सोनं खरं आहे की बनावट? हे कसं ओळखायचं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अमरेन्द्र यार्लागड्डा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"काय सोन्यासारखी पोरगी आहे?" असं वाक्य आपल्या तोंडातून सहज निघतं. म्हणजेच एखादी व्यक्ती फार चांगली असेल तर आपण त्या व्यक्तीची तुलना सोन्यासोबत करतो.
पण, ज्या सोन्यासोबत तुलना करतो ते सोनं किती शुद्ध आहे? हे आपल्याला माहिती असतं का? सोन्याची गुणवत्ता आणि त्याची शुद्धता कशी तपासायची हे तुम्हाला माहिती आहे का?
सर्वसाधारणपणे शुद्धता मशीनमध्ये टाकून एका मिनिटात सोन्याची डिजिटल शुद्धता मोजली जाते. पण, प्रयोगशाळेत ही शुद्धता मोजायला तब्बल चार तास लागतात.
हे तपासण्यासाठी खूप कमी खर्च येतो आणि प्रयोगशाळेत सोनं शुद्धता किती आहे हे माहिती होतं, असं भारतीय मानक ब्युरो (बीआयएस)चे अधिकारी सांगतात.


हॉलमार्किंग असले तर सोनं शुद्ध असतं का?
सोनं खरेदी करताना आपल्याला कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे हे पाहुयात.
बाजारात 22 कॅरेट सोन्यापासून बनवलेले दागिने सर्वाधिक उपलब्ध असतात. या सर्व दागिन्यांवर बीआयएसच्या नियमांनुसार हॉलमार्किंग असणं गरजेचं असतं.
हॉलमार्किंगमध्ये BIS लोगो, 22K916 (ज्वेलरी कॅरेट) आणि HUID (हॉलमार्किंग युनिक आयडेंटीफिकेशन नंबर) असते.
प्रत्येक दागिन्यावर या तीन गोष्टी असणं गरजेचं असतं.

फोटो स्रोत, बीआयएस
बीआयएस हैदराबादचे संचालक पीव्ही श्रीकांत यांनी बीबीसीला सांगितलं की "या तीन गोष्टींशिवाय दागिने विकणं कायद्यानं गुन्हा आहे.
बीआयएस अधिनियम 2016 नुसार हॉलमार्कशिवाय दागिने विकणं गुन्हा आहे.
यासाठी दोन किंवा पाच वर्षांचा तुरुंगवास आणि 2 लाख रुपये दंड अशी शिक्षा होते. कधी कधी दंड आणि तुरुंगवास अशा दोन्ही शिक्षा होऊ शकतात."
दागिन्यांवरील एचयूआयडी नंबर बीआयएस केअर अॅपमध्ये टाकून दागिने खोटे की खरे आहेत हे तपासता येतं. बीआयएसनं तशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
कॅरेटनुसार सोन्याचे प्रकार
शुद्धतेनुसार सोन्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. सोनं 24, 23, 22, 20, 18 आणि 14 कॅरेटमध्ये विभागलं गेलं आहे.
यापैकी 22,18 आणि 14 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो.
995 शुद्ध सोन्यापासून दागिने बनवणं कठीण असतं. सोन्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी त्यामध्ये इतर खनिज वापरलं जातं, असं बीआयएसच्या संयुक्त संचालक सत्तू सविता यांनी बीबीसीला सांगितलं.
सोनं 995 असेल तर 24 कॅरेट मानलं जातं. 1000 मिलीग्रॅम मिश्रू धातूत 995 (99.5 टक्के) सोनं असेल तर ते शुद्ध सोनं असतं.

फोटो स्रोत, Getty Images
तसेच सोनं 958 असेल तर त्याला 23, तर 916 असेल तर त्याला 22 कॅरेट मानलं जातं.
833 असेल तर 20, 750 असेलतर 18 आणि 585 असेल तर या सोन्याला 14 कॅरेट सोनं म्हणतात.
महत्वाचं म्हणजे इतर धातू मिसळल्यानंतर सोन्याचं प्रमाण किती टक्के आहे यावर त्याची शुद्धता ठरत असते.
ठरवून दिलेल्यापेक्षा अधिक इतर धातूचा वापर होत असेल तर ग्राहकांच्या हिताचं रक्षण करणं गरजेचं आहे." असं सविता म्हणाल्या.
सोन्याची शुद्धता कशी तपासली जाते?
प्रयोगशाळेत सोन्याची खरी शुद्धता समजते. पण, ती तपासली कशी जाते? जाणून घेऊयात.
सोन्याची शुद्धता तपासण्याची प्रक्रिया चार तासांची आहे. पण, त्यासाठी फक्त 45 रुपये शुल्क भरावं लागतं.

सर्वात आधी बीआयएस कर्मचारी दुकानांतून हॉलमार्क असलेल्या सोन्याचे नमुने गोळा करतात. हे कोणत्या दुकानातून आणले हे न बघता त्याला एक विशेष कोड दिला जातो. त्यानंतर बीआयएस लॅबमध्ये आणल्यानंतर त्याला एक पुन्हा कोड दिला जातो.
सविता सांगतात, "सोन्याची शुद्धता तपासताना त्यावर पूर्णपणे नियंत्रण असतं आणि कोणत्या दुकानातून आणलेल्या सोन्याची शुद्धता तपासली जातेय हे माहिती सुद्धा होत नाही."
"सगळं काही पारदर्शकपणे होण्यासाठी ही प्रक्रिया स्विकारली आहे. आमच्याकडचे नमुने इतर शाखांमध्ये जातात आणि इतर ठिकाणचे नमुने आमच्या शाखेत येतात" असं पी. व्ही. श्रीकांत सांगतात.
प्राथमिक मूल्यमापनासाठी एक्सआरएफ नावाच्या मशीनचा वापर करून नमुने तपासले जातात. कॅरेटचा अंदाज लावला जातो, वजन केले जाते आणि नमुने रजिस्टरमध्ये नोंद केले जातात.
आम्ही नमुने 22K, 18K, 14K मध्ये विभागतो. यामध्ये कुठलाही प्रतिबंधित पदार्थ आढळला तर ते नमुने आम्ही स्विकारत नाही, असं सविता सांगतात.
नमुन्यांमध्ये कुठलाही प्रतिबंधित पदार्थ नसेल तर 1100 डिग्री सेल्सिअस तापमानावर 5-10 मिनिटं सोनं वितळवतात.
वितळलेल्या सोन्याची वनज आणि प्राथमिक अंदाजे वजन याची तुलना केली जाते. त्यानंतर हे मिश्रण हायड्रॉलिक मशीनमध्ये दाबले जाते आणि त्याला बटणांचा आकार दिला जातो.
रोलिंग मशीनच्या सहाय्यानं त्याचं पातळ पत्र्यात रुपांतर केलं जातं.
पत्र्याला कात्रीच्या सहाय्यानं लहान लहान तुकड्यांमध्ये कापतात आणि त्यातलं 150 मिलीग्राम बटर पेपरवर ठेवलं जातं.
शंकूच्या आकाराच्या काचेच्या भांड्यात सोनं, चांदी आणि तांब्याचं मिश्रण बटर पेपरवर टाकतात.
त्याचं पुन्हा एकदा वजन केलं जातं. बॉयलिंग प्लेयर नावाच्या यंत्राच्या मदतीनं त्याचे लहान गोळे तयार करतात आणि ते भट्टीत ठेवून वितळवतात.
1050 ते 1080 डिग्री सेल्सिअस तापमानात हे गरम केलं जातं. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सोनं आणि चांदी शिल्लक राहते आणि इतर सर्व पदार्थांचं ऑक्सिडीकरण होतं.
यानंतर नायट्रीक असिड आणि डिआयोनाइज्ड पाणी वापरून चांदी सोन्यापासून वेगळी केली जाते. त्याला जवळपास 15 मिनिटं लागतात.
सोन्याचा रंग बदलून आणि विविध गणितीय सूत्रं वापरून सोन्याची शुद्धता मोजली जाते.
प्रक्रियेनंतर उरलेल्या मिश्रणाची दुकानातून तपासणीसाठी आणलेल्या सोन्याच्या वजनासोबत तुलना केली जाते.
या प्रक्रियेत किती वाया गेलं याची मोजमाप होतं आणि उरलेल्या मिश्रणाला डिकोड करून त्याला पुन्हा आणलं त्या दुकानात पाठवलं जातं, असं बीआयएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
सर्वसामान्य व्यक्ती थेट लॅबमध्ये जाऊन आपलं सोनं तपासू शकते का?
आमच्याकडे आलेले नमुने आम्ही स्विकारले नाहीतर दुकानदाराला पुन्हा नमुने पाठवण्याची संधी एकदा दिली जाते.
पण, त्यानंतरही नुमन्यांमध्ये काही आढळलं आणि ते फेटाळण्यात आलं तर नियमांनुसार कारवाई केली जाते, असं पी. व्ही. श्रीकांत सांगतात.
आपलं सोनं किती शुद्ध आहे हे तपासण्यासाठी लोक हैदराबादच्या चोरलापल्लीमधल्या बीआयएस लॅबसोबत थेट संपर्क करू शकतात.

पण या प्रक्रियेत मूळ पदार्थाचं वजन कमी होतं. हॉलमार्किंग असेल तर ग्राहकांनी सोनं खरेदी करायला हवं.
तरीही तुम्हाला प्रयोगशाळेत सोन्याची शुद्धता तपासायची असले तर आमच्यासोबत संपर्क करू शकता, असं सविता म्हणतात.
सोन्यात कुठले पदार्थ मिसळणं हानिकारक आहे?
सोन्याची मजबूती वाढवण्यासाठी त्यात इतर धातू मिसळतात. पण, सोन्यात कॅडमिअम, ऑस्मियम, पॅलेडियम, रोडियम, रुथेनियम आणि इरीडियम याचा वापर करणं मनाई आहे.
याचा वापर केल्यास सोन्यासोबत मिश्रधातू तयार होत नाही. तसेच कॅडमियमचा मानवाच्या शरीरावर वाईट परिणाम होतो.
त्यामुळे या पदार्थांवर निर्बंध लावण्यात आले आहे. सोन्यापासून मिश्र धातू बनवण्यासाठी चांदी, तांबे आणि जस्त वापरलं जाऊ शकतं, असं सविता यांनी सांगितलं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











