NPS : म्हातारपणात आर्थिक सुरक्षेसाठी असलेली नॅशनल पेन्शन सिस्टम काय आहे, महिन्याला किती रुपये मिळू शकतात?

ज्येष्ठ नागरिक

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, तुषार कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

रिटायर झाल्यावर तुम्हाला एखाद्या थंड हवेच्या शांत, निवांत ठिकाणी एखादा कॅफे काढायचाय. किंवा फार काही डोक्याला टेन्शन न घेता एक उत्पन्नाचा स्रोत राहील आणि आवडीच्या गोष्टींसाठी वेळ देता येईल अशी लाईफ स्टाईल पाहिजे.

तर हे सारं काही करण्यासाठी पैसे पाहिजेत ते पण ज्यावेळी आपण वयाने ज्येष्ठ होऊ तेव्हा त्यासाठी आतापासून आपल्याला काय करता येईल. तर याचं उत्तर आहे की राष्ट्रीय पेन्शन प्रणालीत गुंतवणूक करायची.

नॅशनल पेन्शन सिस्टम ही सरकारची अशी योजना आहे. की ज्यामध्ये आपण दरमहा आता पैसे गुंतवायचे आणि आपण निवृत्त झाल्यावर आपल्याला मग दर महिन्याला पैसे मिळतील. आता आपल्यापैकी एक जण तरी असा हुशार नक्कीच असेल की मग आम्हीच पैसे भरायचे आणि मग तेच आम्हाला देणार त्यापेक्षा तुम्हीच आम्हाला द्या नं. आम्ही तुम्हाला नंतर देऊ.

पण मित्रांनो हीच तर गंमत आहे. की जितके दिले त्याच्या पेक्षा जास्त आपल्याला मिळतील. अगदी व्याजासकट.

उदाहरण म्हणून आपण पाहू की तुम्ही 35 वर्षांचे आहात. दर महिन्याला तुम्हाला 10,000 रुपये गुंतवायचे आहेत आणि दरवर्षी 10 टक्क्यांनी ही रक्कम वाढवत नेण्याची तुमची तयारी देखील आहे. तर तुम्हाला रिटायरमेंटनंतर किती पैसे मिळतील? तर NPS ट्रस्टचे कॅलक्युलेटर सांगते की तुमची एकूण रक्कम (corpus) 2 कोटी 67 लाख इतकी होईल. त्यातील तुम्ही 1 कोटी 60 लाख रुपये रिटायरमेंट नंतर काढून शकाल. उरलेली जी रक्कम आहे ती तशीच राहील पण त्यातून तुम्हाला 60,000 रुपये महिन्याला मिळतील. ( तुम्ही दरवर्षी किती रक्कम गुंतवणुकीत वाढवता, प्लान कोणता घेता आणि तुमचे वय यावरही गोष्टी अवलंबून आहेत. हे फक्त समजण्यासाठी उदाहरण देण्यात आले आहे.)

तुम्ही देखील NPS कॅलक्युलेटरवर जाऊन तुम्हाला किती गुंतवायचे आहेत, किती काळासाठी गुंतवायचे आहेत, याची माहिती टाकून मिळणारी रक्कम त्या ठिकाणी पाहू शकता.

हे फक्त उदाहरण म्हणून आहे, आपण महिन्याला किती रुपये गुंतवू शकतो आणि आपण किती काळासाठी ही गुंतवणूक करत आहोत त्यावर हे अवलंबून आहे.

NPS योजना कुणासाठी आहे?

सुरुवातीलाच एक गोष्ट आपण लक्षात घेऊ ती म्हणजे आपण ज्या ठिकाणी नोकरी करतो तिथे आपण PF अकाउंटमध्ये पैसे भरत असतो. अर्थात ते पैसे आपल्याला थेट मिळण्याऐवजी त्या अकाउंटमध्येच जातात आणि शेवटीला ते आपल्याला मिळतात.

तेव्हा आपल्याला वाटू शकतं की आपण जर आधीच पैसे भरत असू तर डबल खर्च कशासाठी? तर याचं उत्तर आहे, आर्थिक स्थैर्यासाठी. ते कसं ते आपण या लेखात पाहू.

महिला आणि मुलगा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुलांसाठी NPS वात्सल्य ही योजना आहे.

आता येऊ पुन्हा NPS कडे, मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपण सरकारला पैसे द्यायचे आणि ते आपल्याला जास्त पैसे देणार. मग सरकार स्वतःचं आर्थिक नुकसान का करून घेईल? अगदी योग्य प्रश्न तुमच्या मनात आला आहे. यात सरकार आपले स्वतःचे नुकसान करुन घेत नाहीये किंवा आपल्या देखील होत नाहीये.

आपण जो पैसा दर महिन्याला गुंतवणार आहोत तो पैसा सरकार म्युच्युअल फंड, शेअर मार्केट किंवा बाँडमध्ये गुंतवतं. त्यातून तुमची एक रक्कम तयार होते. तुमची बचत, म्हणजेच मुद्दल अधिक तुमच्या गुंतवणुकीवरील व्याज असे मिळून तुमच्या रिटायरमेंटनंतर ( किंवा तुम्ही जेव्हा ठरवलं एक्झिट करायचं) त्यानंतर तुम्हाला ते पैसे दर महिन्याला मिळतात.

ही योजना 18 ते 60 वयोगटात असणाऱ्या प्रत्येक भारतीयासाठी आहे. सरकारी, निमसरकारी, खासगी, अगदी तुम्ही कुठे काम करत नाहीत पण महिन्याला काही पैसे गुंतवायचे आहेत, अनिवासी भारतीय या सर्वांसाठी ही योजना आहे.

अल्पवयीन मुलांसाठी देखील 'NPS वात्सल्य योजना' आहे ज्यात तुम्ही तुमच्या पाल्यासाठी गुंतवणूक करू शकता.

आपण सुरुवातीला पाहू की ही योजना कसं काम करते?

NPS ही देशातील एक विश्वासार्ह गुंतवणूक योजना मानली जाते. 2009 साली ही योजना सुरू करण्यात आली.

निवृत्त झाल्यानंतर तुम्ही गुंतवलेली 60 टक्के रक्कम तुम्हाला एकरकमी काढता येते. आणि उरलेली 40 टक्के रक्कम तशीच ठेवली जाते ज्यातून अ‍ॅन्युटी खरेदी केली जाते आणि दर महिन्याला काही पैसे दिले जातात.

तुम्ही जे पैसे द्याल ते पैसे 'पेंन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी' PFRDA (कडून सरकारी बाँड, कंपन्यांचे रोखे आणि स्टॉक्समध्ये गुंतवले जातात. तुमच्या गुंतवणुकीवरील परतावा हा बाजारभावानुसार दिला जातो.

जसं स्टॉक्ससाठी SEBI ही रेग्युलेटरी अथॉरिटी आहे तसं PFRDA ही NPS साठीची रेग्युलेटरली अथॉरिटी आहे.

NPS उघडण्याची प्रक्रिया काय?

NPS चे अकाउंट उघडण्यासाठी या वेबसाईटला भेट द्या आणि APPLY NOW वर क्लिक करा. त्यानुसार आपण या वेबसाईटमार्फत रजिस्ट्रेशन करू शकतो. त्यावर आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. ज्यात आपली सर्व माहिती द्यावी लागते.

NPS उघडण्यासाठी KYC आवश्यक आहे. तसेच तुमचा पासपोर्ट साइज फोटो आणि स्वाक्षरी देखील फॉर्मवर अपलोड करावी लागते.

पेन्शन

फोटो स्रोत, Getty Images

हे सर्व झाल्यावर तुम्हाला एक नंबर मिळतो त्याला PRAN ( Permanent Retirement Account Number) असे म्हणतात. नोंदणी झाल्यावर मोबाईलवर OTP येतो नंतर तुम्ही आपल्या अकाउंटहून लॉग इन करू शकता.

Tier -1 आणि Tier -2 मध्ये काय फरक असतो?

NPS आपल्याला ऑफलाइन देखील उघडता येते. त्यासाठी तुमचे खाते असलेल्या बँकेत जावून तिथे खाते उघडून घेता येऊ शकते.

NPS मध्ये जेव्हा आपल्याला खाते उघडायचे आहे, तेव्हा आपल्यासमोर हा प्रश्न येतो की Tier - 1 मध्ये उघडायचे की Tier -2 मध्ये.

तर हे दोन्ही टियर काय आहेत हे आपण पाहू.

tier-1 हे मुख्य रिटायरमेंट सेव्हिंग अकाउंट आहे तर tier -2 हे ऐच्छिक आहे. ज्यांच्याकडे tier- 1 आहे त्यांनाच हे काढता येते. आता हा देखील प्रश्न पडू शकतो की जर आपल्याकडे एक अकाउंट आहे तर हे दुसरं कशासाठी?

tier -2 चा फायदा हा आहे की पहिल्या अकाउंटमध्ये असणारे फायदे तर तुम्हाला सर्व मिळतात पण तुम्हाला पैसे काढण्यासाठी एक पर्याय उपलब्ध होतो. त्यासाठी काही नियम व अट आहेत पण गरजेच्या वेळी तो तुम्ही काढू शकता. तर tier- 1 मध्ये तुमच्या निवृत्तीपर्यंत (60 वर्षं) लॉकिंग पिरिअड असतो. तोपर्यंत आपल्याला पैसे काढता येत नाहीत.

NPS मुळे इन्कम टॅक्समधून सूट मिळते का?

NPS मुळे उत्पन्न करातून सूट मिळते की नाही याचे उत्तर तुम्ही कोणती कर प्रणाली स्वीकारली आहे त्यावर अवलंबून आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की सध्या Old tax regime आणि New tax Regime या दोन कर प्रणाली अस्तित्वात आहेत.

आपण दोन्ही कर प्रणालीमध्ये करात किती सवलत मिळते ते आपण पाहू.

बचत

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

जुनी कर प्रणाली ( Old Tax Regime)

जर तुम्ही ही कर प्रणाली स्वीकारली तर 80 CC D (1 )च्या अंतर्गत 1.50 लाख रुपयांपर्यंत तुम्ही केलेली गुंतणवूक ही करमुक्त आहे. जर वात्सल्य NPS किंवा अतिरिक्त गुंतवणूक ( tier -2) केली असेल तर 80 CC D (1 - B) च्या अंतर्गत आणखी 50 हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर कर लागू होत नाही.

NPS अकाउंटमध्ये Employer ने तुमच्यासाठी गुंतवणूक केल्यावर 80CCD (2) अंतर्गत वेतनावरील 10 टक्के गुंतवणूक ( खासगी कर्मचारी) आणि सरकारी कर्मचाऱ्यासाठी 14 टक्के गुंतवणूक ही करमुक्त असते.

ज्यावेळी निवृत्तीनंतर आपण एक्झिट करणार असतो त्यावेळी 60 टक्के रक्कम आपल्याला एक रकमी मिळते, त्यावर कुठलाही कर लावला जात नाही.

त्यानंतर आपली जी 40 टक्के रक्कम उरते, त्यातून पुढील गुंतवणूक करुन त्यातला जो भाग अ‍ॅन्युटी खरेदीसाठी (आपल्या ठेवीतून जी गुंतवणूक होत आहे आणि दरमहा रक्कम दिली जात आहे तो हिस्सा) त्यावर कर लावला जात नाही. पण त्यावरील उत्पन्न आपल्या हाती येते त्यावर नियमाप्रमाणे कर असतो.

नवी कर प्रणाली ( New Tax Regime)

जर तुम्ही नवी कर प्रणाली स्वीकारली तर NPS वरील तुम्ही स्वतः केलेल्या गुंतवणुकीवर तसेच वात्सल्य NPS मधील गुंतवणुकीवर कुठलीही कर सवलत नाही.

परंतु, NPS अकाउंटमध्ये Employer ने तुमच्यासाठी गुंतवणूक केल्यावर 80CCD (2) अंतर्गत वेतनावरील 14 टक्के गुंतवणूक (खासगी कर्मचारी) आणि सरकारी कर्मचाऱ्यासाठी 14 टक्के गुंतवणूक ही करमुक्त असते.

ज्यावेळी निवृत्तीनंतर आपण एक्झिट करणार असतो त्यावेळी 60 टक्के रक्कम आपल्याला एक रकमी मिळते, त्यावर कुठलाही कर लावला जात नाही.

त्यानंतर आपली जी 40 टक्के रक्कम उरते, त्यातून पुढील गुंतवणूक करुन त्यातला जो भाग अ‍ॅन्युटी खरेदीसाठी (आपल्या ठेवीतून जी गुंतवणूक होत आहे आणि दरमहा रक्कम दिली जात आहे तो हिस्सा) त्यावर कर लावला जात नाही. पण त्यावरील उत्पन्न आपल्या हाती येते त्यावर नियमाप्रमाणे कर असतो.

PF असताना NPS मध्ये गुंतवणूक करावी का?

वरील सर्व गोष्टी सांगितल्यावर तुम्हाला वाटू शकते की आमच्याजवळ असलेले PF ( प्रोव्हिडंट फंड - भविष्य निर्वाह निधी) हे देखील तर पेन्शन सारखेच आहे. रिटायरमेंटनंतर आलेली रक्कम आपण बँकेत फिक्समध्ये टाकू शकतो आणि त्यावरील व्याज हे दरमहा येऊ शकते. ते महिन्याच्या खर्चाचा प्रश्नही मिटला. तर, हा विचार काही चूक नाहीये.

PF आणि NPS मध्ये एक फरक आहे, तो म्हणजे प्रोव्हिडंट फंड हे तर केवळ संघटित क्षेत्रातीलच व्यक्तीसाठी असतात. त्याचबरोबर NPS मधून गुंतवणुकीचा एक जास्त पर्याय उपलब्ध होतो. आज केलेल्या गुंतवणुकीतून भविष्यात तुम्हाला एकरकमी मोठी रक्कम हवी असेल आणि काही पैसे महिन्याला हवी असेल त्यासाठी हा पर्याय उपलब्ध आहे.

PF असताना NPS मध्ये गुंतवणूक का करावी यावर PFRDA चे अध्यक्ष दीपक मोहंती यांनी 'झी बिजनेस'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले, की "वृद्धावस्थेत एक सशक्त आर्थिक आधार असणे आवश्यक आहे. जे लोक खासगी नोकरीत आहेत त्यांना तर त्यांच्या कंपनीकडून काही लाभ होतात पण जे असंघटित क्षेत्रात आहेत, व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी NPS हे एक साधन आहे ज्यातून त्यांना पेन्शन मिळू शकते. यात आणखी एक गोष्ट आहे की जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील तेव्हा तुम्ही पैसे टाकू शकता. (SIP मध्ये मात्र नियमित टाकावे लागतात.) त्यातून तुम्ही तुमच्या सुरक्षित भविष्याची तरतूद करू शकता."

NPS हा आपल्या भविष्य निर्वाह निधीसोबतच आर्थिक सशक्तिकरण करणारा एक चांगला पर्याय मानला जातो. अगदी 1,000 रुपयांपासून देखील आपण गुंतवणूक करू शकतो ज्याचा आपल्याला निवृत्तीनंतर फायदा होईल.

( हा लेख केवळ गुंतवणुकीचे कोणते उत्पादनं उपलब्ध असतात याची माहिती देण्यासाठी आहे. गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञाशी किंवा तुमच्या गुंतवणूक सल्लागाराशी सल्ला मसलत करावी.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)