सोन्याच्या खाणीचा अब्जावधींचा घोटाळा, अनेकांचं उद्ध्वस्त आयुष्य आणि एका भूवैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ

मायकल डी गुझमन
फोटो कॅप्शन, मायकल डी गुझमन

इंडोनेशियाच्या जंगलामध्ये सोन्याचा प्रचंड साठा सापडल्याच्या एका खाण कंपनीच्या दाव्यानंतर त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी चढाओढ लागली होती. मात्र, जे चकाकत होतं ते सोनं नव्हतं.

एका नव्या पॉडकास्ट सीरिजमधून ही बाब उघड झाली आहे. मात्र, त्या कंपनीच्या मुख्य भूवैज्ञानिकाच्या रहस्यमयी मृत्यूबद्दलचे प्रश्न अजूनही तसेच आहेत.

(डिस्क्लेमर : या लेखात विचलित करणाऱ्या गोष्टी आहेत. यात आत्महत्या आणि ग्राफिकद्वारे देण्यात आलेल्या माहितीमुळे वाचक अस्वस्थ होऊ शकतात.)

19 मार्च 1997च्या सकाळी मायकल डी गुझमन हा ब्रे-एक्स मिनरल्स या कॅनेडियन खाण कंपनीचा मुख्य भूगर्भतज्ज्ञ इंडोनेशियातील दुर्गम भागातील जंगलात जाण्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये बसला.

एखाद्या ठिकाणी सोन्याचा प्रचंड साठा सापडला आहे, असं कळल्यानंतर त्या ठिकाणी जाण्यासाठी या प्रकारचा प्रवास याआधी त्याने असंख्य वेळा केला होता.

मात्र, या खेपेस त्यानं प्रवास तर सुरू केला, मात्र तो नियोजित स्थळी पोहोचला नाही.

प्रवास सुरू केल्याच्या वीस मिनिटांनी हेलिकॉप्टरचा डाव्या बाजूचा मागचा दरवाजा उघडला आणि खाली असलेल्या घनदाट जंगलात कोसळून डी गुझमनचा मृत्यू झाला.

कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यानं जाहीर केलं की, डी गुझमननं आत्महत्या केली आहे. त्याला हेपॅटिटिस बी असल्याचं निदान झालं होतं आणि वारंवार होणाऱ्या मलेरियाशी लढून तो थकला होता.

दहा वर्षांनंतर कॅलगरी हेराल्डनं सुझेन विल्टन या कॅनेडियन पत्रकाराला डी गुझमनच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी पाठवलं.

"संपूर्ण जगाच्या निम्म्या अंतरावर मला पाठवण्यात आलं. तेव्हापासून या कथेनं मला झपाटलं आहे," असं त्या म्हणतात.

नव्या पॉडकास्ट सीरिजसाठी त्या पुन्हा या प्रकरणावर काम करत आहेत. त्या अंतिम हेलिकॉप्टर फेरीआधी नेमकं काय घडलं, याचा त्या शोध घेत आहेत.

खाणीचं ते दुर्गम स्थळ इंडोनेशियातील बोर्नियो बेटावरील पूर्व कालिमांतन प्रांतातील बुसांगमध्ये होतं

फोटो स्रोत, Richard Behar

फोटो कॅप्शन, खाणीचं ते दुर्गम स्थळ इंडोनेशियातील बोर्नियो बेटावरील पूर्व कालिमांतन प्रांतातील बुसांगमध्ये होतं
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

डी गुझमनचा जन्म 1956 च्या व्हॅलेंटाईन्स डेला (14 फेब्रुवारी) फिलिपाईन्समध्ये झाला होता. त्याच्या जन्मदिवसाप्रमाणेच तो देखील नेहमी प्रेमात असायचा. जगातील विविध देशांमध्ये एकाच वेळी त्याच्या तीन किंवा चार पत्नी होत्या.

डी गुझमनला कराओके, बिअर, स्ट्रीप क्लबमध्ये जाणं आणि सोनं घालणं आवडायचं. तो एक अनुभवी भूगर्भतज्ज्ञ होता. त्याला वाढत होतं की इंडोनेशियामध्ये त्याला त्याचं नशीब आजमावता येईल.

1990 मध्ये नैसर्गिक खनिजांच्या प्रचंड साठ्यामुळे इंडोनेशियाकडे सोनं शोधणाऱ्यांसाठी संधीचं ठिकाण म्हणून पाहिलं जात होतं, असं विल्टन सांगतात.

भूगर्भतज्ज्ञांचा इंडियाना जोन्स अशी ओळख असलेल्या जॉन फेल्डरहॉफ या डच माणसाला वाटत होतं की, इंडोनेशियातील बोर्नियो बेटावरील पूर्व कालिमांतान प्रांतातील बुसांग या ठिकाणी असलेल्या सोन्याच्या खाणीतून भरपूर सोनं मिळू शकेल. मात्र, यासंदर्भात पुढे जाण्यासाठी त्याला पैशांची आवश्यकता होती.

एप्रिल 1993 मध्ये फेल्डरहॉफनं ब्रे-एक्स मिनरल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड वॉल्श यांच्याशी एक सौदा केला. हे सोनेरी स्वप्न वॉल्श जमिनीखाली दडलेल्या खनिज्याच्या संभाव्य गुंतवणूकदारांना विकणार होते.

फेल्डरहॉफनं प्रत्यक्ष खाणीच्या ठिकाणच्या कामकाजावर नियंत्रण ठेवलं आणि हे स्पष्ट केलं की, सोन्याच्या शोधासाठी त्याला एक प्रकल्प भागीदार हवा, तो म्हणजे भूगर्भतज्ज्ञ असलेला त्याचा मित्र डी गुझमन.

जॉन फेल्डरहॉफ याच्याकडे करिष्माई व्यक्तिमत्व असल्याचं म्हटलं जायचं

फोटो स्रोत, Warren Irwin

फोटो कॅप्शन, जॉन फेल्डरहॉफ याच्याकडे करिष्माई व्यक्तिमत्व असल्याचं म्हटलं जायचं

मात्र, त्या ठिकाणी खरोखरंच सोनं आहे की नाही हे ड्रील करून तपासण्यासाठी फेल्डरहॉफ, डी गुझमन आणि त्यांच्या टीमकडे फक्त 18 डिसेंबर 1993 पर्यतचाच वेळ होता. कारण त्या दिवशी इंडोनेशियन सरकारनं त्यांना सोन्याचा शोध घेण्यासाठी दिलेल्या परवान्याची मुदत संपणार होती.

परवाना संपण्याची अंतिम मुदत येण्यास काही दिवसांचाच अवधी राहिलेला असताना दोन खड्डे खणण्यात आले. मात्र तिथं सोनं असल्याचं कोणतंही चिन्हं नव्हतं. तेव्हा डी गुझमननं अचानक वॉल्शला सांगितलं की, सोनं हमखास मिळेल असं ड्रील करण्याचं ठिकाण कुठे आहे हे त्याला ठाऊक आहे. हे ठिकाण त्यानं स्वप्नात पाहिलं होतं, असं विल्टन सांगतात.

त्यांच्या टीमनं तिसरा खड्डा किंवा ड्रील अगदी तिथेच खणला जिथे डी गुझमननं सांगितलं होतं आणि त्यांना सोनं सापडलं. चौथा खड्डा खणल्यावर किंवा ड्रिल केल्यावर तर आणखी सोनं सापडण्याची शक्यता दिसू लागली.

हा सोन्याच्या खाणीचा आतापर्यतचा सर्वात मोठा घोटाळा होता. या घोटाळ्यामुळे असंख्य लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. मात्र नक्की काय झालं?

पुढील तीन वर्षं त्या खाणीच्या ठिकाणी काम सुरू राहिलं. त्या ठिकाणी मिळू शकणाऱ्या सोन्याचा अंदाजित साठा वाढल्यानं गुंतवणूकदारांची संख्यादेखील वाढत गेली. ब्रे-एक्स मिनरल्स या कंपनीच्या शेअरच्या किंमती तेजी येण्यास सुरूवात झाली. 20 सेंट्सवरून शेअरची किंमत 280 कॅनेडियन डॉलरवर (206 अमेरिकन डॉलर किंवा 163 पौंड) पोहोचली. त्यामुळे कंपनीचं बाजारमूल्य 6 अब्ज कॅनेडियन डॉलरवर (4.4 अब्ज अमेरिकन डॉलर किंवा 3.5 अब्ज पौंड) पोचलं.

कॅनडाच्या छोट्या शहरांमधील असंख्य लोक या सोन्याच्या खाणीतून पैसा कमावण्याच्या गर्दीत सहभागी झाले. त्यांनी त्यांच्या बचतीमधून लाखो डॉलर्सची गुंतवणूक केली.

मात्र, जसजसा काळ पुढे गेला तसतशी या सोन्याच्या खाणीची चमक कमी होत गेली.

1997 च्या सुरूवातीला तत्कालीन इंडोनेशियन राष्ट्राध्यक्ष सुहार्तो यांनी आदेश दिला की, यापुढे ब्रे-एक्स मिनरल्ससारखी एक छोटी कंपनी एकट्यानं या खाणीवर मालकी हक्क ठेवून त्याचा फायदा घेऊ शकत नाही. कंपनीला तिच्या नफ्यातील काही हिस्सा इंडोनेशियन सरकारला द्यावा लागेल. त्याचबरोबर ब्रे-एक्स मिनरल्सला सहयोग करण्यासाठी एक अधिक अनुभवी खाण कंपनीदेखील यात सहभागी होईल. त्यानंतर फ्रीपोर्ट-मॅकमोरॅन या अमेरिकन कंपनीशी हा करार झाला.

सोन्यासारख्या मूल्यवान धातूच्या खाणीशी निगडीत सर्व प्रकारची आर्थिक जोखीम घेण्यापूर्वी फ्रीपोर्ट-मॅकमोरॅन या कंपनीला तिच्या बाजूनं काही गोष्टींची खातरजमा करून घ्यायची होती. कंपनीने आपल्या भूगर्भतज्ज्ञांना बुसांगच्या खाणीच्या ठिकाणी दोन ट्विन ड्रिल किंवा खड्डे करून तपासणी करण्यासाठी पाठवलं. ट्विन ड्रील म्हणजे आधीच सोनं सापडलेल्या जागेच्या शेजारी ड्रिलिंग करून आणि खडकाचे नमुने घेऊन तिथे सोन्याच्या साठ्यांचं अस्तित्व तपासण्याची एक पद्धत आहे.

खाण उद्योगात ही एक स्टॅंडर्ड पद्धत आहे. मात्र आतापर्यत ब्रे-एक्स मिनरल्सनं ही पद्धत अंमलात आणली नव्हती.

ट्विनिंग ड्रिल करून मिळालेले नमुने दोन वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले. मात्र दोन्ही प्रयोगशाळांमधून एकच निष्कर्ष आला. तो म्हणजे तिथे सोन्याच्या कोणताही अंश सापडला नाही.

ज्या लोकांनी त्यांची बचत या कंपनीत गुंतवली होती त्यांच्यासाठी या गोष्टीचा काय अर्थ होता?

1997 पर्यत खाणीच्या ठिकाणी खोदकाम सुरू होतं

फोटो स्रोत, Warren Irwin

फोटो कॅप्शन, 1997 पर्यत खाणीच्या ठिकाणी खोदकाम सुरू होतं

फ्रीपोर्ट-मॅकमोरॅन कंपनीकडून वॉल्श आणि फेल्डरहॉफ यांना नवीन माहिती कळवण्यात आली. त्यांनी ती डी गुझमनला कळवली, त्यावेळेस गुझमन टोरोन्टोमध्ये एका परिषदेत होता. त्यांनी त्याला बुसांगला परतून फ्रीपोर्ट-मॅकमोरॅन कंपनीच्या टीमला याबाबतचं स्पष्टीकरण देण्यास सांगितलं.

डी गुझमन कॅनडातून सिंगापूरमार्गे परतला. सिंगापूरला त्याने त्याची पत्नी जेनी आणि त्याचा मुलगा, मुलगी यांच्याबरोबर काही वेळ घालवला.

त्याच्या शेवटच्या तासांची माहिती जेनिफर वेल्स या आणखी एका कॅनेडियन पत्रकारानं गोळा केली आहे.

जेनिफर म्हणतात, डी गुझमननं त्याच्या आयुष्याची शेवटची संध्याकाळ ब्रे-एक्स मिनरल्सची कर्मचारी रुडी वेगा बरोबर बालिकपापन या शहरात घालवली. हे शहर बुसांगच्या खाणीच्या दक्षिणेस 100 मैलांपेक्षा अधिक अंतरावर आहे.

वेगा कंपनीच्या फिलिपिनो संशोधक टीमचा भाग होती. तिलाही फ्रीपोर्ट-मॅकमोरॅन कंपनीसमोर हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी डी गुझमनबरोबर जायचं होतं.

इंडोनेशियन पोलिसांना वेगानं नंतर दिलेल्या माहितीनुसार, ते दोघेही कराओके बारमध्ये गेले होते. हॉटेलमधल्या आपल्या खोलीत परतल्यानंतंर डी गुझमननं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, असं रुडी वेगानं सांगितलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी डी गुझमन आणि वेगा हेलिकॉप्टरनं सामरिंडाला गेले. हे शहर बुसांगपासून जवळ आहे.

डी गुझमन त्यानंतर खाणीकडे जाण्यासाठी पुन्हा हेलिकॉप्टरमध्ये बसला. मात्र, यावेळेस वेगा त्याच्यासोबत नव्हती.

हेलिकॉप्टरमध्ये त्यावेळेस डी गुझमन बरोबर दोन माणसं होती. त्यातील एक मेंटेनन्स तंत्रज्ञ होता तर दुसरा पायलट होता. मात्र यावेळेस पायलट हा वेगळा व्यक्ती होता. बुसांगच्या खाणीसाठी जाताना जो पायलट नेहमी असायचा त्याच्याऐवजी एक इंडोनेशियन हवाई दलाचा पायलट हेलिकॉप्टर उडवत होता. सामारिंडा इथं डी गुझमननं घेतलेला थांबा देखील विचित्र होता. एरवी डी गुझमन बालिकपापनवरून थेट बुसांगला जात असे.

मायकल डी गुझमनचा जन्म फिलिपाईन्समध्ये झाला होता

फोटो स्रोत, Genie de Guzman

फोटो कॅप्शन, मायकल डी गुझमनचा जन्म फिलिपाईन्समध्ये झाला होता

सुरूवातीला एकदा जबाब दिल्यानंतर हेलिकॉप्टरचा पायलट या प्रवासाविषयी क्वचितच बोलला आहे. मात्र डी गुझमनला जे काही झालं त्यात आपला सहभाग असण्याच्या गोष्टीचा त्याने इन्कार केला आहे. त्याचबरोबर नक्की काय झालं ते त्यानं पाहिलं नसल्याचं सांगितलं आहे, असं विल्टन सांगतात.

19 मार्च 1997 ला स्थानिक वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता डी गुझमनचा मृत्यू झाला.

हेलकॉप्टरमध्ये एक हस्तलिखित पत्र सापडलं आहे आणि चार दिवसानंतर घनदाट जंगलातून एक मृतदेह हस्तगत करण्यात आला.

डी गुझमनच्या मृत्यूनंतर सहा आठवड्यांनी बुसांगचं सोनेरी स्वप्न प्रत्येकासाठी संपलेलं होतं. गुंतवणूकदारांसाठी फक्त निराशा शिल्लक राहिलेली होती.

त्यानंतर ब्रे-एक्स मिनरल्स कंपनीचे 6 अब्ज कॅनेडियन डॉलरचं बाजारमूल्य शून्यावर आलेलं होतं.

एका स्वतंत्र बातमीतून हे स्पष्ट झालं की, बुसांगच्या त्या खाणीत कोणतंही सोनं अजिबात नव्हतं. 1995 ते 1997 दरम्यानचे खनिजांचे नमुने तपासण्यास आले. त्यामध्ये या नमुन्यांना सॉल्टिंग नावाच्या प्रक्रियेद्वारे छेडखानी करण्यात आल्याचं आढळून आलं. दुसऱ्या एका स्त्रोतातून सोन्याचे कण या नमुन्यांमधील दगडांवर सॉल्टहॅकरच्या मदतीनं फवारण्यात आले होते. जेणेकरून त्यात सोनं आढळण्याचा खोटा निष्कर्ष काढता येईल.

जवळपास 30 वर्षांनंतर सुद्धा या घोटाळ्यासाठी कोणालाही जबाबदार ठरवण्यात आलेलं नाही.

पत्रकार सुझान विल्टन यांनी फिलिपाईन्समधील मनिला येथील डी गुझमनच्या थडग्याला भेट दिली.
फोटो कॅप्शन, पत्रकार सुझान विल्टन यांनी फिलिपाईन्समधील मनिला येथील डी गुझमनच्या थडग्याला भेट दिली.

वॉल्श यांनी पुन्हा पुन्हा सांगितलं की त्यांना याबद्दल काहीच माहित नाही. त्यांचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं 1998 मध्ये मृत्यू झाला. 2007 मध्ये एका कॅनेडियन न्यायाधीशानं निकाल दिला की फेल्डरहॉपला या घोटाळ्याबद्दल काहीच माहित नव्हतं आणि इनसायडर ट्रेडिंगमध्येदेखील (कंपनीच्या अंतर्गत माहितीच्या जोरावर केलेली शेअर्सची खरेदी-विक्री) तो दोषी नाही. फेल्डरहॉफचा 2019 मध्ये मृत्यू झाला.

यामुळे आपण पुन्हा डी गुझमनकडे परततो. या घोटाळ्याचा खरा सूत्रधार आपण आहोत हे वास्तव लोकांना सांगणं टाळलं जावं यासाठी तर त्याने आत्महत्या केली नाही ना?

विल्टन म्हणतात, गुझमनचे आत्महत्या करण्यापूर्वीच्या पत्रातून काही प्रश्न निर्माण होतात.

या पॉडकास्टसाठी फेल्डरहॉफचा चुलत भाऊ सुझेन फेल्डरहॉफ म्हणाला की डी गुझमननं हे पत्र लिहिलं असेल याविषयी त्यानं शंका व्यक्त केली आहे.

या पत्रात गुझमनच्या आजारपणाबद्दल लिहिलं आहे. मात्र त्याच्या नातेवाईकांनी तो आजारपणाबद्दल काही तक्रार करत असल्याचं कधीच ऐकलं नव्हतं, असं विल्टन सांगतात.

विल्टन सांगतात ब्रे-एक्स मिनरल्सच्या वित्तीय व्यवस्थापकाला गुझमन यांच्याकडून आत्महत्येपूर्वी आणखी एक पत्र लिहिण्यात आलं होतं. मात्र डी गुझमन या व्यक्तीला प्रत्यक्षात ओळखत नव्हते. या पत्रात डी गुझमनच्या एका पत्नीच्या नावाची स्पेलिंग चुकीची लिहिण्यात आली आहे.

ऑटोप्सीचा अहवाल जाहीर झाल्यानंतर गुझमनच्या कुटुंबानं संबंधित पुरावे तपासण्यासाठी एक फिलिपिनो टीमची नियुक्ती केली होती. डॉ. बेनिटो मोलिनो त्या टीमचे सदस्य होते.

जंगलात सापडलेल्या मृतदेहाच्या फोटोमध्ये गुझमनच्या गळ्यावर जखमा आढळून आल्या असल्याचं मोलिनो सांगतात. त्यावरून त्यांनी डी गुझमनचा मृत्यू गळा आवळून झाल्याचा निष्कर्ष काढला.

"त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच मृत्यू आत्महत्या वाढावा यासाठी त्याला हेलिकॉप्टरमधून खाली जंगलात फेकून देण्यात आलं असावं," असं मोलिनो यांनी पॉडकास्टमध्ये सांगितलं.

"मोठ्या गुन्ह्यांमध्ये नेहमीच एका व्यक्तीवर दोष टाकला जातो. त्यामुळे या घोटाळ्याचा खरा सूत्रधार सापडेल यावर आमचा विश्वास नाही."

मायकल डी गुझमन ज्युनियर सुद्धा भूवैज्ञानिक आहे
फोटो कॅप्शन, मायकल डी गुझमन ज्युनियर सुद्धा भूवैज्ञानिक आहे

तो मृतदेह तरी डी गुझमनचा आहे का?

सुरूवातीच्या माहितीवरून, असं दिसतं की ती व्यक्ती चार दिवसांपूर्वीच मृत पावलेली आहे. मृतदेह शोधण्यासाठी इतका वेळ लागला होता, असं फोरेन्सिक मानववंशशास्त्रज्ञ (आंथ्रपोलोजिस्ट) डॉ. रिचर्ड टॅडुरन सांगतात. त्यांनी मोलिनो बरोबर काम केलं.

डी गुझमनची पत्नी जेनीचं देखील म्हणणं आहे की जो मृतदेह सापडला त्याचे दात जसेच्या तसे होते तर तिच्या पतीला खोटे दात बसवण्यात आलेले होते. डी गुझमनच्या दातांचा अहवाल त्याच्या कुटुंबाकडून कधीही जाहीर करण्यात आला नाही, असं विल्टन सांगतात.

जेनी डी गुझमनचे मित्र आणि भूगर्भतज्ज्ञ मंसूर गिगर सांगतात की, त्यांनी तिला सांगितलं होतं की तिचा पती अद्याप जिवंत आहे आणि तो दक्षिण अमेरिकेत पळून गेला आहे. गिगर यांना वाटतं की डी गुझमन सध्या केमन बेटांवर राहतो आहे.

आपल्या मृत्यूचा बनाव रचण्यासाठीच डी गुझमन यानेच हेलिकॉप्टरमध्ये एक मृतदेह ठेवला होता का? तो त्या हेलकॉप्टरमध्ये चढला तरी होता का?

जिनी आणि गुझमनच्या मुलाला वाटतं की त्याचे वडील अद्याप जिवंत आहेत. त्याच्या आईनंच त्याला असं सांगितलं आहे.

त्याच्या वडिलांप्रमाणेच तोदेखील एक भूगर्भतज्ज्ञ आहे आणि वडिलांचा वारसा पुढे चालवण्याची जिद्द बाळगून आहे. मात्र यावेळेस तो वारसा योग्य मार्गानं पुढे नेण्याची त्याची इच्छा आहे.

"कदाचित मी स्वत:च्या खाणी सुरू करू शकेन. काही गुंतवणुकदार मिळवू शकेन आणि माईक डी गुझमनपेक्षा अधिक चांगला व्यक्ती बनू शकेन." असं मायकल डी गुझमन ज्युनियर म्हणतो.