100 रुपयांतही सोनं, स्वस्तात सोने खरेदीचे 'हे' आहेत 6 पर्याय

फोटो स्रोत, Getty Images
गेले काही दिवस सोन्याच्या भावात घसरण होत असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे सोने खरेदीसाठी अनेकांची धावपळही सुरू आहे.
भारतीयांचं सोन्यावरचं प्रेम तर जगभरात प्रसिद्ध आहेत. आणि तुम्हाला माहित आहे का, की जगामधल्या सोन्याच्या एकूण साठ्यापैकी सुमारे 11 टक्के साठा भारतात आहे.
तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय; थोडीफार तरी बचत करत असालच. वाचवलेल्या पैशांचा उपयोग साधारणपणे आपण गुंतवणूक करण्यासाठी करतो. ही गुंतवणूक सोने-खरेदीमध्येच सर्वाधिक केली जाते.
सोन्याचे दागिने खरेदी करण्याची परंपरा भारतात जुनी आहे. सोन्यात केलेली गुंतवणूक कधीच वाया जात नाही, असं म्हटलं जातं.
सोन्याचे दागिने अंगावर परिधान करता येतात. पण अडचणीच्या काळात ते आपल्याला प्रचंड उपयोगीही ठरतात.
सणासुदीला, लग्नात किंवा कोणत्याही कार्यक्रमात अनेक कुटुंबांमध्ये सोन्याची खरेदी केली जाते.


सोन्याचे सध्याचे दर तुम्ही पाहिले असतीलच. सोनं खरेदीचा विचार करताना दागिने घेण्याचा पर्याय तर असतोच, पण इतरही काही पर्याय आहेत ज्याद्वारे तुम्ही सोन्यात गुंतवणूक करू शकता.
हे पर्याय नेमके काय आहेत? त्यातून तुम्हाला परतावा कसा मिळू शकतो हेच आपण या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

फोटो स्रोत, Getty Images
1. दागिने
सोनं खरेदीचा बहुतेक लोकांकडून वापरला जाणारा मार्ग म्हणजे दागिने. सोन्याचे दागिने विकत घेण्याचे काही फायदे आहेत तर काही तोटेसुद्धा आहेत.
दागिने खरेदीचा पहिला फायदा म्हणजे हे दागिने तुम्ही वापरू शकता. म्हणजे तुमची ही गुंतवणूक कपाटात वा लॉकरमध्ये पडून राहू शकत नाही.
दागिन्यांच्या खरेदीतून होणारा तोटा असा की हे सोनं दागिन्यांच्या रूपात देताना तुम्हाला घडणावळ म्हणजे मेकिंग चार्जेस द्यावे लागतात जे 10 टक्क्यांपेक्षा जास्त असू शकतात.
याशिवाय दागिने खरेदीवर 3 % GST आकारला जातो. दागिन्यांसोबत एक भावनिक नातं तयार होतं, त्यामुळेच अगदीच कठीण प्रसंग आला तरच ते विकण्याचा, गुंतवणुकीसारखं वापरण्याचा विचार केला जातो. आणि अशा प्रकारे सोनं विकताना ज्वेलर्स त्यातून 'घट' काढण्याची शक्यता असते.

फोटो स्रोत, Getty Images
2. फिजिकल गोल्ड
सोनं खरेदीचा दुसरा पर्याय म्हणजे सोन्याचं वळं, नाणं किंवा बिस्कीट. यामध्ये तुम्हाला मेकिंग चार्ज द्यावा लागत नाही आणि शुद्धतेची गॅरंटी असते.
सोन्याच्या प्रत्येक नाण्यावर BIS हॉलमार्क असतो. ही नाणी ज्वेलर्स, बँक आणि ई-कॉमर्स वेबसाईटवर उपलब्ध असतात. पण यावर 3% GST द्यावा लागतो
3. डिजीटल गोल्ड
डिजिटल गोल्डच्या रूपात देखील सोन्याची खरेदी करता येते. यामध्ये तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून सोनं खरेदी करू शकता.
अनेक पेमेंट अॅप्सवरूनही डिजीटल गोल्ड घेता येतं.

फोटो स्रोत, Getty Images
यातली चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला अगदी 50-100 रुपयांपासून लहान रक्कमेचीही खरेदी करू शकता. मोठा खर्च करण्याची गरज नाही.
थोडं थोडं सोनं खरेदी-विक्री तुम्ही या माध्यमातून घेऊ शकता. यावरही तुम्हाला 3% GST लागेल. हे डिजीटल गोल्ड व्हर्च्युअली घेतलेलं असल्याने सोन्याची काळजी घेण्याची जबाबदारी तुमच्यावर नसते.
काही ज्वेलर्स तुम्ही घेतलेलं डिजीटल गोल्ड दुकानात एक्सचेंज करून प्रत्यक्ष सोनं घेण्याचा पर्यायही देतात.
4. सॉव्हरिन गोल्ड बाँड
सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हा सरकारने दिलेला पर्याय आहे. यामध्ये तुम्ही घेत असलेल्या गोल्ड बाँडसाठी सरकारकडून हमी दिली जाते, त्यामुळे तुमचे पैसे बुडायची जोखीम नसते.
सोन्याचा भाव जसा वाढेल तसा तुम्हाला फायदा होतो आणि सोबत एक ठराविक व्याजही मिळतं.
दर काही कालावधीनंतर सरकारकडून असे सॉव्हरिन गोल्ड बाँड विक्रीसाठी आणले जातात आणि आठवडाभरासाठी ही योजना गुंतवणुकीसाठी खुली असते. शिवाय सेकंडरी मार्केटमधूनही तुम्ही गोल्ड बाँड विकत घेऊ शकता.

5. गोल्ड ETF
Gold Exchange Traded Fund (Gold ETF) ही एक ओपन एन्डेड म्युच्युअल फंड स्कीम आहे. यामध्ये 99.5% शुद्धतेच्या गोल्ड बुलियनमध्ये गुंतवणूक केली जाते.
या मार्गामुळे तुम्हाला सोनं खरेदीसोबतच शेअर्ससारखं त्याचं ट्रेडिंगही करता येतं. कारण एखाद्या कंपनीच्या शेअर्ससारखंच या Gold ETF चंही स्टॉक एक्स्चेंजमध्ये ट्रेडिंग होतं आणि गुंतवणूकदार या गोल्ड ETF च्या युनिट्सची खरेदी वा विक्री करू शकतात.
या प्रकारच्या गुंतवणुकीचा फायदा म्हणजे सोनं चोरी होण्याची भीती नसते.
6. गोल्ड सेव्हिंग योजना
अनेक सोनार ही ज्वेलरी चेन स्टोअर्स हा पर्याय देतात. यामध्ये दरमहा तुम्ही ठराविक रक्कम त्यांच्याकडे जमा करायची.
यामध्ये तुमच्या योजनेचा कालावधी संपताना त्या ज्वेलरकडून एखादा हप्ता किंवा बोनसची भर घातली जाते आणि तुम्ही या एकूण रक्कमेचा वापर करत सोनं खरेदी करू शकता. दरमहा थोडी थोडी बचत करून एखादी मोठी गोष्ट घेण्यासाठी हा पर्याय अनेकांकडून वापरला जातो.
सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे हे विविध मार्ग आहेत. पण कोणतीही गुंतवणूक म्हटली की त्यात जोखीम - धोका येतोच. म्हणूनच नीट विचार करून आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच गुंतवणुकीचे निर्णय घ्या.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)












