स्वतःला 'फिल्म लाइन की आखरी मुघल' म्हणणाऱ्या आशा भोसलेंना सुरुवातीला का मिळाले होते रिजेक्शन

आशा भोसले आणि लता मंगेशकर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आशा भोसले आणि लता मंगेशकर
    • Author, वंदना
    • Role, सीनियर न्यूज एडिटर, आशिया

"मैं फिल्म लाइन की आख़िरी मुघल हूँ"

दोन वर्षांपूर्वी आशा भोसले यांनी जेव्हा हे विधान केलं होतं, तेव्हा त्याची खूप चर्चा झाली होती.

8 सप्टेंबर 1933 ला जन्मलेल्या आशा भोसले यांनी 1943 साली म्हणजे वयाच्या दहाव्या वर्षापासून गायला सुरुवात केली होती.

आज (8 सप्टेंबर 2024) त्यांचा 91 वा जन्मदिन.

हंसराज बहल, ओपी नय्यर, मदन मोहन, आरडी बर्मन, इलयाराजा, अनु मलिकपासून एआर रहमानपर्यंत अनेक संगीतकारांसोबत त्यांनी काम केलं आहे.

रफी, मुकेश आणि किशोरपासून अगदी बॉय जॉर्ज ते आदित्य नारायण पर्यंत वेगवेगळ्या पिढीच्या गायकांसोबत त्यांनी गाणी गायली आहेत.

1995 साली उस्ताद अली अकबर खाँ यांच्यासोबतच्या एका अल्बमसाठी त्यांना ग्रॅमी पुरस्कारांसाठी नामांकनही मिळालं होतं.

इतक्या वर्षांच्या सांगीतिक प्रवासाला आणि अनुभव शब्दांत मांडण्यासाठीच कदाचित त्यांनी ‘मुघल’ या शब्दाचा वापर केला असावा.

आशा भोसले यांनी 10 हजारांहून अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत. यातल्या प्रत्येक गाण्याची स्वतःची एक गोष्ट आहे.

आज यातल्याच काही मोजक्या गाण्यांबद्दलचे किस्से जाणून घेणार आहोत. स्वतः आशा भोसले यांनीच अनेक इंटरव्ह्यू, कार्यक्रम आणि आपल्या यूट्यूब चॅनेलवर याबद्दलच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

जेव्हा आशा भोसले आणि किशोर कुमार यांना रिजेक्ट केलेलं

1943 मध्ये मराठी चित्रपटांमधून आशा भोसले यांनी पार्श्वगायनाची सुरूवात केली होती.

1945 मध्ये आशा यांना हिंदी गाणी मिळायला सुरूवात झाली. तेव्हा किशोर कुमार आणि आशा भोसले दोघेही नवीन होते.

संगीत दिग्दर्शक खेमचंद प्रकाश संगीत क्षेत्रातलं एक मोठं नाव होतं. आशा भोसले आणि किशोरदा दोघेही गाणं रेकॉर्ड करण्यासाठी खेमचंद प्रकाश यांच्या स्टुडिओत पोहोचले. तिथे म्युझिक रेकॉर्डिस्ट रॉबिन बर्न पण उपस्थित होते.

दोघांनी गायला सुरुवात केली- अरमान भरे दिल की लगन तेरे लिए है.

किशोर कुमार

फोटो स्रोत, NIKITA PUBLICATION

पुढचा किस्सा अनेक पुस्तकं आणि आशा भोसलेंनी दिलेल्या मुलाखतींमध्ये आहे.

झालं असं होतं की, गाण्याचं रेकॉर्डिंग मध्येच थांबवण्यात आलं आणि रॉबिन बर्नजी यांना म्हटलं की, हे गायक काही कामाचे नाहीत.

ते गाणं नंतर तलत महमूद आणि गीता दत्त यांनी ‘जान पहचान’ चित्रपटात राज कपूर आणि नर्गिससाठी गायलं.

दोघांनाही रिजेक्ट करण्यात आलं. आपला आज यावर विश्वास बसणार नाही, पण स्वतः आशा भोसलेंनी ‘मोमेंट्स इन टाइम’ या सीरिजमध्ये आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरून हा किस्सा शेअर केला होता.

यामध्ये त्या सांगतात, “या घटनेनंतर काही वर्षांनी आम्ही दोघं एक गाणं रेकॉर्ड करत होतो- आँखो में क्या जी, रुपहला बादल. अचानक किशोरदा थांबले आणि त्यांनी मला म्हटलं की, पाहा, व्हिलन बसलाय. त्यांचा रोख रॉबिन बॅनर्जी यांच्याकडे होता. त्यांनीच आम्हाला गाण्यातून काढून टाकलं होतं.

जाताना किशोरदांनी म्हटलं, ‘रॉबिनदा, आम्हाला ओळखलं का? तुम्ही आम्हाला काढून टाकलं होतं.’ मी त्यांचा हात पकडून म्हटलं की, दादा जाऊ दे ना...असे होते किशोरदा.”

आशा भोसले

फोटो स्रोत, Getty Images

सुरुवातीला आलेल्या अडचणींनंतरही आशा भोसलेंनी जे यश मिळवलं त्याबद्दल संगीत क्षेत्रातील जाणकार राजीव विजयकर सांगतात, “आशा भोसले यांचं वैशिष्ट्यं म्हणजे त्या काळासोबत राहिल्या. जुनं ते सोनं असं त्यांनी कधी मानलं नाही. त्यांच्या आवाजात भजन जितके चांगले वाटतात, तितकेच कॅबरेही. वैविध्य हीच त्यांची ताकद आहे आणि त्या जोरावर त्या इथपर्यंत पोहोचल्या आहेत.

तुम्ही ‘आगे भी जाने न तू’ गाण्याचं उदाहरण घ्या. हे गाण नाइट क्लब नंबर आहे, पण त्यात एक प्रकारचं तत्वज्ञानही आहे. त्यांच्या या गाण्यात एक दर्दही आहे. नाइट क्लबमध्ये चित्रीत केलेल्या या गाण्यात असे भाव आणणं अवघड होतं, आशा भोसले यांनी हे साध्य केलं.”

जेव्हा देव आनंदने ‘दम मारो दम’ गाणं काढून टाकलं होतं...

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

1971 मध्ये देव आनंद यांचा ‘हरे रामा हरे कृष्णा’ हा चित्रपट रिलीज झाला होता. या सिनेमातलं ‘दम मारो दम’ हे गाणं आजही कल्ट मानलं जातं.

मात्र, आनंद बक्षी यांनी लिहिलेलं हे गाणं देव आनंद यांनी सिनेमातून जवळपास काढूनच टाकलं होतं.

हे गाणं तयारही झालं नव्हतं तेव्हाची ही गोष्ट आहे. आशा भोसले तेव्हा नेपाळमध्ये होत्या. त्या एका कॅफेत गेल्या तेव्हा त्यांना एक ओळखीचा चेहरा दिसला. जवळ जाऊन पाहिलं तर ते आरडी बर्मन होते.

‘मोमेंट्स इन टाइम’ या सीरिजमध्ये आशा भोसले सांगतात, “नेपाळच्या कॅफेमध्ये आरडी बर्मन वेगवेगळे स्पूल ऐकत होते. त्यांनी मलाही ते ऐकवले. त्यात कोणतंही संगीत नव्हतं, बोल नव्हते. फक्त वेगवेगळे आवाज होते. आरडी बर्मन यांनी सगळे स्पूल खरेदी केले. महिन्याभरानंतर त्यांनी मला एक गाणं ऑफर केलं. मलाही ते खूप आवडलं.

पण दोन दिवसांनी त्यांनी मला फोन करून सांगितलं की, गाणं सिनेमातून काढण्यात आलंय. हे ऐकल्यावर मी दिग्दर्शकाच्या घरी गेले. मी त्यांना सांगितलं की, हे गाणं चांगलं आहे आणि ते काढू नका. मी खूप आग्रह केला. शेवटी दिग्दर्शकांनी म्हटलं की, तुम्ही एवढा आग्रह करताहात तर मी हे गाणं ठेवतो.”

आशा भोसले- देव आनंद

फोटो स्रोत, Getty Images

ते गाणं होतं- दम मारो दम आणि दिग्दर्शक होते स्वतः देव आनंद.

हे गाणं ऑल इंडिया रेडिओवर बॅन झालं होतं. अनेक लोकांना वाटत होतं की, यात ड्रग्स वगैरे आहे. पण तरीही हे गाणं खूप हिट झालं.

या गाण्यानेच झीनत अमानला रातोरात स्टार बनवलं.

बीबीसीच्या सहयोगी पत्रकार मधु पाल यांच्यासोबत बोलताना राजीव विजयकर सांगतात, “दम मारो दम आशा भोसले यांच्या दहा सर्वोत्तम गाण्यांपैकी एक मानलं जाऊ शकतं. हे गाणं एका ड्रग अडिक्टवर चित्रीत केलं आहे. त्यामुळे गाण्यात थोडाशी मादकता आणि काहीशी बेफिकिर बेहोशी गरजेची होती.

झीनत अमानच्या या हिप्पी कॅरेक्टरचा ‘सूर’ त्यांनी अतिशय सहजतेने पकडला. या गाण्यासाठी आशा भोसलेंना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.”

आजा आजा मैं हू प्यार तेरा- रफी आणि आशावर लागलेली पैज

1966 मध्ये प्रदर्शित झालेला तीसरी मंजील हा सिनेमा आरडी बर्मन आणि शम्मी कपूर या दोघांच्याही करिअरसाठी महत्त्वाचा ठरला.

आशा भोसले आणि शम्मी कपूर दोघांमध्ये खूप चांगले संबंध होते. आशाजी शम्मी यांना ‘भैय्या’ म्हणूनच बोलवायच्या. शम्मी यांना स्वतःला संगीताची खूप उत्तम समज होती. आशाजींच्या रेकॉर्डिंगच्यावेळी अनेकदा शम्मी कपूर यायचे.

‘तीसरी मंजील’मधलं आजा आजा मैं हू प्यार तेरा या गाण्याचा प्रस्ताव घेऊन आरडी जेव्हा आशा भोसलेंकडे गेले होते, तेव्हा ते नवीन होते.

आशा भोसले-आरडी बर्मन

फोटो स्रोत, PANCHAM UNMIXED

‘इंडियन आयडॉल’ या कार्यक्रमात आशा भोसलेंनी या गाण्याशी संबंधित किस्से सांगितले होते.

त्या सांगतात, “बर्मनजींनी ‘आजा आजा मैं हूँ प्यार तेरा’ हे गाणं गायला सुरूवात केली. जेव्हा ते ‘अ आ आजा’ पर्यंत आले, तेव्हा मला धक्काच बसला. मला वाटलं हे आपल्याला जमणार नाही. मी त्यांना म्हटलं की, मी चार-पाच दिवसांनी करते हे.”

“मी ‘ओ हा हा’ची प्रॅक्टिस करत राहायचे. गाडीतही मी प्रॅक्टिस करायचे. सिनेमाचे निर्माते नासिर हुसैन आणि पंचम यांनी रफीजी आणि माझ्यावर 500 रुपयांची पैज लावली होती. दोघांपैकी चांगलं कोण गाईल, यावर पैज होती.

मी खूप घाबरले होते. मी लतादीदींच्या रुममध्ये गेले. तिने मला म्हटलं की, एवढं का घाबरतीयेस? तू आधी मंगेशकर आहेस आणि मग भोसले, हे विसरू नकोस. तुझं गाणं उत्तमच होणार. मी गाणं गायले आणि पंचम माझ्यावर लावलेली 500 रुपयांची पैज जिंकले.”

दिल्ली का ठग- जेव्हा किशोरदांना हवं होतं गाढव

1958 मध्ये किशोर कुमार आणि नूतन यांचा एक चित्रपट आला होता- दिल्ली का ठग.

यामध्ये मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेलं आणि रवी यांनी संगीत दिलेलं एक गाणं होतं- सीएटी कॅट, कॅट माने बिल्ली.

हलक्याफुलक्या गाण्यांच्या यादीत हे गाणं अव्वल मानलं जातं. आशा भोसले आणि किशोर कुमार यांना हे गाणं रेकॉर्ड करायचं होतं. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते एसडी नारंगही तिथे उपस्थित होते.

गाण्याचे बोल प्राण्यांच्या अवतीभोवती रचले होते. C.A.T. कॅट, कॅट माने बिल्ली, R.A.T रॅट, रॅट माने चूहा किंवा G.O.A.T. गोट, गोट माने बकरी L.I.O.N. लायन, लायन माने शेर... दिल है तेरे पंजे में तो क्या हुआ.

आशा भोसले

फोटो स्रोत, Getty Images

आशा भोसलेंनी या गाण्याबद्दल ‘मोमेन्टस इन सॉन्ग’ या व्हीडिओत बोलताना म्हटलं, “आम्ही गाणं गात होतो. अचानक किशोरजींनी चष्मा डोळ्यांवरून खाली घेतला आणि पाहिलं. माझ्या लक्षात आलं की, आता ते काहीतरी मस्करी करणार आहेत.

किशोरदांनी म्हटलं की, मला एक गाढव हवं आहे. गाणं जर जनावरांबद्दल आहे, तर गाढवामुळे फील येईल, असं त्यांचं म्हणणं होतं. दिग्दर्शक नारंग यांना एक सवय होती. ते प्रत्येक गोष्टीत राइट-राइट म्हणायचे. जेव्हा किशोरदांनी आपली ही ‘मागणी’ केली, त्यावरही ते म्हणाले-राइट-राइट.”

त्या पुढे सांगतात की, नारंग यांनी आपल्या टीमला लगेचच गाढव आणायला सांगितलं. पण मला माहीत होतं की, मुंबईत कुठं गाढव मिळणार? मी किशोरदांना म्हटलं, की भूक लागलीये, आपण चहा-बिस्कीट खाऊया. आम्ही जेव्हा परत जात होतो तेव्हा किशोरदांनी मला म्हटलं की, लोक मला वेडसर म्हणतात; पण आज मी सर्वांना गाढव बनवलं.”

‘अब के बरस भेज भईया को बाबुल’ - गाणं गाताना आशा भोसले रडायलाच लागल्या

आशा भोसले एका मोठ्या कुटुंबात वाढल्या. त्यांच्या कुटुंबात लता, उषा, मीना आणि भाऊ हृदयनाथ अशी भावंडं होती. आशा भोसले आणि त्यांच्या भावाचं नातं अतिशय घट्ट आहे.

आशाताईंच्या शब्दात सांगायचं झालं तर त्यांचा भाऊ नेहमी त्यांच्या मांडीवर असायचा. त्याला जे हवं ते तो मला मागायचा. मला घोडा बनवून पाठीवर रपेट मारायचा, आम्हा बहिणींचा तो अगदी लाडका होता.

आशा भोसले यांनी वयाच्या 16-17 व्या वर्षी कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन गणपतराव भोसले यांच्याशी विवाह केला होता हे सगळ्यांनाच माहिती आहे. यानंतर त्यांचं कुटुंबाशी असलेलं नातं काही वर्षं तुटलं होतं. काही वर्षे त्या त्यांच्या भावालाही भेटू शकल्या नव्हत्या.

आशा भोसले-लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर

फोटो स्रोत, Getty Images

"एखादं गाणं गेल्यानंतर ते बराच काळ तुमच्यासोबत कधी राहिलं आहे का?" असा प्रश्न 1991 मध्ये प्रसारित झालेल्या दूरदर्शनच्या एका मुलाखतीत त्यांना विचारण्यात आला.

यावर उत्तर देतांना त्यांनी सांगितलं की, "असं एक गाणं आहे ज्याचा प्रभाव आजही माझ्यावर आहे. खरंतर, मी खूप लवकर लग्न केलं आणि बरीच वर्षे माझ्या भावापासून दूर राहिले. मी त्याला भेटू शकले नव्हते. लहानपणी आई जशी आपल्या मुलाची काळजी घेते तशीच मी माझ्या भावाची काळजी घ्यायचे. मला मुलगा झाला आणि मी त्याच्यात माझा भाऊ शोधत असे. त्यानंतर अनेक वर्षांनी एक गाणं माझ्याकडे आलं. पण एसडी बर्मन साहेब मला वारंवार सांगायचे की, मी हे गाणं नीट गात नाहीये."

"मी म्हटलं की, दादा, मी नेमकं काय करू? मी इतके दिवस गातेय. त्यानंतर अचानक ते माईकवरून म्हणाले की, तुला भाऊ नाहीये का? तुला तुझ्या भावाची आठवण येत नाही का? ते मला एवढंच म्हणाले आणि तिथेच रडायला लागले. बर्मनदा यांनी मला बघितलं आणि मला म्हणाले आता गाणं गा, असं म्हणून ते निघून गेले.

ते गाणे होतं- अबके बरस भेज भैया को बाबूल. आताही मी ते गाणं गायला सुरु केलं की मला रडू येतं."

‘बंदिनी’ चित्रपटातील हे गाणं अभिनेत्री नूतनसोबत तुरुंगात राहणारी एक महिला कैदी गात असते. या गाण्याचे बोल आहेत, "अबके बरस भेज भैया को बाबूल, सावन में लीजो बुलाय रे...”

राजीव विजयकर सांगतात, “आशा भोसले यांची शास्त्रीय गाण्यांवर देखील कॅबरेप्रमाणेच अगदी उत्तम पकड आहे. उदाहरणार्थ- 'देखो बिजली डोले बिन बादल के किंवा तोरा मन दर्पण कहलाए'

ऑस्कर विजेते संगीतकार एमएम किरवाणी सांगतात की, “मी आशाजींना फक्त त्यांच्या पाश्चात्य शैलीतील गाण्यांवरूनच ओळखत होतो. पण आशा भोसलेंची शास्त्रीय गाणी ऐकल्यावर त्यांची माझ्या मनातली प्रतिमा बदलली."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)