETF वर लोवर सर्किट लागू शकतं का?
उत्तर - सर्वसाधारणपणे निफ्टी किंवा सेन्सेक्समधल्या शेअर्सच्या किंमतीत खूप जास्त घसरण (10 टक्के किंवा त्याहून अधिक) होते, त्यावेळेस लोअर किंवा अप्पर सर्किट लागतं. ईटीएफमध्ये मात्र सहसा एवढ्या मोठ्या प्रमाणात चढउतार होत नाहीत. पण यदाकदाचित अशी स्थिती निर्माण झाली तर लोवर सर्किट लागू शकतं?
प्रश्न : शेअर्स आणि ETF च्या गुंतवणुकीत काय फरक असतो?
शेअर्सच्या तुलनेत ईटीएफमध्ये गुंतवणूक करणं तुलनात्मकरीत्या थोडं अधिक सुरक्षित असतं. उदाहरणार्थ, जर आपण निफ्टी मिडकॅप ETF विकत घेतला तर मिडकॅप श्रेणीतील शेअर्सचा पूर्ण गट त्यात येतो. त्यात तुलनेनं कमी चढउतार होतात. त्याऐवजी जर आपण मिडकॅप श्रेणीतील चार शेअर्स विकत घेतले, तर त्यात चढउतार होण्याची अधिक शक्यता असते. साहजिकच शेअर्सची निवड करण्यासाठी बराच विचार करावा लागतो. ETF च्या बाबतीत मात्र तसं नसतं, त्यामुळे ते अधिक सोयीचं असतं.
प्रश्न - ETF ची किंमत जास्त असते का? त्यांच्या किमतीत किती वाढ किंवा घसरण होते?
उत्तर - ETF चं मुख्य वैशिष्ट्यं म्हणजे जर त्यात तुम्ही दीर्घकाळासाठी गुंतवणूक करू शकलात तर त्यात तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.
ETF च्या चढउतारांचा संबंध त्याच्या निर्देशांक किंवा इंडेक्सशी असतो. म्हणजेच जितका त्या ETF चा निर्देशांक घसरतो, तितकाच तो ETF देखील घसरतो. सोप्या भाषेत शेअर मार्केटच्या तेजी-मंदीनुसार ETFवर त्याचा परिणाम होतो.
प्रश्न - ETF च्या खरेदी-विक्रीवर देखील ब्रोकरेज लागतो का?
उत्तर - शेअर्सच्या तुलनेत ETF मध्ये गुंतवणूक करण्याचे तोटे कमी आहेत. फक्त ETF च्या बाबतीत लक्षात घ्यायची बाब म्हणजे तुम्ही जितक्या वेळा ETF खरेदी करू आणि त्याची विक्री करू तितक्या वेळा तुम्हाला त्याचा ब्रोकरेज द्यावा लागतो, हे लक्षात घेतलं पाहिजे.
( हा लेख केवळ गुंतवणुकीचे कोणते पर्याय उपलब्ध असतात याची माहिती देण्यासाठी आहे. गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञाशी किंवा तुमच्या गुंतवणूक सल्लागाराशी सल्ला मसलत करावी. )
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)







