वर्ष अखेरीस सोनं 1 लाखांवर पोहोचणार का? 10 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या

प्रतीकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतीकात्मक छायाचित्र

सोन्याचा भाव कडाडल्यामुळे सोन्याची झळाळी वाढली असतानाच सर्वसामान्य नागरिक, गुंतवणूकदारांना अनेक प्रश्न पडत आहेत. सोन्याच्या भावातील तेजीसंदर्भात त्यांच्या मनात अनेक शंका आहेत. सोन्याच्या भावाशी निगडित विविध मुद्द्यांबद्दल जाणून घेऊया.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा भार स्वीकारल्यापासून निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. यात एक महत्त्वाचा निर्णय इतर देशांमधून येणाऱ्या मालावर आयात शुल्क आकारण्याचा देखील आहे.

त्यांच्या या निर्णयाचा जगभरात परिणाम झाला आहे. एकीकडे भारतीय शेअर बाजारात जोरदार घसरण झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला सोन्यात मोठी तेजी येत सोन्याचे भाव वाढले आहेत.

सोन्यामधील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. सोन्याच्या भावात होत असलेल्या वाढीमुळे सर्वसामान्य नागरिक, गुंतवणूकदार आणि उद्योगात चिंतेचं वातावरण आहे.

गेल्या 5-6 दिवसांपासून सोन्याच्या भावात सातत्यानं वाढ होते आहे. मंगळवारी (11 फेब्रुवारी) चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 8,060 प्रति ग्रॅम इतका होता. तर सोव्हेरन गोल्डचा भाव 64,480 (8 ग्रॅम) रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता.

सोन्याच्या भावात होत असलेल्या वाढीमुळे सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झालेल्या 10 शंका आणि प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया.

1. सोन्याचा भाव कोण ठरवतं?

लंडन बुलियन मार्केट हे जगातील सर्वात आघाडीचे ट्रेडिंग व्यासपीठ आहे. तिथेच सोन्याचा भाव किंवा किंमत निश्चित होते.

बडे खाणउद्योजक आणि मोठे उद्योजक या व्यवस्थेचा भाग आहेत. या बाजारात सोन्याच्या भावात सातत्यानं वाढ होते आहे.

सोनं वर्षअखेरीस 1 लाखांवर पोहोचणार का? 10 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या

फोटो स्रोत, Getty Images

यामागे विविध कारणं आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेली राजकीय परिस्थिती, आयात शुल्क आणि जगभरात विविध ठिकाणी असलेली युद्धजन्य स्थिती यामुळे सोन्याच्या भावात वाढ होताना दिसते आहे.

2. सोन्याच्या भावात सातत्यानं वाढ होण्यामागचं कारण काय?

शांताकुमार मद्रास गोल्ड अँड डायमंड मर्चंट्स असोसिएशनचे सरचिटणीस आहेत. ते यासंदर्भात बीबीसीशी बोलले.

ते म्हणाले, "सोन्याच्या भावात वाढ होणार हे अपेक्षित आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यापासून त्यांच्या सरकारची धोरणं, विशेषकरून इतर देशांवर लावण्यात येणारे आयात शुल्क, कर याचा संपूर्ण जगावर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजार पेठेतदेखील सोन्याच्या भावात वाढ होते आहे. परिणामी सोन्याचे भाव कडाडले आहेत."

बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.
बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.

डॉलर मजबूत झाला आहे. दरम्यान भारतीय रुपयाचं मूल्य घसरलं आहे. सोमवारी (10 फेब्रुवारी) डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य 87.17 रुपये होतं.

"स्थानिक बाजारपेठेत देखील सोन्याला मोठी मागणी आहे. सर्व थरातील गुंतवणूकदार सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत. त्यामुळेच सोन्याची मागणी वाढली आहे. या सर्व कारणांमुळे सोन्याच्या भावात जोरदार वाढ होते आहे," असं शांताकुमार म्हणाले.

3. शेअर बाजारातील घसरण यासाठी कारणीभूत आहे का?

"भारतीय शेअर बाजार गडगडल्यानंतर अनेकजण सोन्यामध्ये गुंतवणूक करताना दिसत आहेत. कारण सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनिश्चितता आणि संकट तसंच शेअर बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर अनेकजण सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत," असं गुंतवणूक सल्लागार सतिश म्हणाले.

ते म्हणाले की, "अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर आयात शुल्क लागू केल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सोन्यामध्ये गुंतवणूक करणं हा योग्य पर्याय मानलं जातं आहे."

 सोन्याच्या भावात वाढ होताना दिसते आहे.

फोटो स्रोत, Getty Images

ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर 25 टक्के आयात शुल्क लागू केलं आहे.

अर्थात ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात जाहीर केलं होतं की ते 30 दिवसांसाठी हे आयात शुल्क स्थगित करतील. मात्र चीनमधून येणाऱ्या वस्तूंवरील 10 टक्के आयात शुल्क कायम आहे.

4. अमेरिका आणि चीन मधील 'व्यापार युद्धा'मुळे सोनं महाग झालं आहे का?

ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अमेरिकेनं चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवरील आयात शुल्कात वाढ केली. त्याला प्रत्युत्तर देत चीननं देखील अमेरिकेतून चीनमध्ये आयात होणाऱ्या वस्तूंवर आयात शुल्क लागू केलं.

परिणामी, दोन्ही देशांमधील व्यापार युद्ध वाढण्याच्या शक्यतेची चेतावणी तज्ज्ञ देत आहेत.

गुंतवणूक सल्लागार सतिश म्हणाले की सोन्याच्या भावात मोठी वाढ होण्यामागे हे देखील प्रमुख कारण आहे.

"अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्ध हे प्रमुख कारण आहे. यामुळे सर्व कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ होते आहे. सोनं हा सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानला जातो. त्यामुळे जागतिक पातळीवरील अशा गोंधळाच्या वातावरणात सोन्यात गुंतवणूक करण्यावर भर दिला जातो आहे. त्यातून सोन्याच्या भावात मोठी वाढ होते आहे," असं सतीश म्हणाले.

5. सोन्याच्या भावात अशीच वाढ होत राहील का?

"सध्या असलेली परिस्थिती अशीच राहील. यात 2026 मध्येच सुधारणा होईल. त्यावेळेस देखील सोन्याचा भाव खाली येणार नाही. सोन्याच्या भावात चढ-उतार होतील. मात्र त्यात संतुलन साधलं जाऊ शकतं," असं शांताकुमार म्हणाले.

6. सोन्याचा भाव प्रति तोळा 1 लाख रुपयांवर पोहोचेल का?

या प्रश्नाला उत्तर देताना शांताकुमार म्हणाले की या वर्षाच्या अखेरीपर्यंत सोन्याचा भाव 1 लाख रुपये प्रति तोळा (दहा ग्रॅम) वर पोहोचू शकतो.

प्रतीकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतीकात्मक छायाचित्र

शांताकुमार म्हणाले की, "यावर्षी मार्च महिन्यात सोन्याचा भाव 8,000 रुपये प्रति एक ग्रॅमवर पोहोचेल अशी आमची अपेक्षा होती. मात्र सोन्याचा भाव त्या पातळीवर एक महिनाभरापूर्वीच पोहोचला आहे. यावर्षी डिसेंबरपर्यंत सोन्याचा भाव 10,000 रुपये प्रति एक ग्रॅमच्या पातळीवर पोहोचेल असं आम्हाला वाटतं."

ते पुढे म्हणाले, "मात्र सद्यपरिस्थिती अशी आहे की सोन्याचा भाव या पातळीवर तीन महिने आधीच म्हणजे सप्टेंबरपर्यंतच पोहोचू शकतो. त्यामुळे यावर्षाच्या अखेरीपर्यंत सोन्याचा भाव 1 लाख रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर पोहोचल्यास आश्चर्य वाटायला नको."

7. सोन्याच्या भावात वाढ होत असताना आपण दागिने विकत घ्यावेत का?

शांताकुमार म्हणतात की सोन्याचे दागिने विकत घ्यावेत.

ते म्हणाले, "कारण सोन्याचा भाव वाढतच जाणार आहे. सध्याच्या परिस्थितीत सोन्याचे दागिने विकत घेणं योग्य ठरेल."

गुंतवणूक सल्लागार सतिश यांनी देखील असंच मत मांडलं.

ते म्हणाले, "सोन्याचे दागिने विकत घेण्याची ही योग्य वेळ आहे. सोन्याचा भाव वाढतो आहे म्हणून दागिने विकत न घेणं ही योग्य गोष्ट नव्हे. कारण भविष्यात सोन्याचा भाव यापेक्षा आणखी वाढण्याची मोठी शक्यता आहे."

8. सद्यपरिस्थितीत आपण सोन्याचे दागिने विकावेत का?

सतीश म्हणाले, "ज्यांना दागिने विकायचे आहेत, ते आता नक्कीच विकू शकतात. कारण ज्या किंमतीला सोन्याचे दागिने घेतले होते, त्यापेक्षा अधिक किंमतीला दागिने विकल्यामुळे त्यात नफा होईल."

9. दागिन्यांव्यतिरिक्त सोन्यामध्ये गुंतवणुक करण्याचे इतर पर्याय कोणते?

सतिश यांनी यासंदर्भात काही पर्याय सांगितले. ते म्हणाले की डिजिटल गोल्ड आणि गोल्ड बाँड्स हे चांगले पर्याय आहेत.

डिजिटल गोल्ड हा सोनं विकत घेण्याचा आणि सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा डिजिटल पर्याय आहे. म्हणजेच प्रत्यक्ष सराफा दुकानात जाऊन सोनं खरेदी करण्याऐवजी डिजिटल स्वरूपात सोन्याची खरेदी करणं. ही खरेदी ऑनलाईन स्वरूपात करता येते.

गोल्ड बाँड्समध्ये गुंतवणूक करणं हा सोन्यात गुंतवणूक करण्याचा उत्तम पर्याय आहे. यात तुमच्या गुंतवणुकीवर व्याजाचाही लाभ मिळतो.

10. बँका सोनं विकत का घेतात?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सारख्या जगभरातील शिखर किंवा मध्यवर्ती बँका सोनं खरेदी करत आहेत.

"डॉलरचं मूल्य वाढतं आहे आणि त्यामुळे डॉलर मजबूत होतो आहे. असं मानलं जातं की डॉलरचं मूल्यं आणि सोन्याच्या भाव कोसळणार नाहीत. जेव्हा डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात घसरण होते, तेव्हा लोक डॉलर आणि सोन्याकडे वळतात," असं अर्थतज्ज्ञ प्राध्यापक अरुण कुमार म्हणाले.

"रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देखील अधिक सोनं खरेदी करते आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात घसरण होत असल्यामुळे डॉलर-रुपया विनिमय दरात संतुलन साधण्यासाठी रिझर्व्ह बॅंक सोन्याच्या साठ्यावर अवलंबून आहे," असं गुंतवणूक सल्लागार सतीश म्हणाले.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.