बँकेत लॉकर कसा उघडायचा? लॉकरची चावी हरवली तर काय करायचे? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरं

फोटो स्रोत, Getty Images
बँक लॉकर ही तुमच्या मौल्यवान गोष्टी, महत्त्वाची कागदपत्रं ठेवण्यासाठीची सुरक्षित जागा मानली जाते. बहुतेक बँकांमध्ये, शाखांमध्ये लॉकरची सुविधा असते.
पण बँकेत लॉकर कसा उघडायचा? त्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते? लॉकरमध्ये कोणतं सामान ठेवता येतं आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुमच्या लॉकरची चावी हरवली तर नेमकं काय करायचं?
सर्वांत आधी बँक लॉकर कुठे उघडायचा? तर जवळच्या अशा शाखेत जिथे जाणं-येणं तुमच्यासाठी सोपं आहे आणि सर्व्हिसही चांगली आहे. हो, त्या बँकेत आधीपासून तुमचं खातं असणं गरजेचं आहे, कारण म्हणजे तुम्हाला तुमचा लॉकर वापरता येईल.
लॉकर मिळावा यासाठी तुमचा त्या बँकेत करंट किंवा सेव्हिंस अकाऊंट - बचत खातं असायला हवं.
लॉकर उघडण्याची प्रक्रिया काय?
लॉकरसाठी अर्ज करताना तुम्हाला ओळखपत्र - identity proof, पासपोर्ट साईझ फोटो द्यावा लागतो.
लॉकर उघडण्यासाठीच्या या प्रक्रियेमध्ये बँक तुमच्यासोबत लॉकर अॅग्रीमेंट करते. लॉकर वापरण्यासाठीच्या अटी आणि नियम या करारात असतात. असा करार करणं कायदेशीररीत्या बंधनकारक आहे. आणि यावर बँक अधिकारी आणि ग्राहक या दोघांची सही असणं आवश्यक आहे.
साधारणपणे कोणत्याही बँकेत वेगवेगळ्या साईझचे लॉकर्स उपलब्ध असतात. त्यातून तुम्ही तुमच्या गरजेनुसार लहान - मध्यम किंवा मोठ्या साईझचा लॉकर निवडायचा असतो.
अनेकदा बँकेमध्ये या लॉकरसाठी वेटिंग लिस्टही असते. अशावेळी तुम्हाला तुमची मागणी नोंदवून वाट पहावी लागू शकते. किंवा मग दुसऱ्या शाखेत लॉकर उपलब्ध आहे का, ते देखील तपासता येईल.

फोटो स्रोत, Getty Images
लॉकर घेण्यासाठी बँकेत ठराविक सिक्युरिटी डिपॉझिट ठेवावं लागतं किंवा मग काही बँका ठराविक कालावधीचं फिक्स्ड डिपॉझिट करून घेतात. लॉकर बंद केल्यावर ही रक्कम तुम्हाला परत मिळते.
बँकेची शाखा कुठे आहे, तुम्ही किती मोठा लॉकर घेतलाय यानुसार तुम्हाला लॉकरचं भाडं भरावं लागतं. मोठ्या साईझच्या लॉकरचं भाडं जास्त असतं.
लॉकर वापरण्याचे नियम काय?
ज्याप्रमाणे कार्ड वापरून ATM मधून ठराविक वेळा कोणत्याही चार्जशिवाय पैसे काढता येतात, आणि मग नंतर त्यावर फी आकारली जाते - तसंच ठराविक वेळा तुम्हाला लॉकर फ्री ऑपरेट करता येतो. त्यापेक्षा जास्त वेळा लॉकर ऑपरेट केल्यावर फी भरावी लागते.

फोटो स्रोत, Getty Images
बँकेत लॉकर उघडताना कुटुंबातल्या कुणा सदस्याला नॉमिनी करणं आवश्यक आहे. म्हणजे लॉकरधारकाचं निधन झालं तर अशावेळी लॉकरचा वापर करणं शक्य होऊ शकतं, ती व्यक्ती लॉकरची जबाबदारी घेऊ शकते.
आता तुम्ही तुमच्या बँक लॉकरसाठी एकाऐवजी 4 नॉमिनी ठेवू शकता.
बँक लॉकरमध्ये कोणत्या गोष्टी ठेवल्या जाऊ शकतात?
दागिने ठेवू शकता. तुमची प्रॉपर्टीची कागदपत्रं ठेवू शकता किंवा इतर कोणती महत्त्वाची गोपनीय कागदपत्रं ठेवू शकता.
बँक लॉकरमध्ये किती दागिने ठेवू शकतो, यावर काही मर्यादा आहे का? तर रिझर्व्ह बँकेने अजून यासाठीची कोणतीही कमाल मर्यादा ठरवलेली नाही.
पण मग लॉकरमध्ये ठेवता येणार नाही, अशा काही गोष्टी आहेत का?
तुम्ही लॉकरमध्ये कॅश ठेवू शकत नाही. परकीय चलन ठेवता येणार नाही. कोणतंही हत्यार बँक लॉकरमध्ये ठेवता येणार नाही. सोबतच कोणतीही धोकादायक वस्तू लॉकरमध्ये ठेवता येत नाही.
लॉकरमधून एखादी गोष्ट गायब झाली तर?
लॉकर सुरक्षित असतो असं आपल्याला वाटतं. पण खरंच लॉकर 100% रिस्क फ्री असतो का?
समजा लॉकरमधून एखादी गोष्ट गायब झाली तर ती जबाबदारी कुणाची?
लॉकरमध्ये ठेवलेल्या गोष्टींची जबाबदारी आपली नाही - हे बँकेने आधीच स्पष्ट जाहीर केलेलं असतं.
म्हणूनच तुम्ही लॉकरमध्ये जी मौल्यवान वस्तू वा दागिने ठेवणार असाल, त्याचा इन्शुरन्स काढणं चांगलं.

फोटो स्रोत, Getty Images
पण समजा लॉकरमधून काही चोरीला गेलंच, गायब झालं तर बँकेची काहीच जबाबदारी नाही का?
बँकेची जबाबदारी ही मर्यादित स्वरुपातच असते.
या बाबतीत लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या 100 पटींपर्यंतच बँकेची आर्थिक जबाबदारी असेल. म्हणजे जर तुमच्या लॉकरचं वार्षिक भाडं रु. 5000 असेल, तर तुम्हाला 5 लाखांपर्यंतच्या नुकसानापासून संरक्षण मिळेल. हे कव्हरेज आग, चोरी, दरोडा पडणं, इमारत कोसळणं यासारख्या घटनांसाठी असतं.
म्हणूनच लॉकरमध्ये दागिन्यांसारख्या मौल्यवान गोष्टी ठेवताना त्यांचं मूल्यांकन करून त्यानुसार त्याचा विमा काढा, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
लॉकरची चावी हरवली तर काय?
बँकेच्या लॉकरच्या दोन चाव्या असतात. एक लॉकर धारकाकडे असते. या चावीची कोणतीही डुप्लिकेट चावी नसते. दुसरी चावी असते बँकेकडे. पण दोन्ही चाव्या एकत्रित लावल्याशिवाय लॉकर उघडता येत नाही.
मग एखाद्या व्यक्तीक़डून लॉकरची चावी हरवली तर? कारण जर लॉकरची कोणतीही डुप्लिकेट चावी नसेल तर लॉकर कसा उघडता येणार?

फोटो स्रोत, Getty Images
अशा परिस्थितीत एकमेव पर्याय असतो, तो म्हणजे लॉकर तोडणे. हे काम बँकेचे अधिकृत तंत्रज्ञ करतात. सर्वांत पहिल्यांदा लॉकर धारकाची ओळख पटवली जाते. पूर्ण प्रक्रिया त्याच्या उपस्थितीतच पार पडते.
या पूर्ण प्रक्रियेत याचीही काळजी घेतली जाते की, एक लॉकर तोडताना दुसऱ्या लॉकरचं कोणतंही नुकसान होता कामा नये.
लॉकरची चावी हरवल्यावर काय करायचं?
सर्वांत आधी तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन लेखी तक्रार करायची आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या लॉकरचा नंबर, ज्या ब्रँचमध्ये तुमचं अकाउंट आहे, त्या ब्रँचचं नाव आणि बाकी माहिती भरावी लागते.
त्याचबरोबर तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एक एफआयआरही दाखल करावी लागते. त्या एफआयआरची एक कॉपी तुम्ही बँकेत जो अर्ज देणार आहात, त्यासोबत जोडावी लागते.
हरवलेली चावी सापडलीच तर ती पुन्हा बँकेत जमा केली जाईल असं हमीपत्रही ग्राहकांना बँकेला द्यावं लागतं.
आपली ओळख पटवण्यासाठी पॅन कार्ड किंवा आधारकार्डची कॉपीही जमा करावी लागते.
लॉकर तोडण्याचा खर्च कोणाचा?
लॉकर तोडण्यापासून ते नवीन लॉकर घेण्यापर्यंतचा खर्च ग्राहकांनाच करावा लागतो. हा खर्च तुमच्या लॉकरचा आकार आणि बँकेवर अवलंबून असतो.
बँक या खर्चाची पूर्वकल्पना ग्राहकाला आधीच देत असते. बँकेच्या लॉकरच्या चावीची पूर्ण जबाबदारी ग्राहकावर असते.
बँक लॉकरबद्दलचं अॅग्रीमेंट करत असतानाच चावी हरवल्यावर त्याची जबाबदारी ग्राहकावर असेल हे स्पष्ट केलेलं असतं.
सगळी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केल्यावरही बँक लॉकर उघडायला मनाई करू शकते का?
या बाबतीत आरबीआयच्या स्पष्ट सूचना आहेत. बँक असं करू शकत नाही. विनाकारण चालढकल केली तर ग्राहक बँकिंग ओम्बुड्समॅन, कन्झ्युमर कोर्ट किंवा न्यायालयात दाद मागू शकतात.
लॉकर Break Open म्हणजे फोडून उघडण्याची परवानगी बँकेला असते?
काही अपवादात्मक परिस्थितीत बँक तुमचा लॉकर उघडू शकते.
तर तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये अवैध वस्तू ठेवल्याची माहिती बँकेला मिळाली तर बँक असं करू शकते.
जर तुम्ही सलग 3 वर्षं बँक लॉकरचं भाडं भरलं नाही, तर बँक लॉकर उघडू शकते.
आणि समजा लॉकर ज्या व्यक्तीच्या नावावर आहे तिचा वा त्याचा मृत्यू झाला, आणि नॉमिनी नाही - तर अशा परिस्थितीत बँकेला हा अधिकार असतो.
पण त्या आधी बँकेला यासाठी नोटीस प्रसिद्ध करावी लागते. या नोटिशीला उत्तर मिळालं नाही तरच बँक अधिकारी आणि तटस्थ साक्षीदारांसमोर एखादा लॉकर उघडला जाऊ शकतो.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











