कोलार गोल्ड फिल्डचा (KGF) इतिहास, या खाणीतून 121 वर्षं काढलं जात होतं सोनं

यश

फोटो स्रोत, KGF Facebook

    • Author, हर्षल आकुडे,
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"कह देना उनको की मैं आ रहा हूँ, अपनी KGF लेने..."

KGF-2 चित्रपटातील अभिनेता संजय दत्तचा हा डायलॉग...

या चित्रपटाने प्रदर्शनापासूनच कमाईचे अनेक विक्रम मोडले होते.

KGF-2 चित्रपटात कन्नड सुपरस्टार यश प्रमुख भूमिकेत होता. त्याच्यासोबत संजय दत्त, रवीना टंडन आणि प्रकाश राज या अभिनेत्यांनीही काम केले आहे.

हा मूळ कन्नड चित्रपट आहे. याचा पहिला भाग 21 डिसेंबर 2018 रोजी कन्नड, तेलुगू, तमीळसह हिंदी डबिंगमध्येही प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटालाही देशभरातून तुफान प्रतिसाद मिळाला.

अखेर, या निमित्ताने ही प्रतिक्षा संपणार आहे. या पार्श्वभूमीवर कोलार गोल्ड फिल्ड काय आहे? त्याचा इतिहास काय आहे? सिनेमात दाखवल्याप्रमाणे तो तितकाच रक्तरंजित आहे का?

KGF चा इतिहास

KGF अर्थात कोलार गोल्ड फिल्ड्स हा कर्नाटक राज्याच्या दक्षिण-पूर्वेकडे स्थित कोलार जिल्ह्यातील खाणींचा परिसर.

कोलार जिल्ह्याच्या मुख्यालयापासून दक्षिणेस 30 किलोमीटर वर रॉबर्टसनपेट तालुक्यात हे ठिकाण आहे. बंगळुरू-चेन्नई महामार्गावर बंगळुरुच्या पूर्वेकडे सुमारे 100 किलोमीटर अंतरावर KGF टाऊनशीप वसलेली आहे.

कर्नाटक

द क्विंट वेबसाईटने KGF च्या शोधाचा रंजक इतिहास एका बातमीत दिला आहे. या बातमीनुसार, "स्वातंत्र्यपूर्व काळात 1871 साली ब्रिटिश सैन्यातील मायकल फिट्झगेराल्ड लॅव्हेली हे नुकतेच न्यूझीलंड येथील युद्ध आटोपून भारतात दाखल झाले होते. त्यांच्या निवृत्तीच्या दिवसांत त्यांनी बंगळुरू आपलं निवासस्थान बनवलं. या काळात लॅव्हेली आपला बराच काळ वाचन करण्यात घालवत असत."

दरम्यान, त्यांनी 1804 मध्ये एशियाटिक जर्नलमध्ये प्रकाशित झालेला एक चार पानी लेख वाचला. या लेखात कोलार येथे आढळून येणाऱ्या सोन्याबाबत उल्लेख होता. याच लेखामुळे लॅव्हेली यांची उत्सुकता वाढीस लागली.

याविषयी संशोधन करत असताना ब्रिटिश सरकारमधील लेफ्टनंट जॉन वॉरन यांचा एक अहवाल लॅव्हेली यांच्या हाती लागला.

लॅव्हेली यांना मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरंगपट्टणम लढाईत इंग्रजांनी टीपू सुलतान यांना ठार केल्यानंतर 1799 मध्ये कोलार आणि परिसर इंग्रजांच्या ताब्यात आला.

कालांतराने इंग्रज सरकारने टीपूकडील भूभाग म्हैसूर संस्थानाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला. मात्र कोलार परिसरात सर्वेक्षण करण्यासाठी हा भूभाग आपल्याकडेच ठेवून घेतला.

सोन्याचा शोध

चोल साम्राज्याच्या काळात या परिसरात लोक केवळ हातांनी खणून-उकरून सोनं जमिनीतून काढायचे, अशा चर्चाही तत्कालीन लेफ्टनंट जॉन वॉरन यांनी ऐकल्या होत्या.

या सर्व चर्चा ऐकल्यानंतर वॉरन यांनी कोलारमधील सोन्याबाबत माहिती देणाऱ्या व्यक्तीसाठी एक बक्षीस जाहीर केलं.

काही दिवसांनी कोलारमधील ग्रामस्थ चक्क बैलगाड्या घेऊनच त्यांच्यासमोर हजर झाले. या बैलगाड्यांमध्ये कोलार परिसरातील चिखल भरलेला होता. वॉरन यांच्यासमोरच सगळा चिखल धुवून काढला गेला. या चिखलात त्यांना सोन्याचाअंश-तुकडे आढळून आले.

यानंतर वॉरन यांनी यासंदर्भात अधिक तपास केला. त्यानुसार, कोलार येथील नागरिक वापरतात, त्या पद्धतीने हातांनी उकरून खोदकाम केल्यास येथील जमिनीतून दर 56 किलो मातीतून अंदाजे गुंजभर सोनं काढता येऊ शकतं, असा निष्कर्ष वॉरन यांनी काढला.

संजय दत्त

फोटो स्रोत, KGF Facebook

तंत्रज्ञानाचा वापर करून तसंच विशेष कौशल्य असलेल्या व्यक्तींकडून हे काम करवून घेतल्यास आणखी जास्त सोनं बाहेर काढता येऊ शकतं, असं मतही वॉरन यांनी व्यक्त केलं.

वॉरन यांच्या अहवालानंतर 1804 ते 1860 दरम्यान या भागात अनेक अभ्यास आणि सर्वेक्षण झाले. पण यांमधून इंग्रज सरकारला फारसं काही हाती लागलं नाही. उलट, जमिनीखाली खोदकाम करत असताना अपघातांमुळे काही प्रमाणात जीवितहानीही याठिकाणी झाली. त्यामुळे नंतर याठिकाणी खोदकाम करण्यावर बंदी घालण्यात आली होती.

1871 मध्ये वॉरन यांचाच अहवाल वाचून लॅव्हेली यांच्या मनात कोलारविषयी उत्सुकता निर्माण झाली. लॅव्हेली तडक बैलगाडीत बसून बंगळुरू ते कोलार 100 किलोमीटर प्रवासासाठी निघाले.

याठिकाणी दोन वर्षे अभ्यास केल्यानंतर 1873 मध्ये लेफ्टनंट वॉरन यांनी म्हैसूरच्या महाराजांकडे याठिकाणी खोदकाम करण्यासाठी परवानगीचा अर्ज केला. लॅव्हेली यांनी कोलार परिसरात खोदकाम करण्याचा 20 वर्षांचा परवाना मिळवून याठिकाणी 1875 मध्ये काम सुरू केलं.

सुरुवातीची काही वर्षे लॅव्हेली यांचा वेळ कामाचा निधी उभं करणं, मदतीसाठी लोकांना तयार करणं या गोष्टींमध्ये खर्च झाला. अखेर, अनेक अडचणींनंतर KGF मधून सोनं मिळवण्याचं काम प्रत्यक्षात सुरू होऊ लागलं.

वीज पोहोचलेलं भारतातलं पहिलं शहर

सुरुवातीच्या काळात KGF मध्ये खाणीत प्रकाशासाठी मशाली, रॉकेलचे कंदील यांच्या मदतीने प्रकाशयोजना करण्यात आली होती. पण या कामासाठी ती पुरेशी नव्हती. त्यामुळे याठिकाणी वीजेचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे वीज पोहोचलेलं भारतातलं पहिलं शहर म्हणून KGF ची ओळख बनली.

कोलार गोल्ड फिल्ड्सची वीजेची मागणी पूर्ण करण्यासाठी येथून 130 किलोमीटर अंतरावर कावेरी विद्युत केंद्र उभारण्यात आलं.

केजीएफ

फोटो स्रोत, KGF Facebook

हे आशिया खंडातील जपाननंतरचं केवळ दुसरं विद्युत केंद्र ठरलं. शिवनसमुद्र याठिकाणी याची उभारणी करण्यात आली होती.

KGF हे भारतात पूर्णपणे वीज पोहोचलेलं पहिलं शहर बनलं. वीजनिर्मितीनंतर KGF ला अखंडीत वीजपुरवठा करण्यात येऊ लागला. सोन्याच्या खाणींमुळे बंगळुरू आणि म्हैसूर या मोठ्या शहरांच्या तुलनेत KGF लाच प्राधान्य देण्यात येत असे.

KGF मध्ये वीज पोहोचल्यानंतर येथील सोन्याचं उत्खनन आणखी वाढवण्यात आलं. खोदकाम आणखी खोलवर करण्यासाठी खाणीत प्रकाशयोजना करून विविध प्रकारच्या मशीन्स कामात जुंपण्यात आल्या.

1902 मध्ये केजीएफ येथे भारतातील 95 टक्के सोन्याचं उत्पादन होत होतं. 1905 मध्ये सोन्याचं खाणकाम करण्याच्या बाबतीत भारत जगात सहाव्या क्रमांकावर होता.

लिटिल इंग्लंड

KGF मध्ये सोनं सापडल्यानंतर येथील चित्रच पालटून गेलं.

तत्कालीन ब्रिटिश अधिकारी, अभियंते या परिसरात घरे बांधून राहू लागले. इथलं हवामानसुद्धा इंग्लंडप्रमाणेच थंड होतं. त्यामुळे ब्रिटिशांना हे ठिकाण आवडू लागलं. ब्रिटिश शैलीत बांधलेल्या घरांमुळे याठिकाणी इंग्लंडमध्ये आल्याचा भास होत असे.

केजीएफ

फोटो स्रोत, KGF Facebook

डेक्कन हेराल्डच्या बातमीनुसार, याच कारणामुळे KGF ला लिटिल इंग्लंड असं संबोधलं जाऊ लागलं होतं. KGF च्या पाण्याची गरज भागवण्यासाठी ब्रिटिश सरकारने जवळच एक तलावही बांधलं. येथून KGF पर्यंत पाण्याचे पाईपलाईन टाकण्यात आले. पुढील काळात हेच तलाव या परिसरातलं आकर्षणाचं केंद्र बनलं. ब्रिटिश अधिकाऱ्यांसह स्थानिक नागरीक याठिकाणी पर्यटनासाठी जाऊ लागले.

दुसरीकडे, सोन्याच्या खाणींमुळे याठिकाणी आजूबाजूच्या राज्यांतून येणाऱ्या कामगारांची संख्याही वाढू लागली होती. 1930 च्या सुमारास याठिकाणी तब्बल 30 हजार कामगार कार्यरत होते. त्या कामगारांचे कुटुंबीय आजूबाजूच्या परिसरात राहत असत.

राष्ट्रीयीकरण

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केंद्र सरकारने हा परिसर आपल्या ताब्यात घेतला. 1956 मध्ये येथील खाणीचं राष्ट्रीयीकरण करण्यात आलं. 1970 मध्ये BGML म्हणजेच सरकारच्या भारत गोल्ड माईन्स लिमिटेड कंपनीने याठिकाणी काम सुरू केलं.

केजीएफ

फोटो स्रोत, Twitter

सुरुवातीच्या यशानंतर कंपनीच्या नफ्याचा आलेख दिवसेंदिवस खालावतच गेला. 1979 येईपर्यंत अशी स्थिती आली की कंपनीला आपल्या कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर देणंसुद्धा कठीण झालं होतं.

कधीकाळी भारतातील 95 टक्के सोन्याचं उत्खनन करणाऱ्या KGF ला ऐंशीच्या दशकानंतर उतरती कळा लागली.

त्यावेळी अनेक कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. कंपनीचा तोटा दिवसेंदिवस वाढतच होता. अखेर येथून मिळणाऱ्या सोन्यापेक्षा ते मिळवण्यासाठीचा खर्च जास्त अशी परिस्थिती ओढावली.

या पार्श्वभूमीवर, अखेर 2001 भारत गोल्ड माईन्स लिमिटेड कंपनीने येथील खाणकाम थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे येथील वातावरण गेल्या काही वर्षांत निर्मनुष्य आणि भयाण बनलं.

मोदी सरकारकडून पुन्हा काम सुरू करण्याचे संकेत

KGF येथील खाणकाम तब्बल 121 वर्षांपेक्षाही जास्त काळ सुरू होतं. 2001 पर्यंत सलग खोदकाम करण्यात आलं. येथील खाणीतून 121 वर्षांत तब्बल 900 टनांपेक्षा जास्त सोनं काढण्यात आल्याची नोंद आहे.

खाणकाम बंद झाल्यापासून 15 वर्षे KGF मधील सगळंच काम ठप्प होतं. पण नरेंद्र मोदी सरकारने 2016 साली या ठिकाणचं काम पुन्हा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.

KGF मधील खाणींमध्ये अजूनही बरंच सोनं असल्याचं म्हटलं जातं. 2016 साली केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने KGF चं काम पुन्हा करण्यासाठी लिलाव घोषित केला होता. पण याविषयी पुढे काय झालं, याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)